सिन्नर तालुक्यातील गोसावी समाज

_Sinnar_Gosavi_Samaj_1.jpg

गोसावी समाज हा सिन्नर तालुक्यामध्ये सर्वत्र पसरलेला आहे. गोसावी समाजाची घरे तालुक्यामध्ये गावोगावी, खेडोपाडी, आढळून येतात. समाजाची जनगणना एक हजार एकशेआठ इतकी आहे. त्यांपैकी पाचशेऐंशी स्त्रिया, पाचशेअठ्ठ्याऐंशी पुरूष, एकशेतीन नोकरी करणारे, सहासष्ट व्यवसाय करणारे, एकशेसव्वीस घरकाम करणारे, तीनशेसात शिक्षण घेणारे, दोनशेनऊ शेती करणारे, नऊशेपन्नास मजुरी करणारे, पंधरा निवृत्त तर अवलंबून शून्य आहेत.

गोसावी समाज हा भटक्या जातींमध्ये मोडला जातो. त्यामुळे समाजाचे लोक घरी फार कमी प्रमाणात आढळून येतात. समाजाची प्रत्येक गावी चार-पाच घरे आढळून येतात. समाजात गोस्वामी, गिरी, पुरी, गोसावी इत्यादी प्रकारची आडनावे आढळून येतात. गोसावी समाजाला भगवान शंकराचे वरदान लाभलेले आहे असा समज आहे. सर्व गोसावी समाज एकत्र येऊन सिन्नरमध्ये दर महाशिवरात्रीला देवाची पूजा करतात, तेव्हा मात्र गर्दी उसळलेली दिसून येते.

गोसावी समाजात व्यक्ती मरण पावली तर तिला सर्वात प्रथम मांडी घालून भिंतीला टेका लावून बसवले जाते. नंतर त्याच्या दफनक्रियेपर्यंत त्याच्या पूर्ण अंगाला तूप लावून त्याची सेवा केली जाते. त्याच्या जवळ अगरबत्ती, धूप–दीप यांचा वास केला जातो. गोसावी समाजामध्ये मृत व्यक्तीला जाळले जात नाही. त्या व्यक्तीला दहा फूट लांबीचा खड्डा खोदून, त्यातही एका गाभार्‍यात बसवून ठेवतात. नंतर जे लोक अंत्यविधीला येतात ते लोक त्यांच्या सोबत ऐपतीप्रमाणे मीठ आणतात. त्या व्यक्तीच्या घरची मंडळीही एक ते दोन गोणी मीठ आणून ठेवतात. अंत्यसंस्कारासाठी त्याशिवाय अर्धी गोणी चाळलेली राख व दोन-तीन पाटया बेलांची गरज लागते.

मृत व्यक्तीचा विधी करताना सर्वप्रथम तिला पाटावर बसवून आंघोळ घातली जाते. नंतर त्या व्यक्तीला त्या खडड्याच्या गाभार्‍यात बसवून ठेवतात. प्रत्येक अवयवावर खोबर्‍याची वाटी ठेवली जाते. मृत व्यक्तीला वाळलेल्या अर्ध्या भोपळ्याने पाणी दिले जाते. म्हणून गोसावी समाजात भोपळा खात नाहीत. सर्व सेवा झाल्यानंतर, उपस्थित सर्वजण प्रत्येकी ओंजळभर मीठ व राख खड्ड्यात टाकतात. नंतर त्या व्यक्तीस पुरले जाते. समाजाला शंकराचे वरदान असल्यामुळे त्यांना सुतक हे नसतेच. तिसर्‍याच दिवशी पूजाअर्चा करून पुरलेल्या व्यक्तीसमोर सारवून घेतले जाते. तेराव्या दिवशी समाधीची पूर्णपणे बेलाने पूजा केली जाते. लोक मृत व्यक्तीच्या शेजारी समाधी बांधतात व रोज पूजा करतात.

गोसावी समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या समाजातील वडिलधारी व्यक्ती बगलेत भगवी झोळी घेऊन रोज पीठ मागायला जाते. पीठ मागणे हा त्या समाजाचा धर्म मानला जातो. त्यामुळे त्यांना मागून खाताना लाज वाटत नाही. लोकश्रद्धाही त्यास पूरक आहे. गोसावी सकाळी सकाळी दारात आल्याचे भारतीय संस्कृतीत चांगले मानले जाते. गावामध्ये गोसाव्याला गावाच्या देवाची पूजा करण्यास दिलेली असते. त्या बदल्यात त्याला दरवर्षी धान्य दिले जाते. त्याला देवाचे धान्य म्हणतात.

गोसावी समाजाच्या वतीने काही गावांमध्ये मठाची स्थापना केलेली असते. त्या मठात लग्न न केलेल्या व सर्व सुखसोयींचा त्याग केलेल्या एका गोसाव्याने जिवंत समाधी घेतलेली असते. मठामध्ये स्त्रियांना येऊ दिले जात नाही. मठासमोर दरवर्षी दसर्‍याआधी आठव्या माळेला होम पेटवला जातो. सिन्नर तालुक्यामध्ये सोनांबे व गोंदे येथे मठ आढळून येतात. गोसाव्यांची स्मशानभूमी ही सिन्नरमध्ये शिर्डी रोडला खेटूनच आहे. तीही काशीआईच्या मंदिराच्या पुढे आहे. सिन्नरमध्ये जुन्या समाधीही आढळून येतात. त्या जुन्या समाधी भैरवनाथ मंदिराला खेटून आहेत असे दिसून येते.

सिन्नर तालुक्यामध्ये नांदूर-शिंगोटे या गावी गोसावी राहतात. गोसावी रहिवासी सिन्नर शहरामध्ये तानाजी चौक, गंगा वेस, अपना गॅरेज वसाहत, कमलनगर, शिवाजीनगर येथे आहेत. गोसावी समाज बाहेरही अनेक गावांमध्ये उदाहरणार्थ दापूर, चास, रामवाडी, कासारवाडी, मानोरी, गोंदे, नळवाडी, निर्‍हाळे, कोनांबे, मुसळगांव, धारणगाव, खंबाळे, भोकणी, किर्तीगळी, कोमलवाडी, पाथरे, पाटोळे, वडांगळी, दोडीखुर्द, देवपूर, सोनांबे, टेंभुरवाडी, निमगाव, पांगरी, सोमठाणे, मोह, कणकोरी, भरतपूर, विंचुरी दळवी, बारागाव पिंपळे, सोनेवाडी, सायाळे वावी, वडगाव, जोंगलटेंभी तसेच सिन्नरच्या कानडी मळा, नवा पूल, मॉडर्न कॉलनी, सरदवाडी, भैरवनाथ सोसायटी, विजयनगर अशा सर्व ठिकाणी राहतो.

गिरी आडनावाचे लोक गोंदे या गावात राहतात. गोसावी आडनावाचे लोक विविध गावांमध्ये तसेच सिन्नरमध्ये सर्वत्र आढळतात. भारती हे आडनाव असणारे लोक सोनांबे या गावात राहतात. गोसावी समाजात कोणत्याही वडीलधार्‍या व्यक्तीच्या नावानंतर गिर हा शब्द लावला जातो.

– सविता शांताराम गिरी

(मूळ लेखन ‘लोकपरंपरेचे सिन्नर’)

About Post Author

2 COMMENTS

  1. प्रथा पाळाव्या काा?गोसावी…
    प्रथा पाळाव्या काा?गोसावी समाजातील मुलानी शिक्षण घेऊ नये काा? काा अजून भिक्षा मागावी, अशा प्रथा चांंगल्ल्या असतील तर सुधारलेल्या,.उच्च जातीतील लोकांंनी अनुसरव्यात.

Comments are closed.