सिन्नरचा नटसम्राट मस्तान मणियार (Sinnar’s Stage Activity And Mastan Maniyar)

1
108

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी हे गाव सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेले; तेथील प्रथा-परंपरा आगळ्यावेगळ्या. तेथील हौशी नाट्यचळवळही शंभर वर्षांहून जुनी. तो वारसा प्रत्येक पिढीने नेटाने पुढे चालवला आहे. जुन्या पिढीतील भास्कर पाटील, पांडू सोनार, दिगंबर वालझाडे, दगू गायकवाड, दिगंबर काळे ही जुन्या काळची मातब्बर मंडळी. मस्तान मणियार यांनी त्यांच्या भक्कम खांद्यांवर नटराजाची ती पालखी गेली दोन-तीन दशके अलगद पेलली, पण तेही थकले आहेत.

त्यांना अभिनयाची गोडी बालवयातच लागली. त्यांचे नाटक गल्लीतच एखाद्या घराच्या उंच ओट्यावर रात्रीच्या वेळेला बारदानाचे पडदे लावून, कंदिलाच्या उजेडात सुरू होई. ती शाळकरी मुले तमाशातील वग किंवा गावातील मोठ्या माणसांनी केलेले नाटक यांचे अनुकरण करत. नाटकाची ती नक्कलही अस्सल भासे. मुलाचे पाय पाळण्यात दिसावेत तसा तो प्रकार ठरला, मात्र ! मस्तानभार्इंनी स्वतःची नाटक कंपनी गावातील नाटकाची आवड असलेले मित्र हेरून सुरू केली. गोपाळ तुपे या मित्राने नाव सुचवले, कलावैभव ! मुंबईची मोहन तोंडवलकर यांची कलावैभव नाटक कंपनी गाजत होती. वडांगळीची कलावैभव नाटक कंपनीही अल्पावधीत नावारूपाला आली.

          भागवत खुळे हा मस्तानभार्इंचा आवडता कलावंत आणि मित्रदेखील. त्याचे संभाषण ऐकले, की जुन्या जमान्यातील मराठी चित्रपटसृष्टीतील माधव आपटे यांची आठवण होई. भागवतरावांना जन्मतः वाचादोष असल्याने ते बोबडे, गेंगाणे बोलत. ते स्टेजवर येताच प्रेक्षकांमध्ये हास्याची लकेर उमटत असे. भागवतरावांच्या प्रवेशाच्या वेळी मस्तानभाईदेखील उल्हसित होत असत. मस्तानभाई इन्स्पेक्टरच्या भूमिकेत असले, की भागवतराव पोलीस हवालदार असणार ! एरवी गंभीर भूमिका करणारे मस्तानभाई भागवतरावांच्या जोडीला विशिष्ट हावभाव करून विनोदाची पेरणी करत.

 

मस्तानभार्इंनी अनेक कलावंत घडवले; हौशी कलावंतांचे विद्यापीठच म्हणावे इतके ! मस्तानभार्इ गावातील तरुणांमधील कलागुण हेरून त्यांना कामे देत. त्यांनी भाऊसाहेब गीताराम खुळे, शिवाजी पोपट खुळे, बाळासाहेब दौलत आढांगळे आदी तरुणांना नायकाच्या किंवा महत्त्वाच्या भूमिका देऊन रंगमंचावर उतरवले. त्यांनी शिवाजी गीताराम खुळे, नजीर शेख, शिवाजी गोरे, सोमनाथ घोटेकर, शिवाजी गीते, पुरुषोत्तम ठोक, बाळू कांदळकर, दत्ता सातपुते, संजय भावसार, अशोक खुळे, सुखदेव गीते, भास्कर आहेर, रवींद्र खुळे, श्रीहरी कोकाटे, दत्तू कोकाटे, दत्तात्रय खुळे, शांताराम खुळे, सूर्यभान खुळे, भैय्या शेख, अकील शेख, विठ्ठल खुळे, बबलू गायकवाड अशा या कलावंतांतील अभिनयाला वाव दिला.

नाटकाची निवड, संहितेचे वाचन, आर्थिक पाठबळ, पात्रांची निवड, सेट उभारणे, तांत्रिक बाबींची तयारी, पार्श्वसंगीत-गायन-नांदी-पार्श्वगायन, प्रसंगानुसार ट्रिक सीन्स आदींची सर्व जोखीम मस्तानभार्इंवर असे. शंकरराव म्हाळणकर, कृष्णा म्हाळणकर, दत्ता सातपुते, शिवाजी गोरे यांची त्यांना गायन, वादन, नांदी या बाबतींत मदत होई. तांत्रिक बाजू, नेपथ्य भास्कर आहेर करत. मणियार कोणाचे फाजील लाड करत नसत. दारू पिऊन रंगमंचावर जाणे हे त्यांच्या शिस्तीबाहेर असे. तशी चूक कोणी केली तर ते त्याला प्रयोगात संधी देत नसत.

          सिन्नर तालुक्याचे आमदार सूर्यभान गडाख यांचे प्रेम मस्तानभार्इंना लाभले. त्यांना त्यांच्या माध्यमातून सिन्नर शहरात व अनेक ठिकाणी शाळांच्या मदतीसाठी नाटकांचे प्रयोग करण्याची संधी मिळाली. त्यामुळे कलावैभव नाट्य कंपनीचे नाव नाशिक जिल्हा व शेजारील नगर जिल्ह्यापर्यंत जाऊन पोचले. गावोगावचे गावपुढारी जसे तमाशा ठरवण्यासाठी फडमालकांकडे नारायणगावला जात; तसेच, नाटक ठरवण्यासाठी वडांगळीला येत. हौशी नाटक कंपनी असल्याने, जुजबी मानधनात नाट्यप्रयोग केले जात. कलावंत मंडळी त्यांचे त्यांचे कामधंदे दिवसभर सांभाळून रात्रीचे नाटकाचे प्रयोग करत, परगावचे दौरे करत.

 

         मस्तानभाई एरवी मितभाषी, संकोची, निगर्वी, नम्र. मात्र रंगभूमीवर पाऊल ठेवताच त्यांच्यात वेगळाच आवेश संचारत असे. त्यांचे व्यक्तिमत्त्वही ठाशीव होते. सहा फुटांची भरभक्कम उंची, गव्हाळ वर्ण, घारे डोळे, डोक्यावर कुरूळे केस, नेहरू शर्ट, पायजमा असा पोशाख असलेले आणि त्यांचा तो ठेवणीतील खर्जातील आवाज. ते प्रेक्षकांची मने बोलका चेहरा, देहबोली आणि अभिनय यांद्वारे जिंकून घेत. स्थानिक कलावंतांनाही समाजात वेगळा सन्मान मिळत असे असा तो काळ होता. सेलिब्रिटींची लाट यायची होती. गावकरी आस्थेने कलावंतांचे आदरातिथ्य करत. मस्तानभार्इंनी लोकप्रियतेची ती नशा जिल्ह्यात अनुभवली आहे. त्यांचा व्यवसाय होता कासारचा. नाटकाच्या रात्री प्रेक्षकमनात उंचीवर असलेला तो कलंदर कलावंत दुसऱ्या दिवशी बांगड्यांनी भरलेली पिशवी सायकलला अडकावून बांगड्या भरण्यासाठी खेड्या-खेड्यांवर, वाड्या-वस्त्यांवर वणवण करत असे. त्यांनी उपजीविका, पोटापाण्याचा धंदा आणि नाट्यवेड यांची आयुष्यात गल्लत केली नाही.

 

          त्यांची काही नाटके गाजली. उदाहरणार्थ रायगडची राणी, झुंज, शिवकंकण, राजकारणाचा झाला तमाशा, क्रांतीवीर उमाजी नाईक, गीता गाती ज्ञानेश्वर, भक्त पुंडलिक, चलो मच्छिंदर गोरख आया. नाटकांचे आयोजन गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी, गावोगावच्या यात्रा-जत्रा, लग्नाच्या वराती, बारसे अशा कारणांनी केले जाई. त्यांनी नवनाथांच्या पोथीवर बेतलेले चलो मच्छिंदर गोरख आया हे नाटक गावातील हरहुन्नरी कलावंत भास्कर आहेर यांच्याकडून लिहून घेतले होते. भास्कर आहेर हे तंत्रकुशल. त्यांनी त्यांच्या पारंपरिक सुतार-लोहार कामाच्या व्यवसायात निरनिराळे प्रयोग केले. त्यात आधुनिकता आणली. त्यांनीच गावात सर्वप्रथम वेल्डिंग मशीन, लेथ मशीन आणले. वृत्तीने धार्मिक असलेल्या भास्कर आहेर (मिस्त्री) यांना त्यांच्या रसाळ वाणीने विविध धार्मिक ग्रंथ वाचण्यात विशेष आनंद मिळे. नवनाथाची पोथी तर त्यांना तोंडपाठ होती. चलो मच्छिंदर गोरख आया हे ट्रिक सीन्संनी भरलेले नाटक होते. त्या नाटकातील ट्रिक सीन्समुळे आणि त्यातील अद्भुत अशा अभिनयामुळे ते नाटक सर्वदूर गाजले. गोरक्षनाथांनी मंत्र म्हणताच रंगमंचावर अंधारात दिवे प्रकाशमान होत असत. मस्तानभार्इंनी भास्कर आहेर (मिस्त्री) यांच्या कलेला, त्यांच्या हरहुन्नरी वृत्तीला त्या नाटकात चालना दिली आणि त्या नाटकाने सिन्नरच्या नाट्य इतिहासात सुवर्णकाळ निर्माण केला. गीता गाती ज्ञानेश्वर हा नाट्यप्रयोगही विशेष गाजला. संगीतमय असलेल्या त्या नाटकात अनेक अभंग होते. हरहुन्नरी शिक्षक शंकरराव म्हाळणकर यांनी संगीताची बाजू सुरेख सांभाळली तर त्यांचेच धाकटे बंधू कृष्णा म्हाळणकर यांनी सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अशोक घुमरे यांच्यासारखे, नाशिकची प्रायोगिक नाट्य चळवळ पाहून आलेले हरहुन्नरी कलावंत एका टप्प्यावर वडांगळीत दाखल झाले. त्यांनी प्रायोगिक एकांकिका बसवल्या, प्रायोगिक नाटके केली. दरम्यान, टीव्हीने घराघरांत ठाण मांडले. नाट्य चळवळीला उतरती कळा लागली. मस्तानभार्इंनी काळाची पावले ओळखून थांबून घेतले. एकेकाळी रंगभूमी गाजवलेला तो कलावंत त्यांचा पारंपरिक बांगड्या भरण्याच्या व्यवसायात तो मी नव्हेच अशा आविर्भावात पूर्णपणे गुंतून गेला. स्वत:ची हयात रंगभूमीच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या त्या कलावंताने वृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या शासकीय मानधनाचीही अपेक्षा केली नाही. त्यांची तिन्ही मुले कर्ती झाली आहेत. त्यांच्या पत्नीने कलेवर प्रेम केले. सुना-नातवंडांनी घरभरले गोकुळ झाले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी, पंचाहत्तरीत प्रवेश करणारा तो नटसम्राट त्याच्या गतस्मृतींना आठवत करोनाकाळातही मनाची श्रीमंती जपत आहे !

मस्तानभाई मणियार 7798065298

                                                                  

– किरण भावसार 7757031933 kiranvbhavsar1972@gmail.com

(किरण भावसार यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.)

——————————————————————————————————————————————————-

 

About Post Author

Previous articleकोकण आणि कॅलिफोर्निया ! (Konkan And California)
Next articleमराठी संगीत रंगभूमी- मर्मबंधातील ठेव (Musicals on Marathi Stage – Rich Tradition)
किरण भावसार हे वडांगळी, ता. सिन्नर (नाशिक) येथील रहिवाशी असून सध्या नोकरीनिमित्त सिन्नर येथे स्थायिक आहेत. त्यांना कथा, कविता, ललित लिखाणाची आवड आहे. त्‍यांची ‘मुळांवरची माती सांभाळताना’ हा कवितासंग्रह, तसेच ‘आठवणींची भरता शाळा’ व ‘शनिखालची चिंच’ या दोन ललित लेखसंग्रहांची ईबुक्स प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या ‘मुळांवरची माती...’ या कवितासंग्रहाला कुसुमाग्रजांच्या पहिल्या कवितासंग्रहाच्या नावाने दिला जाणारा ‘विशाखा’ पुरस्कार, अहमदनगर येथील ‘इतिहास संशोधन मंडळा’च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘कवी अनंत फंदी’ पुरस्कार मिळाला आहे. लेखकाचा दूरध्वनी -7588833562

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here