समृद्ध सुखद

5
56
_Sukhad_8

सुखद राणेमहाराष्ट्रातील एकशेआठ किल्ले पादाक्रांत करणारा, मुंबई-कन्याकुमारी-मुंबई अशी सायकल भ्रमंती करणारा, तरुणाईने इतिहासाचा मागोवा घ्यावा, इतिहासातून स्फूर्ती घ्यावी यासाठी रायगड जिल्ह्यात छायाचित्रांची प्रदर्शने भरवणारा व व्याख्याने करणारा सुखद राणे हा तरुण अक्षरश: स्वप्न जगतो.

सुखद मूळच्या सिंधुदुर्गामधील देवगड तालुक्यातील जामसंडे येथील. त्याचा जन्म १९६७ साली दादर (मुंबई) येथे झाला. पण लगेच वडील उल्हासनगरला स्थलांतरीत झाल्‍याने शालेय जीवनाचा श्री गणेशा उल्हासनगरमधील सरस्वती विद्यामंदिरात झाला. सुखद दुसरीला असताना त्याच्या वडिलांचे पक्षाघाताने निधन झाले. आईच्या पदरात सुखद व्यतिरिक्त आणखी तीन मुले. सगळ्यात मोठा आनंद, नंतर सुबोध आणि प्रगती. चारही मुले शिकत होती. आई हिंमतीने कुटिरोद्योगांचे साहाय्य घेत संसार चालवत होती. मुलेही हिंमतवान, कधी साड्यांना टिकल्या लावत, कधी चॉकलेटला रॅपर लावत तर कधी दारी आलेल्या शेवग्याच्या शेंगा बाजारात विकत. गणपतीत मखरे करुन विकणे हा तर त्यांचा प्रिय उद्योग. सुखद दहावीपर्यंत अंबरनाथ येथील कानसई हायस्कुलला शिकला. १९८२ ते १९८४ या दोन वर्षांत अंबरनाथ येथेच रबर टेक्नॉलॉजी कोर्स पूर्ण करून सुखद पुणे येथील ‘स्वस्तिक रबर’ या कंपनीत रुजू झाला. त्याच काळात त्याला गड-किल्ले खुणावू लागले. त्यातच महेश व उमेश कुळकर्णी आणि मिलिंद भागवत जिवाभावाचे मित्र मिळाले त्यांच्या सहवासात सुखद वैचारिक व सामाजिक दृष्टीने प्रगल्भ झाला. त्याच बरोबर हेमंत पाठक, उदय वाघ, अजय वाघ, विलास वैद्य, संजय जांभुळकर या सवंगड्यांबरोबर गडकिल्ले सर होऊ लागले. तेथेच त्याला या क्षेत्रात आणि संस्थात्मक कार्याची उणीव भासू लागली आणि सुखदने ‘निसर्ग गिरिभ्रमण’ या संस्थेच्या उभारणीत पुढाकार घेतला.

सुखद राणे रायगड प्रदक्षिणेत सहभागी झाले असतानाचे छायाचित्र त्याच दरम्यान, १९९० साली सुखद नोकरीनिमित्ताने रोह्यात आला असता त्याला अवचितगडाचे दर्शन झाले आणि सुखद सुखावला. त्याने परक्या गावातही असंख्य मित्र जोडले. त्यांना ‘पाठीवरील सॅक’ची ओळख करून दिली. मिलिंद ओक, संदिप कोठेकर, शिरिष गुळवणी अशाच इतर मित्रांना बरोबर घेऊन ‘निसर्ग गिरिभ्रमण’ संस्थेचे काम रोह्यात सुरु झाले. त्यांनी गडकिल्ल्यांची भटकंती, झाडे जगवा संदेश घेऊन वृक्षारोपणाचे कार्यक्रम, दुर्गसेवा, गडांची साफसफाई, गिर्यारोहणक्षेत्रातील मान्यवरांची व्याख्यानं असे वेगवेगळे उपक्रम राबवले. त्याने गोनीदां आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून प्रेरणा घेत स्वत:ला घडवले वेगवेगळ्या विषयांवरील माहितीचे संकलन, छायाचित्रांचे संकलन हे करत असतानाच सुखदने पत्रकारीतेतही मुसंडी मारली. सुखदने ‘लोकमत ’सारख्या अग्रगण्य दैनिकासाठी काम केले. सुखद १९९३ला किल्लारीच्या भूकंपाच्यावेळी लातूरवासीयांच्या मदतीस धावून गेला.

पत्नी समृद्धी, मुले शुभम आणि दिपतेज यांच्‍यासह सुखद राणे सुखदची अर्धांगिनी बनून आलेल्या सृष्टीने १९९४ सुखदच्या सार्‍या छंदा मध्ये साथ देत संसाराची जबाबदारी उचलली. त्यामुळेच सुखद वयाचा मध्य ठप्पा पार करत असताना उदयोन्मुख पिढीतील नीलेश दामाणी, पराग बनकर, नुरूद्दीन रोहावला, प्रसन्न वारंगे, पराग पोतदार यांना साथीला घेऊन ‘सृष्टी फाऊंडेशन ’ ही संस्था उभारू शकला. संस्थेच्या माध्यमातून गडकिल्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाचे काम अधिक संघटित व नियोजन बद्ध झाले. संकलित केलेल्या माहिती व छायाचित्रांची प्रदर्शने व जोडीला सुखदची ओघवत्या शैलीतील व्याख्याने यांचा जागर जिल्हाभर सुरू झाला. त्यातून जिल्ह्यात निरनिराळ्या ठिकाणी दुर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमी संघटना आकारास आल्या.

२००८ हे वर्ष सुखदची परीक्षा पाहणारे ठरले. त्याची पत्नी सौ.सृष्टीला कॅन्सरचे निदान झाले व अल्पावधीतच तिने जगाचा निरोप देखील घेतला. तो काळ सुखद आवंढा घेऊन सांगू शकतो. त्याने धीरोदत्तपणे स्वत:बरोबर आपल्या आठवीत असणार्‍या मुलालाही सांभाळले. त्याने वर्षभरात समृद्धीशी विवाह केला. सुखद व त्याचा मुलगा, समृद्धी व तिचा मुलगा असे छान चौकोनी कुटुंब झाले आहे. घरात सुखसमृद्धी नांदत आहे.

त्याने नवीन तंत्रज्ञानाच्या जगात नवनव्या तंत्राचा अवलंब करून आपले दुर्ग प्रचार व प्रसाराचे काम नव्या जोमाने सुरू केले आहे. चित्रकला, छायाचित्रण, पत्रकारिता, दुर्गप्रेम हे सारे जपताना सुखदने सांसारिक व व्यावसायिक जबाबदार्‍या समर्थपणे पेलल्या म्हणून तर ‘सॅम्परट्रान्स निरलॉन’ या आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करताना त्याच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत राहिला आहे. व्यावसायिक जबाबदार्‍यांच्या माध्यमातून युरोपमधील, फ्रान्स, ऑस्ट्रीया तसेच चीनमधील शांघाय परिसरातील कारखान्यांना त्याच्या नियमित भेटी होतात.

सुनिल तटकरे यांच्या् हस्ते ‘गुणवंत रायगड’ हा पुरस्कार स्वीकारतानासमाजानेही सुखदच्या धडपडीची दखल घेतली. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते सुखदचा रायगड जिल्ह्यातील ‘गुणवंत’ म्हणून सन्मान करण्यात आला (एप्रिल २०११, कोमसाप संमेलन)

सुखदचे दुर्गप्रेम हा त्याचा ध्यास आहे. सायकलिंग हा त्याचा छंद आहे म्हणून तर महाराष्ट्रातले साडेतीनशे किल्ले पादाक्रांत करण्याची त्याची पुढील योजना आहे. सायकलवर जगप्रवास करण्याची त्याची मनीषा आहे. त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती स्वप्ने वास्तवात आणेल याची खात्री त्याच्याशी बोलताना पटते.

अस्मिता जपतो तो
त्यालाच खरे अस्तित्व आहे II1II
सोन्यासारख्या इतिहासाचे
तेज वर्तमानी जपतो जो
त्याला परिसारखे नाव आहे II2II
आत्मभान ठेवून जगतो जो
त्याला भविश्यातही अस्तित्व आहे
कार्य तयांचे प्रेरक आहे II3II

सुखद राजाराम राणे
सृष्टी ४, निर्माण रेसीडेन्सी, ब्राम्हण आळी, काळे दत्त मंदिराजवळ, रोहे, जिल्हा- रायगड, पिन – ४०२१०९,
९४२३३८३२८१, ९८९४६५९३९८
sukhadrane@rediffmail.com

ना.रा.पराडकर
मु.पो. मेढे, ता. रोहा, जिल्हा रायगड
९२७२६७७९१६

About Post Author

5 COMMENTS

  1. अतिशय उत्तम कार्य…!!!

    अतिशय उत्तम कार्य…!!!
    असेच चालू राहू दे..!
    पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दीक शुभेच्छा….!

  2. अतिशय प्रेरणा दायक”!! सुखद
    अतिशय प्रेरणा दायक”!! सुखद राणे सर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!!

Comments are closed.