समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग (Telang, Social Reformer)

0
73
काशिनाथ त्र्यंबक तेलंग
काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म 30 ऑगस्ट 1850 रोजी झाला. ते विविध पदांमुळे व त्यास अनुरूप कार्यामुळे ओळखले जातात – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडित, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस (1885-1889), मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (1892), त्यांनी हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी भगवद्‌गीतेचा इंग्रजीत अनुवाद केला. काशिनाथ त्र्यंबक तेलंग न्यायाधीश चार वर्षेच होते. त्यांचे वय त्यावेळी अडतीस-एकोणचाळीस वर्षांचे होते. त्यांच्या न्यायाधीशपदाच्या कारकिर्दीत उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर आलेला सर्वांत महत्त्वाचा खटला म्हणजे आप्पाजी नरहर कुलकर्णी विरुद्ध रामचंद्र रावजी कुलकर्णी हा होय. एकत्र कुटुंबात आजोबा-बाप-मुलगा अशा तीन पिढ्या हयात असतील तर तिसर्‍याला, म्हणजे नातवाला पहिल्याकडून (म्हणजे आजोबाकडून) वाटणी मागता येते का? असा प्रश्न त्या खटल्यात न्यायालयासमोर आला होता. त्यावर तेलंग यांचे उत्तर होकारार्थी होते, पण ते अल्पमतात गेले. परंतु तेलंग यांचे मत नंतरच्या काळात अनेक उच्च न्यायालयांनी मान्य केले. त्यांना न्यायाधीश होण्याआधी वयाच्या छत्तिसाव्या वर्षी मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू आणि सर्वांत तरुण कुलगुरू होण्याचा मान मिळाला. न्या. तेलंग आणि त्यांच्यानंतर न्या.रानडे आणि न्या.चंदावरकर या न्यायमूर्ती-त्रिमूर्तीने परस्परपूरक भूमिका निभावून महाराष्ट्राला उदारमतवादाचा वस्तुपाठ घालून दिला. कायदा व न्याय यांव्यतिरिक्त समाजकारण, राजकारण, धर्मकारण आणि अर्थकारण या क्षेत्रांतही न्या.तेलंग यांनी सक्रिय सहभाग घेऊन भरीव कार्य केले. काँग्रेसच्या स्थापनेत न्या. तेलंग यांचा सहभाग होता.
त्यांचे विचार व लेखन प्रगतिशील होते. त्या दृष्टीने त्यांचे शास्त्र व रुढी यांच्या बलाबलांविषयी विचार’ (1886) सामाजिक विषयासंबंधी तडजोडहे मराठीतील दोन निबंध पाहण्यासारखे आहेत. काशीनाथ तेलंग यांनी म्हटले आहे, की कालमानानुसार धर्मात बदल करण्याची योजना भारतीय इतिहासाने भारतीय जनतेला शिकवली आहे. तिला भारतीयांनी सोडल्यास त्यांच्या धर्मातील जिवंतपणा नाहीसा होईल.काशीनाथ तेलंग यांनी दुसऱ्या निबंधात विचारस्वातंत्र्याचे महत्त्व दाखवले आहे. त्यांनी पूर्वीच्या काळी हिंदुस्थानातील लोक गोमांस भक्षण करत असले, तरी पुढे तेथील लोकांनी ते विचारपूर्वक सोडले आहे. म्हणून त्याचा फेरविचार करण्याची आवश्यकता नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला आहे. 
त्यांनी मराठी भाषा व मराठी वाङ्‌मय यांच्या समृद्धीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महाराष्ट्र भाषासंवर्धक मंडळी स्थापन केली. तिचा उद्देश ऐतिहासिक, चरित्रात्मक, बोधपर व उपयुक्त विषयांवर ग्रंथनिर्मिती करावी असा होता. त्यांचे बहुतेक ग्रंथ अनुवादित स्वरूपाचे आहेत. त्यांचे स्फुट लेख जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी व इंडियन अ‍ँटिक्वेरी या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. शास्त्र व रूढी यांच्या बलाबलांविषयी विचार’ ‘सामाजिक विषयांसंबंधी तडजोडहे त्यांचे मराठी निबंध प्रसिद्ध असून त्यातून त्यांनी धार्मिक सुधारणांसंबंधी विचार मांडले. भर्तृहरीची नीती व वैराग्य शतके व मुद्राराक्षस नाटक हे त्यांचे संपादित ग्रंथ. त्यांनी इंग्रजीत गीतेचा गद्यपद्यात्मक अनुवाद केला. शहाणा नाथन आणि स्थानिक स्वराज्यव्यवस्था हे त्यांचे आणखी दोन अनुवादित ग्रंथ. त्यांची व्याख्यानेही ग्रंथरूपाने पुढे प्रसिद्ध झाली. त्यांचा मृत्यू 1 सप्टेंबर 1893 रोजी झाला.
– संकलित
(संदर्भ : 1. चपळगावकर, न्या. नरेंद्र; ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’; मौज प्रकाशन, 2010)
———————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here