सद्भावना संमेलन

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन

अमेय पालक संघटनेच्या सहकार्याने

सद्भावना संमेलन

व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या थिंक महाराष्ट्र डॉट कॉम प्लॅटफॉर्मतर्फे ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात संवेदनाशील अस्वस्थ नागरिकांची एक बैठक या 15 ऑगस्ट 2023 रोजी झाली. तिला सुमारे पन्नास व्यक्ती उपस्थित होत्या. लेखिका वीणा गव्हाणकर या प्रमुख स्थानी होत्या. मीडियातील भारती सहस्त्रबुद्धेसुवर्णा धानोरकर, अभिजित कांबळे या तीन जणांनी सध्याच्या बकाल परिस्थितीचे निदान केले णि सज्जनशक्तीचे नेटवर्क हा दिलासा देणारा उपाय ठरू शकतो असे सांगितले.

या बैठकीचा पाठपुरावा म्हणून ठाणे येथे एक गट तयार झाला व त्यांनी समाजात जे मंगल घडत आहे त्याच्या नोंदी मोगरा फुलला या थिंक महाराष्ट्र वेबपोर्टलवरील दालनामध्ये करणे आरंभले. त्यामधून सुमारे पन्नास लेखकांची फौज एकत्र झाली व त्याच्या दुप्पट लोक त्या नोंदी वाचू लागले. 15 ऑगस्टच्या बैठकीच्या महिनाभरापूर्वी पाच वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी तळेगाव येथे एकत्र जमले आणि त्यांनी वैचारिक घुसळण नावाचा एक कार्यक्रम महाराष्ट्रातील गावोगावी ग्रंथालये व महाविद्यालये यांच्या सहकार्याने चालवला आहे. वेगवेगळ्या विषयांवरील सुमारे पस्तीस व्याख्याने/मुलाखती गेल्या अडीच महिन्यांत घडून आल्या आहेत. वैचारिक घुसळणीच्या या प्रकल्पास व्याख्यान सत्र असे नाव देण्यात आले असून तो प्रकल्प भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चालवला असल्याचे म्हटले आहे. तो प्रकल्प चालवणाऱ्या पाच संस्था म्हणजे थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे सद्‍भावनेचे व्यासपीठ आणि अन्य चार संस्था [‘स्वप्नभूमी’ (केरवाडी-परभणी)ग्रंथालय मित्र मंडळ (ठाणे)आरोग्यभान (पुणे) आणि विचारवेध (पुणे)] होत आणि त्या प्रकल्पाचे समन्वयक आहेत अपर्णा महाजन.

अपर्णा महाजन सद्‍भावनेचे व्यासपीठया नावाने थिंक महाराष्ट्रवर एक दालन चालवतात. त्यात दर सोमवारी मुख्यत: संस्थांसंबंधी परिचयात्मक लेख आणि वैचारिक स्पंदने प्रसिद्ध होत असतात.

अमेय पालक संघटना ही संस्था म्हटले तरी डोंबिवली-खोणी येथे मनोदुर्बल व्यक्तींसाठ वसतिगृह चालवते. संस्थेने नुकताच रौप्यमहोत्सव साजरा केला. त्यातून या एका छोट्या संस्थेमागे केवळ सद्भावामुळे समाजाचे केवढे मोठे बळ उभे आहे असे जाणवते. तसेच, ठाण्याच्याच भाग्यश्री फाऊंडेशनतर्फे सक्षम नागरिक नावाचा उपक्रम शाळा शाळांत राबवण्याचा प्रयत्न आहे. समाजाची आणि शिक्षणव्यवस्थेची साथ मिळाली तर महाराष्ट्रभर शिक्षण सुधारणेची ही मोठी चळवळ होऊ शकेल. त्यात अपेक्षा शालेय मुलांनी दैनंदिनी लिहावी व ती रोज शिक्षकांनी तपासावी एवढीच आहे. ठाणे, भिवंडी व कोल्हापूर येथील जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांमध्ये तो उपक्रम राबवला गेला तेव्हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आश्चर्य वाटावे अशी सुधारणा घडून आली. सक्षम नागरिक मोहिमेचे मार्गदर्शक आहेत अनिल काकोडकर आणि दत्तात्रय शेकटकर.

मुंबईच्या राजूल वासा यांनी सेलिब्रल पाल्सी रोगांनी ग्रस्त अशा मुलांचे जीवन बदलून टाकले आहे. त्यांचे उपचार पूर्णत: विनामूल्य असतात. मेंदूबाधित रोगांनी पछाडलेले जगभरचे पेशंट त्यांच्याकडे इंटरनेटवरून सल्ला घेतात. फिनलंडमध्ये वासा उपचार केंद्रनावाचे फलक अनेक ठिकाणी आढळतील. तसेच, सुजाता रायकर थॅलेसेमिया रोग महाराष्ट्रातून नष्ट व्हावा यासाठी जनजागृती करत सर्वत्र दौडत असतात. त्या पलीकडे त्या त्यांच्या साथ या संस्थेतर्फे नव्वद रूग्ण कुटुंबांना त्यांच्या आयुष्यभरासाठी आर्थिक मदत करत असतात. थिंक महाराष्ट्रचे वेबपोर्टल पाहिलेत तर तशा शेकडो संस्था व व्यक्ती आढळून येतील. लेखक, प्रशासक ज्ञानेश्वर मुळे चांगुलपणाची चळवळ चालवत असतात.

समाजाचा हा भाव मीडियांतून प्रकट होताना दिसतो का? उलट, रोजच्या भडक बातम्यांनी आणि विकृत वाटाव्यात अशा पुढाऱ्यांच्या घोषणांनी मने जर्जर होऊन जातात. सांस्कृतिक भाव नावाची गोष्ट समाजात आहे हेच आपण विसरून गेलो आहोत का? त्याचा विपरित परिणाम आपल्याही मनांवर होत आहे ना? यातून आपलीच मने विकृत तर होणार नाहीत ! हे विपरित चित्र बदलण्यासाठी सज्जन शक्तीचा उद्घोष प्रथम जळगावचे उद्योजक भवरलाल जैन यांनी वीस-बावीस वर्षांपूर्वी केला. त्यांनी पुस्तक लिहिले आणि उत्तम शिक्षणासाठी अर्थसंकल्पातील शिक्षणविषयक तरतूद वाढवली पाहिजे असे आग्रहाने मांडले. हा मुद्दा अनेक शिक्षक प्रतिपादतात. परंतु भवरलाल यांनी त्याला प्रतिसाद म्हणून सत्शक्ती जागृत करण्याचा मार्ग सुचवला. लेखक-कवी सुहास तपस्वी हे एका मोठ्या कंपनीच्या महाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले. त्यांनी स्वयंसेवी संस्थांनी व्यवस्थापनाची तत्त्वे कशी अंगीकारावी हे सांगण्यासाठी देवरूखच्या मातृमंदिर संस्थेचा अभ्यास पुस्तक रूपाने मांडला. त्यांचे म्हणणे असे, की मातृमंदिरच्या नारकर दांपत्यांप्रमाणे दोन हजार कुंटुंबे महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांची सूत्रधार असतील तर राज्याचे सारे समाजचित्र बदलून जाईल. तपस्वी हे एमबीए विद्यार्थ्यांना शिकवायचे. त्यांनी शेवटच्या काही वर्षांत गावोगावी जाऊन सत्शक्ती बैठका घेण्याचा खटाटोप चालवला, विद्या बाळ वगैरे पुण्यातील विद्वान सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. परंतु तो खटाटोप मूळ धरू शकला नाही. तर सत्शक्तीचा प्रभाव असा असू शकतो. त्यासाठीच हे आवाहन आहे.

काळ दुर्गतीला सोकावलेला असताना आपल्यासारखी सुखासीन संवेदनाशील माणसे एकवटली त्यामधून सत्शक्तीची चळवळ उभी राहिली तर ! म्हणून हे सद्भावनेचे संमेलन. आपण सत्प्रवृत्त लोक एकत्र येऊया. काही विचारविनिमय करू. काही कार्यक्रम आखुया आणि मार्गी लागूया.

सद्भावनेचे संमेलन
तारीख : रविवार, 10 डिसेंबर 2023 सकाळी 9:30 ते दुपारी 2:00
जागा – अमेय पालक संघटनेचा आश्रम, (खोणी, डोंबिवली)
(संमेलनाला येण्या-जाण्यासाठी डोंबिवली स्टेशनवरून बसेसची व्यवस्था करता येईल. दुपारची भोजनव्यवस्था खोणी आश्रमातच आहे.)

————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here