श्‍यामची आई

1
67
_carasole_3

महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे पुस्तक ‘श्यामची आई’! त्या पुस्तकाबद्दल लिहिताना पुस्तकाचे लेखक साने गुरुजी यांचे उद्गार प्रथम आठवतात. पुस्तक प्रकाशित होत असताना त्यांनी त्यांच्या मनोगतात म्हटले होते, “हे हस्तलिखित आतापर्यंत साठसत्तर लोकांनी ऐकले-वाचले आहे. ते त्यांना आवडले. ते मी न विचारताच ‘आईबद्दलची त्यांची भक्ती व प्रीती हे हस्तलिखित वाचून शतपट वाढली’ असे म्हणाले. या पुस्तकाचे काम झाले आहे. ते महाराष्ट्रात खपले नाही, तरी त्याचे कार्य झाले आहे. ते लिहीत असताना मला अपार आनंद लुटावयास मिळत होता, हा काय कमी फायदा? परंतु मी आसक्तीमय आशा बाळगून राहिलो आहे, की ‘श्यामची आई’ घरोघरी जाईल; ते मुलांची मने बनवू पाहणाऱ्या पाठशाळांतून, निदान दुय्यम शिक्षणाच्या पाठशाळांतून तरी जाईल. ते तसे जावो वा न जावो; परंतु आज माझ्या अनेक मित्रांच्या प्रेमाच्या मदतीमुळे ‘श्यामची आई’ माझ्या घरातून सर्वांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहे. तिने स्वत:च्या मुलाला वाढवले, त्याप्रमाणे ती इतर मुलाबाळांनाही वाढवण्यासाठी बाहेर पडत आहे. ती उघड्या दारांतून आत शिरेल, बंद दारे ठोठावून पाहील. परंतु सारीच दारे बंद झाली तर? तर ती माझ्या घरातच येऊन राहील; माझ्या हृदयात तर ती आहेच आहे.”

म्हणजे साने गुरुजी पुस्तक प्रकाशित होत असताना लोक त्याचे स्वागत कसे करतील याबद्दल साशंक होते. गुरुजींची शंका फोल ठरली. पुस्तक घरोघरी पोचले. ‘श्यामची आई’ प्रथम १९३५ मध्ये प्रकाशित झाले. पुस्तकाच्या अनेक आवृत्ती निघाल्या. शेकडो, हजारो… काही लाख प्रती विकल्या गेल्या. पुस्तकाची रचना तत्कालीन पुस्तकांपेक्षा निराळी आहे. पुस्तकाची बेचाळीस प्रकरणे आहेत. ‘रात्र पहिली’पासून ‘रात्र बेचाळीसावी’ अशी ती प्रकरणे. शिवाय प्रत्येक प्रकरणाला ‘थोर अश्रू’, ‘मोरी गाय’, ‘सोमवती अवस’ यांसारखी वेगवेगळी नावे आहेत. गुरुजींनी त्या बेचाळीस रात्रींपैकी छत्तीस रात्री तुरुंगात बसून लिहिल्या. म्हणून त्या प्रकरणांना ‘रात्र’ म्हणण्यात आले आहे. त्यांनी नाशिक तुरुंगात ९ फेब्रुवारी १९३३, सोमवारी पहाटे लेखन संपवले. त्यांनी ते पुस्तक पाच दिवसांत दिवसा काम करून उरलेल्या वेळात रात्री व पहाटे मिळून लिहून काढले. त्यावेळची मनोवस्था सांगताना ते म्हणतात, “हृदय भरलेलेच असे. भराभरा शाईने कागदावर ओतावयाचे एवढेच उरलेले असे.” बाहेर आल्यावर त्यांनी ‘नऊ रात्री’ लिहिल्या. म्हणजे एकूण ‘पंचेचाळीस रात्री’ झाल्या. परंतु ‘तीन रात्री’ काही कारणांमुळे वगळण्यात आल्या, म्हणून त्या ‘बेचाळीस रात्री’ झाल्या. कथनातील वातावरण आश्रमीय आहे. श्याम त्याच्या आश्रमबंधूंना आईविषयी कथन करतो. मध्ये मध्ये आश्रमबंधूंचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संवाद आहेत. आश्रमबंधू श्यामच्या गोष्टी ऐकायला उत्सुक आहेत. श्याम त्या जुन्या गोष्टी सांगताना मधूनच त्याच्या काळाशी त्या प्रसंगांची तुलना करतो; अधुनमधून काही ठिकाणी त्याचे स्वत:चे वाचन, चिंतन यानुसार काही भाष्य करत जातो.

सानेगुरुजींची आई विवाह होऊन पालगडला आली, तेथे ते कथन सुरू होते आणि आईच्या मृत्यूशी त्याची अखेर होते. साने गुरुजींच्या प्रवाही शैलीमुळे ते सरळ, साधे गोष्टीरूप कथन वाचकाला सहजपणे खेचून घेते. प्रसंग आईने श्यामला पत्रावळी शिकायला लावण्याचा असो, पोहायला शिकणे भाग पाडण्याचा असो किंवा आईच्या अनुमतीने गाव सोडून दूर जाण्याचा असो; वाचक त्यात गुंतून पडतात. पण ती श्याम व आई यांची एकेरी गोष्ट नाही. श्यामची आई त्या काळातील स्वाभिमानी, दक्ष गृहिणी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेची चौकट सांभाळत घराची प्रतिष्ठा राखू पाहणारी करारी पत्नी आणि प्रेमळ तरीही कठोर माता आहे. ती पारंपरिक चौकटीत राहून माणुसकीची मूल्ये जपणारी, पशू-पक्ष्यांवर माया करणारी, झाडाफुलांना जीव लावणारी घरंदाज स्त्री आहे. घराची अब्रू जप्तीमुळे चव्हाट्यावर येते, तेव्हा ती तनामनाने कोसळते. पण अहेवपणी नवऱ्याच्या मांडीवर मृत्यू येणे हे महद्भाग्य मानून मृत्यूकडे वाटचाल करू लागते. तिचे चित्र साकार होत असताना तत्कालिन गावगाड्याचे जीवनदर्शन आपोआप होऊन जाते. ‘बडा घर पोकळ वासा’ झालेले कौटुंबिक जग दिसून जाते. त्यातील भाऊबंदकी कळते. त्यात सावकारी पाश आहे. माणुसकीने शेजारधर्म सांभाळणारी माणसे आहेत. माणुसकी सोडून गावभर पिटली जाणारी जप्तीची दवंडी आहे. कुटुंबसंस्थेतील जीवघेणा कलह आहे आणि जिव्हाळ्याचे चिवट धागेही आहेत. पालगड गाव, त्या भोवतालचा समुद्र, त्यातून हर्णे बंदराकडे निघालेले पडाव, कंबरभर पाण्यातून त्या पडावापर्यंत पोचणारी माणसे, दूर हर्णे बंदरात दिसणारी बोट हे सारे काही डोळ्यांसमोर उभे राहते.

साने गुरुजींच्या मनात भारतीय संस्कृतीबद्दल उदंड प्रेम होते. त्यांच्या विचारांचे माणिक-मोती पुस्तकभर विखुरले आहेत. त्या काळातील घरोघरी श्लोक म्हणण्याच्या दैनंदिन पद्धतीबद्दल सांगताना ते म्हणतात, “मित्रांनो! प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे. प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते. सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते. प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे. तो ओळखला पाहिजे. आपल्या साऱ्या चालीरीतींत आपण लक्ष घातले पाहिजे. काही अनुपयुक्त चाली असतील, त्या सोडून दिल्या पाहिजेत. परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये. आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे.”

साने गुरूजीसाने गुरुजी आपले दोषही जाणून आहेत. दुसऱ्या एका ठिकाणी ते म्हणतात, “भाऊबंदकी! या भारतवर्षात भाऊबंदकी फार! ती कौरव-पांडवांच्या वेळेपासून आहे, अजून आहे. भावाभावांत जेथे प्रेम नाही; तेथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील?” त्यांनी त्या संदर्भात मनावर आईचे कोरले गेलेले बोल सांगितले आहेत, “श्याम, तुम्ही पाखरांवर प्रेम केलेत, तसेच पुढे एकमेकांवर प्रेम करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल; पण आपल्याच भावांना पाण्यात पाहाल. तसे नका हो करू. तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका. तुमची एकच बहीण आहे, तिला कधी अंतर देऊ नका; तिला भरपूर प्रेम द्या.”

लहानपणी, श्यामची रामरक्षा पाठ नव्हती, कारण श्यामकडे पुस्तक नव्हते. शेजारच्या भास्करने घरात पुस्तक असल्यामुळे रामरक्षा पाठ केली व श्यामला ती येत नाही म्हणून तो चिडवू लागला. श्याम मारामारीवर आला. पण आईने मध्ये पडून श्यामला सुनावले, “तू त्याचे पुस्तक घेऊन ती रामरक्षा वहीवर उतरवून घे आणि पाठ कर. त्याच्यावर चिडण्यात अर्थ नाही.” श्यामने रामरक्षा वहीत लिहून घेतल्यावर त्याला कोण आनंद झाला! त्या संदर्भात साने गुरुजी पुढे किती महत्त्वाची माहिती देऊन जातात! ते लिहितात, “मला किती आनंद झाला होता, केवढी कृतार्थता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा! माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदादिकांच्या हस्तलिखित पोथ्या कितीतरी होत्या! ठळक, वळणदार अक्षर; कोठे डाग नाही, अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोथ्या-पुस्तके लिहून घेत. सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर, त्याला मान मिळत असे. मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वत: स्वत:साठी लिहून घेतले होते, ते दिले आहे. त्या काळात आळस माहीत नव्हता. छापखाने नव्हते, पुस्तकांची टंचाई. मोरोपंत काशीहून पुस्तके बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवत! समर्थांच्या मठांतून ग्रंथालये असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने गल्लोगल्ली आहेत, पुस्तकांचा सुकाळ आहे; तरीही ज्ञान बेताबाताचे आहे. मनुष्याचे डोके अजून खोके आहे. जीवन सुधारले आणि सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्यदक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले – असे दिसत नाही.”

श्‍यामची आईआचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ पुस्तकाबद्दल म्हटले आहे, “मानवी जीवनातील सर्व सद्गुणांची, सौंदर्याची अन् मांगल्याची जणू काही धार काढूनच ती या चांदीच्या कासंडीत भरून गुरुजींनी तरुण पिढीच्या हातात दिलेली आहे. त्या दृष्टीने ‘श्यामची आई’ ही भारताच्या मुलाबाळांची अन् तरुणांची ‘अमर गीताई’ आहे असे म्हटले पाहिजे.” आचार्य अत्रे यांना ते पुस्तक इतके आवडले, की त्यांनी त्यावर चित्रपट काढला. तो लोकप्रिय ठरला आणि सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून त्याला त्या वर्षीचे राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले. त्या चित्रपटाच्या निर्मितीविषयी लिहिताना आचार्य अत्रे यांनी म्हटले आहे, “साने गुरुजींची ‘श्यामची आई’ बऱ्याच दिवसांपासून माझ्या डोक्यात घोळत होती. मी त्या गोष्टीच्या कथानकाचा चित्रपटाच्या दृष्टीने विचार सुरू केला. मी रोज झोपण्यापूर्वी त्यातील एक प्रकरण तरी वाचत असे; पण त्या कथानकातून लागणारे नाट्य कसे काढायचे याचा कित्येक दिवसांपर्यंत मला बोध होईना. मूळच्या वाङ्मयकृतीतील रससौंदर्य जर जसेच्या तसे रूपेरी पडद्यावर उतरवता आले नाही, तर आपल्या हातून त्या थोर कलाकृतीवर अन्याय होईल, ही जाणीव मला विशेष भिववत होती. चित्रपटाचा हा मुळी विषय नव्हे असे कित्येकांचे म्हणणे पडले. पण माझ्या मनाला काही ते पटेना. शब्दांपेक्षा चित्र हे एका दृष्टीने अधिक प्रभावी माध्यम आहे, यावर माझा विश्वास होता. म्हणून ‘श्यामची आई’ वाचताना हृदयाची जी कालवाकालव होते, तोच भावनात्मक प्रत्यय त्याच कथेचे चित्र पाहताना का येऊ नये असा माझा सवाल होता. जवळजवळ दोन वर्षांच्या विचारमंथनानंतर त्या कथेच्या चित्रपटीय रूपांतराचा एके दिवशी मला साक्षात्कार झाला अन् त्यानंतर मी चार-दोन दिवसांच्या आत ती संपूर्ण चित्रकथा लिहून काढली.” चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाल्यानंतर केलेल्या भाषणात त्या पुस्तकाची महती सांगताना आचार्य अत्रे म्हणाले, “माझ्या चित्रपटाचे यश हे साने गुरुजींचे आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीतील त्या आघाडीवरच्या योद्ध्याने नाशिकच्या तुरुंगात असताना १९३३ साली ती अमरकथा लिहिली. सद्गुणांच्या सामर्थ्यावर साने गुरुजी हे तरुणांचे गुरुजी झाले.” (‘मी कसा झालो?: मी चित्रपटकार कसा झालो’  : आचार्य अत्रे)

‘श्यामची आई’ हे पुस्तक किंवा चित्रपटानंतरही पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जीवनमूल्यांची बरी-वाईट उलथापालथ झाली. त्या काळातील जीवनमूल्ये जशीच्या तशी आदरणीय वाटणे शक्य नाही, स्वीकारणेही शक्य नाही. ‘स्त्री’चा माणूस म्हणून सर्वंकष विकास अपेक्षित करताना, त्यागमूर्ती-सोशीक-कष्टाळू पतिव्रता-माता असलेली ‘श्यामची आई’ ही आदर्श स्त्री रूपाचे प्रतिमान म्हणून तरुणांपुढे ठेवणे शक्य नाही. मुद्रणशास्त्र प्रगत झालेले असताना हस्तलिखित पुस्तकांचा विचार केला, तर जगात आपला निभावच लागणार नाही. पण एक निश्चित की ‘श्यामची आई’ हा आमच्या सांस्कृतिक इतिहासातील भावमयी आदर्श आहे. आजवर हे पुस्तक हृदयाने वाचले गेले. पुढील काळात ते हृदयाने वाचले जावेच, तसेच बुद्धीनेही वाचले जावे, हे लक्षात ठेवले पाहिजे. तेवढी त्या पुस्तकाची क्षमता आहे. कार्ल मार्क्स यांचे अर्थशास्त्रीय सिद्धांत आणि फ्रॉईड यांचे मानसशास्त्रीय सिद्धांत यामुळे आपल्या जीवनविषयक विचारांत मूलभूत परिवर्तन झाले आहे. ‘श्यामची आई’मधील कित्येक प्रसंग, निरीक्षणे, विचार-चिंतन असे आहे, की त्याही बाजूंनी त्या पुस्तकाचे विश्लेषण वेगळ्या प्रकारे होऊ शकते. हे मंथन होऊन त्यातील स्वीकारार्ह, अनुकरणीय विचारसंचित मराठी जनतेपर्यंत पोचले पाहिजे.

–  विनया खडपेकर

(आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरील भाषण. ‘राजहंस ग्रंथवेध’- जानेवारी २०१४ – अंकावरून उद्धृत)

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.