श्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक

0
438

मराठी वाचकांच्या मनावर 1940 ते 1980 अशी चार दशके अधिराज्य गाजवले ते श्री. ना. पेंडसे या कोकणातील लेखकाने ! त्यांनी कोकणच्या तांबड्या मातीतील सर्वसामान्य माणसाच्या चिवट लढाया  वैश्विक केल्या. कोकणातील निसर्गतेथील सर्वसामान्य  माणसेसंस्कृती त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीचा बापू’ अशा एकापेक्षा एक कादंबऱ्या सरस ठरल्या. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या  जगण्याचा नि मनाचा शोध त्यांच्या कादंबऱ्यांमधून घेतला...

श्री. ना. पेंडसे यांचे श्रीपाद नारायण पेंडसे हे पूर्ण नाव. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1913 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मूर्डी येथे झाला. त्यांचे वडील दापोलीला नोकरीला होते. पेंडसे यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत पूर्ण केल्यानंतर, तेथे व  काही काळ ठाण्यात शिक्षकाची नोकरी केली. ते ‘बेस्ट’मध्ये नोकरी 1942 ते 1967 या काळात करत होते. त्यांच्या घरात लेखनाची किंवा साहित्याची परंपरा नव्हती. पण त्यांच्या स्वत:च्या मनात लेखनाची ऊर्मी बालपणापासून होती.

पेंडसे यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीला कथालेखनापासून प्रारंभ झाला. त्यांची ‘जीवनकला’ ही कथा ‘सह्याद्री’ मासिकात 1938 मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी काही व्यक्तिचित्रे लिहिली. त्यांचा ‘खडकावरील हिरवळ’ हा व्यक्तिचित्रांचा संग्रह 1941 मध्ये प्रसिद्ध झाला. पेंडसे यांची ‘एल्गार’ ही प्रकाशित झालेली पहिली कादंबरी. त्यांनी ती मुंबईत 1946 साली हिंदू-मुस्लिम दंगे झाले, ते सूत्र धरून लिहिली आहे. त्या कादंबरीत कोकणात राहणाऱ्या रघू आणि कादर या दोन हिंदू-मुस्लिम मित्रांची कथा रेखाटलेली आहे. त्यांनी ती कथा जेथे घडते ते गाव, त्यातील घरे, माणसे, रस्ते, गल्ल्या, निसर्ग, झाडे हे सारे जिवंतपणे रंगवलेले आहे. ‘एल्गार’ ही ‘प्रादेशिक कादंबरी’ म्हणून नावाजली गेली.

‘हद्दपार’ या कादंबरीने त्यांचा आत्मविश्वास वाढवला. श्री.नां.च्या आईचे एक चुलते मुंबईला प्रख्यात शिक्षक होते. ते दामले मास्तर म्हणून ओळखले जात. श्री.नां.ना त्यांच्याविषयी कृतज्ञतेने बोलणारी अनेक माणसे भेटली. दामले मास्तरांचे गोड बोलणे, त्यांचा मुलांना कधीही न रागावण्याचा स्वभाव ही वैशिष्ट्ये श्री.नां.च्या मनात कायमची कोरली गेली. ‘हद्दपार’मध्ये आलेले राजेमास्तरांबाबतचे अनेक प्रसंग व घटना या दामले मास्तर आजोबांच्या जीवनात घडलेल्या होत्या. पेंडसे यांच्या यशाचा आलेख त्यानंतरच्या काळात, ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ या कादंबऱ्यांनी चढता ठेवला. ‘गारंबीचा बापू’ ही हर्णे बंदराच्या परिसरात घडलेली कादंबरी. श्री.ना. यांनी हर्णे, मुरूड, आंजर्ले, मुर्डी ही बंदरपट्ट्याची गावे आणि दापोली या प्रदेशावर हाडामांसाच्या माणसांसारखेच प्रेम केले. त्यांचे मुर्डी या जन्मगावी, मुरूडला आजोळी आणि दापोलीला सुरुवातीची काही वर्षे वास्तव्य होते. कोकणच्या मातीने त्यांच्यावर आयुष्याच्या पहिल्या अकराव्या वर्षांपर्यंत संस्कार केले. ते एवढे जबरदस्त होते, की त्यातून ती कादंबरी मराठी साहित्याला नवे वळण देणारी ठरली. तिने पेंडसे यांची अस्सल कादंबरीकार म्हणून ओळख निर्माण केली. त्यांनी ‘हत्या’ कादंबरीमध्ये एका कोवळ्या मुलाच्या भावविश्वाची झालेली हत्या रेखाटली आहे. कादंबरीचा नायक पंधरा वर्षांचा मुलगा आहे.

‘ऑक्टोपस’, ‘रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’ या त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी कादंबरीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. श्री.नां.नी ‘ऑक्टोपस’मध्ये कामवासनांच्या विळख्यात अडकलेल्या माणसांची कथा सांगताना तंत्रविषयक अभिनव प्रयोग केला. ती कादंबरी पात्रांच्या संवादांतून आकार घेते. ‘लव्हाळी’ आणि ‘ऑक्टोपस’ या मुंबईच्या पार्श्वभूमीवर आकारास आलेल्या कादंबऱ्या. ‘रथचक्र’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार 1964 मध्ये लाभला. त्यामुळे ती महाराष्ट्राबाहेर पोचली. पन्नासच्या दशकातील कोकणामधील कोणा एका ‘ती’ची ही कथा कोकणच्याच पार्श्वभूमीवर आकाराला येते. ‘ती’ची आर्थिकदृष्ट्या हलाखीची स्थिती, परावलंबित्व देणारे जगणे, त्रासदायक भोगणे हे वाचकांच्या परिचयाचे होते, पण ‘ती’ची त्यातून बाहेर पडण्यासाठी मनस्वी धडपड, मधूनच जाणवणारी जळफळणारी मानसिकता हे ‘ती’च्या व्यक्तिरेखेला उंची मिळवून देते. ‘रथचक्र’ ही दूरदर्शनवर मालिकेच्या स्वरूपात ऐंशीच्या दशकात झळकली.

‘तुंबाडचे खोत’ ही चार पिढ्यांची कहाणी रंगवणारी बृहद्कादंबरी आहे. ती चौदाशे पृष्ठांची द्विखंडात्मक कादंबरी एका घराण्याचा इतिहास रंगवते. तो प्रवास 1848 ते 1948 असा सुमारे एक शतकाचा आहे. पेंडसे यांनी तो विलक्षण ताकदीने, बारकाव्यांनिशी मांडला आहे. श्री.ना. पेंडसे यांनी नमूद करून ठेवले आहे, की ‘तुंबाडचे खोत’ आणि ‘लव्हाळी’ या कादंबऱ्या लिहिण्यासाठी मी माझ्या सर्व क्षमता वापरल्या. त्यामुळे त्या कधीही वाचल्या तरी अमुक ठिकाणी असे लिहिण्यास हवे होते अशी पश्चातबुद्धी होत नाही.

पेंडसे यांच्या सर्व कादंबऱ्यांमध्ये धडपडणारी माणसे केंद्रस्थानी असतात. त्यांचा विश्वास माणसाच्या पराक्रमावर आहे. त्यांनी तशा माणसांच्या कथा रंगवताना त्यांचा शेवट सुखात्म केला किंवा येणाऱ्या लढ्यांशी तो जोडला. त्यांनी दु:खातून मानवी जीवनाला पूर्णविराम देण्याऐवजी त्याच्या लढायांचे मार्ग मोकळे करून दिले. त्यांनी त्यांच्या लेखनातील पात्रांनाही पुरेपूर स्वातंत्र्य दिले. त्यांना समजून घेण्यासाठी चिंतन केले, असे त्यांच्या कादंबऱ्या वाचताना जाणवते.  त्यांची बापू, राधा, खोत अशी पात्रे अमर झाली, ती त्यामुळेच. ती कोकणच्या निसर्गाचाच एक भाग वाटावा इतकी त्या मातीशी एकरूप झालेली आहेत. श्री.नां.ची पात्रे कट्टर इहवादी आहेत. ती सुखाच्या शोधात असतात, मग ते सुख कोठल्याही माध्यमातून प्राप्त होवो. ‘गारंबीचा बापू’ त्याची  महत्त्वाकांक्षा कशी पुरी करतो हे महत्त्वाचे नाही. त्याला तशी जिद्द, महत्त्वाकांक्षा असते तेच पुरेसे आहे. म्हणूनच कादंबरीत बापूला यश कसे मिळते याचे फारसे वर्णन नाही. तसेच, ‘रथचक्र’मधील सेक्सला नैतिकतेची नसती बंधने नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये मेलोड्रामा नाही आणि विषण्णताही नाही.

त्यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे ते स्वत:च. त्यामुळे त्यांचे वाद-संवाद-विसंवाद हे सारे त्यांच्याच मनाचे खेळ. त्या खेळातूनच त्यांची ती सारी पात्रे, कथा जन्माला आल्या. त्यातून उलगडत जाणारे मानवी वृत्ती-प्रवृत्तींचे गूढ, अतर्क्य खेळ रंगवताना पेंडसे नीतिकल्पनांच्या सोप्या समीकरणांच्या पलीकडे जातात. ते पाप-पुण्य, श्रद्धा, तर्क, वासना यांचे चित्रण करत मानवी जीवनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात.

श्री.ना. हे फ्योदोर दोस्तोव्हस्कीचे भक्त होते. त्यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी ‘राधा’चे आव्हान स्वीकारले आणि वेदनेचे झाड बनलेल्या ‘राधे’च्या दु:खाला वाचा फोडणारी ‘गारंबीची राधा’ अवतरली. ते म्हणत, “कादंबरी म्हणजे जिवंत झाड. झाडाने कोठे वाढायचे हे जसे माणसाने ठरवायचे नसते; तसेच, कादंबरीचेही आहे.” त्यांचे ‘श्री.ना. पेंडसे – माणूस आणि लेखक’ हे आत्मकथन 1974 आणि 2005 अशा दोन टप्प्यांमध्ये प्रकाशित झाले. ते निवेदनशैलीच्या दृष्टीने लक्षणीय ठरले. श्री.ना. पेंडसे यांनी मित्राच्या भूमिकेत शिरून आपलेपणाने आणि तितक्याच तटस्थपणे आत्मचरित्र लिहिले. एक श्रेष्ठ साहित्यिक देहाभोवतीची अहंमची नि अस्मितेची टरफले अलगदपणे बाजूला सारून त्याचे शब्दचित्र कसे रेखाटू शकतो याचा तो आगळावेगळा प्रयोग आहे. लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील ‘आभाळाची हाक’ ही कादंबरी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी पूर्ण करणे हा लेखक म्हणून श्री.नां.नी केलेला पराक्रमच म्हणावयास हवा ! टिळक यांनी मूलगामी स्वरूपाचे संशोधन आणि राजकारण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्या आणि दोन्ही क्षेत्रांत कळस गाठला हेच त्यांच्याविषयी वाटणाऱ्या जबरदस्त आकर्षणाचे मुख्य कारण आहे असे श्री.ना. पेंडसे यांनी म्हटले आहे.

श्री.नां.नी कादंबऱ्यांची नाट्यरूपांतरेही केली. त्यांची ‘संभूसांच्या चाळीत’, ‘रथचक्र’, ‘चक्रव्यूह’ अशी अनेक नाटके रंगभूमीवर आली आणि गाजलीही. चौदा कादंबऱ्या नि इतरही विपुल लेखन करणारे श्री.ना. पेंडसे हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी कादंबरीकारांचे आघाडीचे प्रतिनिधी होत. साहित्यातून विश्वबंधुत्वाची पताका मिरवणारा कोकणचा कलंदर असा तो मनस्वी, श्रेष्ठ साहित्यिक 23 मार्च 2007 रोजी काळाच्या पडद्याआड गेला !

श्री.ना. पेंडसे यांनी ‘खडकावरील हिरवळ’ (1941) हे व्यक्तिचित्रण, तर ‘एल्गार’ (1949), ‘हद्दपार’ (1950), ‘गारंबीचा बापू’ (1952), ‘हत्या’ (1954), ‘यशोदा’ (1957), ‘कलंदर’ (1959), ‘रथचक्र’ (1962), ‘लव्हाळी’ (1966), ‘ऑक्टोपस’ (1973), ‘आकांत’ (1981), ‘तुंबाडचे खोत’ (1987), ‘गारंबीची राधा’ (1993), ‘कामेरू’ (1998), ‘आभाळाची हाक’ (2007) या कादंबऱ्या लिहिल्या. श्री.नां.च्या ‘जुम्मन’ (1966) या कथासंग्रहातील कथांत समाजातील वास्तवाचे प्रतिबिंब उमटते. पेंडसे यांनी काही नाटके लिहिली. त्यात  ‘महापूर’ (1961), ‘राजेमास्तर’ (1964), ‘यशोदा’ (1965), ‘गारंबीचा बापू’ (1965), ‘संभूसांच्या चाळीत’ (1967), ‘असं झालं आणि उजाडलं’ (1969), ‘चक्रव्यूह’ (1970), ‘पंडित; आतातरी शहाणे व्हा !’ (1978), ‘रथचक्र’ (1980) ही नाटके प्रकाशित झाली, तर ‘शोनार बांगला’ व ‘हुद्दार’ ही त्यांची अप्रकाशित नाटके आहेत. त्यांचे ‘श्री.ना. पेंडसे – माणूस आणि लेखक’ (1974 व 2005) हे आत्मचरित्र. तसेच, त्यांचे ‘बेस्ट उपक्रमाची कथा (1972), ‘प्रायश्चित्त’ (नॅथॅनिअल हॅथॉर्नच्या ‘स्कार्लेट लेटर’चा अनुवाद 1969) हे इतर साहित्यदेखील प्रकाशित आहे.

– स्वाती महाळंक 8888102207 swatimahalank@gmail.com

——————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here