‘श्रीमंत’ निसर्गातील ‘गरीब’ गाव (Kumshet – poor village in rich natural resources area)

0
123

कुमशेत हे नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील आदिवासी खेडे. ते तालुक्याच्या गावापासून पासष्ट किलोमीटर उंचीवर आहे आणि नगरपासून एकशेनव्वद किलोमीटर दूर. टेकडीवर वसलेले ते गाव, सभोवताली खोल दऱ्या, भोवती जंगल आणि श्वापदे. गावाला निसर्गाचे भरभरून देणे लाभले आहे.

 

गावाला सहा वाड्या. गावात सगळी वस्ती आदिवासी जमातीची. लोकवस्ती एक हजार एकशेसहासष्ट. गावात दोनशेबावीस कुटुंबे. गावाचे एकूण क्षेत्र सात हजार एकर. त्यांपैकी सहा हजार एकर हे वनक्षेत्र. उरलेल्या हजार एकर क्षेत्रात गाव आणि गावाची शेती. प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला सरासरी दोन-तीन एकर शेती येते. तीही खडकाळ. इतकी कमी जमीन असताना हे लोक कसे जगतातइतक्या कमी क्षेत्रात फक्त भात लागवड होते; अपवादाने काहीजण गहू करतात. वरई-नागली करण्याचे प्रमाणही कमीच आहे. अतिपाऊस व तीव्र हवामान यांमुळे उतार पिके व फळबाग लागवड करणे कठीण. आंबा लावला तर वाळवी लागते. आवळा वाढत नाही. त्यातून फक्त भात हे उत्पन्न. किती भात होतो? घरटी दोन ते तीन पोती तांदूळ हातात येतो. तो तांदूळ केवळ घरात खाण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे शेतीतून जगण्यासाठी उत्पन्न काहीच नाही.

 

अभयारण्य असल्याने वन्य पशू शेतीचे नुकसान करतात. ते नुकसान सतत होत असते. वनखाते खूप कडक वागते. जंगलात येऊ देत नाहीत. जनावरे चारू देत नाहीत. भात व कोरडी भेंडी किंवा तत्सम भाजी हे मुख्य अन्न. भात त्या कोरड्या भाजीसोबत खातात. गावात एकतर रोजगार हमी किंवा गाव सोडून मजुरीला जाणे एवढे दोनच उत्पन्नाचे मार्ग आहेत.

दोन वर्षांपूर्वी रोजगार हमीची कामे पस्तीस ते चाळीस दिवस चालली; पण आता फारशी होत नाहीत. बाहेरच्या बागायती कामापेक्षा कमी मिळणारी मजुरी, वनक्षेत्र जास्त असल्याने मर्यादा व अधिकाऱ्यांचे तांत्रिक मार्गदर्शन लवकर न मिळणे, कामासाठी साईट नसणे अशी अनेक कारणे गावकऱ्यांकडून कळतात. दोनशेबावीस कुटुंबांपैकी जवळपास दोनशे कुटुंबांतील लोक पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात बागायती शेतीत मजुरीला जातात. बागाईतदार तीनशे रुपये मजुरी व जेवण देतात. गावातील तरुण स्त्री-पुरुष वर्षाचे आठ महिने नारायणगावला जाऊन-येऊन असतात. गावात फक्त म्हातारी माणसे आणि लहान मुले अनेकदा असतात.

महिला बचत गटात बांबूच्या वस्तू बनवतात.

 

गावकऱ्यांनी जंगलात शेती करण्यासाठी 2005 च्या कायद्यानुसार पूर्वी कसलेल्या जमिनीवर हक्क सांगणारे वनहक्क दावे केले, पण एकशेसहापैकी फक्त अकरा दावे मंजूर झाले. लोक सातत्याने पाठपुरावा आंदोलने 2005 पासून करत आहेत, पण शासन दोन एकर जमीन कसण्यास मंजुरी देत नाही. सरपंच सयाजी आसवले यांनी मेंढालेखाव पाचगाव या दोन्ही आदिवासी गावांचे लढे समजावून घेतले व त्या धर्तीवर कुमशेतची बाराशे एकरांची वनजमीन ग्रामपंचायतीच्या नावावर करून घेतली आहे. वनाधिकाऱ्यांकडून नकाशे वगैरे कागदपत्रे मिळायची आहेत. आसवले व गावकरी यांचे प्रयत्न त्यासाठी चालू आहेत. आसवले म्हणाले, की रोजगार व पाणी हे गावासमोरील सर्वांत बिकट प्रश्न आहेत. वनजमीन गावच्या ताब्यात आल्यावर ते प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकेल. गडचिरोलीत जाऊन बांबू लागवड व वस्तुनिर्मिती यांचे प्रशिक्षण घेतले आहे. कलेक्टरकडे दोनशे किलोमीटरवर जाऊन अनेक प्रश्नांचा अनेक वेळा सातत्याने पाठपुरावा करण्याइतकी आसवले यांची समज आहे. त्यांचीच धडाडी व चिकाटी हीच त्या गावाचे प्रश्न सुटण्याची आशा वाटते. गावाला रेशन मिळण्यासाठी सतत प्रयत्न करतो असे तहसीलदार मुकेश कांबळे सांगतात. काही कुटुंबांचे रेशन सुरू झाले आहेही. गावात रस्ता आणि आरोग्य यांची आबाळ आहे. रस्त्याचा काही भाग तर नुसती सुटी खडी आहे. तेथे मोटारसायकलही नीट चालवता येत नाही. आरोग्यकेंद्र तेथून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे.

रमाकांत डेरे हे राजुरीला स्वत:चे वस्तुसंग्रहालय असलेले कारागीर आहेत. त्यांनी बांबू लागवड आणि चंदन लागवड कशी उपयुक्त ठरेल याबद्दल तपशीलवार माहिती गावाला दिली आहे. महिला बचत गटात बांबूच्या वस्तू बनवतात, पण कोठे विकाव्या तेच त्यांना कळेना. लोकपंचायत ही स्वयंसेवी संस्था शेतीचा स्तर सुधारणे, शेतीतील प्रयोग,वनौषधी, पशुपालन, महिला उद्योजकता या विषयांवर त्या गावात काम करत होती. ते काम सध्या स्थगित आहे असे आसवले यांच्या बोलण्यात आले. गावाला जंगलावर सामुहिक हक्क मिळतो.

गावचा निसर्ग

 

गावनितांत सुंदर आहे. कडेला उंचच उंच डोंगर, अंगावर येणारे कडे. खळाळणारे झरे. भंडारदरा धरण,कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड ही पर्यटकांच्या गर्दीची ठिकाणे जवळच. मात्र या जागेकडे पर्यटकांचे लक्ष गेलेले नाही. माणसांचा विकास साधणे व निसर्ग जपणे, दोन्ही शक्य आहे. गावकरी म्हणाले, की पर्यटनविकासासाठी मुख्य रस्ता चांगला हवा. एक रस्ता नसणे गावाच्या विकासाच्या अनेक प्रकारच्या संधी हिरावून घेत होता. गावात शाळा चौथीपर्यंत आहे. बरीच मुले आश्रमशाळांत जातात. दहा मुले पदवीपर्यंत पोचली. ती कंपनीत रोजगार करतात.

 

गावाची लोकसंख्या अकराशे त्रेसष्ट आहे. गावचे लोक महादेव कोळी समाजाचे. गावाला ग्रामपंचायत आहे. आसवले सरपंच म्हणून दोन वर्षांपूर्वी निवडून आले. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे, परंतु ते वयाच्या सोळाव्या वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. सध्या त्यांचे वय बेचाळीस आहे. पत्नी व शाळेत जाणारी तीन मुले असा त्यांचा संसार आहे. गावात देवळे म्हणजे मुख्यत: चारपाच देवराया आहेत. त्यात विठ्ठल-रुक्मिणी, हनुमान असे देव आहेत. ग्रामदैवत म्हणून धारेराव या वीरपुरुषास पुजले जाते. त्याने 1827 च्या दरम्यान ब्रिटिश सैन्यास सळो की पळो करून सोडले होते अशा गोष्टी सांगतात. त्यांच्या नावाने दर रविवारी गावात यात्रा भरते. गावाभोवती रतनगड, भैरवगड हे छोटे किल्ले येतात. मुळा नदीचे उगमस्थानही त्याच परिसरात आहे.

श्रीमंत जंगलसंपत्ती असलेले हे गरीब गाव.

सयाजी आसवले 9922257664

हेरंब कुलकर्णी 8208589195 herambkulkarni1971@gmail.com

हेरंब कुलकर्णी हे शिक्षण क्षेत्रातील लेखक व कार्यकर्ते आहेत. ते वैचारिक आणि शिक्षणविषयक लेखन करतात. त्यांची नऊ पुस्तके व चार पुस्तिका प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेख वर्तमानपत्रांत आणि मासिकांत प्रसिद्ध होत असतात.

——————————————————————————————-————————————————————–

 

 

 

 

———————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here