केदारलिंग हे पाचलचे ग्रामदैवत. पाचल हे कोकणच्या राजापूर तालुक्यातील गाव. केदारलिंग मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. पाचल गाव कोंड-दिवाळवाडी रस्त्यावर येते. मंदिर रस्त्यालगत दाट वनराईत वसलेले असे आहे -लाकडी, कौलारू आणि टुमदार. मंदिराच्या डाव्या बाजूला ‘ब्राह्मण देवराई’ आणि मागील बाजूला ‘रामेश्वर देवराई’ आहेत. रामेश्वर देवराईमध्ये रामेश्वराचे छोटेखानी लाकडी मंदिर 1980-85 पर्यंत सुस्थितीत होते -ते भग्र अवस्थेत आहे. देवळाची (म्हणजे केदारलिंग देवस्थानाची) एकोणीस गुंठे जमीन देवस्थानाच्या नावावर आहे. सरकारच्या धोरणानुसार देवस्थान हा ट्रस्ट झाला आहे.
केदारलिंग हे शंकराचे देवस्थान. पण त्या देवळात गाभारा किंवा पिंडी नाही. देवळाला कळस नाही. देवळात पुरातन पाषाणमूर्ती विराजमान आहे. आसनस्थ पाषाण मध्यभागी; केदारलिंग देवाच्या उजव्या बाजूला धनीणबाय (म्हणजे माता पार्वती), रामेश्वर, कालकादेवी, पावणादेवी, देवाच्या डाव्या बाजूला नवशादेव, ब्राह्मणदेव, ईठलादेवी, नवलादेवी आणि समोर खाली गणपती… अशा अनेक देवदेवतांच्या पाषाणमूर्ती देवळात लाकडी मंडपामध्ये विराजमान आहेत.

गावकार मंडळींमध्ये खोत, गुरव, नारकर, तेलंग आणि महार (हरिजन) यांचा समावेश होतो. आता महार समाज राहिलेला नाही. त्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्याने इतर चार मंडळी गावच्या देवस्थानाचा कारभार, उत्सव, धार्मिक विधी गावाच्या साथीने पार पाडतात.
चार गावकार मंडळींमध्ये खोत हे राजसत्तेचे मालक मानले जात -देवाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या हुकमाशिवाय कार्य होत नाही. दुसरे म्हणजे पूर्वसत्तेचे मालक – त्यात पुजारी हा गुरव, त्याला साथ देणारे नारकर आणि तेलंग देवस्थानाच्या कार्यात पाच-बारा करतात. म्हणजे पाच हे गावकरी-मानकरी आणि बारा म्हणजे गावातील सर्व जाती-धर्माचे लोक. म्हणजेच गावाच्या चतु:सीमेच्या (चार सीमा) आत राहणारे लोक. केदारलिंग हा त्यांचे रक्षण करतो अशी त्यांची श्रद्धा आहे.

केदारलिंग (पाचलोबा) देवाच्या वार्षिक उत्सवाची सुरूवात मार्च महिन्यातील होळी पौर्णिमेपासून (शिमगोत्सव) होते. देवाची ‘रूपे’ पालखीत होळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लावली जातात. त्या आधी दोन दिवस, मानकरी खोताच्या हुकूमाने देवाला कौल लावतात. देवळात देवाला कौल लावण्याची परंपरा आहे. ते काम गुरव व गावकार मंडळी करतात. म्हणजे देवाला, “शिमगा खेळण्यास तयार आहेस का?” असे कौलाच्या रूपाने विचारले जाते. कौल मिळाला, की पुढील तयारी सुरू होते. त्याला ‘होळीचा मांड’ असे म्हणतात. त्या ठिकाणी होळी पौर्णिमेच्या दिवशी होळी उभी केली जाते. त्यासाठी गावातील सर्व लोक एकत्र जमून आंबा किंवा माड या झाडांचा उपयोग करतात. पुजारी (गुरव) झाडांची पूजा करतो. गावातील सुतार समाज त्या झाडाला मानाचा घाव घालून ते झाड तोडतो. ते झाड सर्व लोक खांद्यावर उचलून ढोल-ताश्यांच्या गजरात होळीच्या मांडावर नाचवत घेऊन येतात. होळी उभी केली जाते. त्या जागेला ‘चव्हाटा’ (चव्हाटा म्हणजे चतु:सीमेचा मालक) असेही म्हणतात. पाचलमध्ये होळी उभी करण्याची पद्धत आहे. त्यावेळी चव्हाट्याला रूप (मुखवटा) लावले जाते. ती शिमगोत्सवाची सुरुवात झाली. पाचलला होम होत नाही.
देवाचे दागिने, कपडे घालून ते सजवले जातात. रूपे लावण्याची जबाबदारी गावचा सुतार सांभाळतो. देवाचा जामदारखाना (पेटारा) गुरवाच्या घरी असतो. त्यात देवाचे दागिने, कपडे, वस्त्र असे सर्व सामान असते. तो पेटारा बांबूंपासून बनवलेला आहे. त्या पेटाऱ्याला फक्त रस्सीने बांधून ठेवतात. त्याला कुलूप वगैरे काही नाही. पेटाऱ्यामध्ये असलेल्या वस्तूंची यादी खोतांकडे असते. ते सर्व वस्तू कार्यक्रमाच्या वेळी बघून घेतात आणि बघून पुन्हा पेटीत ठेवतात. तो पेटारा देवळात आणण्याचा मान गावातील धावडे कुटुंबीयांकडे आहे.
गावकरी व मानकरी पालखी होळीच्या मांडावर सकाळी घेऊन येतात. होळीचा मांड सजवलेला असतो. पालखी गावातील जुन्या देवस्थानांची भेट त्या दिवशी घेते. उदाहरणार्थ पालखी जुना चव्हाटा, कालकादेवी देवस्थान, गोसावीबुवा मठ या ठिकाणी जाते. जुना चव्हाटा बाजारवाडी येथे भिंगार्डे यांच्या घराजवळ आहे. गावकरी मंडळींनी त्याचा जीर्णोद्धार भिंगार्डे कुटुंबीयांच्या देणगीतून 2022 मध्ये केलेला आहे.

पालखी जुन्या चव्हाट्यावर भेटून, राजसत्तेचे मालक खोत यांची पाच घरे घेऊन संध्याकाळी होळीच्या मांडावर (खेळण्याच्या ठिकाणी) येते. ती जागाही देवस्थानाच्या मालकीची आहे. पालखी अठरा वर्षांपूर्वीपर्यंत गावातील प्रत्येक घरी जायची. त्या-त्या घरी घरातील प्रमुख व्यक्ती देवाची पूजा करायचा. गावकऱ्यांना पालखी दारात येणार तो दिवस सगळ्यात मोठा दिवस (आनंदाचा) वाटायचा. लोक त्यांची गाऱ्हाणी देवाला सांगायचे, लहानग्यांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आनंद व्हायचा. कारण गावातील नागरिकांना देवाची पूजा करण्यास मिळायची. आता देव (पालखी) गावात फिरत नाही. कारण हे पाच मानकरी. त्यांतील एक मानकरी (हरिजनांचा) बौद्ध झाला. तोच मानकरी धूपारतीला ढोल वाजवायचा. तसेच, प्रत्येक घरामध्ये पूजा झाल्यानंतर धूपारतीच्या वेळी ढोल गळ्यात घालून वाजवायचा. परंतु त्या समस्येमुळे देवाचे (पालखी) गाव घेणे बंद झाले. सर्वजण वाडीवाडीप्रमाणे क्रमाक्रमाने होळीच्या मांडावर येऊन पूजा करतात. त्यांचे गाऱ्हाणे सांगतात, पूजा करतात, धूपारती होते व पालखी वानकरीण होते. वानकरीण म्हणजे देवाला प्रार्थना करताना लोकगीत म्हटले जाते ज्यामध्ये सर्व समाजांचा उल्लेख असतो. ते गीतगायन गावातील धावडे कुटुंबीय करतात. त्याच दिवशी प्रत्येक घराची पाठवणी (वर्गणी) म्हणून पाचशेएक रुपये देऊन, त्याची पावती लोक घेतात. गावकरी मंडळी त्या रकमेमधून देवाचे वर्षातून येणारे सर्व कार्यक्रम करत असतात.
देवाला खेळवण्याचा कार्यक्रम संध्याकाळी होळीच्या मांडावर चव्हाट्याजवळ अकरा दिवस रोज होतो. पालखी नाचवण्यासाठी रात्री साडेनऊ-दहा वाजण्याच्या दरम्यान उचलली जाते. ती पुन्हा पालखीच्या मांडावर चव्हाट्याभोवती तीन किंवा पाच प्रदक्षिणा पूर्ण करून बसवली जाते. धूपारती होते. वानकरणी होतात. लोकांची गाऱ्हाणी होतात आणि सुरुवात होते ती पाचलच्या प्रसिद्ध ‘घुमटा’ची ! ‘घुमट’ हे फक्त पाचलला पाहण्यास मिळते. घुमट पाचलच्या बाजारवाडीतील देवरूखकर कुटुंबीय त्यांच्या वाडकरी मंडळीच्या सहाय्याने सादर करतात. घुमट खेळामध्ये राधेची भूमिका (स्त्री पात्र) त्याच वाडीतील सरवणकर कुटुंबीय करत. मात्र त्यांनी ती करणे थांबल्यानंतरही ‘घुमट’ सादर होते. त्यामध्ये तेल-वात घेऊन बांधरकर (तेली) उभे राहतात. घुमटानंतर लोकांच्या करमणुकीसाठी गावातील जुनीजाणती माणसे विविध सोंगे (पात्र) सादर करून त्या-त्या काळात लोकांची भावनिक करमणूक करायचे. शिमगोत्सवात शेवटच्या दिवशी पाचलचे रोमट (पेठवाडी) सादर करतात. त्याला शिंपणे असे म्हणतात आणि देव पुन्हा देवळात स्थानापन्न होतात.

दुसरा कार्यक्रम म्हणजे श्रावण महिन्यात येणारे चार किंवा पाच रविवार म्हणजे देवाची वारी. त्या वारीचा उद्देश शेतकऱ्यांचा विश्रांतीचा दिवस ! त्या दिवशी शेतकरी शेतातील कोणतेही काम करत नाहीत. तिसऱ्या वारीला देवाचा सप्ताह (चोवीस तास जागरण करण्याचा दिवस). त्या देवाची गावात जेवढ्या वाड्या आहेत, तेवढे क्रमाक्रमाने येऊन देवळात भजन करतात. प्रत्येक वाडीसाठी एक वेळ ठरवून दिलेली असते. गुरववाडीपासून सुरूवात होते. ती बावकरवाडी पूर्ण करते. अशा तऱ्हेने चोवीस तासांचा सप्ताह (जागरण) संपतो. देवाला ब्राह्मणांकडून चौथ्या वारीला अभिषेक केला जातो. त्या दिवशी दुपारी गावातील लोकांना महाप्रसाद असतो. श्रावणात येणाऱ्या ‘पोवती पौर्णिमे’ला देवाला पोवती बांधण्याचा कार्यक्रम होतो. गुरव देवाची पूजा करून देवाला पोवते बांधतात आणि पोवत्याचे दोरे पूर्ण गावात घराघरात पोचवले जातात.

गणेश चतुर्थीला मुख्य गुरवाच्या घरी देवाची रूपे लावली जातात. त्याच ठिकाणी देवाच्या गणपतीची स्थापना केली जाते. त्यापाठोपाठ सुरू होतो नवरात्र उत्सव. गुरव देवळात घटस्थापना करतो. त्याला कुंभ लावले जाते. कुंभात विविध प्रकारची धान्ये लावली जातात. त्यावर फुलांची माळ चढवली जाते. माळ रोज लावली जाते. संध्याकाळी गावातील लोकांकडून आरती केली जाते. गोसावी डमरू घेऊन आरतीच्या वेळी नऊ दिवस गावातील आरतीला उभा असतो. नऊ दिवस देवळात करमणुकीचे विविध कार्यक्रम होतात. सातव्या दिवशी गावातील धनगर समाज ढोल वाजवण्याचा कार्यक्रम करतो. त्याला ‘गजी नृत्य’ असे म्हणतात. धान्य, दक्षिणा हे सर्व गुरवकीच्या गुरवाचे असते. ते देवस्थानाला मिळत नाही. शेवटी, दसरा पूजन होते आणि तो लावलेला कुंभ म्हणजे धान्य घराघरांत पुजाऱ्यामार्फत पोचवले जाते.
वर्षातून येणाऱ्या तीन उत्सवांत रूपे लावण्याची जबाबदारी ही गावाच्या सुतार मंडळींकडे असते. त्या बदल्यात वर्षातून एकदा सुतारांना देवाचा शिधा दिला जातो. त्यामध्ये एक नारळ, विडा, सुपारी, शेरभर तांदूळ अशी शिधासामग्री असते. पूर्वी देवस्थानाच्या काही जमिनी होत्या. म्हणजे शेतजमीन. त्याला सुतारमळा, सोनारमळा, महारमळा, गुरवमळा असे म्हणत. पण त्यापैकी सुतारांकडे काही शिल्लक राहिलेले नाही. महारमळा, गुरवमळा मात्र आहेत. त्याकाळी बलुतेदार हे मळे पिकवून, शेती करून त्यांचा उदरनिर्वाह करत.
दिवाळीत देवाची पूजाअर्चा गुरव सुरू करतो. गुरवाच्या घरा(पिढी)प्रमाणे ते देवस्थानाची पूजा क्रमवार करतात. दिवाळी दरम्यान येते ती त्रिपुरी पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री देवळात दीपोत्सव साजरा होतो. दीपमाळेवर मोठमोठे दिवे लावले जातात. भोपळ्याचा आकार देऊन त्याचे दोन दिवे बनवले जातात. गुरव रात्री बारानंतर दोन दीपमाळांवर दोन दिवे ठेवतात. पण त्यांच्या रूपात असंख्य दिवे तयार करून ते मंदिरात आणि परिसरामध्ये ठेवले जातात. सुतार समाज दिवे ठेवण्याचे काम करतो. सजवलेली पालखी मंदिराबाहेर काढून देवळाभोवती नाचवली जाते. पालखीच्या पुढे वाडी-वाडीतील भजने, दिंड्या चालू असतात. अशा पाच प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी देवळात येते आणि त्रिपुरी पौर्णिमेचा कार्यक्रम पूर्ण होतो. त्याला कोकणात ‘टिपर’ असेही म्हणतात. त्यानंतर येते ती देव दिवाळी. त्या दिवशी दीप देवाला ओवाळून घराघरात फिरवला जातो. नव्या जमान्यात सारे बदलून गेले आहे. पण पाचलोबाच्या प्रथापरंपरा मात्र नेकीने चालू आहेत.
– श्रीकृष्ण यशवंत सुतार 8655977626 मु. पाचल, दिवाळवाडी, ता. राजापूर