श्रमदानातून ढगेवाडीचा कायापालट

3
34
carasole

संगमनेर-भंडारदरा रस्त्यावर अकोल्याच्या जवळ डोंगरांच्या रांगेमध्ये ‘ढगेवाडी’ हा पाडा वसलेला आहे. ढगेवाडीला जायचे असेल तर तीन डोंगर ओलांडून, चढ चढून वर गावात जावे लागे. तीस वर्षांपूर्वी त्या पाड्यावर पन्नास-साठ कच्च्या झोपड्या होत्या. पाण्यासाठी महिलांना डोंगर उतरून पाच किलोमीटर अंतर चालून जावे लागत होते. पावसाळ्यात तेथे थोडीफार शेती होई. पण नंतर गावातील लोक मजुरीसाठी दूर जात असत. ते रस्तादुरुस्ती, बांधकाम, ऊसतोडणी अशा कामांच्या शोधात वणवण फिरत. त्यांच्या मागे पाड्यावर म्हातारी-कोतारी आणि लहान मुले राहत.

ढगेवाडीतला एक तरुण, भास्कर पारधी हा त्या परिस्थितीतून गावाला बाहेर कसे काढावे या विचारात असायचा. भास्करने शालेय शिक्षण अकोला (ता. संगमनेर) येथील ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या वसतिगृहात राहून घेतले. त्यालनंतर तो पुण्यातील मोहन घैसास यांच्या ‘सुयश चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेत काम करू लागला. त्याला त्यातून नवी दृष्टी मिळाली. भास्कसरची विचारचक्रे गावाच्या विकासाच्या दृष्टीने फिरू लागली. तो ढगेवाडी पाड्यावर परत आला. त्यांरच्यारसोबत ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे कार्यकर्ते व ‘सुयश ट्रस्ट’चे मोहन घैसास व स्मिता घैसास हेदेखील होते. त्यांनी मिळून ढगेवाडीची पाहणी केली. विकासाच्या दृष्टीने काही योजना आखल्या. मग त्यांनी ग्रामस्थांना एकत्र करून, त्यांना त्या योजना समजावून दिल्या. जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. गावक-यांना त्यांच्या  उत्साहाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गावातील तरुणांच्या मदतीने गावाभोवतालच्या डोंगरउतारावर ठिकठिकाणी चर खणून पावसाचे पाणी जिरवण्याची व्यवस्था केली. गावात पाझर तलाव होता. त्या तलावाच्या खाली बांध बांधला. अशा तऱ्हेने पावसाचे पाणी अडवण्याची व्यवस्था झाली. ते सर्व ढगेवाडीतील गावकऱ्यांच्या श्रमदानातून घडले.

गावक-यांच्या कष्टांची फळे लवकरच दिसू लागली. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी डोंगरउतारावर जमिनीत मुरण्यास सुरूवात झाली. जमिनीच्या पोटात गेलेले पाणी गावातील विहिरींना लागले. पाझर तलावात उन्हाळ्याच्या दिवसांतही पाणी दिसू लागले. गावातील पाण्याचा प्रश्न सुटला! गावात शेती बाराही महिने होऊ लागली. ढगेवाडीत 1990 पूर्वी फक्त पाच विहिरी होत्या. जलसंधारणाचे काम करण्यात आल्या नंतर गावात पंचवीस विहिरी आहेत. ग्रामस्थांनी पाण्याचे वाटप सगळ्यांना समान केले. त्यामुळे प्रत्येकाचे शेत हिरवेगार दिसू लागले आहे. गाव डोंगरावर असल्याने सपाट जमीन कमी, उतार जास्त, म्हणून गावकऱ्यांनी उतारावर भाजीपाल्याचे पीक घेण्याचे ठरवले. पीक चांगले आले. टोमॅटोचे पीक तर अमाप आले.

गावक-यांकडे भाजीपाला शहरात विक्रीस नेण्यासाठी दळणवळणाचे साधन नव्हते. गावात रस्ताही नव्हता. श्रमदानातून विकास साधता येतो हे गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावक-यांनी पुढे पाऊल उचलले. सगळ्यांनी मिळून गावासाठी रस्ता तयार केला. परिणामी गावचा भाजीपाला बाहेर विक्रीस पाठवला जाऊ लागला. टोमॅटोचे अमाप पीक बघून मोहनराव घैसास यांनी ढगेवाडी ग्रामस्थांना साहाय्य केले. गावात ‘अंबेमाता अभिनव टोमॅटो सॉस उत्पादक सहकारी संस्था’ या नावाने प्रकल्प 2001 मध्ये सुरू झाला.

ढगेवाडीतील महिलांनी एकत्र येऊन दोन बचतगट सुरू केले आहेत. त्यातील पैशांतून गांडूळखत प्रकल्प सुरू झाला आहे. साठ-सत्तर झोपड्या असलेल्या ढगेवाडीत आता विटांची पक्की घरे दिसू लागली आहेत. गावात सायकली-मोटारसायकली आल्या. दारिद्रय रेषेखाली असलेले गाव फक्त तीन वर्षांत दारिद्रय रेषेच्या वर आले! गावकरी मजुरीसाठी अन्यत्र न जाता गावातच काम करू लागले. उलट, बाहेरचे मजूर ढगेवाडीत कामासाठी येतात. गावकऱ्यांनी फळझाडे लावण्याचेही मनावर घेतले आहे. तो सर्व बदल स्वावलंबनातून शक्य झाला आहे. अठराविश्वे दारिद्रय असलेली ढगेवाडी स्वावलंबनातून संपन्नतेकडे वाटचाल करत आहे. भास्कर पारधीसारखे वनवासी युवक तयार झाले तर वनवासी भागाचा विकास दूर नाही!

भास्‍कर पारधी – 9763396451

– वृषाली पांचाळ
9420484892

About Post Author

3 COMMENTS

  1. Preranadayee, swawalambanch
    Preranadayee, swawalambanch aawashayak kewal sarkar nahi tar samajahi parivartan karu shakto yache uttam udaharan

  2. लेख सुंदर आहे .खेड्यातील
    लेख सुंदर आहे .खेड्यातील तरुणांना प्रे्रेरणा देणारा आहे.

Comments are closed.