शुल्बसूत्रे

1
26
carasole

दर्भाच्या विणलेल्या दोरीला शुल्ब म्हणतात. तीन किंवा पाच दर्भमुष्टी घेतात आणि त्या एकापुढे एक अशा प्रकारे वळतात. दर्भदुष्टी व समिधा शुल्बाने बांधतात. पशूच्या अनुष्ठानात यूपाला गुंडाळण्यासाठी व पशूच्या गळ्याला बांधण्यासाठी शुल्बाचाच उपयोग करत.

कल्पसूत्रे हा वेदांगाचा एक भाग. वैदिक कर्मकांड हा कल्पसूत्रांचा मुख्य विषय आहे. कल्पसूत्रांचं गुहसूत्रे, श्रोतेसूत्रे व धर्मसूत्रे असे तीन प्रकार आहेत. त्यांपैकी श्रोतेसूत्रांत अनेक यज्ञयागांचे विवरण आहे. या श्रोतेसूत्रांना शुल्ब सूत्रे उपयुक्त ठरतात.

शूल्ब या शब्दाचा अर्थ रज्जू असा आहे. रज्जूने मोजलेल्या वेदींची रचना हा शुल्बसूत्रांचा प्रतिपाद्य विषय आहे. कर्मकांडाशी संबंधित असल्यामुळे शुल्बसूत्रे ही यजुर्वेदाच्या शाखांत उपलब्ध होतात. कात्यायन शूल्बसूत्रे हे एकच शुल्बसूत्र शुक्ल यजुर्वेदाशी संबद्ध आहे. पण बौधायन, आपस्तंब, सत्याषाढ, मानव, वाराह व वाधूल अशी सहा शुल्बसूत्रे कृष्ण यजुर्वेदाशी संबद्ध आहेत. त्‍याशिवाय, आपस्तंभ शुल्बसूत्राच्या टीकेत करविंदस्वामीने मशक व हिरण्यकेशी या दोन शुल्बसूत्रांचा उल्लेख केला आहे. पण सांप्रत ती उपलब्ध नाहीत. या सर्व उपलब्ध सात शुल्बसूत्रांत बौधायन शुल्बसूत्र हे सर्वांत मोठे व बहुधा सर्वांत प्राचीन आहे. त्‍यात तीन परिच्छेद व सव्‍वापाचशे सूत्रे आहेत. त्यात विविध परिमाणे, वेदींच्या निर्मितीसाठी लागणारे रेखा गणिताचे प्रमुख नियम, निरनिराळ्या वेदींचा आकार व प्रकार, गार्हपत्यचिती व छदश्चिती यांच्या निर्मितीचे वर्णन, काम्य दूष्टींच्या निरनिराळ्या वेदींच्या निर्माणाचे वर्णन, इत्‍यादी विषय आलेले आहेत.

आपस्तंभ शुल्बसूत्रात सहा पटले, ण्‍कवीस अध्याय व दोनशेतेवीस सूत्रे आहेत. प्रथम पटलात वेदीच्या रचनेला आवश्यक अशा रेखा गणिताच्या सिद्धातांचे विवेचन आहे. दुस-या पटलात वेदींची स्थाने व रुपे यांचे वर्णन, तसेच वेदी बनवण्याच्या प्रक्रियेचे वर्णन आहे. शेवटच्या पंधरा अध्यायांत काम्येष्टींना आवश्यक अशा विभिन्न वेदींच्या आकार-प्रकारांचे वर्णन आहे.

बौधायन शुल्बसूत्रावर द्वारकानाथ यज्वा व वेंकटेश्वर दीक्षित यांच्या आणि आपस्तंभ शुल्बसूत्रांवर कपादिस्वामी, करविंदस्वामी, सुंदरराज व गोपाल यांच्या टीका आहेत.

कात्यायन शुल्बसूत्र हे कात्यायन शुल्ब परिशिष्ट किंवा कातीय शुल्ब परिशिष्ट या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. याचे दोन भाग असून, पहिला भाग सूत्रात्मक व दुसरा श्रोत्रात्मक आहे. यात वेदीच्या रचनेसाठी आवश्यक असे रेखा गणिताचे नियम, वेदींचे स्थान, क्रम व परिमाण मापाची रज्जू निपुण वेदिनिर्मात्याचे गुण व कर्तव्ये इत्‍यादी विषय आलेले आहेत.

या शुल्बसूत्रावर महीधर, राम किंवा राम बाजपेय गंगाधर व विद्याधर गौड यांच्या टीका आहेत.

सत्याषाढ शुल्बसूत्राचा समावेश सत्याषाढ श्रोतेसूत्रातच केलेला आहे.

राजेंद्र शिंदे –  info@thinkmaharashtra.com

(संदर्भ – ‘भारतीय संस्‍कृतिकोश (खंड नववा)’ पृष्‍ठ क्रमांक ४०९)

About Post Author

1 COMMENT

  1. विद्यार्थ्यांना अतिशय…
    विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त माहिती! धन्यवाद!?

Comments are closed.