शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून बंधाऱ्यांची निर्मिती

0
73
_ShirpurPaternchya_MadhymatunBandharyanchiNirmiti_2.jpg

पाण्याची पिढ्यान् पिढ्या मुबलकता असावी यासाठी ‘शिरपूर पॅटर्न’ हा सर्वांत मोठा यशस्वी पर्याय म्हणून सिद्ध होत आहे. ‘शिरपूर पॅटर्न’ने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात पासष्टपेक्षा जास्त गावांमध्ये एकशेचौऱ्याऐंशींपेक्षा जास्त बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. अमरिशभाई पटेल यांचे ते काम. ते माजी शिक्षणमंत्री व आमदार आहेत. त्यांच्या समवेत वरिष्ठ भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांचे मोठे काम आहे.

अमरिशभाई पटेल यांना पुऱ्या शिरपूर तालुक्यात पडणारे पावसाचे पाणी थेंब न थेंब जमिनीत जिरवायचे आहे. पावसाचे पाणी नदीत वाहून जाता कामा नये, यासाठी त्यांच्या संकल्पनातून व सुरेश खानापूरकर यांच्या मदतीने जलसंधारणाचा ‘शिरपूर पॅटर्न’ बारा वर्षांपूर्वी शिरपूर तालुक्यात उदयास आला. राज्यभरातून व देशभरातून सेवाभावी संस्था, राजकीय व सामाजिक क्षेत्र यांमधून अनेक मंडळी यांनी भेट देऊन ‘शिरपूर पॅटर्न’ पाहिला व त्यांपैकी काहींनी सुरेश खानापूरकर यांना सोबत नेऊन राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाचे काम सुरू केले आहे.

प्रत्येक लोकप्रतिनिधींचे काम व कर्तव्य पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून त्याच्या मतदारसंघाला पाणी देणे हे असते. पण कितीतरी मतदारसंघांमध्ये पाण्याबाबत भीषण चित्र पाहण्यास मिळते. अमरिशभाई पटेल यांची राजकीय कारकिर्द गेल्या बत्तीस वर्षांची आहे. शिरपूर शहराला दोन वेळा स्वच्छ, निर्जंतूक पाणी देण्याचे काम त्या काळात सुरू आहे. आता तर चोवीस तास पिण्याच्या पाण्याची योजना यशस्वीरीत्या राबवली गेली आहे. ते काम शेवटच्या टप्प्यात असून चौथ्या मजल्यापर्यंत विजेची मोटर सुरू न करता पाणी पोचवण्याची बाब कौतुकास्पद आहे.

_ShirpurPaternchya_MadhymatunBandharyanchiNirmiti_1.jpgराज्यशासनाने यापुढे मोठी धरणे न बांधता ग्रामपातळीवर व तालुका स्तरावर छोट्या बंधाऱ्यांवर भर द्यावा ही भूमिका योग्य व रास्त आहे. शासनाने गेल्या अनेक वर्षांत मोठी धरणे बांधली. पाणी व वीज यांसाठी धरणांची गरज आहेच; परंतु, अनेक ठिकाणी सुपीक जमिनी त्या योजनांखाली गेल्या. त्या प्रमाणात हरित पट्टे मात्र तयार झाले नाहीत. तसेच, अनेक धरणांमध्ये साचलेल्या गाळाची समस्या उभी राहिली आहे.

अमरिशभाई पटेल यांनी ‘प्रियदर्शिनी सूतगिरणी’च्या माध्यमातून 2004 पासून ‘शिरपूर पॅटर्न’च्या जलसंधारणाच्या कामांना आरंभ केला. त्यातून पंचावन्न गावांमध्ये एकेशअठ्याहत्तर बंधारे पूर्ण झाले आहेत. कामांना शासनाच्या वतीने; तसेच, ‘श्री विलेपार्ले केळवणी मंडळा’मार्फत आर्थिक योगदान सुरू आहे. गरजू व शेतकरी बांधवांना अमरिशभाई पटेल व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेश पटेल यांच्या प्रयत्नांनी त्यांचा मुंबई येथील मित्र परिवार व ‘जुहू जागृती मंडळ’ यांच्या वतीने डिझेल इंजिन मोफत पुरवण्यात येते. ‘शिरपूर पॅटर्न’मध्ये कामांचे अनेक फायदे शेतकरी बांधवांच्या बांधांपर्यंत किंवा शेतापर्यंत पोचतात. त्यासाठी नाल्यांच्या बाजूने चांगल्या प्रतीचे रस्ते तयार करून देण्यात आले आहेत. नाले खोलीकरणामुळे व रुंदीकरणामुळे तेथील माती शेतांमध्ये टाकून शेतकरी बांधवांची शेती सुपीक झाली आहे.

‘शिरपूर पॅटर्न’ने, बघता बघता व्यापक रूप धारण केले आहे. शिरपूर तालुक्यात तसेच महाराष्ट्रात ‘शिरपूर पॅटर्न’ अंतर्गत कामे करून घेण्यासाठी लोकसहभाग व लोकचळवळी यांतून सेवाभावी संघटना तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील अनेक मंडळी यांचा देखील उत्साह दिसून येत आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकरता पाण्याचे स्रोत जिवंत ठेवणे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ते ‘शिरपूर पॅटर्न’मुळे शक्य होते.

(जलसंवाद, मार्च २०१८वरून उद्धृत)

– संजय झेंडे

About Post Author

Previous articleदुशेरे – जाधवांचे गाव (Dushere)
Next articleभूमातेच्या आरोग्यासाठी कर्बप्रयोग
संजय झेंडे हे धुळ्याचे. त्यांनी पुणे येथून M.Lib. अभ्यासक्रमाची पदवी घेतली. ते दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे धुळे जिल्हा प्रतिनिधी 1993-2014 पर्यंत होते. त्यांनी पंचवीस वर्षे पत्रकारिता केली. संजय झेंडे यांच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जलसंधारणविषयक प्रयोगांची माहिती देणारी कव्हर स्टोरी `जलसंवाद` मासिकाच्या माध्यमातून प्रसिध्द होत आहे. त्यांनी धुळे जिल्ह्याशी संबंधित विविध प्रश्नांवर, तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांविषयी लिखाण केले आहे. त्यांना तडवी भिल्लांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध घेण्यासाठी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई’ तर्फे आणि तापी खो-यातील जल वळण योजनांचा अभ्यासकरण्यासाठी ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा’ तर्फे फेलोशिप मिळाली. संजय झेंडे यांचे खान्देश इतिहास खंड -1 व 2 मध्ये ‘तडवी भिल्लांसंबंधी लेख’ व ‘समर्थ धुळे जिल्हा 2020’ या पुस्तकामध्ये ‘धुळे जिल्ह्याच्या प्रगतीचा वेध’ हे दोन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी नदीजोड प्रकल्पावर आधारित `मंत्र जल व्यवस्थापनाचा` हे पुस्तक (2008) लिहिले आहे. झेंडे यांना पां.वा. गाडगीळ पुरस्कार (1992), अतुलभाई जोशी विकास पत्रकारिता पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार (2002) असे सन्मान प्राप्त झाले आहेत. ते तापी खोरे गॅझेटिअर सदृष्य ग्रंथ निर्मिती प्रकल्पाचे समन्वयक आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9657717679