शब्दांकित

3
31
मुलुंड विहार महिला मंडळातर्फे आयोजित ‘शब्दव्रती आनंदयात्री’ कार्यक्रमात अभिवाचन करताना डावीकडून प्रज्ञा गोखले, स्नेहल वर्तक, पद्मजा प्रभू, नीलिमा घोलप आणि माधवी जोग
मुलुंड विहार महिला मंडळातर्फे आयोजित ‘शब्दव्रती आनंदयात्री’ कार्यक्रमात अभिवाचन करताना डावीकडून प्रज्ञा गोखले, स्नेहल वर्तक, पद्मजा प्रभू, नीलिमा घोलप आणि माधवी जोग

मुलुंड विहार महिला मंडळातर्फे आयोजित ‘शब्दव्रती आनंदयात्री’ कार्यक्रमात अभिवाचन करताना डावीकडून प्रज्ञा गोखले, स्नेहल वर्तक, पद्मजा प्रभू, नीलिमा घोलप आणि माधवी जोग  ‘शब्दांकित’ हा आमचा, हौशी मैत्रिणींचा गट. आम्ही चौघी मैत्रिणींनी मिळून तो १९९९ साली सुरू केला. त्या चौघी म्हणजे आशा साठे, माधवी जोग, निशा मोकाशी आणि मी स्वत: अनुराधा जोग. आशा आणि माधवी या दोघी स्वेच्छानिवृत्त शिक्षिका आणि त्याही भाषा विषयाच्या. आम्ही एकत्र भेटलो आणि थोड्या गप्पांनंतर आशा आणि माधवी ह्या दोघींनीही शाळेतील मुलांसाठी काहीतरी करावे असे वाटत असल्‍याचे सांगितले. आमच्‍याजवळ वेळ व उत्साह, दोन्ही होते,  त्याचा सदुपयोग व्हावा ही जबरदस्त इच्छा तर होतीच!

 चौघींचे एका मुद्यावर एकमत होते – आमच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत चांगल्या साहित्याच्या वाचनाचा वाटा मोठा आहे. चांगले विचार, सुसंस्कार, शुद्ध आचरण या गोष्टी काही केवळ घरातल्या वळणाने आपल्यात आले नाहीत तर आपण चांगल्या साहित्यातूनही खूप काही शिकलो असे आम्हाला वाटत होते. आम्ही मग असा विचार निश्चित केला, की आपण मुलांसमोर व जमल्यास मोठ्यांसमोरही चांगले साहित्य नेण्याचे काम करावे. विचारमंथनानंतर, ‘अभिवाचन’ हा सादरीकरणाचा प्रकार, आमची वये व कुवत लक्षात घेता आम्हांला जमेल असे वाटले. शब्द हेच आमचे माध्यम राहणार होते, म्हणून आम्ही गटाचे नाव हे ‘शब्दांकित’ असे ठेवले.

 आमअंबरनाथ येथे ‘चंद्र माझा’ हा कार्यक्रम सादर करताना डावीकडून रमा सुंदर, अनुराधा जोग, आशा साठे आणि माधवी जोगच्या उपक्रमाची मुहूर्तमेढ साने गुरुजींच्या चरित्रकथनाने १९९९ साली रोवली गेली. आशा साठेने झपाटल्यागत गुरुजींच्या साहित्याचा अभ्यास केला आणि आठवड्याभरात एका तासाच्या कालावधीत सांगता येईल अशा पद्धतीने गुरुजींच्या चरित्राची ‘कथा-सानेगुरुजींची’ ही संहिता तयार केली.

 त्याच सुमारास, कै. चेतन दातार यांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकावरून तयार केलेली ‘गोष्टी – श्यामच्या आईच्या’ ही संहिताही आम्हाला सादरीकरणाकरता सुलभा देशपांडे यांनी उपलब्ध करून दिली.

 दोन कार्यक्रम हातात आल्यावर आम्हांला अधिक मैत्रिणींची गरज निर्माण झाली. थोडासा शोध घेताच कुंदा सामंत, वर्षा वाकडे, आशा गाडगीळ या आमच्या गटात सामील झाल्या. ‘शब्दांकित’ने दोन्ही कार्यक्रमांचे जवळजवळ शंभर प्रयोग केले. आशा साठेने लिहिलेल्या संहितेचे अभिवाचन आम्ही नववीपासून पुढच्या वर्गांसाठी करत असू;  तर ‘श्यामची आई’ या पुस्तकावरून तयार केलेली संहिता पाचवी ते सातवीच्या मुलांसमोर सादर करत असू आणि आजही करतो. सुरुवातीच्या काळात, आम्ही खूप उत्साहाने काम केले. एका दिवशी तीन तीन शाळांमध्ये जाऊन अभिवाचन केले! आता आमचे क्षेत्र फक्त मुंबईपुरते मर्यादित राहिले नाही तर आम्ही पुणे , नाशिक , संगमनेर, लातूर , गुलबर्गा, दापोली-अगदी पालगडला साने गुरुजी ज्या गावी जन्मले तेथे जाऊनही कार्यक्रम सादर केले. दापोलीला गुरुजी ज्या शाळेत शिकले तिथे कार्यक्रम करताना आम्ही भारावलो होतो. जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याने आम्ही मानधनाची अटही ठेवली नाही.

 गुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्त आमच्या ‘शब्दांकित’ गटाने त्यांना अशी ही कृतिशील आदरांजलीच वाहिली!

ठाण्याच्या मो.ह. विद्यालयात ‘गोष्टी श्यांमच्या आईच्या’ ही संहिता सादर करताना डावीकडून स्मिता महाजन, माधुरी पाटणकर, माधवी जोग आणि संपदा मावळणकर  आमचा उत्साह पहिल्याच वर्षीच्या यशाने द्विगुणित झाला; आता मोठ्यांसाठीही काहीतरी केले पाहिजे असे ठरले. त्या वर्षी बहिणाबाई चौधरी यांची पन्नासावी पुण्यतिथी होती. त्यानिमित्त माधवी जोग हिने बहिणाबाईंच्या कविता, गाणी आणि आठवणींवर आधारित ‘बोल बहिणेचे’ ह्या संहितेचे लेखन केले. त्‍या संहितेच्‍या सादरीकरणाकरता शर्मिला सोहोनी, मंजिरी गोखले, नीलिमा घोलप अशा गायिकांचा आमच्‍या गटांत समावेश झाला. सुमती दसनूरकर आणि कुंदा सामंत यांनी कार्यक्रमांची संगीताची बाजू जबाबदारीने सांभाळली. ‘शब्दांकित’चे कुटुंब विस्तारू लागले. ‘बोल बहिणेचे’ ह्या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला.

त्‍याच सुमारास कवयित्री शांता शेळके यांचे निधन झाले. त्‍यांना श्रद्धांजली म्‍हणून माधवी जोग हिने ‘शब्‍दव्रती आनंदयात्री’ ही संहिता लिहून स्‍व. शांताबाईंचा साहित्‍यप्रवास उलगडला. त्‍यानंतर आशा साठे हिने लिहिलेला ‘चंद्र माझा’ हा कार्यक्रमही आम्ही करू लागलो. ‘चंद्र माझा’ हा कार्यक्रम म्हणजे बालकवींपासून चंद्रपूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या पर्यंतच्या साहित्यिकांच्या साहित्यातील कविता, गीते यांची चांदणयात्राच आहे. त्या चांदण्याला विज्ञानाचीही किनार आहे. हे सारे चांदणप्रेमी रसिकांना भावते, पुन:प्रत्ययाचा आनंद देते.

विविध महिला मंडळांकडून आयोजित ‘मैत्री’ या कार्यक्रमात ‘बोल बहिणेचे’ या संहितेचे अभिवाचन करताना डावीकडून माधवी जोग, मीना दिवेकर, प्रज्ञा गोखले आणि अनुराधा जोग  आम्ही आता अभिवाचनाचे आणखी दोन नवीन कार्यक्रम करू लागलो. एक म्हणजे वर्षा तळवेलकर यांच्या कवितांवर आधारलेला, स्त्रीजीवनाची विविध रूपे, अंगे दाखवणारा ‘मोहवनातील चिद्भ्रमरी’ तर दुसरा शाळेतील मुलांकरता ‘नेगल.’ माधवी जोग हिने विलास मनोहर यांच्या ‘नेगल’ या पुस्तकावरुन त्याचे शब्दांकन केले आहे. शाळेतील मुलांसाठी वन्य प्राणीजीवनाचे दर्शन घडवणारा, तसेच पशुप्रेम व पर्यावरणप्रेम ही मूल्ये रुजवणारा असा हा कार्यक्रम आहे.

कार्यक्रमांची संख्‍या वाढल्‍यावर आमच्‍या गटांत प्रज्ञा गोखले, मृदुला गोखले, सुनिला बहुलीकर, गार्गी लागू, स्मिता चिटणीस, माधुरी पाटणकर, अशा अनेक मैत्रिणी सामील झाल्‍या. ‘शब्दांकित’चा परिवार पस्तीस जणींचा आहे.

 आम्ही मोठ्यांसाठी चार आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी असे तीन कार्यक्रम बारा वर्षं सादर करत आहोत. हा साहित्यिक उपक्रम असल्यामुळे कार्यक्रमांमधील गीतांचे शब्द, त्यातील मूळ कविता श्रोत्यांपर्यंत पोचावी म्हणून आम्ही वाद्यांची साथ घेत नाही. ते श्रोत्यांनाही आवडते.

 आमच्‍या ह्या उपक्रमातून आम्‍हाला खूप समाधान व आनंद मिळतो आणि आम्‍ही तो भरभरून दाद देणार्‍या रसिकांनाही देण्याचा प्रयत्न करतो.

अनुराधा जोग
५, मंजिरी,
माहीम मकरंद सहनिवास,
वीर सावरकर मार्ग,
माहीम, मुंबई – १६
दूरध्‍वनी – ०२२–२४४४९७८८
इमेल – asjog1311@gmail.com

About Post Author

3 COMMENTS

  1. शब्दांकित सादर करणाऱ्या
    शब्दांकित सादर करणाऱ्या ग्रूपचे मनापासून अभिनंदन! चांगला उपक्रम आहे.

  2. A very informative n
    A very informative n educational programme. I would say from ‘ages 9 to 99’ everyone could enjoy this literary work .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here