प्रगती बाणखेले यांचे ‘ऑन द फील्ड’ हे पुस्तक ‘वास्तवाच्या जमिनीवर ठाम उभे आहे आणि ते मनात खोलवर उतरत जाते. लेखिकेने ते रिपोर्ताजच्या पठडीतील लिखाण असल्याचे प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे, पण पुस्तक वाचून पूर्ण होते तेव्हा वाचक प्रस्तावनेला तहेदिल संमती दर्शवत असताना त्याला ते रिपोर्ताजच्या कितीतरी पलीकडे जाते असे जाणवते. येथे लेखिकेशी त्याचे असहमत होणे पुस्तकाचा रुतबा (दर्जा, वजन) वाढवणारे ठरते.
‘सपनो को सरहद नहीं होती’ हा या पुस्तकातील पहिला लेख त्याने वाचकाचे बोट जे धरले जाते ती पकड शेवटच्या लेखापर्यंत अधिकाधिक घट्ट होते. खरी गोष्ट एवढ्या असोशीने मांडली जाते तेव्हा ती फिक्शन आणि नॉन फिक्शन यांच्या मधोमध येऊन उभी राहते ! ती दोन्ही किनारे केव्हाही कवेत घेऊ शकते ! वाचक पुस्तकाच्या सोबतीने वाहत राहणे ही अपरिहार्यता सहजपणे स्वीकारतो. हमीद स्वत:च्या प्रेमासाठी देशाची सरहद्द पार करून कैदेत पडलेला आहे. त्याच्यासाठी त्याची आई फौजिया अलाबला घेते असे म्हणते, तेव्हा वाचकाचे हातही आपोआप प्रार्थनेसाठी जोडले जातात ! खूप भावनिक गुंतागुंत असलेल्या त्या लेखाची मांडणी प्रगती बाणखेले यांनी संयत अशी केली आहे. लेख वाचकाला सुन्न करून टाकतो.
‘गणेश ते गौरी’ या लेखाने पुस्तकाची ऐपत खूप वाढवली आहे. तृतीय पंथीयांच्या आयुष्याची परवड समजून घेणे आणि ती कागदावर उतरवणे हे काम जिकिरीचे आहे. त्यासाठी एक नजर आणि उपजत असे कारुण्याचे झरे मनात वाहते असावे लागतात. त्यांच्या मनाचे तळकोपरे सांभाळणे ही गोष्ट कठीण असते. पुस्तकात तृतीय पंथीयांबद्दलचे दोन लेख आहेत. त्यांच्या विश्वाचे दरवाजे किलकिले करून वाचकाला तेथे डोकावू देण्याचे नेक काम ‘ऑन द फील्ड’ हे पुस्तक करते. ते केवळ कोरडे रिपोर्टिंग नाही, तर भावनांचे सीमेंटिंग असलेली लाखमोलाची वास्तू आहे. ‘गौरी ते गणेश’ हा लेख म्हणजे पुस्तकातील मास्टरपीस असे म्हणावे लागेल.
लेखिकेने तृतीय पंथीयांच्या आयुष्याचे सगळे ताणेबाणे नेमक्या पद्धतीने अधोरेखित केले आहेत. गणेशचा गौरीपर्यंतचा प्रवास वाचकाचा पाठलाग पुस्तक वाचून संपल्यावरही करत राहतो. टॉलस्टॉयच्या एका वाक्याची आठवण येते, ‘ऑल हॅपी फॅमिलीज आर अलाईक; इच अनहॅपी फॅमिली इज अनहॅपी इन इट्स ओन वे.’ हे सामर्थ्य जसे गौरीच्या दुःखाचे, तसेच प्रगती बाणखेले यांच्या शब्दांचेही. ‘ऑन द फील्ड’ काम करणारा माणूस काही लिहितो तेव्हा बहुतांश वेळा ते लेखन तर्ककर्कशतेकडे झुकलेले असते. पण या पुस्तकातून भावनेचा एक नितळ झरा वाहत असतो. तर्क आणि भावना यांचे संतुलन साधण्याची नफिस (देखणी) करामत लेखिकेला सहज जमली आहे. शरीरात होणाऱ्या कोठल्याशा केमिकल लोच्यामुळे भाळी आलेले तृतीय पंथीयाचे जगणे सही पद्धतीने उजागर झाले आहे. तृतीय पंथीयांचे जगणे असे मांडले आहे, की त्याची दाहकता तर जाणवत जाते, पण त्याचबरोबर मोठ्या कसोशीने टाळलेली शब्दबंबाळता अधिकच लक्षात येते. नाही तर ‘मॉडर्न रायटर्स ॲड टू मच वॉटर टू देअर इंक’ हे लेखिकेने अजिबात होऊ दिलेले नाही. ‘एडिटिंग’चे भान हे या पुस्तकाचे एक बलस्थान आहे.
‘भटक्यांची मुंबई’ हा भटक्यांच्या जगण्याचा एक तुकडा आहे, पण तो वाचकाला व्यापून राहतो. गाय रस्त्यावर आली म्हणून त्यांना मुंबईसारख्या महानगरीत भरावा लागलेला दंड वाचकाला त्याच्याच खिशातून गेल्यागत वाटते, इतका वाचक त्यांच्या समस्यांशी रिलेट होत जातो. वाचक ‘आमची पालं तोडू नका, हे पण लिवणार का तुम्ही पेप्रात…’ हे वाचतो तेव्हा त्याला पुस्तकाच्या पानांतही त्या लहानगीच्या नजरेला नजर देण्याची हिंमत राहत नाही. अमृता प्रीतम ‘जिसने लाहोर नही देखा वो जम्याही नही’ असे म्हणत असत. लेखिकेचा ‘मैने लाहोर देख्या’ हा लेख लाहोरची अनेक अंगांनी झलक दाखवणारा व तशीच वेगळी अनुभूती देणारा आहे. पुस्तकातील प्रत्येक लेखाशी, त्यातील परिस्थितीशी वाचक स्वतः रिलेट होत राहतो हे पुस्तकाचे अंगभूत सामर्थ्य. ते कदाचित लेखिकेच्या जगण्याचेदेखील सामर्थ्य असावे ! ‘पाचूच्या बेटावरील अश्रू’ हा लेखही कातर करून जातो. त्याचा शेवट येथे देण्याचा मोह टाळता येत नाही. लेखिका लिहिते, ‘यादवी युद्ध संपते तेव्हा सैनिक त्यांच्या तळावर परत जातात. बंडखोर घरी जातात, नाहीतर सत्तेत. युद्धभूमीवर राहतात, ती जगणे हरवलेली माणसे ! ती माणसे नव्या सरकारकडे डोळे लावून बसलेली आहेत. त्यांना त्यांच्या जखमांवर संवेदनशीलतेने फुंकर घालून भविष्याविषयी विश्वास देण्याचे काम वेगाने होण्यास हवे. अन्यथा युद्ध संपूनही त्या राखेखाली धुमसणाऱ्या विस्तवातून पुन्हा आग भडकण्यास वेळ लागणार नाही !’… हे असे काही वाचल्यावर ते केवळ रिपोर्टिंग पठडीतील लेख राहत नाहीत. वेदनेशी रिलेट झालेल्या लेखिकेचे आत्मगतही पुस्तकाच्या पानापानांतून डोकावत राहते. तेरा हजार युद्धे मानवी इतिहासातील गेल्या पाच हजार वर्षांत लढली गेली, पण त्यातून कोणत्याही समस्या संपल्या नाहीत. वॉर बिगोटस वॉर… हीच खंत या लेखातून अधोरेखित होताना दिसते. एका अभ्यासकाने म्हटले होते, ‘युद्धावर लिहिलेल्या साहित्याची एकेक फाईल रस्त्यावर ठेवत गेलो तर शिकागो ते वॉशिंग्टनपर्यंतचा रस्ता संपेल, पण त्या फायली मात्र संपणार नाहीत.’ लेख वाचताना त्याचीच प्रचीती आल्यागत वाटत राहते.
‘निळा दर्या लाल रेघ’ या लेखातून बातम्यांतून भेटलेल्या माणसांना जाणून घेण्याची धडपड, त्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्यामागील मानवतेवरील अपार श्रद्धा हे लेखिकेचे रूप स्पष्टपणे उभे राहते. त्यातूनच तिच्या लेखणीतील अक्षरे गाढी आणि त्या माणसांचे दुःखे गहिरी होत जातात. अनवधानाने देशाची सागरी हद्द ओलांडणाऱ्यांच्या वेदना, त्यामागील राजकारण त्या लेखात नेमके टिपलेले आहे.
‘ऑन द फील्ड’ या पुस्तकाने मोठा अवकाश व्यापला आहे, इतका की एकेका प्रकरणाचे स्वतंत्र पुस्तक व्हावे ! प्रत्येक लेखाचे शीर्षकही देखणे आणि अर्थपूर्ण आहे. पुस्तक वाचून झाल्यावरही ते संपत नाही; कितीतरी वेळ साथसंगत करत राहते.
ते लेख प्रसंगोपात लिहिलेले आहेत, पण ते ‘सामान्यांचे आयुष्य आणि मानवतेची कहाणी हा इतिहासाचा विषय असतो’ या अंगभूत प्रेरणेने लिहिलेले असल्यामुळे लेखांत कोरे सिद्धांती रिपोर्टिंग नाही तर ते लेख त्या पलीकडे जाऊन वाचकाला अस्वस्थ करतात… त्याच्या डोक्यात नव्हे तर काळजातही उतरतात.
प्रगती बाणखेले यांच्या लेखनातील समृद्ध मुशाफिरीचे वाचक तहेदिल स्वागत करतील याविषयी मनात कोणतीही शंका नाही. शब्दांना अर्थ असतात आणि अर्थांचे परिणाम असतात, ही चांगल्या लिखाणाची कसोटी ‘ऑन द फील्ड हे पुस्तक’ देते. संतोष घोंगडे यांचे मुखपृष्ठ पुस्तकाला साजेसे असे आहे.
वृत्तपत्र माध्यमांमध्ये असे संवेदनशील लेखक असणे ही त्या माध्यमांचा रुतबा आणि विश्वासार्हता वाढवणारी गोष्ट आहे.
पुस्तकाचे नाव: ऑन द फील्ड
लेखिका: प्रगती बाणखेले
मुखपृष्ठ: संतोष घोंगडे
प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन
पृष्ठे : 184 किंमत: 240 रुपये
प्रगती बाणखेले 9870029365
– मनोज बोरगावकर 9860564154 korakagadnilishai@gmail.com
——————————————————————————————————————