विष्णूचे उपासक – वैष्णव संप्रदाय (Vishnu Worshiper – Vaishnava sect)

_vishnu_devta

विष्णू आणि त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची आराधना करणारा तो वैष्णव संप्रदाय. नारायण-विष्णूमधील नारायण या देवाचा उल्लेख प्रथम ‘शतपथ ब्राह्यण’ ग्रंथात आढळतो. तो वैदिक देव नव्हे. विष्णू या देवाचा उल्लेख ऋग्वेदात फक्त पाच सूक्तांत आहे. त्यावरून तो आर्य देवताकुलात प्रथम प्रतीचा देव नसावा. एकाच देवतेचा उल्लेख नारायण व विष्णू या दोन नावांनी महाभारत व पुराणे यांत केला गेला आहे. त्या देवाच्या उपासकांना भागवत, पांचरात्र (सृष्टीची उत्पत्ती पुरूष, प्रकृती, स्वभाव, कर्म आणि देव या पाच विषयांनी झाली आहे असे मानणारा पंथ), एकांतिक, सात्त्वत (विष्णू) आणि वैष्णव अशी नावे दिलेली आढळतात. वैष्णव असा उल्लेख महाभारताच्या बऱ्याच नंतरच्या भागात क्वचित आहे. त्यावरून वैष्णव पंथाला वैष्णव हे सर्वसाधारण नाव बऱ्याच नंतर, म्हणजे विष्णू या देवाला महत्त्व मिळाल्यानंतर प्राप्त झाले असावे. मृणाल दासगुप्ता यांच्या मते, भागवत हे नाव मूळ वृष्णिकुलाचे दैवत वासुदेव-कृष्ण यांच्या उपासकांनी धारण केले. ते नारायण-विष्णूच्या उपासकांपेक्षा वेगळे होते. श्रीमती जयस्वाल यांच्या मते, भागवत हा शब्द ‘भज’ (= वाटणी करणे) या धातूवरून आला आहे. ‘भग’ म्हणजे संपत्ती, वाटा अशा अर्थाचा शब्द ऋग्वेदात आहे. भारतीय संस्कृती कृषिप्रधान आहे. तीमध्ये धान्य (मुख्यत्वे भात) आपापसांत वाटून घेऊन समूहाने राहणाऱ्या समाजाला भागवत हे नाव मिळाले असावे. 

कौटिलीय अर्थशास्त्रात वृष्णिकुलातील संकर्षण-बलदेव ह्याच्या आलेल्या उल्लेखावरून त्याची उपासना इसवी सनपूर्व चौथ्या शतकात होत असावी. तो देव पांचरात्र संप्रदायाने पुढे मान्य केल्यानंतर वैष्णव पंथात त्याच वृष्णिकुलातील वासुदेव-कृष्ण यांची उपासना सुरू झाली असावी. ते दैवत गोपालकांचे असावे. तसा अंदाज कुशाणकालीन स्थापत्यकलेतील वासुदेवाच्या मूर्तीवरून बांधता येतो. गोविंदाचार्य स्वामिन यांच्या मते, भागवत धर्माला प्रथम केवळ वासुदेव हाच देव मान्य होता आणि कृष्ण हा देव त्या वासुदेवापेक्षा वेगळा होता. कृष्ण हा आभीर या भटक्या गोपालक जमातीचा देव होता. त्या कृष्णाचे व वासुदेवाचे एकीकरण होऊन, कालांतराने, वासुदेव-कृष्ण हे भागवतांचे व साऱ्या वैष्णव पंथीयांचे मुख्य दैवत बनले.

यज्ञयागांनी देवांना पूजण्याचा मार्ग अशोकाच्या नंतरच्या काळात मागे पडला आणि देवांना पूजण्यासाठी मंदिरे बांधली जाऊ लागली; गंधफुलांनी पूजा करण्याचा नवा मार्ग सुरू झाला. ती नव्या धर्मकल्पनेची सुरुवात होय. नव्या धर्मात भक्तीला मध्यवर्ती स्थान मिळाले. त्या मन्वंतराला जी मुख्य घटना कारणीभूत झाली, ती म्हणजे वैष्णव धर्माची उभारणी. वैष्णव पंथाने त्यांच्या भागवत धर्माद्वारे भक्तिमार्गाचे तत्त्वज्ञान व त्याची सारी विधिरचना तयार केली आहे. भागवत धर्माची शिकवण ही कृष्ण हा परमेश्वर असून त्याला भक्तीने शरण जाण्याने मानवाचा उद्धार होतो अशी आहे. ती केवळ गीतेतून मांडली गेली नाही तर भागवतादी पुराणांतून अमर करण्यात आली. त्यासाठी कृष्णाचे जीवनचरित्र, त्याच्या लीला यांना काव्य, कथा, कला यांच्याद्वारा रंगवण्यात आले. वैदिक धर्मातील इतर कोणत्याही दैवताला तितके रंगवण्यात आलेले नाही. यज्ञयागादिकांचे मंत्र मागे पडले. संतकवी कृष्णभक्तीची गाणी गाण्यात तल्लीन होऊन गेले. कृष्णावरील प्रेम व्यक्त करण्याला आणि मुक्ती मिळवण्याला गोपींची आर्तता केवळ पुरे, हा भक्तिमार्गाचा कानमंत्र ठरला. 

_vaishnavacha_tilaवैष्णव पंथीयांनी बौद्ध व जैन धर्मीयांच्या अहिंसेच्या नव्या नैतिक तत्त्वास मान्यता दिली. गोपाळांना उपयुक्त अशा अनेक पशूंचा नाश वैदिक विधीनुसार यज्ञयाग करण्यात होत असावा, म्हणून वैष्णव पंथाने त्याविरूद्ध प्रचार केला असावा असे अलीकडील इतिहासकारांचे मत आहे. रामाच्या अयोध्येत तशा प्रकारचा कायदा होता असा उल्लेख रामायणात आहे.    

वैष्णव पंथातील महत्त्वाचे नवे तत्त्व म्हणजे त्यातील अवतारवाद. देव निरनिराळी रूपे धारण करून फिरतात असा ऋग्वेदात उल्लेख असला, तरी वैष्णव धर्मातील अवताराची कल्पना त्याहून वेगळी आहे. देव दुष्टांचा नाश करण्यासाठी व भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेतो हे उद्दिष्ट वैदिक कल्पनेत आढळत नाही. वैष्णव पंथाने अवतारवादाची कल्पना बौद्ध धर्मावरून घेतली असावी. बुद्धाच्या पूर्वीच्या अवतारांप्रमाणेच विष्णूच्या अवतारांवर पुराणे रचली गेली. विष्णूचे अवतार किती होते याबद्दल उल्लेख निरनिराळे आढळतात.

अवतारांच्या दोन याद्या महाभारतातील नारायणीय भागात आहेत. पहिल्या यादीत सहा अवतारांचा उल्लेख आहे व दुसऱ्या यादीत चार. त्यावरून दहा अवतारांची कल्पना रूजली गेली. अवतारांच्या या कल्पनेला साकार करण्याकरता मंदिरे व मूर्ती आल्या. पूजाविधी हेदेखील वैष्णव पंथाचे वैशिष्ट्य होय. त्यांनी योजलेल्या पूजेत देवाला धूप, अलंकार, वस्त्रे, फुले अर्पण करण्यात येतात. वाद्ये वाजवण्याची प्रथाही पूजा करतेवेळी असावी. मंदिराची उभारणी व मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासंबंधी नियम रचण्यात आले. विष्णूची शंख, चक्र इत्यादी पवित्र चिन्हे वैष्णवांच्या अंगावर काढण्यात येत असत. त्यावरून वैष्णवांना चक्रधर अशी संज्ञा देण्यात आली. चक्रधरांचा उल्लेख अश्वघोषाच्या बुद्धचरितात आहे. वैष्णव धर्मीयांनी पूजेआधी कपाळावर व शरीराच्या विशिष्ट भागांवर गंधाचे पट्टे, टिळे इत्यादी काढण्याची प्रथाही सुरू केली. त्यातही जी विविधता आढळते, ती त्या त्या उपपंथाचे वेगळे तत्त्वज्ञान दर्शवते. वैष्णव धर्मीयांनी पूजेसाठी जपावर भर दिला. विधियज्ञापेक्षा जपयज्ञ दसपट महत्त्वाचा आहे असे विष्णुस्मृतीत म्हटले आहे. मंत्रांची व मंत्रशक्तीची कल्पना जपातूनच निर्माण झाली. देव त्याचे नाव अनेकदा घेण्याने, म्हणजे जप करण्याने मनात साकार होतो.

हे ही लेख वाचा –
नाथ संप्रदाय व त्याचा प्रभाव
महानुभाव पंथाच्या सिन्नरमधील खुणा

वैष्णव पंथात चातुर्मास्य या वर्षाकालाला फार महत्त्व आहे. गुप्तकाळात चातुर्मास्याचे वर्णन आढळते. त्याचे महत्त्व ऊस व भात यांच्या रोपणी व कापणी या क्रियांशी निगडित केले गेले. कार्तिकात शकट (बैलगाडी) व उळूखल (उखळ) यांची ऊसाने पूजा केली जात असे. तोच पूजाविधी पुढे चातुर्मास्याच्या विधीत समाविष्ट करण्यात आला. वैष्णव धर्माने मानवाच्या लहानसहान क्रियांचे रूपांतर आचारात व व्रतात केले.

वैष्णव पंथाचा उदय व प्रसार साधारणपणे इसवी सनपूर्व 200 ते इसवी सन 500 या काळात झाला. आर्येतर जमातींचे भारतातील महत्त्व वाढले होते. परकीय जमातींनी भारतात प्रवेश केला होता. त्या सर्वांना कलाकुसरींनी नटलेल्या मंदिरांविषयी व देवतांविषयी आकर्षण वाटले. ग्रीकांचा राजदूत हीलिओडोरस हा भागवत पंथाचा अनुयायी होता असा उल्लेख बेसनगर येथील शिलालेखात आहे. कुशाण राजांनीदेखील वासुदेवाच्या उपासनेला प्रोत्साहन दिले. त्या पंथाचे मूळ कार्यक्षेत्र मध्यप्रदेशच्या दक्षिणेस आणि गुजरात व राजस्थान यांच्या उत्तरेस होते असे ग्रीअर्सनचे मत आहे. रायचौधरी यांच्या मते, यमुनेचा प्रदेश हा त्या पंथाचा मुख्य प्रदेश होता.

ramdas_swami_vaishnavवैष्णव पंथाचा प्रसार आठव्या शतकापर्यंत झाला. तो सामान्यतः भारतभर होता. परंतु त्यानंतर शंकराचार्यांच्या मायावादाचे खंडन करण्यासाठी जे वैष्णव आचार्य पुढे सरसावले, त्यांनी वैष्णव पंथाच्या तत्त्वज्ञानाची मुळे भारतीय जीवनात अधिक खोलवर रुजवली. वैष्णव पंथाच्या चार मुख्य शाखा नवव्या शतकापासून ते बाराव्या शतकाअखेरपर्यंत बनल्या – श्रीसंप्रदाय, ब्रह्यसंप्रदाय, सनकसंप्रदाय व रुद्रसंप्रदाय. त्या चार शाखांचे प्रणेते अनुक्रमे रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क व वल्लभाचार्य हे होते. त्या चार आचार्यांनी शंकराचार्याच्या अद्वैताविरुद्ध अनुक्रमे विशिष्टाद्वैत, द्वैत, द्वैताद्वैत व शुद्धाद्वैत या तत्त्वप्रणालींची रचना केली. त्या चारही तत्त्वप्रणाली एकमेकींपासून विभिन्न असल्या तरी त्यांच्यात सामान्यतः जे ऐक्य आढळते ते शंकराचार्यांच्या मायावादाशी विरोध व केवलाद्वैताची अशक्यता मांडण्याच्या बाबतीत आहे. विश्वाची सत्यता सिद्ध करण्याने या वैष्णवपंथीय आचार्यांनी मानवाला संसारप्रवृत्त केले व द्वैत सिद्ध करण्याने ईश्वर व जीवात्मा यांच्यात भक्तीचे नाते जोडले. आचार्यांच्या तात्त्विक चर्चेला तत्कालीन संतकवींच्या रसाळ भक्तिकाव्याचा आधार मिळाला. जयदेवाने गीतगोविंद बाराव्या शतकाच्या अखेरीस लिहिले. ती वैष्णव पंथाची सर्वश्रेष्ठ कलाकृती होय.

_bhgvadgetaवैष्णव संप्रदायाच्या शाखा भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांत तेराव्या शतकापासून निर्माण झाल्या. त्यांत पुढील प्रसिद्ध आहेत : 1. गौडीय संप्रदाय (प्रवर्तक-चैतन्य, बंगाल), 2. महापुरुषिया संप्रदाय (प्रवर्तक – शंकरदेव, आसाम), 3. रामदासी पंथ (प्रवर्तक – रामदास, महाराष्ट्र), 4. उद्धवी स्वामीनारायण संप्रदाय (प्रवर्तक – सहजानंद, गुजरात), 5. रामावत संप्रदाय (प्रवर्तक-रामानंद, उत्तर प्रदेश). त्यांशिवाय राधावल्लभी संप्रदाय, हरिव्यासी संप्रदाय, गोकुलेश संप्रदाय, सखीभावक संप्रदाय, मार्गी संप्रदाय, गोकुलेश संप्रदाय, सखीभावक संप्रदाय, हरिदासी (अथवा हट्टी) संप्रदाय इत्यादी अनेक लहान संप्रदाय आढळून येतात. महाराष्ट्रातील महानुभाव पंथ व वारकरी संप्रदाय, बंगालमधील बाउल पंथ या चळवळींना उत्तरेतील तुलसीदास, कबीर, मीरा वगैरे संतकवींना मूळ स्फूर्तिगंगा वैष्णव पंथाच्या भक्तिमार्गातून निघालेली आहे.

महाभारतातील नारायणीय पर्व, भागवतपुराण व भगवदगीता हे वैष्णव पंथाचे मुख्य प्राचीन साहित्य होय. दक्षिण भारतात आळवार संतांच्या गीतांच्या ‘प्रबंधम’ या संग्रहाला तशी मान्यता आहे, वैष्णव पंथाची अधिक पद्धतशीर तत्त्वप्रणाली पांचरात्र संहितांत आढळते. त्या संहिता इसवी सन 100च्या सुमारास शांडिल्य (उपनिषदांचा ऋषी नव्हे) याने रचल्या असे मानले जाते. त्यांची संख्या एकशेआठ आहे. वैष्णवांच्या संहिता ज्ञान, योग, क्रिया आणि चर्या या चार भागांत (पाद) विभागलेल्या आहेत. वैष्णव पंथ ब्राह्यणविरोधी आहे व ईश्वराच्या भक्तीसाठी ब्राह्मणांच्या मध्यस्थीची जरुरी नाही, असे त्यांचे सांगणे प्रथमपासून आहे. वैष्णव धर्मीयांनी त्यांच्या लेखनासाठी संस्कृतऐवजी तत्कालीन प्राकृतांचा उपयोग केला.
(संकलित, मुख्य स्रोत – विश्वकोश)

About Post Author