विज्ञानदृष्टी देणारी – वसुंधरा

2
88
carasole

‘वसुंधरा’ हे सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र आहे. ते कुडाळ तालुक्यातील नेरूरपार या गावी साडेचार एकरांच्या परिसरात आहे. बाबा आमटे यांचे शिष्‍योत्तम सी.बी. नाईक यांनी त्‍या संस्‍थेची सुरूवात केली.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात विज्ञानदृष्टीचा प्रसार-प्रचार करून तेथील अंधश्रद्धेला डोळस पर्याय देणे हा त्‍या संस्‍थेचा उद्देश आहे.

सीबींचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्‍या कुडाळ तालुक्यातील नेरूरपार. सीबी त्यांच्या वडिलांनी मुंबईशी जुळवून घेतल्यामुळे जरी मुंबईकर झाले, तरी त्यांचा रजा घेऊन गावी जाण्याचा कोकणी सिलसिला सुरू होता. बाबा आमटे यांच्‍या ‘भारत जोडो’ अभियानामध्‍ये त्‍यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांचा त्यांच्या गावात, जिल्ह्यात काम सुरू करावे असा विचार पक्का झाला. सीबी यांनी बाबा आमटेंच्‍या सल्‍ल्‍यानुसार 1994 मध्ये ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये उपव्यवस्थापक पदावर असताना ऐच्छिक सेवानिवृत्ती पत्करली. त्‍यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्यासाठी ‘वसुंधरा’ या सार्वजनिक विश्वस्त न्यासाची स्थापना केली. ‘वसुंधरा’ हे विज्ञान केंद्र निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास होता. विज्ञानजाणीव व दृष्टी जागृत झाली, की लोकांमधील अनिष्ट प्रथांना नवीन पिढी विज्ञानातून उत्तर देईल व त्या कमी होतील हा आशावाद सीबींना ‘वसुंधरा’ सर्वोत्तम विज्ञान केंद्र स्थापण्यासाठी प्रेरित करत होता.

‘वसुंधरा विज्ञान केंद्र’ मुंबई-गोवा हायवेवर, कुडाळपासून पाच किलोमीटर अंतरावर, बिबवणे या गावी भाड्याच्या जागेत उभे राहिले. सीबींच्या मित्रपरिवाराने केंद्र उभारणीत आर्थिक, बौद्धिक आणि इतर साहित्य यांची भरभरून मदत दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालक-शिक्षक-विद्यार्थ्यांनी नवीन विज्ञान केंद्राला सक्रिय सहकार्य दिले व त्याच्या सुविधा वापरणे सुरू केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागात विज्ञानप्रयोग करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणारी विज्ञानवाहिनी ‘फिरते ज्ञानविज्ञान – Science on Wheels’ हा ‘वसुंधरा’चा पहिला महत्त्वाचा पथदर्शी प्रकल्प. तो 1998 मध्ये सुरू झाला. टेम्पो-ट्रॅव्हलरमधील सुसज्ज प्रयोगशाळा वर्षातून दोन वेळा पन्नास ते साठ हायस्कूल्सना (आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांसाठी) व नव्वदाहून अधिक प्राथमिक शाळांना (पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी) भेट देते. मुलांना त्या फिरत्या प्रयोगशाळेत पाठ्यपुस्तकातील व इतर नावीन्यपूर्ण पूरक प्रयोग प्रत्यक्ष स्वत:च्या हातांनी करता येतात. शंभर गावांतील सुमारे बारा हजार विद्यार्थी दरवर्षी या फिरत्या प्रयोगशाळेत प्रयोग करतात, दृक्-श्राव्य माध्यमातून विज्ञान-गणित संकल्पना समजावून घेतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ती लोकविज्ञान चळवळ बनली आहे. ‘वसुंधरा’च्या प्रशिक्षित तरुण शिक्षक-शिक्षिका व्हॅनबरोबर असतात.

‘वसुंधरा’मार्फत ‘शब्दयात्रा’ हा फिरत्या वाचनालयाचा अभिनव उपक्रम राबवला जातो. शंभर पुस्तके असलेली बॅग सोळा शाळांपर्यंत पोचवली जाते व महिन्याभराने तेथील बॅग बदलून त्यांना दुसरी बॅग उपलब्ध करून दिली जाते. पुस्तकबॅगांना संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, बहिणाबाई चौधरी अशी नावे दिलेली आहेत.

‘युरेका हॉल’ ही ‘वसुंधरा’ची खासीयत. साडेचार एकर परिसरात ‘युरेका हॉल’ आहे. हॉलमध्ये विज्ञानाच्या अनेक सोप्या प्रयोगांची मांडणी करण्यात आली आहे. जिज्ञासूने स्वत: प्रयोग करून विज्ञान संकल्पना जाणून घ्याव्यात व अडचण असल्यास संस्थेच्या शिक्षक, मार्गदर्शक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी अशी योजना त्या हॉलमध्ये आहे. ‘वसुंधरा’चे प्रकल्पप्रमुख के.एम. पटाडेसर आहेत. ते सतत ‘अपडेट’ राहण्याच्या प्रयत्नात असतात. त्यासाठी भारतभर दौरे करतात. कोकण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे प्रयोग उपलब्ध करून दिले तर अधिक फायदा होईल त्याचा विचार करून तेथील प्रयोगांची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्याने प्रयोग स्वत: करून बघावा अशी सुविधा ‘युरेका हॉल’मध्ये आहे. ‘युरेका हॉल’ बासष्ट प्रयोगांसह सुसज्ज आहे. त्यातील नऊ प्रयोगांची संपूर्ण रचना, तर सदतीस प्रयोगांचे आराखडे के.एम. पटाडे यांनी केले आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र यांमधील मूलभूत संकल्पना त्या प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांना समजावून घेणे सुलभ होते.

पटाडे सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक आहेत. कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या नरडवे गावातील हायस्कूलमध्ये चौतीस वर्षे साहाय्यक शिक्षक म्हणून पटाडे कार्यरत होते. कुडाळ हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री प्रदीप बर्डे ‘वसुंधरा’च्या व्यवस्थापनाची जबाबदारी पाहतात. पटाडे व बर्डे यांनी त्यांच्या सेवाकाळात ‘विज्ञान अध्यापक संघटना’ स्थापन केली. सीबींनी त्यांना 1995 पासून ‘वसुंधरा’शी जोडून घेतले. पटाडे-बर्डे जोडीने दहावी गुणवत्ता विकास प्रकल्प, विज्ञान शिबिरे यांत उत्साहाने सहभाग घेतला. पटाडेसर 1 जुलै 2006 पासून म्हणजे सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवसापासून ‘वसुंधरा’साठी पूर्णवेळ उपलब्ध झाले व त्यांच्या नेतृत्वाखाली ‘वसुंधरा’ नावीन्यपूर्ण उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवू लागली. वंदना करंबेळकर, भाग्यविधाता वारंग या विश्वस्तांचे जिल्ह्यातील उपक्रमांना सक्रिय मार्गदर्शन लाभते.

संस्थेने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा मार्गदर्शनाचा उपक्रम 1997 पासून सुरू केला. त्रेपन्न जणांना अंतीम राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे! एवढे विद्यार्थी दुर्गम व डोंगराळ जिल्ह्यातून उत्तीर्ण होणे हा उच्चांकच आहे. ‘वसुंधरा’चे प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रशिक्षण केंद्र म्हणून आकार घेत आहे. कर्जत, सांगली, सातारा, पाटण, कोल्हापूर, इचलकरंजी, रत्नागिरी, चिपळूण येथीलही विद्यार्थी प्रशिक्षणासाठी ‘वसुंधरा’त येत असतात. महाराष्ट्र स्तरावर 2009 -10 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल अडुसष्ट टक्के होता, त्या वेळी मुंबई अठ्ठावन्न टक्के व पुणे पन्नास टक्के अशी आकडेवारी होती. असे हुशार विद्यार्थी दुर्गम भागातून शोधून काढण्याचे कार्य ‘वसुंधरा’ गेली कित्येक वर्षे करत आहे. देवगडचा कुणाल मराठे (2007), तर कुडाळचा संजोग जोशी (2009) यांनी ‘राष्ट्रीय प्रज्ञाशोध’ परीक्षेत महाराष्ट्रात पहिले येण्याचा मान मिळवला, तर मालवणचा रामप्रसाद ठाकूर महाराष्ट्रात 2008 मध्ये दुसरा आला. कुडाळ तालुक्यातील गवंडीकाम करणारे वडील व मोलमजुरी करणारी आई अशा तांबे कुटुंबातील अक्षय ‘राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती’चा मानकरी ठरला. सध्या तो ‘आयटीआय’चा( मुंबई) विद्यार्थी आहे. दारिद्र्य रेषेखालील मागासलेल्या घटकांसाठी NMMS ह्या परीक्षेसाठी ‘वसुंधरा’तर्फे मार्गदर्शन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनशेवीस शिष्यवृत्ती राखीव आहेत. ‘वसुंधरा’ने यात मार्गदर्शन करण्यापूर्वी त्यातील बहुतांश शिष्यवृत्ती न वापरता परत जात असत. 2011 मध्ये दोनशेसतरा विद्यार्थ्यांना, तर 2012 मध्ये दोनशेअठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांना (इयत्ता आठवी ते बारावी) दरमहा पाचशे रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली!

‘विज्ञान अध्यापक मंडळा’तर्फे घेण्यात येणाऱ्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत 2010 साली सहावीतील एका विद्यार्थ्याने, तर नववीच्या दोन विद्यार्थ्यांनी दोन रौप्यपदके संपादन केली. ती संख्या सहा रौप्यपदकांपर्यंत 2011 व 2012 मध्ये गेली आहे. वेद दळवी हा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर बालवैज्ञानिक म्हणून 2012 मध्ये निवडला गेला. त्याचा सन्मान तत्कालीन राष्ट्रपती डॉ. प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाला, तर अखिल भारतीय बालविज्ञान परिषदेच्या निमित्ताने वेद दळवीला डॉ. अब्दुल कलाम यांचा सहवास लाभला. डॉ. अब्दुल कलाम यांनीही यापूर्वी ‘वसुंधरा’ला भेट देऊन ‘विज्ञान-वाहिनी’च्या प्रकल्पाचे कौतुक केले होते व ‘वाहिनी’तून प्रवास करण्याची मनीषा व्यक्त केली. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनीही संस्थेला भेट दिली व ‘वसुंधरा’च्या ‘युरेका हॉल’ व ‘विज्ञान-वाहिनी’चे कौतुक केले. सरकारी अनुदानाशिवाय विज्ञानप्रसार करणारी भारतातील ही एकमेव सामाजिक संस्था असावी, असा अभिप्राय काकोडकरांनी व्यक्त केला. ‘विज्ञान-वाहिनी’च्या कामाची माहिती तपशीलवार मागवून घेतली व राष्ट्रीय स्तरावर त्याचा प्रचार आपण करू असे आश्वासनही त्यांनी ‘वसुंधरा’ भेटीच्या वेळी दिले.

‘वसुंधरा’तर्फे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. शासनाचा माध्यमिक शिक्षण विभाग व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्यातर्फे ह्या प्रशिक्षणासाठी प्राधान्याने ‘वसुंधरा’ची निवड केली जाते. ‘यशदा’ (पुणे) या संस्थेचे मार्गदर्शनवर्गही ‘वसुंधरा’च्या सुसज्ज प्रशिक्षणवर्गात घेतले जातात. प्रशिक्षणाबरोबर भोजन-निवासासह निवासी व्यवस्था पुरवणारे आदर्श प्रशिक्षण केंद्र म्हणून ‘वसुंधरा’ केंद्र आता ख्यातनाम होत आहे. पुण्यातील कीटकतज्ज्ञ रवींद्र सोमण गेली तीन वर्षे सातत्याने ‘वसुंधरा’च्या संपर्कात आहेत. त्यांच्या साहाय्याने नजीकच्या भविष्यकाळात ‘कीटक’ दालन ‘वसुंधरा’च्या जागेत साकार होणार आहे. ‘वसुंधरा’तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. तो ‘वसुंधरा’ व स्थानिक प्रशाला यांच्या मदतीने आयोजित करण्यात येतो. अशा प्रकारे, 1995 मध्ये बिबवणे येथे छोट्या जागेत सुरू झालेल्या ‘वसुंधरा’ प्रकल्पाचा विस्तार सिंधुदुर्ग जिल्हाभर झाला आहे. ‘आकाशदर्शन’ हा विशेष कार्यक्रम पटाडेसरांच्या उद्बोधक व दैनंदिन जीवनाशी निगडित अशा माहितीपूर्ण वर्णनामुळे जिल्ह्यातील गावागावांत लोकप्रिय होत आहे.

‘वसुंधरा’ आरोग्यविषयक कामांमध्ये सहभाग घेत आहे. प्रजनन व बाल आरोग्य प्रकल्प सावंतवाडी तालुक्यातील दहा व दोडामार्ग तालुक्यातील आठ दुर्गम गावांमध्ये चालतो. गरोदर माता तपासणी व मार्गदर्शन शिबीर अशा विविध उपक्रमांचा या प्रकल्पात समावेश होतो.

जिल्ह्यातील गावांमध्ये कॅन्सरची तपासणी व कॅन्सरचे रुग्ण शोधून काढण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकास्थित डॉ. अनिल नेरूरकर यांच्या नेतृत्वाखाली नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. नेरूरकर संस्थेचे हितचिंतक सदस्य आहेत. त्यांच्याबरोबर डॉ. शालिनी सबनीस, डॉ. दारव्हेकर, डॉ. रवी वाघमारे (मुंबई), कुडाळमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय निगुडकर, दंतवैद्य डॉ. नीलेश बाणावलीकर व सावंतवाडीच्या डॉ. वैशाली पडते त्या प्रकल्पात कार्यरत आहेत. कर्करोगविरोधी फिरते अभियान जिल्ह्यातील सुमारे वीस गावांमध्ये राबवले जात आहे. तंबाखू / गुटखा सेवनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत जागरुकता वाढवण्यासाठी सभा आयोजित करण्यात येतात. शाळा-कॉलेजांमधून विद्यार्थ्यांना प्रबोधनपर सीडी दाखवून त्यांच्याशी संवाद साधला जातो. त्या प्रकल्पाद्वारे संपूर्ण जिल्हा कर्करोगमुक्त करण्याचे स्वप्न ‘वसुंधरा’ बाळगून आहे.

शालेय पोषण आहाराच्या नवीन धोरणांनुसार कमी पटसंख्या असलेल्या शाळांना पोषण आहार देणे परवडत नाही. नेरूर गावातील चार, कोलगाव व शिवापूर येथील प्रत्येकी एक अशा सहा शाळांना श्रीरामानुग्रह ट्र्स्ट, मुंबई यांच्या देणगीतून ‘वसुंधरा’तर्फे प्रत्येकी पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते. ‘वसुंधरा’चे असे विविध प्रयत्न गेली अठरा-वीस वर्षें सुरू आहेत.

नेरूरपार येथील साडेचार एकर जागेतील पहिल्या टप्प्याचे अंदाजे साठ लाख रुपयांचे व सहा हजार चौरस फुटांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सुरेश प्रभू यांच्या निधीतून एका इमारतीचे, तर संस्थेचे विश्वस्त आनंद नायर (श्रीरामानुग्रह ट्रस्ट) व संस्थेचे सल्लागार ए. व्ही. रामवाडे यांच्या उदार देणगीमुळे विज्ञान केंद्राच्या दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. कोकणच्या निसर्गाचे सौंदर्य अबाधित ठेवत, तेथील वातावरणाशी मैत्री सांधणारी स्थापत्यरचना अविनाश हावळ (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली साकारली आहे.

संस्थेने बाबा आमटे यांचा सेवाभाव अंत:करणी जपला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला वैज्ञानिक चळवळ उभारण्याची ऊर्मी बळ देत असते. ‘वसुंधरा’ संस्था आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण व्हावी म्हणून सीबी काका व विश्वस्त मंडळ प्रयत्न करत आहेत. ‘वसुंधरा’चा वार्षिक खर्च सुमारे पंधरा लाख इतका आहे. Caring Friends या संस्थेचे रमेश कचोलिया यांचे आर्थिक साहाय्य प्रतिवर्षी संस्थेला सुरुवातीपासून दिले जाते.  ‘वसुंधरा’च्या व सीबी काकांच्या कार्याचा यथोचित गौरवही करण्यात आला आहे. वसईचा ‘पद्मश्री भाऊसाहेब वर्तक पुरस्कार’ व ‘आशीर्वाद’चा ‘जीवनगौरव’ पुरस्कार संस्थेच्या व सीबींच्या कार्यासाठी मिळाला. सावंतवाडी संस्थान मराठा समाजातर्फे सी.बी. नाईक यांना ‘मराठा समाजगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यु.आर.एल. फाउंडेशनच्या एक लाख रुपये रकमेच्या सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे सीबी काका मानकरी आहेत. विलेपार्ले येथील सावरकर प्रतिष्ठानतर्फे पार्ल्यातील थोर समाजसेवक स्व. रामभाऊ बर्वे स्मृती पुरस्काराने ‘वसुंधरा’चे कार्य गौरवण्यात आले.

निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. तारकर्ली किनारा, विजयदुर्ग-सिंधुदुर्ग किल्ले, कुणकेश्वर-आंगणेवाडी ही देवस्थाने यांच्याबरोबर विज्ञान व शैक्षणिक पर्यटनासाठी ‘वसुंधरा’ हे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित व्हावे हे सीबीकाकांचे स्वप्न आहे.

‘वसुंधरा’च्‍या रुपाने महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाच्या एका निसर्गरम्य खेड्यात हा विज्ञानदीप सतत तेवत आहे.

वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास प्रकल्प कार्यालय
‘वसुंधरा’ सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान केंद्र
मु.पो. नेरूरपार, कुडाळ-मालवण सागरी महामार्ग, ता. कुडाळ,
जि. सिंधुदुर्ग – 416520
9421147323, (02362) 202164,

eduvasundhara@gmail.com
www.vasundharasow.org

– प्रसाद घाणेकर

About Post Author

2 COMMENTS

  1. Class work at grass root
    Class work at grass root level. Only devoted persons like C B Naik and their followers can do such type of noble job. Hats off you sir!

Comments are closed.