वारली विवाह संस्कार

-vaarlivivah

वारली समाज हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या डोंगराळ भागात राहतो. त्यांची बोलीभाषा मराठी आहे. निसर्ग ही त्या जमातीसाठी ‘माता’ असते. ‘निसर्ग माता’ ही त्यांच्या जीवनाची मूलभूत आणि केंद्रस्थानी असलेली संकल्पना आहे.

वारली जमातीत ‘विवाह’ हा संस्कार महत्त्वाचा आहे. वारली समुदाय पती व पत्नी यांचे नाते आणि त्यांचे सहजीवन यांकडे आस्थेने व आदराने पाहतो. वधू आणि वर यांना परस्पर जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य वारली समुदायात दिले जाते. युवक आणि युवती यांना जोडीदार निवडण्यासाठी महत्त्वाचे माध्यम म्हणजे त्यांचे पारंपरिक नृत्य. त्यात तारपा नावाचे वाद्य वाजवले जाते. युवक आणि युवती तारपाच्या तालावर नृत्य करतात. वृद्ध महिला गीते म्हणून नृत्याला साथ देतात. युवक आणि युवती यांनी एकमेकांची निवड केल्यानंतर त्यांचे पालक एकमेकांना भेटतात. त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर ती दोघे नजीकच्या काळात विवाह करतात. ती विवाहविधी कालांतराने करणार असतील तरीही ती दोघे एकमेकांबरोबर सहजीवन सुरू करू शकतात. त्या सहजीवनात नैतिक मूल्यांचा आदर केला जातो. एकमेकांची फसवणूक केली जात नाही. ज्यावेळी आर्थिक स्थिती अनुकूल निर्माण झाली असेल त्यावेळी विवाह संस्कार केला जातो. त्या पद्धतीमुळे काही वेळा आई-वडील आणि मुले यांचा विवाह एकाच वेळी होतो! 

वारली विवाहाचे पौरोहित्य त्यांच्या जमातीतील विधवा स्त्री करते. तिला ‘धवलारी’ असे संबोधले जाते. धवलारी वारली जमातीच्या विशिष्ट बोलीभाषेतील गीते म्हणून विधी पूर्ण करते. वारली समाजातील विवाहाचे पौरोहित्य एक विधवा स्त्री करते याचे महत्त्व विशेष वाटते. विवाहप्रसंगी उपस्थित सर्वांना स्नेहभोजन असते. वारली विवाहात वधू-वर आणि त्यांचे भाऊ – बहीण यांनाच वधूकडून भोजन दिले जाते. वधू-वरांचे पालकही स्वत: त्यांचे भोजन घेऊन येतात. त्यामुळे वधूच्या वडिलांना खर्चाची चिंता कमी असते. 

वारली विवाहविधी असा असतो : विवाहाच्या सुरुवातीला

१. हिरवा (गणपती),
२. नारनदेव (जलाची देवता),
३. ब्रह्मनदेव (निर्मितीची देवता),
४. वाघोबा (वाघ) यांची प्रार्थना केली जाते.

हे ही लेख वाचा –
आदिवासी कातकरी जमातीचे झिंगीनृत्य
गोंदण : आदिम कलेचा वारसा

वारली समुदाय त्यांना वारा, पाऊस, सूर्य, चंद्र यांची भीती वाटत असल्याने त्यांचीही उपासना करतो. ‘धवलारी’ विवाहविधी सुरू करताना पारंपरिक लोकगीते म्हणते. वर आणि वधू एकमेकांच्या समोर उभे राहतात आणि परस्परांचे हात हातात धरतात. ‘धवलारी’ त्यांच्या हातात तांदूळ देते. ‘धवलारी’ जी गीते म्हणते त्यामध्ये निसर्गदेवतांनी वधू आणि वर यांना आशीर्वाद द्यावे अशी प्रार्थना केलेली असते. वारली देवता अशा आहेत

 • जुगनाथ = विष्णू, • भर्जा= विष्णूची पत्नी, • ढगशारदेव= ढग, • पावशादेव= पाऊस,
• वावदीवारन= वादळ, • चंद्रासूर्य= चंद्र आणि सूर्य, • सुकेशारदे= शुक्र, • वरमादेव= नदी,
• नारनदेव=जलाची देवता, • जऱ्ह्यादेव= झरा, • बत्तीसपोह्या= तलाव.

त्याखेरीज पांडव, राम, लक्ष्मण, सीता, रावण आणि मंदोदरी यांचीही प्रार्थना केली जाते. जोडीनेच, जमातीला संरक्षण देणारे गावाचे मुख्य, हवालदार आणि सुईण यांना वंदन करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला -varlivivahजातो.

गीतांनंतर, वर हा वधूच्या गळ्यात काळ्या मण्यांची माळ बांधतो. वधू हिरव्या रंगाची साडी नेसून सासरच्या घरी प्रवेशाला तयार होते. गृहप्रवेशावेळी नववधूला तिच्या नव्या कुटुंबातून विशेष मानाने स्वीकारले जाते. तिला तिच्या नव्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून दिली जाते. तिला घरातील धान्याची कणगी, उखळ अशा, दैनंदिन वापरातील वस्तूंचा परिचय करून दिला जातो. नववधूला नव्या आयुष्याचा असा वेगळ्या पद्धतीने परिचय! त्याच वेळी वराची माता सुंदरसे गीत गाते, त्यामध्ये तिचा मुलगा हा चंद्र असून तिची सून ही जणू मोगऱ्याची कळी आहे असे वर्णन केलेले असते. विवाहात यज्ञ, होमहवन असे विधी नसतात. भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याची पद्धतही नाही.

वारली समुदाय हा निसर्ग आणि मानव यांना आदर देणारा आहे. त्या समुदायात निसर्गाइतकाच महिलांनाही आदर देण्यात येतो. त्यांच्या चर्चेमध्ये महिलांचे मत विचारले जाते आणि महिलांच्या मताला महत्त्व दिले जाते.

– आर्या जोशी 942205979
jaaryaa@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. वारली या आदिवासी समाजाच्या…
    वारली या आदिवासी समाजाच्या चालीरीती संबंधी सर्वसाधारणपणे माहीत नसलेली चांगली माहीती आहे. या समाजाला निती-अनीतीच्या नागरी संकल्पना लागु करुन चालणार नाहीत. त्यांची नितीमत्ता आजच्या तथाकथित उच्चभ्रु समाजापेक्षा नक्की उच्च आहे हे या माहीती वरुन कळते.

Comments are closed.