वस्तीमधील उमलणारी फुले

0
131

मी ज्या शाळेत शिकवते त्या शाळेत प्रत्येक वर्गाने पाच ते सात मिनिटांचे नाटुकले सादर करावे असा उपक्रम असतो. मुलेच नाटुकली लिहितात, बसवतात. शिक्षक मदत करतात. स्काऊट आणि गाईड कॅम्प यांच्या दरम्यान मुलांना दोन दिवस अगोदर नाटुकली लिहिण्यासाठी विषय दिला जातो.

स्त्री मुक्ती संघटना परिसर विकास या उपक्रमाअंतर्गत मुंबईमधील कचरावेचक महिलांना 1998 पासून संघटित करत आहे. त्यात महिलांचे बचत गट बांधणे, शिक्षण, आरोग्य, रेशन संबंधित समस्या, कौटुंबिक हिंसा, त्यांचे प्रशिक्षण त्यांच्या सहकारी संस्था बांधणे, त्याअंतर्गत रोजगार मिळवून देणे असे अनेक उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमात वस्ती पातळीवर अभ्यासवर्ग घेतले जातात. तरुण मुलामुलींचे गट बनवून त्यांच्यासोबत संविधान, व्यसन, ताणतणाव, व्यवसाय अशा विषयांवर कार्यक्रम घेतले जातात.

स्त्री मुक्ती संघटनेचे काम ज्या वस्त्यांमधून चालते त्या वस्त्यांमध्ये यावर्षी नाट्याविष्कारचा कार्यक्रम बालदिनाच्या निमित्ताने आयोजित करावा असे मनात आले. ज्यात मुलांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यातील सुप्त गुणांन वाव देणे हे उद्दिष्ट ठेवले होते. मी ती कल्पना प्रज्ञा सराफ, योगिनी राऊळ, संगीता जोशी या, स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कानावर घातली. नंतर, संघटनेच्या कार्यकारिणीच्या सर्वांनी ती कल्पना उचलून धरली. योगायोगाने, माझी भेट त्याच काळात नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कलच्या संचालक वासंती भगत आणि सावित्री मेधा अतुल (काली बिल्ली प्रॉडक्शन) यांच्याशी झाली. मी त्यांच्या कानावर ही कल्पना घातली. त्या दोघींनी ‘वस्तीत अर्धा दिवस नाट्यशिबिर घेऊ या, म्हणजे मुलांना उत्साह येईल’ अशी योजना मांडली. मी ती कांजूर, गोवंडी, नवी मुंबई येथे कार्यकर्त्यांच्या मीटिंगा घेऊन त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर वस्ती वस्तीतील मुलामुलींच्या गटवार बैठका घेतल्या. त्यांनी उत्साहाने भाग घेण्याची तयारी दर्शवली. दिवाळीच्या सुट्टीत नाट्यप्रशिक्षणाची शिबिरे घ्यावी असे ठरले. अर्ध्या दिवसाच्या शिबिरात मुलांना मोकळे करणे, वेगळ्या पद्धतीने विचार करणे, आवाजाचे तंत्र, शारीरिक हालचाली, भावव्यक्ती, समज, कल्पनाविलास अशा नाटकातील तंत्रांची प्राथमिक ओळख करून देणे हे मर्यादित उद्दिष्ट होते.

आम्हाला नवी मुंबई, ठाणे येथे चांगले हॉल मिळाले. मुंबईत मात्र जागेचा अभाव होता. एका वस्तीमध्ये हॉल मिळाला, पण झोपडपट्टीतील मुलांचे शिबिर म्हणजे काहीतरी गडबड होणार हे गृहीत धरून पोलिसांना पत्र देण्यास सांगितले. आम्हाला बाकीची शिबिरे रविवारी ऑफिसमध्ये घ्यावी लागली. सर्व विभागांत मुलामुलींचा उत्साह होता. तरी प्रत्येक ठिकाणचा अनुभव मात्र वेगवेगळा होता. आम्ही पोचण्यापूर्वी ठाणे, दिघा, कांजूरमार्गमध्ये वस्तीतील शिक्षिका, कार्यकर्ते मुलांना घेऊन हजर असायचे. त्यामुळे शिबिर चालू व्हायचे. त्या मानाने येथे अडचणी कमी होत्या. पण मानखुर्दमध्ये मुलींवर पाणी भरण्याची जबाबदारी होती. दीड वाजता पाणी यायचे. कोणाची आई कचरा वेचण्यास गेल्याने तिला संध्याकाळी लवकर जाऊन स्वयंपाक करायचा होता. त्यामुळे मानखुर्दमध्ये आम्हाला मुलींना मोकळे करण्यास खूप वेळ लागला. त्या वस्तीच्या बकालपणामुळे मुलींना तेथे फार बाहेर जाण्याची सोय नाही. त्यामुळे त्यांचे विश्व खूपच मर्यादित होते. पण शिबिर संपेपर्यंत मुलींमध्ये थोडासा का होईना आत्मविश्वास आला होता. अर्थात पुन्हा त्यांना त्याच सामाजिक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. तरीही त्यांनी निदान नाटक करण्याची तयारी दाखवली. बालविवाहावर चर्चा केली, हेही नसे थोडके. रफीनगर (गोवंडी) येथील एक मुलगी तर तान्ह्या भावाला घेऊन शिबिरात आली होती ! पेस्तमसागरमध्ये वत्सलाताई नाईक नगरच्या मुलीबरोबर तिची आई आली होती. त्या म्हणाल्या, “मी किती वर्षांनी मुलींना बागडताना, खेळताना पाहिले, खूप छान वाटले.”

मी त्या मुलींची बैठक घेण्यास काही दिवसांनी गेले तेव्हा त्या असे का म्हणाल्या, ते मला कळले. त्यांच्या झोपडपट्टी पुनर्विकासाच्या इमारतीसमोर स्कूटर्स पार्क केलेल्या होत्या आणि लगेच रस्ता, खाली हॉटेल, टपऱ्या, बार आणि दुकाने. सर्व पुरूष मंडळींचा अड्डा, त्यामुळे मुलींना शाळा-कॉलेज व घर याशिवाय बाहेर पाठवलेच जात नाही. त्यामुळे मुलींनी शिबिरात, मोकळिक मिळताच धमाल केली. काही मुली शिबिराच्या सुरुवातीला बोलायलाच तयार नसायच्या, बिचकायच्या, पण त्या शेवटी शेवटी नाटुकल्यांत छोटीशी भूमिका आत्मविश्वासाने करू लागल्या. एका शिबिरात एक मुलगी एका मुलाबरोबर दिसली म्हणून आईने भरपूर मारहाण केली होती. त्यामुळे ती शिबिरात जरा घाबरून सहभाग घेत होती. पण नंतर तिचा चेहराही थोडा खुलला. तीही उत्साहाने सहभागी झाली.

कन्नमवार नगर, कांजूरमार्ग, सूर्यनगर, टागोर नगर, पवई येथील मुलींनी शाळा, ट्रेन, मार्केट, आई अशा विषयांवर दहा मिनिटांत तयारी करून छान अर्थपूर्ण नाटुकली सादर केली. त्यांची निरीक्षणे त्यांनीच मांडण्याचा प्रयत्न केला, तो स्तुत्य होता. पेस्तमसागरमधील मुलींनी ‘आई’वर खूप विचार मांडले. आम्ही मुलांना दिघ्यामध्ये चर्चा करताना म्हटले, “आज मुली कार्यशाळेतून मध्येच उठून पाणी भरण्यास गेल्या, मुले का नाही गेली?” एक मुलगा लगेच म्हणाला, “आमच्या बहिणी असतात ना !” त्याला बोलतानाच स्त्रीपुरूष असमानतेची जाणीव झाली होती. वेगवेगळ्या विषयांवर मुलांसोबत चर्चा झाली.

मुलांना त्यांच्या परिस्थितीतील वेगवेगळ्या विसंगती जाणवू लागल्या. आम्ही मुलांना प्रत्येक कार्यशाळेच्या शेवटी विषयांची यादी देऊन विषय निवडण्यास सांगायचो. ते विषय त्यांच्या रोजच्या जीवनाशी, त्यांच्या आसपास घडणाऱ्या घटनेवर आधारित होते. जसे, मैदानाची गरज, हुंडा प्रथा, छेडछाड, घरगुती हिंसा वगैरे. मग आम्ही मुलांनी निवडलेल्या विषयांवर चर्चा करायचो. मुलांना काय माहिती आहे ते विचारून त्या विषयाचे इतर पैलूही समोर आणायचो. ती विचार करत होती, मांडत होती. त्यावर त्यांना नाटुकले लिहिण्यास सांगितले.

आम्ही सर्व कार्यशाळा झाल्यानंतर आढावा घेतला. तेव्हा लक्षात आले, की विषय जरी समजला असला तरी त्यावर नाटक लिहिणे तितके सोपे नव्हते. मुलांना घरातून काहीच मदत नव्हती. त्यामुळे मुलांना नेमकी कशी सुरुवात करावी हे समजत नव्हते. त्यांना शाळा, कॉलेज, क्लास सुरू झाल्याने एकत्र येणेही जमत नव्हते. मग मी, संगीता जोशी व प्रज्ञा सराफ, आम्ही विभागवार मुलांसोबत मीटिंग्स घेतल्या. त्यांच्याबरोबर कथानक व सीन कसे लिहिता येतील याबाबत चर्चा केली. त्यातील नेतृत्वगुण असलेल्या मुलांना नाटक लिहिण्याची जबाबदारी दिली. सहयोगिनी, अभ्यासवर्गातील शिक्षिका आणि मुले यांनी एकत्र येऊन संहिता लिहिल्या. काही विभागांत जागेची अडचण होती. ती मुले बागेत बसून चर्चा करत. काहींनी कांदाबटाट्याच्या दुकानामागे प्रॅक्टिस केली. काहींनी शिक्षिकेच्या घरी, किचनमध्ये तर काहींनी सार्वजनिक बुद्ध विहारात प्रॅक्टिस केली. शिक्षिका, सहयोगिनी यांनी मुलांसोबत उत्साहाने सहभाग घेतला. लेखन, दिग्दर्शन, चार्ट्स बनवले. शिवाय, काहींनी स्वतः त्यात कामेही केली. एका विभागात अगदी पाच दिवसांत नाटक बसवले. तेथील मुख्य मुलींपैकी एकीचे वडील त्याच काळात हॉस्पिटलमध्ये होते. त्यामुळे तिला वडिलांच्या जागेवर कामावर जावे लागत होते.

मी त्या विभागातील मुलींना भेटण्यास गेले तेव्हा बहुतेक पंधरा-सोळा वर्षांच्या मुली घरात चपाती-भाजी करत होत्या. मला जाणवले, की या मुलींना नाटकात काम करणे, लिहिणे, बसवणे याकरता वेळ काढणे खरेच कठीण आहे. मग मी बागेत मीटिंग घेतली. मुली म्हणाल्या, “आम्हाला विषय कळला आहे. आम्ही संहितेशिवाय नाटक करू.” त्यांनी अवघ्या दोन-तीन दिवसांच्या प्रॅक्टिसमध्ये ‘आई कुठे काय करते?’ यावर छान नाटिका सादर केली. जसजशा संहिता आमच्याकडे येत होत्या आम्ही चकित होत होतो. कोणी गाणी लिहिली होती, कोणी घोषणा. आम्ही त्यांची भाषाही बदलली नाही. थोड्याफार सुधारणा सुचवल्या.

कार्यक्रमाची जागा ठरली. मुंबईतील घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीतील शहीद स्मारक हॉल. लांबच्या मुलांना दोन बस बदलून यावे लागणार होते. ठाण्यातील भीमनगरमधील मुलांना रिक्षा, मग बस असा प्रवास करून यायचे होते. एवढ्या मुलांना आणणे हे जबाबदारीचे काम होते. हॉल दुपारी चारनंतर लग्नाला दिला होता. त्यामुळे कार्यक्रम साडेअकराला सुरू व्हायलाच हवा होता. आणि काय आश्चर्य, जवळजवळ एकशेसत्तर मुले आणि तीसच्या वर कार्यकर्ते वेळेच्या आधी हॉलवर हजर झाले. त्यामुळे कार्यक्रम बरोबर साडेअकराला सुरू झाला. भीमनगरच्या मुलींनी सावित्रीबार्इंची ओवी म्हणून कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर सर्व विभागांच्या नाटिका सादर झाल्या. आम्ही दर तीन नाटिकांनंतर पाहुण्यांचे छोटेखानी मार्गदर्शन ठेवले होते. त्यानुसार वासंती भगत यांनी नाटकाचे वर्कशॉप घेतले होते, त्यांनी मुलांचे कौतुक केले. नाटकाविषयी मार्गदर्शन केले.

शिवाजीनगरमध्ये वस्तीत राहणारी सोळा वर्षीय मुस्लिम मुलगी सानिया मिस्त्री हिला रॅपची आवड आहे व ती स्वतः रॅप लिहिते व सादर करते. तिला ‘गल्ली गर्ल’ असे म्हणतात, ती आली होती. तिने तिच्या आजुबाजूच्या पोरापोरींवर रॅप सादर केले. ज्येष्ठ बालरंगकर्मी लीला हडप यांनीही मुलांना गाणे म्हणून दाखवले व मार्गदर्शन केले.

शेवटी मुलांना नाटकात सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्रे देण्यात आली, तेव्हा मुलांना खूपच आनंद झाला. मुलांनी जेव्हा त्यांच्या पालकांना प्रमाणपत्रे दाखवली तेव्हा, ज्या पालकांनी मुलांच्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून किंवा घरांतील कामामुळे किंवा इतक्या लांब कशाला पाठवायचे नाटकात, म्हणून भाग घेऊ दिला नव्हता त्यांना आणि मुलांना वाईट वाटले. कांजूरमार्ग (पश्चिम) मधील मुलींनी ‘मन सुद्ध तुझं’ हे गाणं खड्या आवाजात सादर केले. गोवंडी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या श्वेता पवारने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खूप छान केले.

ज्योती म्हापसेकर शिबिराच्या शेवटी म्हणाल्या, की या मुलींमधून स्त्रीमुक्ती संघटनेच्या कलापथकाला नवीन ऊर्जा मिळेल. कांजूर (पूर्व)-(पश्चिम), सूर्यनगर, टागोरनगर, कन्नमवार नगर, पवई, ठाणे, दिघा, नेरूळ, मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर एवढ्या विविध भागांमधून मुले, पालक या कार्यक्रमास आले होते. नाटक हे मुलांना फुलण्याकरता, आत्मभान जागवण्याकरता, आत्मविश्वास निर्माण करण्याकरता चांगले माध्यम आहे. त्यातून काही मुलांचे नेतृत्वगुण लक्षात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती आमच्याशी जोडली गेली आहेत.

संगीता सराफ 9819230274 sangeetasaraf72@gmail.com

——————————————————————————————————————

About Post Author