वराहमिहीर: भूगर्भजलाचा पहिला अभ्यासक (Varahmihir – Groundwater Scientist of India’s history)

वराहमिहीर (सन 487 ते 550) हा विचारवंत, पर्यावरणतज्ज्ञ व निष्णात ज्योतिषी उज्जैनच्या (मध्यप्रदेश) परिसरात होऊन गेला. त्याचा बृहत्संहिता हा अतिप्रसिद्ध असलेला ग्रंथ. त्यातील गर्भलक्षणाध्याय, गर्भधारणाध्याय, प्रवर्षणाध्याय आणि दकर्गलाध्याय असे चार अध्याय पाणी ह्या विषयासंबंधी विस्तृत माहिती देतात. दकर्गल (उदक+अर्गल) म्हणजे अडथळ्यांमागील पाणी म्हणजेच भूगर्भातील पाणी किंवा भूगर्भजल! त्यावर साठ विद्वानांनी टीका लिहिल्या आहेत (संदर्भ – महोत्पल विवर्ती यांनी संपादित केलेली प्रत).

वराहमिहिराने भूगर्भजल शोधताना मुख्यत: तीन गोष्टींच्या निरीक्षणावर भर दिला. त्यात उपलब्ध वृक्ष, वृक्षांजवळील वारूळे, त्या वारूळाची दिशा, त्यांत राहणारे प्राणी आणि तेथील जमीन – तिचा रंग, पोत आणि चव!

अमेरिकन भूगर्भ शास्त्रज्ञ मेनझर याने पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी शोधण्याची सुरुवात गेल्या शतकात अगदी सुरुवातीच्या काळात केली. तो आधुनिक शास्त्रज्ञ ह्या विषयाचा मूळपुरूष मानला जातो.

वराहमिहीर हा मुख्यत्वे ज्योतिषी होता. तसाच, तो खगोलशास्त्रज्ञही होता. त्याने आकाशनिरीक्षणासाठी आयुष्याचा बराच काळ निसर्गाच्या सानिध्यात घालवला. त्या विषयावर ग्रंथ लिहिले. बृहत्संहिता हा त्याचा शेवटचा ग्रंथ! तो त्याचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ; तसेच, प्राचीन भारतीय विद्याभ्यासाचा संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यताप्राप्त आहे.

वराहमिहिराने सुमारे पंचावन्न वृक्ष व वनस्पती यांचा अभ्यास करून मांडणी केली आहे. त्यांतील काही वृक्ष – जांभूळ, आंबा, वड, पिंपळ, कंदब, शमी, शिरीष, पळस, बेल, औदुंबर, नारळ, दाऊहळद, बिब्बा, दर्भ, बेहडा, कदंज, कांचन, जेष्ठमध, कवठ, दुर्वा इत्यादी! अशा वृक्षांजवळील वारूळात बेडूक, मासा, साप, पाल, घोरपड, सरडा, मुंगुस, नाग, कासव इत्यादी प्राण्यांचा वास असतो असे उल्लेख आढळतात. त्यांतील बेडूक हा उभयचर म्हणजे पाणी व जमीन, दोन्हीकडे राहणारा! तो उन्हाळ्याचे चार महिने भूगर्भात झोपतो. त्याची बिळे ही दोन-अडीच मीटर एवढी खोल आढळली आहेत. तर जेथे पाणी आहे तेथे माशांसारखे जलचर प्राणीही सापडतात. त्या सगळ्यांची बिळे-वारूळे यांच्या अभ्यासात वराहमिहीर यांचे स्थान अव्वल मानले जाते.

माती किंवा भूगर्भातील पाणी हा त्याच्या निरीक्षणाचा तिसरा महत्त्वाचा भाग! मातीचे वेगवेगळे थर स्थलपरत्वे; तसेच, वेगवेगळ्या खोलीवर आढळतात. वराहमिहीर यांनी मातीचे वर्गीकरण पुढील पद्धतीने केले आहे – काळी माती, भुरकट माती, पिवळी माती, पांढरी माती, लाल माती, वाळू मिश्रीत माती, लोहयुक्त माती, निळसर माती, पिवळसर काळी माती, लालसर पिवळी माती, पांढरट माती, क्षारयुक्त माती, वाळू, ओसाड म्हणजे गवताचे पानेही न उगवणारी माती! ते खडकांचे वेगळे निरीक्षण मांडतात. काळा पाषाण, हिरवट छटा असलेला पाषाण, निळसर काळा पाषाण, करडा-मातकट रंगाचा दगड, चटकन पीठ होईल असा ठिसूळ दगड, थरांचा दगड, तेलकट – मेणचट पाषाण इत्यादी!

वराहमिहीर हे उज्जैनचे. मुख्यत: काळ्या पाषाणाच्या/बेसाल्टच्या क्षेत्रात राहणारे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश यांच्या जवळच्याच राजस्थान या भागातही उपरोल्लेखित प्रकारचे खडक आढळतात.

प्राणी, वृक्ष आणि माती व खडक यांच्या निरीक्षणातून पाणी शोधायचे!त्यांचे वर्गीकरण वराहमिहीर करतात. ती निरीक्षणे खोदलेल्या, उथळ विहीरींबद्दलची आहेत. अर्ध पुरूष म्हणजे एक मीटर ते द्वादश पुरूष म्हणजे चोवीस मीटर एवढ्या खोलापर्यंतची. त्याखालील पाण्याचेही उल्लेख आहेत पण ते तुरळकच. त्यांनी गोड पाणी, मधुर पाणी, तुरट पाणी, क्षारयुक्त पाणी, खारट पाणी असे पाण्याचे वर्गीकरण केले आहे. त्यांनी उपलब्ध पाणी तीन गटांत विभागलेले आहे. 1. भूगर्भाच्या आतून वाहणारे पाणी, 2. ठरावीक प्रकारची रचना असलेल्या भूगर्भात आढळणारे स्थिर पाणी आणि 3. वरील दोन्ही प्रकारांत न मोडणारे भूगर्भातील पाणी. त्यांनी पाण्याचा आढळ वेगवेगळ्या निरीक्षणांमधून करून अडतीस श्लोकांमध्ये मांडून ठेवला आहे.

वराहमिहीर पुढील निरीक्षणे नोंदवून ठेवतात –

1. भरपूर फांद्या व तेलकट साल असलेले ठेंगणे झाड असेल तर तेथे पाणी आढळते.

2. उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर त्या पृष्ठभागाजवळ पाणी असते.

3. झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकली असेल तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.

4. काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील तर पाणी तेथे हमखास मिळते.

5. जमीन जेव्हा गरम झालेली असते आणि ती तेव्हा एखाद्याच ठिकाणी थंड लागली तर तेथे पाणी असते.

6. जमीन उन्हाने तापून गर्दभवर्णाची झाली असेल तर तेथे खडकाच्या खाली पाणी आढळते.

7. जेथे झाडे विरळ असतात तेथे पाणी खूप खोल आढळते.

8. जमीन/खडक तेलकट अथवा मेणचट असेल तर तेथे स्थिर पाणी आढळते.

वराहमिहिराच्या अभ्यासाचा पडताळा प्रत्यक्ष पाहवा म्हणून आंध्रप्रदेशातील तिरूपती विद्यापीठाने विसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी प्रत्यक्ष विहिरी खोदून पाहण्याचे ठरवले. वराहमिहिराच्या निरीक्षणानुसार योग्य ठरतील अशा जागा निवडल्या. सुमारे तीनशे विहिरी खोदल्या. त्यात त्याचे निरीक्षण पंच्याण्णव टक्क्यांपेक्षाही जास्त ठिकाणी योग्य असल्याचे आढळून आले.

(जलोपासना दिवाळी 2017 अंकावरून उद्धृत, संपादित -संस्कारित)

मुकुंद धाराशिवकर (धाराशिवकर हयात नाहीत)

मीरा धाराशिवकर 9420 377 694 gandhar.dharashivkar@gmail.com

मुकुंद धाराशिवकर हे सिव्हिल इंजिनीयर होते. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात सल्लागार म्हणून अडतीस वर्षे व्यवसाय करुन साठाव्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांचे कादंबरी, कथा, नाटक, कविता, व्यक्तिचित्रण अशा ललित विषयांसह पाणी व स्थापत्यशास्त्रासंबंधी अनेक लेख प्रकाशित झाले. तसेच त्यांची एकवीस पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ते भारतीय जलसंस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या प्रयत्नांतून समर्थ धुळे जिल्हा 2020’, वेध उद्याच्या विकासाचा’ आणि ‘प्रगतीच्या पाऊलवाटा’ अशा महत्त्वपूर्ण खंडाची निर्मिती झाली.

——————————–——————————————–——————

About Post Author

Previous articleगणपत लक्ष्मण कोण होते? (Ganpat Laxman’s Writing Published After One Hundred Fifty Years!)
Next articleब्रिटिश मिशनरी आणि मराठी म्हणी (British Missionaries and Marathi Proverbs)
मुकुंद धाराशिवकर हे सिव्हिल इंजिनीयर होते. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात सल्लागार म्हणून अडतीस वर्षे व्यवसाय करुन साठाव्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांचे कादंबरी, कथा, नाटक, कविता, व्यक्तिचित्रण अशा ललित विषयांसह पाणी व स्थापत्यशास्त्रासंबंधी अनेक लेख प्रकाशित झाले. तसेच त्यांची एकवीस पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ते भारतीय जलसंस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या प्रयत्नांतून ‘समर्थ धुळे जिल्हा 2020’, ‘वेध उद्याच्या विकासाचा’ आणि ‘प्रगतीच्या पाऊलवाटा’ अशा महत्त्वपूर्ण खंडाची निर्मिती झाली.धाराशिवकर हयात नाहीत.मीरा धाराशिवकर 9420 377 694

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here