वडांगळीची सतीदेवीची यात्रा

2
72
carasole

‘सतीदेवी सामतदादा’ हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत! ते देवस्थान नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात आहे. तेथे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या सतीदेवीच्या यात्रेमुळे वडांगळी गावची ओळख महाराष्ट्रभर सर्वदूर पसरली आहे. त्या यात्रेत हजारोंच्या संख्येने दिले जाणारे बोकडबळी आणि त्या विरोधात होणारी आंदोलने यामुळे ती यात्रा दरवर्षी गाजते.

वडांगळी हे गाव सिन्नरपासून पूर्वेकडे बावीस किलोमीटर अंतरावर देवनदीच्या काठावर वसलेले आहे. बाजारपेठेचे गाव असलेल्या, वडांगळीची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास आहे. तेथे पंचक्रोशीतील आठ-दहा गावांची बाजारपेठ भरभराटीला आली आहे. गावाच्या पश्चिमेला सायखेडा रस्त्यालगत सतीदेवी-सामंतदादाचे देखणे मंदिर लक्ष वेधून घेते.

त्या देवस्थानाच्या निर्मितीमागे दंतकथा प्रचलित आहे. सामतदादा हा बंजारा तांड्याचा नायक. त्याच्या मृत्यूनंतर त्याची ब्राह्मण पत्नी लिंबू झेलत तांड्यासोबत निघाली. ज्या ठिकाणी लिंबू जमिनीवर पडेल तेथे सती जाण्याचा तिचा निश्चय होता. तो लिंबू वडांगळी गावाजवळ पडला. त्या ठिकाणी सामतदादासोबत त्यांच्या दोन्ही पत्नी सती गेल्या. तेथे सामंतदादा आणि सतीदेवीची मंदिरे उभारण्यात आली. सतीदेवी मंदिरापुढे दहा फूट अंतरावर सामंतदादाचे छोटेखानी मंदिर आहे. मंदिरात पारंपरिक बंजारा वेशभूषेतील अश्वारूढ मूर्ती आहे. सामतदादा नावाचा गाडीवान सतीदेवी भक्त होता. त्याने सतीदेवीबरोबरच स्वत:ची पत्नी जसमा हिच्यासह वडांगळीत प्राणत्याग केल्याची आणखी एक आख्यायिका प्रचलित आहे.

वडांगळीत १९७० सालापर्यंत केवळ सतीदेवी व सामतदादा यांची दगडी साळुंका असलेली दोन छोटी देवळे होती. गोवर्धन राठोड नावाच्या बंजारा भाविकाने देवीला नवस केला आणि त्याला अपत्यप्राप्ती झाली. त्याने पुत्रप्राप्तीच्या आनंदात मंदिराचा जीर्णोद्धार केला. वडांगळीत सतीदेवी व सामतदादा अशी दोन छोटेखानी सुबक मंदिरे उभी राहिली.

सतीदेवीच्या मंदिरात दगडी चिऱ्यासोबतच सतीदेवीच्या दोन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सामतदादाच्या दोन पत्नींपैकी एक ब्राह्मण तर दुसरी बंजारा जमातीची होती. त्यामुळे त्या मंदिरातील एक मूर्ती ब्राह्मण स्त्रीच्या पारंपरिक वेशात तर दुसरी मूर्ती बंजारा जमातीच्या पेहरावात आहे.

वडांगळीतील प्रभाकर सूर्यकांत म्हाळणकर व शंकरराव सूर्यकांत म्हाळणकर या बंधूंनी सतीदेवीची कथा ओवीबद्ध करून पुस्तक स्वरूपात भाविकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. नवनाथ पोथीतील भर्तृहरी नाथाच्या कथेशी सांगड घालत त्या कथेचे उपकथानक स्वरूपात सतीदेवीची कथा पुढे फुलवत नेली आहे. सतीदेवी संबंधातील लेखी माहिती सर्वप्रथम त्या पुस्तकात प्रकाशित झाली.

मंदिर परिसरात कोरीवकाम असलेले दोन दगडी चिरे आहेत. त्यांचा संदर्भ उपलब्ध नाही. सतीदेवी मंदिरामागे सैंदर नावाचा, त्या भागात सहसा न आढळणारा वृक्ष आहे. सतीदेवीचे मंदिर त्या वृक्षाच्या छायेत उभे आहे. वडांगळी गावात किंवा सिन्नर तालुक्यात बंजारा समाजाची वस्ती नाही. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतून बंजारा भाविक वडांगळी गावात दर्शनासाठी येत असतात. पूर्वी माघ पौर्णिमा व चैत्र पौर्णिमा अशी वर्षातून दोन वेळा देवीची यात्रा भरत असे. यात्रा काळात बंजारा समाजाचे बहुसंख्य तांडे ऊस तोडणीसाठी फिरतीवर असत. ते यात्रेसाठी बैलगाड्या जुंपून वडांगळीत दाखल होत. गावात बंजारा भाविकांना लमाण, चारण या नावांनीही संबोधले जाते.

‘सतीयाडी न् सामंतदादा  लो ऽ लो ऽ ऽ लो ऽ ऽ ऽ’ अशी गाणी म्हणत तांड्या तांड्यांनी यात्रेकरूंचे गावात आगमन होत असते. बंजारा समाजाचे भाविक डफ, काशाची थाळी वाजवत देवीची बंजारा भाषेतील गाणी गात, निशाणकाठी मिरवत डेरेदाखल होतात. यात्रेकरू गावात आल्यानंतर सर्वप्रथम सतीदेवीचे दर्शन घेतात. देवीला गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. सतीदेवी नवसाला पावते अशी बंजारा भाविकांची धारणा आहे. नवसपूर्तीसाठी सामतदादाला बोकडबळी देण्‍याची प्रथा आहे.. बळी दिल्‍या जणा-या बोकडाला आधी सामतदादाच्‍या मंदिरात नेले जाते. तेथून बळीसाठी त्‍याचा होकार मिळवला जातो. बक-याने मान हलवणे याला बक-याचा होकार समजतात. त्‍याने मान हलवली नाही तर त्‍यावर पाणी शिंपडून त्‍याला मान हलवण्‍यास भाग पाडले जाते. बोकडबळीला ‘खारा’ नैवेद्य असे म्हणतात. सोबत ‘मद्या’चाही नैवेद्य दाखवला जातो. ऊसतोडणी कामगार असलेल्या अनेक बंजारा भाविकांची वर्षाची पूर्ण कमाई यात्रा काळात प्रवास व बोकडबळीच्या नवसपूर्तीवर खर्च होते. अनेकजण पै-पाहुणे घेऊन स्वतंत्र वाहनाने यात्रास्थळी येतात. ज्यांची आर्थिक कुवत नसते असे चार-पाचजणांचे कुटुंबही बोकडबळी देते. बोकडाच्या मांसाला देवाचा प्रसाद म्हणून मान्यता असल्याने ते फेकून देणे पाप समजले जाते. ज्या कुटुंबाला संपूर्ण बोकड खाणे शक्य होत नाही, ते बोकडाचे मांस खारवून सोबत घेऊन जातात.

सतीदेवी यात्रेत बोकडबळी व मद्याचा नैवेद्य देण्याच्या अनिष्ट प्रथांबरोबरच इतरही काही प्रथा पाळल्या जातात. अनेक बंजारा भाविक यात्रा काळात स्वत:च्या मुलांचे जावळ काढून देवीला मुलांच्या डोक्यावरचे केस अर्पण करतात. त्या प्रथेसाठी गावातील नाभिक समाजातील घरांनी सामंजस्याने प्रत्येक वर्षाच्या पाळ्या वाटून घेतल्या आहेत. गाव व परिसरातील ग्रामस्थ देवीला नवस म्हणून सत्यनारायणाची पूजा घालण्याचे कबूल करतात. त्यानुसार नवसफेडीसाठी यात्रा काळात मंदिर परिसरात सत्यनारायणाची पूजा केली जाते. काही भाविक महिला-पुरुष नवसपूर्तीसाठी गावाच्या वेशीपासून दंडवत किंवा लोटांगण घालत देवीच्या चरणाशी लीन होतात. यात्रेत सौभाग्यलेण्याची प्रथा आढळते. सतीदेवी यात्रेतून विविध बंजारा आभूषणे, उदाहरणार्थ, बांगड्या, चांदीचे गोठ, पाटल्या, चांदीचे झुमके, पायातील पैंजण वगैरे खरेदी करून ती परिधान केल्यास सौभाग्य लाभते अशी समजूत आहे. त्यामुळे अनेक बंजारा महिला यात्रेतून दागिने खरेदी करतात. त्या काळात गावातील सोनाराकडे देवीचे टाक बनवण्यासाठी गर्दी होते. यात्रा काळात देवीला नवीन निशाण (झेंडा) वाहण्याची प्रथा बंजारा भाविकांत आहे. भाविक घरून येताना जुने निशाण घेऊन येतात. यात्रेतून दोन नवीन निशाणे विकत घेऊन जुने निशाण विसर्जित करतात. दोन निशाणांपैकी एक निशाण देवीला वाहून दुसरे घरी घेऊन जातात.

बंजारा समाजाने महाराष्ट्राला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री दिले आहेत. तरीही या समाजात शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक मागासलेपण आहे. विविध रुढी-परंपरा व अंधश्रद्धा यांचा पगडा आहे. त्यामुळे त्यांच्यात बोकडबळी, व्यसनाधीन होण्यासारख्या अनिष्ट प्रथा पूर्वापार काळापासून रूजल्या आहेत. हा समाज ऐपत नसतानाही बोकडबळीची प्रथा पाळताना दिसतो. त्यामुळे त्या समाजात कर्जबाजारी होण्याचे प्रमाण जास्त आहे. आजही तो समाज परंपरा व रूढी यांच्या दुष्टचक्रात अडकला आहे. यात्रा काळात वडांगळी गावात ‘बंजारा दल’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या तालुका व जिल्हा शाखा यांच्यातर्फे तसेच काही शाळांचे विद्यार्थी भाविकांचे अंधश्रद्धा विरोधी जनप्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात. अंधश्रद्धेचा निषेध करण्यासाठी लाक्षणिक उपोषण, पत्रके वाटप, प्रचार फेरी, पथनाट्ये असे मार्ग वापरले जातात. पूर्वी यात्रेत बोकडबळी उघड्यावर दिले जात असत. तो प्रकार आता बंद झाला असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार बंदिस्त ‘स्लॉटर हाऊस’मध्ये बोकड कापले जातात.

कापलेल्या बोकडांच्या कातडीला बाजारात चांगला भाव असतो. ते कातडे खरेदी करण्यासाठी लिलाव केला जातो. त्यांची किंमत लाखांच्या पुढे जाते. स्थानिक खाटिकांमध्ये लिलावाची बोली लावण्याची स्पर्धा असते. तो लिलाव म्हणजे वर्षभर देवीसाठी कापल्या जाणाऱ्या बोकडांच्या कातड्यांची खरेदी करण्याचा मक्ता असतो. यात्रेकरूंना योग्य ते पैसे देऊनच कातडे खरेदी करावे लागते. कातडे विक्रीचा निर्णय यात्रेकरूंचा असतो. केवळ चामडे खरेदीचा मक्ता लाखभर रुपयांच्या पुढे जातो. लिलावातून आलेली रक्कम अथवा लिलाव करण्याचा अधिकार पूर्वापार गावकीकडे (गावची गावठी ट्रस्ट) आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून गावातील मंदिरांची देखभाल, यात्रेतील कुस्त्या, टांग्यांच्या शर्यती यांचा खर्च भागवला जातो.

सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी सहपरिवार सतीदेवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री निधीतून दोन लाख रुपयांचा निधी सतीदेवी देवस्थानाच्या विकासासाठी दिला होता. अशोक चव्हाण या कल्पक बंजारा तरुणाने १९८३ मध्ये देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर मंदिर व परिसराच्या विकासाची घोडदौड वेगाने सुरू झाली. त्याने शासन दरबारी सतत पाठपुरावा करून, अनेक उच्चपदस्थ बंजारा भाविकांकडून, आर्थिक पाठबळ मिळवत मंदिर परिसर विकसित केला. पूर्वी केवळ तीन-चार गुंठे जागेवर असलेला तो मंदिर परिसर दहा एकरहून अधिक जागेवर विस्तारला गेला. मंदिर परिसरात भाविकांसाठी ‘भक्तनिवास’, बोकडबळीसाठी ‘स्लॉटर हाऊस’, सभामंडप, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून एका वेळी दहा हजार लोक जमू शकतील असे भव्य सभागृह त्या ठिकाणी उभारण्यात आले आहे.

एका वृत्तपत्राने १९९३ साली सतीदेवी देवस्थानाच्या बोकडबळी प्रथेसंदर्भात बातमी छापली. त्यानंतर माध्यम जगताचे लक्ष त्या यात्रेकडे, तेथील नवसाच्या नावावर होणाऱ्या पशूहत्येकडे वेधले गेले. दरवर्षी यात्रा काळात त्या विषयावर होणाऱ्या आंदोलनांमुळे; तसेच, दूरचित्रवाणी व वृत्तपत्रांतील प्रसिद्धीमुळे यात्रेचे स्वरूप गेल्या पंचवीस वर्षांत कमालीचे व्यापक होत गेले आहे. पूर्वी केवळ काही हजारोंच्या संख्येने येणारे बंजारा भाविक आता लाखोंच्या संख्येने वडांगळीत येतात. चार-पाच हजार लोकसंख्येच्या गावावर, तेथील ग्रामपंचायतीवर यात्रेच्या नियोजनाचा प्रचंड ताण येतो. यात्रा काळात दोन-तीन दिवसांत हजारो वाहनांनी लाखो भाविक गावात येतात. दोन हजारांहून अधिक बोकडांचा बळी दिला जातो. दारूची विक्रमी विक्री होते. यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्रा काळात परिसरातून वाहणाऱ्या कडवा कालव्याच्या चारीला पाणी पाणी सोडले जाते. त्यामुळे यात्रेकरूंची पाण्याची मोठी गरज भागते. तांड्या तांड्यांवर राहणाऱ्य़ा बंजारा समाजाला प्रतिकुलतेशी झगडण्याचे बाळकडू मिळत असते. त्यामुळे तो समाज यात्रा काळात राहणे, स्नान, प्रातर्विधी आदी अनेक समस्यांची गैरसोय सहन करत मोठ्या संख्येने यात्रेसाठी हजेरी लावतो.

सतीदेवी हे वडांगळी ग्रामस्थांचेही ग्रामदैवत आहे. पूर्वी तेथील शंकर गुरव देवीची पूजाअर्चा करत असत. सध्या त्यांचे वंशज ती जबाबदारी पार पाडतात. देवस्थान ट्रस्टने बंजारा समाजाचे हरीभाऊ राठोड यांची मंदिराच्या देखभालीसाठी व्यवस्था लावली. त्यांचे कुटुंब गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून वडांगळीत स्थायिक झाले आहे. गावात बंजारा समाजाचे ते एकमेव कुटुंब. हरीभाऊंच्या निधनानंतर त्यांची मुले मंदिराची व्यवस्था पाहतात.

सतीदेवीचा यात्रोत्सव हा वडांगळीच्या ग्रामस्थांचा मानबिंदू! गावकरी तो उत्सव दिवाळीसारखा साजरा करतात. गाव तसेच पंचक्रोशीतील कोणीही देवीला बोकडबळी देत नाहीत. गावकरी ‘पुरणाच्या पोळी’चा गोड नैवेद्य देवीला अर्पण करतात. यात्रेच्या निमित्ताने गणगोत, माहेरवाशिणी, पै-पाहुणे, नोकरीनिमित्त बाहेर असलेले चाकरमानी गावाकडे परतात. यात्रेत सामील होतात. यात्रेचा आनंद लुटतात.

वडांगळी गावी यात्रा काळात मोठी उलाढाल होते. बोकडविक्री, दारूविक्री, खाद्यपदार्थ, मिठाई, प्रसाद, नारळ, फुलहार, खेळणी, भांडी, बंजारा पेहराव, बंजारा दागिने-आभुषणे यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली जातात. ती एकूण उलाढाल कोट्यवधी रुपयांची असते. यात्रेच्या दिवशी देवस्थानाच्यावतीने पहाटे देवीची महापूजा करण्यात येते. स्थानिक आमदार, खासदार पुढाऱ्यांना पुजेचा मान देण्यात येतो. सायंकाळी गावातून निशाणकाठीची मिरवणूक निघते. डफांच्या तालावर पन्नास-साठ फूट उंचीची निशाणकाठी गावातून मिरवली जाते. त्यावेळी गणपतबाबा भगत यांच्या अंगात देवीचे वारे संचारते. निशाणकाठीची मिरवणूक देवी मंदिराशी येऊन विसावते. तेथे देवीच्या (वारे) हवेत प्रश्न पाहिले जातात. त्यावेळी देवीचा कौल घेऊन पाऊसपाणी, दुष्काळ, रोगराई यासंबंधीचे भाकीत केले जाते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा फड रंगतो. करमणुकीसाठी लोकनाट्य, तमाशा असतो. तीन दिवस सुरू असलेल्या यात्रेची उत्साहात सांगता होते.

– किरण भावसार

About Post Author

2 COMMENTS

  1. खूप छान आहे.बंजारा संस्कृती…
    खूप छान आहे.बंजारा संस्कृती आणि परंपरा यांचा समावेश आहे.जतन करून ठेवली आहेत.त्याबद्द आभार व ॠणी आहे.

  2. छान माहिती अजून असेल तर…
    छान माहिती अजून असेल तर share करा

Comments are closed.