लाला लजपतराय आणि निग्रो – एक अज्ञात पैलू (Lala Lajpat Rai on Racism in America)

1
50

स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांच्याबद्दल माहीत नसलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांपैकी एक म्हणजे त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात कराव्या लागणाऱ्या संभाव्य कामाचा केलेला विचार. लालाजी इंग्लंडला 1914 साली गेले आणि तेथून अमेरिकेला. ते तेथे जवळ जवळ पाच वर्षे राहिले आणि 1920मध्ये हिंदुस्तानात परतले. त्याआधीही, ते अमेरिकेला एका धावत्या भेटीवर गेले होते. त्यांनी या दुसऱ्या वेळी मात्र संपूर्ण अमेरिका पालथी घातली. त्यांनी तेथे जे काही पाहिले त्यावर सुमारे वर्षभराच्या आत – मार्च 1916 मध्ये – एक पुस्तकही लिहिले. United States of America – A Hindu’s Impressions and Study. ते त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात – नैसर्गिक व मानवनिर्मित सौंदर्याचे वर्णन करणे हा या पुस्तकाचा हेतू नाही. त्या देशाच्या काही प्रश्नांचा मी केलेला अभ्यास यात मांडला आहे. मी अभ्यासासाठी जे विषय निवडले ते भारत देशाच्या उपयोगी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडले आहेत. कारण दोन्ही देशांचे प्रश्न बऱ्याच बाबतींत सारख्या स्वरूपाचे आहेत.

          लालाजींनी पुस्तकात भर दिला आहे तो शिक्षणाच्या प्रश्नावर. त्यांनी संयुक्त संस्थानांचा (युनायडेट स्टेट्स) इतिहास पहिल्या प्रकरणात थोडक्यात दिला आहे. त्यात त्यांनी उत्तरेकडील राज्ये व दक्षिणेकडील राज्ये यांच्या अर्थव्यवस्थेतील फरक, उत्तरेकडील राज्यांतील उद्योगपतींचा तेथील सरकारवरील प्रभाव, दक्षिणेकडील राज्यांवर व्यापाराच्या क्षेत्रात विविध प्रकारचे कर लादून उत्तरेने स्वतःची आर्थिक स्थिती कशी मजबूत केली वगैरे गोष्टी थोडक्यात मांडल्या आहेत. उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांतील संघर्ष 1840च्या सुमारास स्पष्ट होऊ लागला. तो मुख्यतः दोन बाबतींत होता – गुलामगिरी चालू ठेवणे आणि व्यापारावर कर. औद्योगिक उत्पादने नसलेल्या दक्षिणेकडील राज्यांना कर देणे भाग पडले आणि तेही कशासाठी तर उत्तरेतील उद्योगधंद्यांना मदत व्हावी म्हणून” (पृ 21). हे तपशील वाचले की ब्रिटिशांची हिंदुस्तानची आर्थिक लूट करण्याची नीती साहजिकच आठवते. अमेरिकन जरी स्वतःला ब्रिटिशांपासून वेगळे मानत असले तरी, विशेषत: त्या काळी त्यांचे मूळ युरोपीय आणि त्यातूनही ब्रिटिश लोकांच्यातच आहे हे सर्वाना माहीत आहे. आणखी एका विरोधाभासाचे नवल वाटते. आज मुक्त व्यापार हवा म्हणून आग्रह धरणाऱ्या अमेरिकेने आर्थिक सामर्थ्यात सर्वोच्च स्थान कमावले ते दक्षिणेकडील राज्यांवर व्यापारी निर्बंध घालूनच! त्यांनी त्याचबरोबर अब्राहम लिंकन यांचे गुलामगिरीबाबतचे प्रसिद्ध (!) वचनही दिले आहे – एकाही गुलामास मुक्त न करता संघराज्य मला एकत्र राखता आले तर मी तसे करीन, संघराज्य एकत्र राखण्यासाठी सर्व गुलामांना मुक्त करणे भाग असेल तर मी तसे करेन

त्या नंतरची तीन प्रकरणे शिक्षणविषयक प्रश्नांवर आहेत. अमेरिकेतीलशिक्षणव्यवस्था यावरील दोन प्रकरणांतील पहिल्यामध्ये त्यांनी तत्कालीन अमेरिकेत शिक्षण व्यवस्था कशी आहे, तेथील सरकार प्राथमिक शिक्षणाला किती महत्त्व देते, त्यावर किती पैसे खर्च करते, शिक्षणाव्यतिरिक्त बालके आणि त्यांच्या माता यांची काळजी कशी घेतली जाते याचे तपशील दिले आहेत. ते प्रकरणाच्या सुरुवातीला म्हणतात की कोणत्याही देशाच्या संस्कृतीची प्राथमिक कसोटी, तो देश मुले आणि त्यांच्या माता यांची काळजी किती घेतो आणि शिक्षणाबाबत कृती काय करतो यावर असते. आजकाल जी आधुनिक राष्ट्रे म्हटली जातात ती सर्व – निदान बहुतेक सर्व – मुले या संपत्तीचे महत्त्व ओळखतात. त्यामुळे त्या सर्वानी त्यासाठी सविस्तर कायदे केले आहेत. —– ही कल्पना नवी मात्र नाही. सर्व जुन्या संस्कृतींत तसेच म्हटले आहे. हिंदूंच्या स्मृतींतही मुलांच्या कल्याणाला बरेच महत्त्व दिले गेले आहे.” (पृ 34)

          पुढे ते सांगतात, की अमेरिकेच्या शाळांतील सोयी युरोपमधील शाळांपेक्षा अधिक चांगल्या आहेत. तेथे परदेशांतून येणाऱ्या माणसांचा ओघ मोठा आहे, त्यामुळे विविध भाषा बोलणारी मुले एकाच शाळेत असतात. बोस्टनमधील एका शाळेत पंचवीस भाषा बोलणारी मुले आहेत. अशी विविध परंपरांतील मुले ही एक समस्या ठरू शकते. माझ्या मनावर सर्वात मोठा प्रभाव पडला तो सरकार त्या बाबतीत घेत असलेल्या पुढाकाराचा आणि आर्थिक जबादारी उचलण्याचा पूर्ण प्रयत्न करते याचा.त्यांनी त्या बाबतीत जे तपशील दिले आहेत ते वाचले, की साहजिकच आठवण होते ती रशियन राज्यक्रांतीनंतर त्यांना त्यांच्या देशात अशाच प्रकारची व्यवस्था आणायची होती आणि ती अमेरिकेसारख्या भांडवलशाहीराष्ट्रांत अगोदरच आली  होती. त्यांनी अनेक तपशील देताना काही मनोरंजक निरीक्षणे नोंदली आहेत –

        ”आठवीपर्यंतच्या शाळांतील 5.61 लाख शिक्षकांतील ऐंशी टक्के शिक्षक महिला आहेत. हार्वर्ड विद्यापीठातील एका प्राध्यापकाने याबाबत टिप्पणी केली, की महिला शिक्षकांच्या प्राबल्यामुळे, संस्कार घडण्याच्या वयात मुलग्यांचा संबंध सातत्याने महिलांशी आला तर त्यांचा पुरुषीपणालोपून ते मुलींसारखे नरम धरमहोतील.मला असे वाटत नाही. मला त्या देशाच्या महिलांत कणखरपणा आणि चैतन्य वाढताना दिसत आहे.” (पृ 51)

          ”मुले आणि मुली एकाच ठिकाणी शिकत असली तरी त्यामुळे त्यांच्या वर्तनात कोणत्याही प्रकारचे शैथिल्य येत नाही असे मला अनेकांनी सांगितले आहे. ग्रेट ब्रिटन किंवा जर्मनी यांच्यापेक्षा अमेरिकेतील स्त्रीपुरुषांमधील लैंगिक संबंध अधिक अनिर्बंध आहेत असे मुळीच म्हणता येणार नाही.” (पृ 52)

          मात्र ते अमेरिकेतील शिक्षणव्यवस्थेवरील दुसऱ्या प्रकरणाच्या अखेरीस म्हणतात, ”सरकार प्रत्येक मुलाच्या शिक्षणाला खूप महत्त्व देते व मुलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवते. असे असले तरी अमेरिका म्हणजे भूलोकीवरील स्वर्ग आहे, तेथे पापाचरण होत नाही, तेथे अनैतिकता नाही असे म्हणता येणार नाही. मात्र एवढे निश्चित, की परिस्थिती आहे त्यापेक्षा खूप वाईट असणे अधिक स्वाभाविक होते. तसे सुदैवाने घडून आलेले नाही.” (पृ 63)

          त्यांनी अमेरिकेतील निग्रो लोकांच्या शिक्षणाची परिस्थिती त्यावेळी काय होती याचे वर्णन आणि विवेचन केले आहे. प्रकरणाच्या प्रारंभीच ते म्हणतात, ”संयुक्त संस्थानाची निग्रो समस्या आणि आपल्याकडील दलित वर्गीयांची समस्या यांत काही साम्य आहे. संयुक्त संस्थानातील सामाजिक समस्यांची स्थिती एका टप्प्यावर हिंदुस्थानातील सामाजिक समस्यांसारखीच आहे. गुलामगिरी रद्द होण्यापूर्वी निग्रो (बहुतेक सर्व गुलाम होते) लोकांना शिकू द्यायचे नाही असा दक्षिणेतील राज्यांचा पणहोता. अलाबामा राज्यात गुलामांना शिकवणाऱ्याला अडीचशे ते पाचशे डॉलर्स इतका दंड करण्याची तरतूद कायद्यात होती. जॉर्जियात शिक्षण घेणाऱ्या गुलामाला दंड आणि फटके अशी शिक्षा मिळत असे, तर शिकवणारा गौरकाय असला तर त्याला दंड आणि कैद अशी तरतूद होती. (पृ 82) (मात्र लालाजी हेही सांगतात, की त्या कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे होतेच असे नाही.) त्यांनी फ्रेडरिक डग्लस यांच्या आत्मचरित्रातील एक उतारा दिला आहे. डग्लस यांनी त्या उताऱ्यात ते लिहिण्यास-वाचण्यास कसे शिकले त्याचे वर्णन केले आहे. निग्रोंची बौद्धिक पातळी गुलामगिरीत रद्द झाली तेव्हा सरासरी शून्य एवढी होती. नंतर उत्तरेकडील राज्यांत पारिस्थिती खूप बदलली; परंतु दक्षिणेकडे ती बराच काळ पूर्वीसारखीच होती. पूर्वाश्रमीच्या गुलाम मुलांना गोऱ्या मुलांच्या महाविद्यालयात 1915-16 मध्येही प्रवेश नव्हता; गोऱ्या मुलांना काळ्यांबरोबर मिसळण्यास मनाई होती. निग्रोंच्या शिक्षणाबाबत पुष्कळ प्रगती गुलामगिरी रद्द झाल्यानंतरच्या पन्नास वर्षात एकंदरीने आणि उत्तरेकडील राज्यांत अधिक झाली. त्याच वेळी लालाजी सांगतात, कीअनेक मर्यादा असल्या तरी हिंदुस्थानातील दलितांपेक्षा अमेरिकेतील निग्रोंना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध आहेत, हे निश्चित.” (पृ 89)

          लालाजी त्यावेळी अमेरिकेत जोरात चालू असलेल्या एका मोठ्या वादाचा उल्लेख करतात. दक्षिणेकडील राज्यांची भूमिका अशी होती, की निग्रोना व्यवसायाचे शिक्षण देण्यात यावे, उच्च शिक्षण देऊ नये. निग्रोंना सुतार, गवंडी, वाहनचालक आणि तत्सम श्रमांची व प्रतिष्ठित लोक ज्या व्यवसायांना कमी प्रतीचे समजतात त्या व्यवसायांचेच शिक्षण द्यावे.दक्षिणेतील लोकांना तशी भूमिका घेण्यामागे भीती अशी वाटत होती, की निग्रो शिकले तर ते त्यांच्याकडे हक्क मागतील, त्यांच्या स्थानावर येऊ बघतील. लालाजी असेही सांगतात, की हिंदुस्तानात अशीच परिस्थिती आहे. हिंदुस्तानात साम्राज्यवाद्यांनी आणि त्यांची री ओढणाऱ्यांनी एतद्देशीयांना उच्च शिक्षण देण्यास असाच विरोध केला आहे. अर्थात परिस्थिती सर्व बाबतींत सारखी नाही. निग्रो अमेरिकेत बाहेरून आले, आता त्यांना त्यांची स्वतःची भाषा, स्वतःचा देश उरलेला नाही. निग्रोंची भाषा त्यांच्या मालकाने दिलेली भाषा हीच आता आहे. त्यांच्या साथीदारांनी पायाखाली दबलेल्या अवस्थेतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, वर उठण्याचा प्रयत्न केला तर त्याचे शेजारी त्याला तसे करू देत नाहीत. अमेरिकेत निग्रोंचा लढा त्याच देशातील दुसऱ्या वंशाच्या लोकांशी आहे. हिंदुस्तानात उद्योगात गुंतलेल्यांचा लढा परकियांशी आहे. हिंदुस्तानातील औद्योगिक विश्वातील लोकांचे जीवन बाहेरून आलेल्या आर्थिक दबावामुळे उद्ध्वस्त झाले आहे, त्यांची अवस्था अकुशल कामगारांसारखी झाली आहे. (पृ 105)

          औद्योगिक शिक्षणालाच निग्रोंच्या बाबतीत महत्त्व देऊ नये; त्यांना उच्च शिक्षण, जी उच्चवर्गीयाची मक्तेदारी आहे, ते मिळालेच पाहिजे या भूमिकेशी लालाजी पूर्णपणे सहमत नाहीत. किंबहुना त्यांची भूमिका औद्योगिक/व्यावसायिक शिक्षण दिले पाहिजे अशीच होती. त्यानी ती स्पष्ट मांडली नाही, परंतु त्याच भूमिकेतून बहुदा त्यांनी टस्कगी येथील बुकर टी वॉशिंग्टन यांच्या शाळेला भेट दिली. या प्रकरणाच्या सुरुवातीला त्यांनी वॉशिंग्टन यांचे छायाचित्र दिले आहे. त्याशिवाय टस्कगी शाळेतील मेजर रॅम्से आणि प्रा कार्व्हर (संशोधन विभाग प्रमुख, टस्कगी) यांचीही छायाचित्रे दिली आहेत. टस्कगी शाळेने लालाजींच्या मनावर आणि विचारांवर प्रभाव किती टाकला होता ह्याचे द्योतक म्हणून ती छायाचित्रे सांगता येतील. टस्कगी शाळा स्थापन झाल्यापासून पुढील तीस-पस्तीस वर्षांत शाळेने प्रगती कोणत्या क्षेत्रांत केली, विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढली, किती नव्या इमारती विद्यार्थ्यांच्या श्रमातून आणि योजकतेतून उभ्या राहिल्या इत्यादींचे सविस्तर तपशील त्या प्रकरणात येतात. ते तपशील देताना लालाजींचा सूर कौतुकाचा आहे. विद्यार्थी किती शिस्तीने राहतात याबद्दल ते म्हणतात, ”शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थी लष्करी जीवनासारखे शिस्तबद्ध जीवन जगत आले आहेत. देशातील सर्वात मोठे जेवणघर असा तेथील जेवणघराचा लौकिक आहे. तेथे येताना सतराशे विद्यार्थी ज्या शिस्तीने प्रवेश करतात ते दृश्य एकदा पाहिल्यावर विसरता येणार नाही. सारेजण जेवणापूर्वीची प्रार्थना संपेपर्यंत निःशब्द उभे असतात. जेवणाच्या टेबलावर पाळण्याची आचारपद्धत हा टस्कगीमध्ये जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शाळेचा असा नियम आहे, की पानात वाढलेले पदार्थ चवीबद्दल कोणतीही तक्रार न करता संपवलेच पाहिजेत.

          टस्कगीचे कर्णधार बुकर टी वॉशिंग्टन. लालाजींनी त्यांची कोणती कार्यतत्त्वे टस्कगीला तिचे गौरवास्पद रूप देण्यामागे होती हे त्यांच्याच शब्दांत दिले आहे. संस्कृतीचा पहिला धडा जर काही असेल, तर दरवाज्याची कडी जरी खिळखिळी झाली तरी खोलीत राहणाऱ्या माणसाने अस्वस्थ व्हायला हवे. — विजारीच्या सस्पेंडरपैकी एक लोंबता आहे अशा अवस्थेत गावभर भटकणारा माणूस हा खरा ख्रिस्ती असू शकतो यावर माझा विश्वास नाही. —- ज्या माणसाला वाटत असते की त्याला सर्वात चांगले असे शिक्षण मिळाले आहे आणि सर्वात चांगल्या संस्कृतीशी त्याची ओळख झाली आहे तो एक बटन उघडे किंवा एक सस्पेंडर लोंबता अशा अवस्थेत कधीच ठेवणार नाही. लालाजींनी हे विचार टस्कगीतील चर्चमध्ये एकदा रात्रीच्या उपदेश प्रार्थनेच्या (sermon) वेळी मांडले होते असे लालाजींनी नमूद केले आहे. पुढे, वॉशिंग्टन यांनी असेही आवाहन केले, ”जर तुम्हाला कधी कोणाला प्रभावित करता आले तर ज्या खोलीत शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र जमतात ते घर, ती खोली अत्यंत स्वच्छ, जमीन चकचकीत पुसलेली, सर्व फर्निचर व्यवस्थित डागडुजी केलेले आणि मांडलेले असेल याची काळजी तुम्ही घ्या.वॉशिंग्टन यांच्या त्या सूचनेचे मूळ ते जेव्हा हॅम्पटन येथील शाखेत शिकण्याच्या उद्देशाने गेले तेव्हा त्यांना वर्गशिक्षिकेने सांगितलेल्या कामात असावे (वाचा – Up From Slavery – वॉशिंग्टन यांचे आत्मवृत्त. मराठी अनुवाद  गुलामगिरीतून गौरवाकडे).

          लालाजी टस्कगीच्या भेटीच्या वृत्तांताच्या अखेरीस लिहितात – एकंदरीत ह्या भेटीने मला खूप आनंद झाला. त्यातून मी पुष्कळ काही शिकलो. मात्र त्या भेटीमुळे मुख्य काय साधले म्हणाल तर लाहोरचे डी ए व्ही कॉलेज आणि त्याचे पहिले प्राचार्य, कांगडी येथील गुरुकुल आणि त्याचे पहिले गव्हर्नर यांच्याबद्दलचा माझा आदर शतपटींनी वाढला. —- टस्कगी आणि ह्या दोन संस्था यांची कित्येक बाबतीत – देणग्या, खर्च, इमारती, मैदाने, विस्तार – तुलनाच होऊ शकत नाही. तरीही आर्य लोकांच्या या दोन संस्था; संकल्पना, उभारणी, विस्तार आणि व्यवस्थापन या साऱ्या गोष्टी केवळ हिंदूंनी केल्या आहेत; या एकाच कारणाने त्या टस्कगीच्या परीक्षा खूप उंचीवर जातात. हे मी म्हणतो तेव्हा मला वॉशिंग्टन यांना कमी लेखायचे नाही किंवा त्यांच्या कामात त्रुटी आहेत असेही म्हणायचे नाही. वॉशिंग्टन यांचे लोक ज्या परिस्थितीत आहेत, त्याकडे बघता वॉशिंग्टन यांचे कार्य आणि त्यांना मिळालेले यश अद्वितीय, प्रेरणादायी आणि महान आहे. त्यांना त्यांचा समाज हवे ते आर्थिक बळ देऊ शकला नाही, कारण त्या समाजाकडे ते नव्हतेच. तरीही, वॉशिंग्टन यांना निग्रोंचा द्वेष करणाऱ्या गोऱ्या लोकांकडून त्यांनी ते मिळवले ह्याचे श्रेय अखेरपर्यंत द्यावेच लागेल.

          तरीही डी ए व्ही कॉलेज आणि गुरुकुल याचे वैभव वेगळे आणि मोठे आहे, कारण त्यांना आध्यत्मिक पाया आहे. पन्नास रुपयांत साऱ्या कुटुंबाचा निर्वाह चालवणारे हंसराज आणि सर्व उत्पन्न संस्थेला धरून दूध व पाव खाऊन राहणारे मुन्शीराम ह्यांचा अभिमान वाटणे ही गोष्ट खरेच महत्त्वाची आहे.

          इतिहासातील व्यक्तींची अधिक चांगली ओळख करून घेण्यासाठी आणि त्यांच्या विचारधारेची खरी माहिती होण्यासाठी त्यांचे लिखाण वाचण्याला पर्याय नाही हेच खरे!

 

रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी ‘बँक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले‘, ‘क्‍लोज्ड सर्किट‘, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर‘ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे ‘महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

———————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. चांगला लेख,नवे विचार गवसले, वझे ,लेखनास शुभेच्छा… समता गंधे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here