लक्ष लक्ष काजवे… नभोमंडळातील तारकादळच जणू धरतीच्या भेटीला आले आहे! आपल्या चहुबाजूंला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात 'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरवणार्या काजव्यांचा चमचमाट लयबद्ध सुरू आहे… आपण नि:शब्द!
दरवर्षी मे महिन्याचा शेवटचा पंधरवडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा-घाटघर परिसरातील वृक्षराजीवर काजव्यांची मायावी दुनिया अवतरते. शिखरस्वामिनी कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या उडदावणे, पांजरे, मुरशेत, भंडारदरा, चिचोंडी, बारी, मुतखेल, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात; तसेच, रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवर काजव्यांचा बसेरा असतो. ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणांची का होईना 'वस्ती' असते, ती झाडे 'ख्रिसमस ट्री'सारखी सजून जातात. झाडांच्या खोडांवर, फांद्यांवर, पानांवर अगणित काजवे बसलेले असतात; तर अनेक झाडांभोवती पिंगा घालत असतात. त्यांचा चमचमाट सुरू असतो, त्याला लय असते, ताल असतो. काजवे त्यांच्या सुरात प्रकाशफुलांची उधळण करत जीवनगाणे गात असतात. काजव्यांची लुकलुकत होणारी उघडझाप डोळ्यांना सुखावून जाते. पाहणारे कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गाचे अनुपम वैभव भान हरपून पाहातच राहतात.
ग्रीष्म ऋतूला निरोप देताना वर्षाराणीच्या स्वागतासाठी निसर्गदेवताच जणू काजव्यांची ही लक्ष लक्ष प्रकाशफुले मुक्तहस्ते उधळत आहे! नभांगणातील तारांगण जणू भुईवर उतरल्याचा भास! काजव्यांच्या अस्तित्वाने रात्री उद्दीपित झाल्या आहेत. तासन-तास पाहत बसले तरी मन तृप्त होत नाही. काजवे नुसतेच पाहणे हादेखील जीवशास्राच्या अभ्यासकांच्या तसेच निसर्गप्रेमींच्या दृष्टीने अविस्मरणीय अनुभव! काजव्यांची ही मोहमयी दुनिया पाहताना काळोखाची, हिंस्र श्वापदांची, सरपटणार्या प्राण्यांची भीती कुठल्या कुठे पळून गेलेली असते!
काजवा म्हणजे प्रकाशणारा एक कीटक आहे. त्याला सहा पाय आणि पंखांच्या दोन जोड्या असतात. त्यामुळे तो हवेत सहज उडू शकतो. झुरळाइतक्या आकाराच्या या लहान किटकाचे शरीर तीन भागांत विभागलेले असते. रात्रीच्या अंधारात हवेत उडणार्या, बागडणार्या या अग्निसख्याला दोन मोठे डोळे असतात. त्यांचे जीवनचक्र मे महिन्यात सुरू होते. त्यांची संख्या सुरूवातीला नगण्य असते. पुढे मोसमी पावसाच्या तोंडावर मात्र ही संख्या लक्षावधी होते. तेव्हाच या अनोख्या ‘काजवा महोत्सवा’चा क्लायमॅक्स होतो. मे-जून महिन्यांचे दिवस म्हणजे काजव्यांचा प्रजननकाळ! हा कीटक आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चमचम करत असतो. काजव्यांची वाढत जाणारी संख्या पावसाच्या आगमनाची आणि त्याच्या स्वरूपाची वर्दी देतात असे स्थानिक आदिवासी मानतात. मोसमी पाऊस दाखल झाला, की पुढे तो चांगलाच जोर धरतो, नंतर त्याचे रौद्र भीषण तांडव सुरू होते. मग या रपाट्या पावसामुळे इटुकल्या-पिटुकल्या काजव्यांच्या जीवनचक्राचीही अखेर होते. ही मयसभादेखील संपून जाते. काजव्यांनी जीवशास्त्राच्या अभ्यासकांपेक्षा निसर्गप्रेमी, लेखक, कवी यांनाच जास्त भुरळ घातल्याचे दिसून येते.
भाऊसाहेब चासकर – ९८८११५२४५५