लंडन खूप दूर आहे… (Corona Experience in Britain)

अमेय आणि तेजश्री वेल्हाणकर

कोरोनासंबंधात लंडन येथे राहत असलेल्या वेल्हाणकर व दळवी कुटुंबीयांशी संपर्क साधला. अमेय आणि तेजश्री वेल्हाणकर या पतिपत्नींनी तेथील माहिती दिली. पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये 29 जानेवारी 2020 रोजी आढळला. बरेच लोक डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत इटाली, ऑस्ट्रिया अशा युरोपीयन देशांत सहलीसाठी जातात. तसेच ते या वेळीही गेले होते. युरोपीयन देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव आधीच झाला होता. दरम्यान, नववर्ष साजरे करून चीनमधून लोक कामावर हजर  होण्यासाठी ब्रिटनमध्ये परत येऊ लागले होते. परंतु त्यावेळी सगळीकडे पसरलेला कोरोना ब्रिटनमध्ये गांभीर्याने घेतला गेला नाही. त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. कोरोनाचा विषाणू ब्रिटनमध्ये शिरला. सरकारने पहिले पाऊल 16 मार्चला उचलले. परदेशी प्रवासावर निर्बंध घातले. परदेशी प्रवासी थांबले तरी देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच होते. ऑफिस अथवा कंपनीमध्ये एखादा कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघाला तर  तेवढा एक  मजला बंद ठेवला जाऊ लागला. तरीसुद्धा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत गेला. बऱ्याच कंपन्यांनी मग त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरांतून काम करण्याच्या सूचना दिल्या. सरकारने 20 मार्चला लॉकडाऊन जाहीर केले. सार्वजनिक स्थळे, मॉल्स, जिमखाने बंद झाले. विलगीकरणाबद्दलच्या सूचना 24 मार्चला दिल्या गेल्या. तोपर्यंत कोरोनाचा उद्रेक मोठा झाला होता. ब्रिटन कोरोनाबाधित देशांमध्ये जगात दुसऱ्या स्थानावर जाऊन पोचला होता.

        लॉकडाऊन जाहीर झाल्याबरोबर स्टोअर्सबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या, फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी होती. पण स्टोर उघडे आणि आत काही मालच नाही अशी परिस्थिती झाली. कोठेही गेलात तरी मनुष्यस्वभाव बदलत नाही हे म्हणतात, ते खरे आहे. लोकांनी साठेबाजी सुरू केली. सॅनिटायझरची विक्री चढ्या भावाने सुरु झाली. हगवण/डायरियाची साथ आल्याप्रमाणे टॉयलेट पेपरची विक्रमी विक्री झाली. टॉयलेट पेपर मिळेनासे झाले. त्यात सरकारने लक्ष घातले आणि रेशनिंग सुरु केले. एका वेळेस एका व्यक्तीला फक्त दोनच वस्तू खरेदी करता येतील असा नियम निघाला. परिणामी लोक रोज दुकानाबाहेर रांगा लावू लागले. ब्रिटनमध्ये ऑनलाईन खरेदी-विक्री भरपूर प्रमाणात होते. तेथेसुद्धा ऑर्डर देण्यासाठी लाख-दीड लाख लोक क्यूमध्ये असायचे. मर्यादित लोकांच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जायच्या. लोक परत दुसऱ्यादिवशी साईट सुरु झाली, की लॉगिनसाठी प्रयत्न करायचे. त्या सगळ्या गडबडीत जेष्ठ नागरिकांची पंचाईत होऊ लागली. त्यांना लांब रांगेत उभे राहणे जमेना. त्यांच्यासाठी दुपारचा एक तास आरक्षित केला गेला. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सकाळचा एक तास राखीव ठेवला गेला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होऊ लागला.

 

        सध्या तेथे काय परिस्थिती आहे? आर्थिक  केंद्र असलेल्या लंडन आणि व्यवसायाचे केंद्र असलेल्या मँचेस्टर येथे कोरोनाने  हाहाकार माजवला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे ती गर्दीची ठिकाणे आहेत. शरीर तंदुरुस्ती ही अनिवार्य गोष्ट आहे असे मानणाऱ्या सरकारने वॉकला जायला व डॉग रनिंगला बंदी घातली नाही. सार्वजनिक वाहतूक चालू आहे. फक्त अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी दिवसातून एकदा बाहेर पडा अशा सूचना आहेत. पण त्याची कडक अंमलबजावणी होत नाही. कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलिस दंड आकारू शकतात. पण एखादी व्यक्ती, दिवसातून किती वेळा बाहेर पडली आहे, ती नक्की कोणत्या कारणासाठी बाहेर पडली आहे, याचा माग ठेवणे हे काम तसे कठीणच. कोरोनाच्या तडाख्यातून अगदी पंतप्रधान बोरिस जॉन्सन व प्रिन्स चार्ल्सपण सुटले नाहीत. नव्वदी पार केलेल्या राणीच्या बाबतीत ते होऊ नये म्हणून तिला जनसंपर्कापासून दूर दुसऱ्या राजमहालात ठेवले आहे.
          इतर सर्व देशांप्रमाणे ब्रिटनचेही खूप आर्थिक नुकसान झाले आहे. जे.पी.मॉर्गनमध्ये व्हाईस प्रेसिडंट असलेले अमेय वेल्हाणकर सांगतात, की यावर्षी जीडीपीचा दर आठ टक्क्यांनी खाली जाईल असा अंदाज आहे. तेथील स्टॉक मार्केट जानेवारी 2020पासून पंचवीस टक्क्यांनी गडगडले आहे. रोख्यांचे भाव खाली आल्यामुळे उद्योजक पैसे उभारण्यासाठी धावाधाव करु लागले आहेत. सरकारने या सर्वांवर उपाय म्हणून देशाच्या जीडीपीच्या पाच टक्के मदत जाहीर केली आहे. कामगाराचा पगार देणे मालकाला शक्य झाले नाही तर त्याचा ऐंशी टक्के पगार अथवा दरमहा अडीच हजार पौंडांची मदत सरकारने प्रत्येक कामगाराला दिली. मोठ्या कंपन्यांमध्ये काम कमी झाल्याने थोडे कमी तास काम करा व कामानुसार पगार घ्या असे धोरण सुरु केले आहे. ते कर्मचाऱ्यांनापण फायदेशीर ठरत आहे, कारण मुले घरी असतात. त्यांना सांभाळून ऑफिसचे काम करण्याची तारेवरील कसरत सोपी होते. ते सांगतात, कोरोना हा ब्रिटनमध्ये दुष्काळातील तेरावा महिना आहे. ब्रेक्झिटमुळे अर्थव्यवस्था मंदावली होती. त्यात कोरोनाचे संकट आले. डिसेंबर 2020पर्यंत ब्रेक्झिटचे सोपस्कार पूर्ण करायचे होते. ती तारीख गाठणे कठीण आहे. ते पुढे सांगतात, की नॅशनल हेल्थ स्कीमच्या अंतर्गत सर्व वैद्यकीय सेवा सरकार मोफत पुरवते. तो मोठा फायदा नागरिकांना आहे.

 

श्रेयस वेल्हाणकर

डेलॉइटमध्ये असिस्टंट मॅनेजर असलेले श्रेयस वेल्हाणकर सांगतात, की व्हिसावर काम करणारे लोक नोकरीवरून कधी काढून टाकतील या भीतीच्या छायेत काम करत आहेत. नवीन नोकरभरती पूर्णपणे थांबली आहे. श्रेयस यांना मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात परदेश प्रवास करावा लागला. त्यांना परत आल्यावर सर्दीखोकला झाला. त्यांची एका दिवसात टेस्ट होऊन त्याचा रिपोर्टपण मिळाला. ते सांगतात, की आता तसे होत नाही. आजार खूप बळावला असेल तरच टेस्ट होते. आम्ही नॅशनल हेल्थ स्कीम व इतर सेवाभावी काम करणाऱ्या लोकांचे आभार मानण्यासाठी दर गुरुवारी बाल्कनीमध्ये उभे राहून टाळ्या वाजवतो. लॉकडाऊन कंटाळवाणा होऊ नये म्हणून ते व त्यांचे सहकारी लंच ऑनलाईन एकत्र घेतात.

         

दिनानाथ दळवी

लंडनला स्थायिक असलेले जेष्ठ नागरिक दळवी सांगतात, की सरकार आमची खूपच काळजी घेत आहे. आमची मेडिकल हिस्टरी नॅशनल हेल्थ स्कीमकडे आहे. त्यानुसार आमची हाय रिस्क, व्हलनरेबल अशी वर्गवारी केली गेली आहे. त्यांना आमची गरजेची औषधे माहीत असतात. ते लोक आमच्या तब्येतीची चौकशी करतात. गरज पडल्यास औषधेगरजेच्या वस्तू, फूड पॅकेट्स पुरवतात.

        ब्रिटिश टेलिकम्युनिकेशनमध्ये Finance  Manager म्हणून कार्यरत असलेल्या तेजश्री वेल्हाणकर सांगतात, की लॉकडाऊनचा एक मोठा फायदा असा झाला, की अमेय बराच वेळ घरी असतो. माझा प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे मला पेंटिंग करायला, पियानो वाजवायला वेळ मिळतो. मी जीम बंद झाल्यामुळे परत योगाकडे वळले आहे. समर सुरु झाला आहे. लोक सनबाथसाठी उत्सुक आहेत. बरेच महिने घरी असलेल्या मुलांना घरी कसे रमवायचे यासाठी पालक नवनवीन शक्कला लढवत आहेत.     दळवी सांगतात, की व्हीलचेअरवर असलेल्या आमच्या शेजाऱ्याच्या पत्नीचे अचानक निधन झाले.  नॅशनल हेल्थ स्कीमच्या लोकांनी सगळी काळजी घेतली. आम्ही मात्र त्यांना काही मदत करू शकलो नाही. अगदी अंत्यदर्शनसुद्धा आम्हाला घेता आले नाही. तर वेल्हाणकर म्हणाले, की आमचे आईवडील भारतात असतात. आत्तापर्यंत वाटायचे, की त्यांना गरज लागली तर आम्ही लगेच भारतात पोचू. प्रवासाला आठ-दहा तास लागतात. लंडन काही दूर नाही. पण आता जाणवते, ते तेवढे सोपे नाही. लंडन खूप दूर आहे.
अमेय वेल्हाणकर 44-7768534848 ameyavelhankar@gmail.com
दिनानाथ दळवी 44-7521817483 dinanath1954@gmail.com
विनीता वेल्हाणकर 9967654842 vineetavelhankar@gmail.com
विनीता वेल्हाणकर यांचे एम ए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी बँकेत तेहेतीस वर्षे नोकरी केली आणि 2011 साली स्वेच्छानिवृत्ती पत्करली. त्यांचे पती चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांची मुलगी मानसी वैद्य व तिचा परिवार अमेरिकेत आहे आणि मुलगा अमेय व त्याची पत्नी तेजश्री लंडनला वास्तव्यास आहेत. विनीता यांना वाचनाची आवड आहे. तसेच, त्यांचा शेअर मार्केटचाही अभ्यास आहे.  
————————————————————————————————————————-

 

About Post Author

1 COMMENT

  1. ह्या वेगवेगळ्या देशातील नोंदीमुळै परिस्थिती कळण्यात आली .सर्वठिकाणी त्रास ,मानसिक तणाव सारखेच आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here