रूद्र आणि शिव (ShivShankar’s Two Faces – Rudra & Shiv)

रुद्राचा उल्लेख ऋग्वेदात आहे, पण शिवाचा नाही. शिव हा शब्द ऋग्वेदात विशेषण म्हणून आलेला आहे, देवतावाचक म्हणून आलेला नाही. वेदांतील रुद्र कसा आहे? अग्नीसारखा तांबूस, लाल आहे. माथी जटाभार असलेला, उग्र प्रकृतीचा, त्याच्या अवकृपेमुळे मानवी जीवनात अनेक संकटे व दु:खे निर्माण होतात असा; पण तो हवी (देवास अर्पण केलेले अन्न) दिल्यास संतुष्ट होतो आणि कल्याणकारक बनून भक्तांना रोगमुक्त करतो, असाही.

शिवहा शब्द संस्कृत भाषेतील नाही. तो आर्येतर द्रविडवर्गीय भाषांतील आहे. संस्कृत शब्दकोशात शिव म्हणजे भगवान शंकर. त्या शब्दाचे इतर अर्थ चैतन्य, आत्मा, मंगल हेदेखील दिलेले आहेत. शिव हा शब्द वापरल्यास मंगलकारक असा त्याचा अर्थ होतो. परंतु त्यावरून शिव शब्दाचा अर्थ नेमका कळत नाही. शिव म्हणजे तांबूस, लालसर, अरुणरंगी. शिव तांबडा. लालसर म्हणजे चांगला, म्हणजे मंगलदायी ही कल्पना. तसे लालसर दर्शन आकस्मिक घडणे हे शुभसूचक, मंगलकारक मानले जाते. तांबडे फुटण्याची वेळ म्हणजे शिवप्रहर. त्यामुळेच शिवप्रहर ही चांगली, मंगलकारक वेळ समजली जाते.
आर्यद्रविडादी लोक प्रारंभीच्या संघर्षानंतर एकत्र नांदू लागले. आर्यांनी मूळच्या लोकांच्या- द्रविडांच्या – काही लोकप्रिय देवता स्वीकारल्या. शिवही त्यांपैकी एक. आर्यांनी शिवाला रुद्र स्वरूपात पाहिले. श्रीमत् शंकराचार्यांच्या उमा महेश्वर, वेदसारशिवस्तव:’ स्तोत्रात शिवाचे जटाधारी, तृतीय नेत्रात अग्नी असलेला असे वर्णन येते. शिव तांबडा, रुद्रही तांबडा; शिव जटाधारी, रुद्रही जटाधारी, शिवाच्या तृतीय नेत्रात अग्नी तर रुद्र अग्निस्वरूप. त्यामुळे शिव तोचि रुद्र, रुद्र तोचि शिव ही कल्पना रूढ झाली. रुद्राच्या शिवस्वरूपाचा विकास यजुर्वेदामध्ये दिसून येतो. रुद्राची शंभर नावे शतरुद्रियामध्ये येतात. रुद्र हा महादेव स्वरूपात श्वेताश्वतर उपनिषदामध्ये विकास पावला. रुद्राचा महादेव म्हणून उल्लेख अथर्ववेदात येतो. शंकर देवतेचे सध्याचे स्वरूप रुद्र-शिव कल्पनेमध्ये डोंगरी अनार्यांचा देव आणि सैंधव संस्कृतीतील पशुपती यांची भर पडून बनले.
रुद्र

रुद्राबद्दल लोकमानसात भीतीच जास्त आहे. रुद्र ही उग्र देवता ऋग्वेदातील आहे. उपासकाला त्याची भीती वाटे व त्याची प्रार्थना रुद्राच्या शस्त्रांपासून मुक्तता मिळावी अशी आहे. त्याचा कोप होऊ नये, त्याने संतुष्ट राहवे म्हणून भीतीपोटी त्याला यज्ञात हवी दिला जात असे. ब्राह्मण उपाध्यायांच्या मनात रुद्राबद्दल जी भीती वसत होती, ती रुद्र तोचि शिव या श्रद्धेमुळे. शिवाचे पुजारीपण केल्यास व पुजारीपणाचे हक्क म्हणून शिवाला अर्पण केलेला नैवेद्य, फळे, दक्षिणा इत्यादी हवीअसल्याची समजूत असल्याने ते घेतल्यास शिवाचा कोप होईल या भावनेने शिवाचे पुजारीपण ब्राह्मणाने करू नये, केल्यास अकल्याण होते अशी धारणा होत गेली असावी. त्यातून शिवाचे पुजारीपण गुरवांकडे आले असावे.

रुद्राचे आवर्तन अकरा वेळा पाठ म्हणून एकादष्णी करण्याचा प्रघात आहे. या रुद्रमंत्र संहितेचे किंवा शतरुद्रियाचे नमक आणि चमक असे दोन भाग असून त्यांनी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन वाजसनेयी संहितेचे अध्याय सोळा आणि अठरा व्यापले आहेत. पैकी सोळाव्यात रुद्राला जे नमन आहे त्या नमनाचा रोख रुद्राचा रोष भक्तावर न व्हावा व ज्याच्यापासून आपणास त्रास पोचण्याचा संभव आहे अशा सर्वांपासून रुद्राने भक्ताचे रक्षण करावे हा आहे. सुरुवात अशी आहे ॐ नमस्ते रुद्र मन्यवे उतो तो इषवे नम: अर्थ हे रुद्रा, तुझ्या रोषाला (मन्यु) व तुझ्या बाणांना नमस्कार असो.
मधुकर टांकसाळे लिखित पाऊलखुणा
या पुस्तकाचे मुखपृष्ठ

रक्षणावर भर असल्याने या अध्यायातील सहासष्ट मंत्रांपैकी अर्ध्या मंत्रांत रुद्राच्या धनुष्याचा व बाणांचा उल्लेख आहे. या अध्यायाची एकंदर मांडणी अशी आहे, की हे रुद्रा! सर्प वगैरे हिंस्र प्राण्यांना ठार करून यातुधानांना (राक्षसांना) आमच्यापासून दूर घालवून दे. हे भगवन्, तुझ्या धनुष्याची दोरी सोडून टाक आणि बाणही पण फेकून दे कसे. हे रुद्रा! आमच्या कोवळ्या मुलाबाळांचा, आमच्या वृद्ध मातापितरांचा, आमच्या गायी-घोड्यांचा नाश करू नकोस. आम्ही तुला यज्ञात हवी नेहमी देत आलेले आहोत. चोर, लुटारू, खड्गधारी; तसेच, रथकार, कुंभार, लोहार, शिकारी या सर्वांवर तुझे आधिपत्य आहे. तुला नमन असो! ऊन, पाऊस, विजा, विहिरी, तळी या सर्वांत वास करणाऱ्या रुद्रा, तुला नमन असो! हे जटाधारी रुद्रा, ही पाहा, आमची बुद्धी तुझ्या स्वाधीन केली; तर आमच्या गावातील माणसे आणि गुरेढोरे – सर्व निरोगी आणि धष्टपुष्ट होवोत, इत्यादी.

याप्रमाणे नमकाध्यायात रक्षणाची प्रार्थना केल्यावर चमकाध्यायात रुद्राने यज्ञामुळे तुष्ट होऊन भक्तास काय द्यावे हे मला मिळो, हे मला मिळो अशा शब्दांनी वर्णिलेले आहे. त्याचा एकंदर सूर असा आहे, की माझ्या यज्ञाच्या योगाने मला उत्तम अन्न, सुदृढ शरीर, दीर्घायुष्य, राजयक्ष्म्यादी रोग-भय-शत्रू यांपासून अलिप्तता, सर्व प्रकारचे सुख, गाढ झोप येईल अशी शय्या, उत्साहवर्धक पहाट आणि आनंदात जाईल असा सर्व दिवस (सुखं च मे, शयनं च मे, सूषाश्च मे, सुदिनंच मे) तांदूळ-जवस-उडीद-तीळ-मूग-चणे वगैरे धान्ये व सोने-रूपे-पोलाद-लोखंड-शिसे-कथील-पाषाण-मृत्तिका वगैरे खनिज पदार्थ, गायी-कालवडी-खोंड-बैल ही सर्व मला मिळोत.

 

(संकलित)
(कै. मधुकर टांकसाळे यांच्या पाऊलखुणाया पुस्तकावरून)
———————————————————————————————-———————————————————

About Post Author

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here