मोहोळचे भैरवनाथ मंदिर

carasole

सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अंकोली गावामध्ये सातशे वर्षापूर्वीचे भैरवनाथांचे मंदिर आहे. मोहोळ-मंगळवेढा मार्गावर अंकोली स्टॉप आहे. अंकोली पंढरपूर-सोलापूर (ति-हेमार्गे) पंढरपूरपासून एकोणिसाव्या मैलावर आहे. रस्ता डांबरी व नित्य रहदारीचा आहे. कोणत्याही मार्गाने अंकोली गावी येताच समोर मंदिराचा भव्य तट नजरेत भरतो. देवालयाचे उंचच उंच डेरेदार शिखर पाहून मन प्रफुल्लित होते.

भैरवनाथ मंदिराच्या प्रवेशासाठी महाद्वार आहे. मंदिरात चौकोनी आकारातील विहीर आहे. मंदिरात सातशे वर्षापूर्वीची पालखी आहे. मंदिराची स्थापना त्याअगोदर झालेली आहे.

भैरवनाथ हे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील असंख्य भक्तांचे कुलदैवत आहे. मंदिरात  लिंग (पिंड) आहे. ते दिवसातून एकदाच, पूजेच्या वेळेस पाहायला मिळते. ज्या ठिकाणी  पिंड आहे त्यावर छोटा गाभारा बांधलेला असून तेथे पिंडीवर चांदीची दोनशे भार वजनाची सुंदर, सुबक कोरीवकाम केलेली दैदिप्यमान अशी मूर्ती ठेवलेली आहे. तिची दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा व आरती केली जाते. पूजेच्या वेळी त्यावर पितळेचा नागफडा बसवतात. गाभाऱ्याच्या पुढील भागात चार दगडी खांबांवर उभारलेली संपूर्ण दगडी इमारत आहे. त्यातच जोगेश्वरी व काळभैरव या दोन दैवतांसाठी दोन खोल्याही तयार केलेल्या आहेत. त्यापुढील भागात भव्य असा उंच सभामंडप आहे.

मंदिराचा परिसर मोठा आहे. पूर्वी तेथे मोठी शाळा होती. विद्यार्थी संख्या सतराशे होती. शाळेचे स्थलांतर चार वर्षापूर्वी दुसऱ्या ठिकाणी झाले. शाळेच्या‍ रिकाम्या खोल्यांचा उपयोग मंदिरातील वस्तू ठेवण्यासाठी केला जातो. मंदिरासंदर्भात पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी –

सर्व देव एकत्र जमलेले असताना भगवान शंकर हे व्याघ्रचर्म (वाघाचे कातडे), रूंडमाळा, कंठीसर्प व सर्वांगी भस्म धारण करून आले. त्यांना पाहून ब्रम्हदेवादी देवांना तिरस्कार वाटला. शंकरांनी ते मनातून जाणून घेतल्याने त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यातूनच श्री भैरवनाथ अवतीर्ण झाले.

सामान्‍यतः देवळावरील शिखरे उंच व निमुळती अशा प्रकारची असतात, परंतु मोहोळ येथील भैरवनाथ मंदिराचे शिखर गोल घुमटाकार असून त्‍याच्‍या चारी बाजूंस चार मनोरे उभारलेले दिसतात. त्यातून मुस्लिम प्रार्थनास्थळाचा भास होतो. देवळातील ओवऱ्यांचा उपयोग भक्तागणांना निवारा, स्वयंपाक करणे यांसारख्या विविध व धार्मिक कामांसाठी होतो. देवळाच्या आवारात सभोवताली दगडी फरशी घातलेली आहे, सर्वत्र स्वच्छता असते.

मंडपाच्या पुढील बाजूस पंचवीस फूट उंचीच्या, लक्ष वेधून घेणा-या दोन दीपमाळा मंदिराच्या वैभवात भर टाकतात. अद्यापही भक्त मंडळी दीपमाळा प्रज्वलित करून तिच्या प्रकाशात दिसणारे मंदिराचे अलौकिक रूप पाहून डोळ्यांचे पारणे फेडतात.

प्रत्येक रविवारी भैरवनाथाचा छबिना निघतो. त्यामुळे भाविकांची संख्या रविवारी जास्त असते. मंदिराच्या बाहेरील बाजूस घोड्यावर बसलेल्‍या मुद्रेतील भैरवनाथ आणि त्यांची पत्नी जोगेश्वरी देवी यांच्‍या सुंदर मूर्ती आहेत.

जोगेश्वरी देवीचे देऊळ गावाच्या पूर्वेस भैरवनाथाच्या मंदिरापासून चार फर्लांगावर आहे. देऊळ लहान व असंरक्षित असल्याने देवीची मूर्ती मंदिराच्या बाहेरील बाजूस भिंतीमध्ये कोरलेली आहे. जोगेश्वरी देवीला ओवसा देण्यासाठी सुवासिनी स्त्रियांची खुप गर्दी होते. स्त्रिया एकमेकींना हळद-कुंकू लावतात, त्यास ओवसा असे म्हणतात. मंदिरातील पुजा-याने सांगितले, की भैरवनाथ आणि जोगेश्वरी देवी यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला आणि जोगेश्वरी देवी भैरवनाथांवर रूसून बसली होती. त्या‍च ठिकाणी आडरानात, ओसाड जागी ते मंदिर बांधण्यात आले आहे.

मंदिरामध्ये नवस फेडण्याचे कार्यक्रम होतात. तसेच विवाह, जावळ काढणे, नाव ठेवणे असे कार्यक्रम चालू असतात. लग्नासाठी दोन हजार रूपये आणि इतर कार्यक्रमासाठी त्याहूनही कमी पैसे भाड्यापोटी घेतले जातात. मंदिरामध्ये तीन पुजारी असतात. प्रत्येक पुजारी सलग पंधरा दिवस मंदिरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो. तिन्ही पुजारी आपापली गावे ठरवतात आणि त्यांचे जे गाव ठरले आहे ते पुजारी त्याच गावातील भाविकांचे धार्मिक कार्यक्रम करतात. फक्त सोलापुरमधुनच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर अनेक गावांमधूनही भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात.

तेथे आलेल्या तरुणांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, भैरवनाथांच्या मंदिरातील विशेष गोष्ट म्हणजे जर कोणाला सर्पदंश झाला असेल तर ढोलांच्या टिपऱ्यांचा आवाज केला जातो आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तीने मंदिराभोवती फेरी मारायची. जर व्यक्ती बेशुद्ध झाली असेल तर दुसऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीला उचलून मंदिराभोवती फेरी मारायची. तसेच, त्‍या व्‍यक्‍तीला एक दिवस राहावे, रात्री झोपू नये, पाणी पिऊ नये, लिंबाचा पाला खाणे एवढ्या गोष्टींचे पालन करावे लागते. त्‍यानंतर विषबाधा झालेल्या व्यक्तीचे विष उतरते असा समज आहे.

लग्नसोहळ्यानिमित्त श्री भैरवनाथ यात्रा साजरी केली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून अंकोली गावातील ग्रामस्थ त्यांची घरे आतून-बाहेरून स्वच्छ करून घेतात. सर्व कपड्यांची स्वच्छता केली जाते. नंतर प्रत्येक स्त्रीपुरुषाने शुचिर्भूतपणे राहून देव दर्शन करावे, नैवेद्य दाखवावा असा दंडक पाळला जातो. चैत्र शुद्ध दशमीला अनगरचे पाटील यांची मानाची काठी आहे.- ती प्रथम येते. तिला देवाचे पुजारी घडशी ढोल वाजवत जाऊन मानाने देवळात आणतात. एकादशीच्या दिवशी गावातील एकवीरा देवीला रात्री तेल लावण्याचा कार्यक्रम सर्व गणकऱ्यांसमवेत केला जातो. नंतर दुसऱ्या दिवशी श्री भैरवनाथ, जोगेश्वरी, चोखोबा इत्यादी देवांना तेल लावण्याचा कार्यक्रम पार पडतो.

संदर्भ – (चोखोबा- श्री भैरवनाथ महात्म्य , श्री क्षेत्र अंकोली)

– रोहिणी क्षीरसागर

(छायाचित्र – महांकाळ कापुरे)

Last Updated On – 26th May 2016

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.