मोडी लिपी – मराठीचा शॉर्टहँड (Modi – Historical Script of Marathi Language)

1
104

शिवकालीन मोडी लिपीतील पत्र
मोडी ही लिपी तेराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. त्या आधीची दोनशे वर्षे ती महाराष्ट्रात असल्याच्या खुणा मिळतात. मोडीमधील सर्वात जुना उपलब्ध लेख सन 1189 सालचा आहे. म्हणजे मोडी लिपीमहाराष्ट्रात कमीत कमी नऊशे वर्षें वापरात आहे. मोडी लिपीच्या कालावधीसंदर्भात मतांतरे आहेत. काही इतिहासकारांच्या मते, मोडी ही मौर्य (ब्राह्मी) लिपीचा एक प्रकार आहे. राजा रामदेवराय, राजा महादेवराय, राजा हरपालदेव यादव यांच्या कालखंडात मोडीचा प्रसार प्रामुख्याने झाला. यादवांचे प्रधान हेमाडपंत (1260-1309) यांना मोडी लिपी लोकाभिमुख करण्याचे श्रेय दिले जाते.

मोडी लिपी ही हात न उचलता लिहिली जाते. म्हणून तिला शॉर्टहँड लेखनाच्या जवळची मानतात. मोडीमध्ये अनेक शब्दांचे लघुरूप लिहिले जाते. ती लिपी गोलाकार अक्षरांची वळणे व लपेटे यांमुळे सुंदर बनली आहे. मोडी लिपीचे साधारणतः सहा कालखंडांत वर्गीकरण केले गेले आहे

1. आद्यकालीन मोडी – ही शैली साधारणतः बाराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती.

संत ज्ञानेश्वरांचा मोडी लिपीतील श्लोक

 

2. यादवकालीन मोडी राजा रामदेवराय, राजा महादेवराय आणि राजा हरपालदेव यादव यांच्या कालखंडात मोडी लिपीचे पुनरुज्जीवन झाले. ती शैली यादव साम्राज्याच्या अखेरच्या कालखंडापर्यंत (तेरावे शतक) अस्तित्वात होती.
3. बहामनीकालीन मोडी – बहामनी कालखंडात म्हणजेच चौदाव्या ते सोळाव्या शतकाच्या कालावधीत ती शैली वापरली जात होती.
4. शिवकालीन मोडी – छत्रपती शिवरायांच्या कालखंडातील मोडी लिपीला शिवकालीन मोडी लिपी असे म्हटले जाते. मोडी लिपीचा यादवकालात सुरू झालेला प्रवास शिवकालात बहरून आला. साधारणतः सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत तो बहर चालू राहिला.
5. पेशवेकालीन मोडी – मोडी लिपी पेशव्यांच्या कालखंडात रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. मोडीचे लिखाण बोरूने पेशवेकाळात होत असे. बोरूच्या सहाय्याने मोडी लेखन हे अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाची सुरूवात येथपर्यंत चालू होते.
6. आंग्लकालीन मोडी – या शैलीचे अस्तित्व एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत होते. मोडी लिपी पेनाने इंग्रजांच्या कालखंडात लिहिली जाऊ लागली. ब्रिटिशांनी छपाई यंत्राचा वापर केल्यामुळे लिपीमध्ये एकसारखेपणा आला, पण तिचे सौदर्य नष्ट झाले. ब्रिटिशांनी मोडी ही लिपी वापरण्यास तसेच छपाईस अवघड असल्यामुळे देवनागरी (बालबोध) लिपीचा वापर सक्तीचा केला. त्यामुळे मोडी लिपीचा वापर कमी होत गेला. मोडी लिपी 1960पर्यंत लिखाणात अल्प प्रमाणात प्रचलित होती. तिचा समावेश प्राथमिक अभ्यासक्रमातही होता.

हेमाडपंत हा महामंत्री म्हणून देवगिरीच्या महादेव व रामदेवराय यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1260 पासून होता. त्यावेळी त्याच्याकडे दप्तराचे कामकाज असे. देवनागरीतील प्रत्येक अक्षर सुटे असल्यामुळे त्या लिपीत लिहिताना प्रत्येक वेळी हातातील लेखणी उचलावी लागे. लेखन करण्यात त्यामुळे अर्थात बराच वेळ जाई. ती अडचण दूर व्हावी म्हणून हेमाद्रिपंत यांनी देवनागरीतील अक्षरे मोडून जलद लिहिता येईल अशी पद्धत शोधून काढली. तिलाच मोडी लिपी असे म्हणतात. त्या लिपीत लेखणी न उचलता अनेक शब्द लिहिता येतात. ती कल्पना हेमाद्रिपंत यांना फारसी लिपीतील जलद लिहिण्याची शिकस्ता नामक जी लिपी आहे त्यावरून सुचली असावी असे समजतात (काही जाणकार मोडी लिपी ही हेमाद्रिपंताने विकसित केली असे मानत नाहीत. ते हेमाद्रिपंताने मोडी लिपी प्रचलित केली असे मानतात. महाराष्ट्र शासनाच्या नोंदीतही तसाच उल्लेख आहे).

काही लोक मोडी लिपी श्रीलंकेतून आणली असेही मानतात. परंतु तेथील सिंहली लिपीच्या वळणाचा मोडी लिपीशी काही संबंध दिसत नाही.
मोडी लिपीचा प्रसार भारताच्या इतर प्रांतांतही मराठी साम्राज्य वाढले तसतसा होत गेलेला आहे. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात तर भारतातील मोठमोठ्या शहरांत – जसे, की मद्रास व म्हैसूर येथे – तिचा वापर सरकारदप्तरी झालेला दिसतो. कर्नाटकात जुन्या सावकारी घराण्यांतील हिशोब हे कानडी भाषेत,परंतु मोडी लिपीत लिहिलेले आढळतात. इंग्रजी राजवटीतही कित्येक इंग्रज अधिकाऱ्यांच्या सहीचे मोडी अक्षर असलेले कागद ऐतिहासिक दप्तरांत सापडतात. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली सरकारी पत्रके मोडी लिपीत असलेली दिसतात. ख्रिस्ती मिशनऱ्यांनीही पहिली मराठी पुस्तके त्या लिपीतच छापली होती. मोडी लिपीची चिटणिशी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी इत्यादी वळणे प्रसिद्ध आहेत.
– (संकलित – महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयातील नोंदी व भारतीय संस्कृतीकोशातील नोंद यांच्या आधारे)
———————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. मोडी लिपी व तिच्या बदलत्या रुपाची सुंदर माहिती देणारा लेख.प्रा.पुरुषोत्तम पटेल,म्हसावद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here