मोगरा फुलला !

मराठी साहित्यविश्वातील कवयित्री व भाषा अभ्यासक सुनंदा भोसेकर आणि आघाडीच्या ललित लेखिका राणी दुर्वे या दोघी ‘मोगरा फुलला’ या नावाचे नवे दालन घेऊन थिंक महाराष्ट्र वेबपोर्टलच्या समूहात दसऱ्यापासून सामील होत आहेत.

दालनात संवेदनाक्षम व जाणीवसमृद्ध अशा अनेक लेखकांचे विविध विषयांवरील साहित्य/कला/ विचारसमृद्ध असे लेखन तेथे प्रसिद्ध होईल. त्यामधून सद्भावना व सुसंस्कृतता या गुणांचा परिपोष व्हावा आणि मराठीतील समृद्ध सांस्कृतिक जग पूर्वगुणवत्तेने प्रकट व्हावे असा प्रयत्न आहे. तुम्हीही मराठीतील सुजाणपणास कवेत घेऊ इच्छिणाऱ्या या व्यापक प्रयत्नात लेखन करून, तसेच ऑडिओ-व्हिडिओ पाठवून सहभागी व्हावे ही विनंती.

सुनंदा भोसेकर यांना भाषा विकास आणि संस्कृती यांच्या अभ्यासात आणि प्रवासात विशेष रस आहे. त्यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये वाचन आणि संस्कृतीविषयक सदर लेखन केले आहे. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले असून तिसरा प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

सुनंदा भोसेकर 9619246941 sunandabhosekar@gmail.com

राणी दुर्वे या आघाडीच्या ललित लेखिका त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे वाचकप्रिय आहेत. प्रवास आणि माणसांचे आपसातील नातेसंबंध हे त्यांच्या लेखनाचे विषय आहेत. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी एक 1960 नंतरच्या जागतिक नवसिनेमाविषयी आहे.

राणी दुर्वे 9619663972 ranidurve@gmail.com

 – संपादक, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
———————————————————————————————-

मोगरा फुलला !

विचारांच्या पलीकडे असते ते संवेदन. ‘विचार’ ही गोष्टही मूर्त म्हणावी लागेल इतके ‘संवेदन’ अमूर्त आहे. म्हणजे, ‘पाऊस पडणे’ हा ‘विचार’ असेल तर त्या बरोबर जाणवणारा ‘मातीचा सुगंध’ हे ‘संवेदन’ आहे. माणूस रानात चालत असतो. हिरव्या वाटेवर पावलांना वेग आलेला असतो आणि कानावर निर्झराचा रव येतो. पाणी प्रत्यक्ष नजरेस पडण्याआधीच माणूस ‘पाण्याचे असणे’ अनुभवतो. उन्हाचे दिवस असतात. गजगजीत गर्दीच्या रस्त्यावरून जात असताना अचानक कुठूनसा मोगऱ्याचा सुगंध येतो आणि नकळत, मन पाण्याचा शिडकावा व्हावा तसे ताजे होते. मनात असा ‘मोगरा फुलणे’ म्हणजे संवेदन जागवणे होय !

बहुपेडी असा हा भारतीय समाज त्याच्या स्वत:च्या अनेकविध विचारधारा, प्रथा-परंपरा घेऊन एकमेकांच्या सोबतीने मार्गक्रमण करत आहे. प्रत्येकाची चाल-रीत भिन्न असली तरी समाजाची संस्कृती एक आहे. विविधतेत एकता बाळगून असलेल्या या समाजातील नीतिमूल्यांची जपणूक, सद्भावनेचा जागर, प्रथा-परंपरांमधील अनेकता शोधण्याची आणि मुख्य म्हणजे तुटलेपणाची भावना असणाऱ्या घटकांना स्वत:त सामावून घेऊन त्यांनाही स्वत:सोबत नेण्यासाठी लोकांमधील संवेदनशीलतेला थेट आवाहन करणारे ‘मोगरा फुलला’ हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वरील एक स्वतंत्र दालन आहे.

समाजाचे संस्कृतिकारण आणि जाणिवजागृती हा हेतू मनात धरून दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू करत असलेले हे नवीन दालन समाजाला समृद्ध करेल अशी आशा आहे.

– संपादक, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
—————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

  1. खूपच छान ग सख्यांनो .आता पुनः काही विचारपरिप्लुत अन् काही nostalgically clever वाचायला मिळणार तर! Looking forward to it.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here