सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांचे तळबीड (Hambirrao Mohite – Shivaji’s Military Chief and his village Talbeed)

छत्रपतींच्या सहकाऱ्यांमध्ये अभिमानाने नाव घ्यावे लागेल, ते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे ! त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराड शहरापासून जवळ असलेल्या तळबीड गावी 1630 मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव हंसाजी मोहिते. ‘हंबीरराव’ हा त्यांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल मिळालेला किताब आहे. तो शिवाजी महाराज यांनी प्रतापराव गुजर यांच्यानंतर त्यांना स्वराज्याचे सरसेनापती केले तेव्हा दिलेला आहे. हंबीरराव यांनी त्यांच्या शौर्याने आणि युद्धभूमीवरील अभ्यासाने मराठा सैन्यात नवचैतन्य निर्माण केले, शत्रूच्या मनात धास्ती निर्माण केली. त्यामुळे मराठा सैन्य पुनश्च धीराने उभे राहिले. सैन्याचा आत्मविश्वास वाढला.

तळबीड गाव कराड-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आहे. ते कराडपासून तेरा किलोमीटरवर डाव्या हाताला तीन किलोमीटर आत वसले आहे. तेथील वातावरण निसर्गसुंदर आहे. निसर्गाने या गावाची मांडणी वसंतगड किल्ल्याच्या पायथ्याला, जणू किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी केली असावी. राष्ट्रीय महामार्गावरून खाली उतरले, की गावाच्या वेशीवर पश्चिमेकडे हंबीरराव मोहिते यांच्या स्मरणार्थ उभारलेली मोठी कमान आहे. कमानीखालून आत गाव आहे. हंबीरराव मोहिते यांचे स्मारक गावात समोरच पूर्वेकडे तोंड करून उभारलेले आहे. वास्तू कलात्मक आहे. स्मारकात स्वच्छता, सुंदरशी छोटीशी बाग आहे. गावात सरसेनापतींचे वंशज राहतात. स्मारकाच्या जवळ मोहिते घराण्याचा वीरगळ आहे. त्याचे दर्शन श्रद्धेने आणि भक्तीने घेतले जाते. वसंतगड गावाच्या पाठीमागे, पश्चिमेला खंबीरपणे उभा आहे. गड चढण्यास अवघड नाही. असे सांगतात, की हंबीरराव वसंतगडावरच राहत असत. वसंतगड हा शिलाहार वंशातील दुसरा भोज राजा याने बांधला. छत्रपतींनी तो आदिलशहाकडून 1659 साली जिंकून घेतला. गडावर प्रवेश दरवाज्याचे अवशेष आहेत.

ग्रामस्थांनी स्मारकाशेजारी राममंदिर नवीन बांधले आहे. ती वास्तूही सुंदर आहे. स्मारकात छोटी तोफ आहे.

हंबीरराव मोहिते यांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजवला होता. निजामशाहीने त्यांना ‘बाजी’ हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावाची पाटीलकी सांभाळत. त्या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली होती. त्या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संपर्क शहाजीराजे यांच्याशी आला. धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. संभाजी व धारोजी मोहिते हे दोघे त्या काळातील पराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये वर्णन केलेली आहे. संभाजी मोहिते स्वराज्य स्थापनेच्या वेळी शहाजीराजे यांच्या लष्करात होते. ते पुढे कर्नाटकला गेले. त्यांनी त्यांची मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवाजी महाराजांशी लावून दिला व भोसले घराण्याशी नाते निर्माण केले. पुढे, संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी- हंबीरराव-मोहिते यांनी त्यांची मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्याशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगदी जवळचे घराणे झाले. ताराराणी यांनीही त्यांचे नाव पित्याप्रमाणे इतिहासात अजरामर केले आहे.

मोहिते घराण्यातील अनेक पुरुषांनी ‘कर्तबगार घराण्या’ला साजेशी कामगिरी स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी करून दाखवली. पुढे, त्यांनी त्यांचे कर्तृत्व शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रवासामध्येदेखील गाजवले व वारसा चालू ठेवला. हंबीरराव शूर होते. ते त्यांचा धर्म संकट हे कोणतेही का असेना, त्याला निधड्या छातीने सामोरे जाणे हाच मानत असत. हंबीरराव हे शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये सेनानी म्हणून प्रथम कार्यरत होते. प्रतापराव गुजर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बहलोलखानाविरुद्धच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले आणि स्वराज्याच्या सरसेनापतींची जागा रिकामी झाली. त्याच लढाईमध्ये हंबीररावांनी स्वत:हून पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवले. शत्रुसैन्याचा पाडाव केला. त्यांचा तो पराक्रम पाहून प्रतापराव गुजर यांच्यानंतर रिकाम्या झालेल्या सेनापतींच्या जागी निधड्या छातीचा वीर म्हणून शिवाजी महाराजांनी हंबीरराव यांची निवड केली. ते अष्टप्रधान मंडळातील हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती !

हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची साक्ष म्हणजे त्यांची तलवार होय. त्याचे कारण म्हणजे हंबीरराव मोहिते यांनी अफझलखानासोबत झालेल्या लढाईत गाजवलेला पराक्रम होय. त्या लढाईत त्यांनी सहा तासांत सहाशे शत्रुसैन्यांस मारले असे म्हटले जाते. त्या तलवारीवर चांदणीच्या आकाराचे सहा शिक्के आहेत. एखाद्या मावळ्याने एकाच लढाईत शंभर शत्रूंना कंठस्नान घातले, तर त्या मावळ्याच्या तलवारीवर एक शिक्का उमटवला जाई. तसा पराक्रम अन्य कोणी गाजवल्याचे ऐकिवात नाही. शिवाजी महाराजांनी ती प्रथा चालू केल्याचे बोलले जाते. हंबीरराव यांची ती तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात विराजमान आहे.

स्वराज्याचा गाडा हाकण्याची जबाबदारी राज्याभिषेकानंतर वाढली. शत्रुसैन्य चहुबाजूंनी टपून बसले होते. तशा वेळी हंबीरराव मोहिते यांनी महाराजांना पदोपदी साथ दिली. हंबीररावांनी पहिले लक्ष्य केले ते मुघल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांना. हंबीरराव मोहिते यांच्या सैन्याने महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांच्या छावण्यांवर जबरदस्त प्रहार करून त्यांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर त्यांनी खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूर, वरकड येथपर्यंत मजल मारत प्रत्येक मुघलाला हाकलून दिले. त्यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचा दबदबा वाढत गेला. त्यांनी मुघलांप्रमाणे आदिलशाहीलादेखील जबरदस्त दणका दिला. त्यांनी कर्नाटकातील कोप्पल येथे आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान याचा प्रचंड पराभव करून तेथील जनतेला स्वराज्याच्या छत्रछायेखाली आणले. हंबीरराव यांनी सरसेनापतींचे पद स्वीकारल्यापासून मोहिमांवर मोहिमा काढून चहुबाजूंना स्वराज्याची पताका फडकावली.

दरम्यान, शिवाजीमहाराजांचे निधन झाले. स्वराज्याची धुरा थोरले पुत्र संभाजी महाराज यांच्याकडे आली. हंबीरराव मोहिते यांनी संभाजी महाराजांना पाठिंबा दिला. संभाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर, त्यांनी केलेली बुऱ्हाणपूरची लूट महत्त्वाची मानली जाते. त्या विजयामुळे मुघलांच्या वर्चस्वाला तडा गेला. रामशेजच्या किल्ल्याची लढाई इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. हंबीररावांनी किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या खानाला चांगलीच अद्दल घडवली होती. हंबीरराव यांनी त्यानंतरही मुघल सरदार कुलीचखान, रहुल्लाखान व बहादूरखान आणि शहाजादा आझम यांना स्वराज्याच्या बाहेर पिटाळून लावताना पराक्रमाची शर्थ केली.

हंबीररावांची शेवटची लढाई ही वाईजवळील मुघल सरदार सर्जाखान याच्या विरुद्धची. त्या लढाईतदेखील त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे शौर्य गाजवले. हंबीरराव तोफेचा गोळा लागून 16 डिसेंबर 1687 रोजी धारातीर्थी पडले. मराठ्यांना त्या लढाईत विजय मिळाला खरा; पण त्यांनी अमूल्य असा त्यांचा ‘हिरा’ मात्र गमावला.

प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakulk@yahoo.com
————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here