मुराद बुरोंडकर यांचे आंबा संशोधन

0
150

मुराद महम्मद बुरोंडकर यांचे कर्तृत्त्व दापोलीत, विशेषत: कोकण कृषी विद्यापीठात बहरले; परंतु नियतीचा भाग असा, की मुराद बुरोंडकर यांनी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून 2021 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्याच वर्षी त्यांचे कोल्हापूर येथे आकस्मिक निधन झाले !

मुराद बुरोंडकर यांचा जन्म 13 ऑगस्ट 1960 रोजी झाला. मुराद यांचे कुटुंब मुरुड-दापोलीचे. त्यांचे वडील व्यापारी जहाजावर खलाशी होते. त्यांना मुराद धरून पाच मुलगे व एक मुलगी. मुराद यांनी उच्च शिक्षण घेतले व त्यांनी कृषी क्षेत्रात मोठी कामे केली. मुराद यांचे शिक्षण दापोली, मुरूड व फुरूस (खेड तालुका) येथे झाले. त्यांनी पदवीचे शिक्षण कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयात घेतले. त्यांनी पदवी प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह व एम एससी (कृषी) ही पदव्युत्तर पदवी वनस्पती शरीरक्रियाशास्त्र विषयात पूर्ण केली. त्यांनी आचार्य ही पदवी (पीएच डी) कर्नाटकच्या धारवाड येथील कृषी विद्यापीठातून सुवर्ण पदकासह प्राप्त केली.

त्यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ, कोकण कृषी विद्यापीठात संशोधक-प्राध्यापक, वनशास्त्र महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता अशी विविध पदे जबाबदारीने व कर्तृत्वाने भूषवली. त्यांतील लक्षणीय ठरले ते आठ वर्षे आंब्यावरील संशोधन व विस्तार या संबंधीचे काम. त्यामुळे त्यांना वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे ‘कनिष्ठ आंबा शरीरक्रिया शास्त्रज्ञ’ या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती 1990 साली मिळाली. त्यांना ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदावर बढती 1998 साली मिळाली.

मुराद बुरोंडकर यांना आंबा पीक- उत्पादन आणि काढणी पश्चात शरीरक्रियाशास्त्र या विषयातील संशोधनाचा तीस वर्षांपेक्षा अधिक व भात शरीरक्रियाशास्त्र यांमधील संशोधनाचा पंधरा वर्षांचा दांडगा अनुभव होता. त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आंबा उत्पादन तंत्रज्ञानाशी संबंधित नऊ शिफारशी व संकरित तीन जातींची निर्मिती यांमध्ये थेट संशोधक म्हणून राहिला आहे. त्या शिफारशी भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली) व महाराष्ट्र राज्याची संयुक्त संशोधन आढावा समिती यांनी व्यावसायिक तत्त्वावर अवलंबन करण्यासाठी प्रमाणित व प्रसारित केल्या आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखाली आंब्याच्या एक वर्षाआड फळधारणेवर उपाय म्हणून पॅक्लोबुट्रॉझॉलच्या उपयोगासंबंधीचे संशोधन भारतात पहिल्यांदाच 1986 ते 1992 या दरम्यान यशस्वी ठरले.

त्यामुळे हापूससारख्या, आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असलेल्या झाडाला दरवर्षी लवकर मोहर येऊन आंब्याचे उत्पादन दोन ते अडीच पटींनी वाढले आहे. आंबा उत्पादक दरवर्षी वीस हजार लिटरपेक्षा जास्त पॅक्लोब्युट्रॉझॉलचा उपयोग जवळपास सात ते दहा हजार हेक्टर क्षेत्रासाठी मागील वीस वर्षांपासून करत आहेत. तसे शेतकरी कोकणातीलच नव्हे तर गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतीलही आहेत.

पॅक्लोब्युट्रॉझॉल हे संजीवक आहे. ते तंत्रज्ञान आंबा उत्पादनातील शाश्वततेसाठी मोलाचे आहे. पॅक्लोब्युट्रॉझॉल हे वाढीवर मर्यादा घालत असल्यामुळे; तसेच, ते वाढीचे नियमन करते. म्हणून त्याची भूमिका विद्यापीठाच्या एकात्मिक आंबा उत्पादन तंत्रज्ञानामध्ये मध्यवर्ती व निर्णायक ठरली आहे. ‘सिंधू’ ही आंब्याची जात. ती 1992 मध्ये प्रसारित करण्यात आली. ती पातळ कोय असलेली पहिली जात होय. ती विकसित करण्यात बुरोंडकर यांचा वाटा सिंहाचा आहे. ती ‘रत्ना’, ‘निलम’ व ‘हापूस’ याच्या संकरातून निर्माण करण्यात आली आहे. त्यांनी ‘कोकण रूची’ ही आंब्याच्या लोणच्यासाठी; तसेच, ‘सुवर्णा’ ही ‘हापूस – निलम’ याच्या संकरातून संकरित जात विकसित केली आहे. ‘सिंधू ही सघन लागवडीकरता योग्य असून त्यात नियमित व भरपूर फळधारणा होते. त्याची फळे मध्यम आकाराची, आकर्षक तांबडया रंगाची, साकामुक्त असतात आणि ती सुवासिक व चवदारही आहेत.

बुरोंडकर यांनी आंब्याच्या जुन्या व खूप घनदाट बागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठीचे तंत्रज्ञान 1998 मध्ये विकसित करण्यात मोलाची भूमिका पार पाडली. अशा बागांमधील वृक्षांची उत्पादकतेत लक्षणीय घट त्यांच्या घनदाटपणामुळे, सूर्यप्रकाशाअभावी झालेली असते. त्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना दुपटीपेक्षा जास्त उत्पादन मिळू लागले. परिणामत: ते शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरले. त्या तंत्रज्ञानाच्या अवलंबनासाठी विशेष अनुदानाची तरतूद राष्ट्रीय फळबाग योजनेमध्ये आहे. एकाच हंगामात आंबा झाडाच्या शेंड्यातून पुन्हा पुन्हा येणाऱ्या मोहरामुळे फळांची गळ होते. बुरोंडकर यांनी गळ थांबवण्यासाठी ‘जिब्रीलीन्स’ या संजीवकाच्या पन्नास पीपीएम तीव्रतेच्या दोन फवारण्या हंगामाच्या पहिल्या मोहरावर करण्याची शिफारस केली. ती जगन्मान्य झाली आहे. बुरोंडकर यांनी जागतिक बँक पुरस्कृत आंबा पिकावरील एन.ए.आय.पी. प्रकल्पासाठी तीन आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचे ‘प्रमुख/उपप्रमुख संशोधक’ म्हणून बजावलेली कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी सातत्यपूर्ण आंबा उत्पादनासाठी पंचसूत्रीची निर्मिती केली आहे.

आंब्याबाबत एकूणच त्यांच्या शिफारशी या संशोधन व शेती, दोन्ही ठिकाणी उपयोगी ठरल्या आहेत. हापूस आंब्याचे उत्पादन व प्रत वाढवण्यासाठी; तसेच, फळातील साक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी स्फुरदाची मात्रा, उगम व देण्याची वेळ; तसेच, त्यांनी केलेली सल्फेट ऑफ पोटॅश आणि पोटॅशियम नायट्रेटच्या माध्यमातून नत्र, पालाश यांच्या मात्रेबरोबर देण्याची ठोस शिफारस उपयुक्त ठरली आहे. बुरोंडकर व त्यांचे सहकारी यांनी हापूस आंबा फळांची पिकण्याची क्रिया आठ ते दहा दिवस लांबवून फळांचा एकूण कालावधी सव्वीस ते अठ्ठावीस दिवसांपर्यंत वाढवता येणे शक्य असल्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यासाठी त्यांनी मिथाईल सायक्लोप्रोपेन या संजीवकाचा वापर सुचवला आहे. ते संशोधन आंबा उत्पादक व निर्यातदार शेतकऱ्यांसाठी विकासमार्गावरील मैलाचा दगड ठरले आहे. बुरोंडकर व त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ यांनी कमाल केली ती हापूस आंब्यातील फळे न कापता आतील साका ओळखून व साकाग्रस्त फळे वेचण्याचे स्वयंचलित उपकरण विकसित करण्यामध्ये ! ते उपकरण नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त अचूकपणे साकाग्रस्त फळे ओळखण्यास सक्षम ठरले आहे. त्याची व्यापारी तत्त्वावर वापरासाठी कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे देशाला आंबा निर्यातीतून मोठे चलन उपलब्ध होऊ शकेल.

बुरोंडकर हे जपानला वाफ प्रक्रिया संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक होते. ती प्रक्रिया फळमाशी विरहित आंबा निर्यातीसाठी अनिवार्य असते. आंबा पीक प्रक्रिया करण्यापूर्वी किमान तीन दिवस आधी काढण्याची शिफारस त्यात करण्यात आली आहे. त्यामुळे फळांच्या दर्ज्यावर विपरीत परिणाम होत नाहीच; त्याच वेळी, फळमाशीचे पूर्ण नियंत्रणच होते आणि फळातील साका व देठकुजव्या रोग यांचे प्रमाणही ताब्यात राहते. त्यामुळे ते तंत्रज्ञानही उपयुक्त ठरले आहे.

कोकणात समुद्रालगत जांभ्या खडकात आंब्याच्या बागांमध्ये आंब्याचा मोहोर आणि फळधारणा दोन ते अडीच महिने आधी मिळण्यासाठी पॅक्लोब्युट्रॉझॉल (पंचवीस टक्के द्रव्य स्वरूपात) 2.5 मिलिलीटर प्रती मीटर झाडाच्या व्यासाप्रमाणे 15 मे ते 15 जून (पाण्याची सोय असल्यास) या कालावधीत जमिनीतून देण्याच्या त्यांनी ‘प्रमुख संशोधक’ म्हणून केलेल्या नव्या शिफारशीस मान्यता मिळाली आहे.

त्यांनी अकरा पदव्युत्तर आणि पाच आचार्य (पीएच डी) पदवी विद्यार्थ्यांचे ‘मार्गदर्शक’ म्हणून काम केले आहे. त्यांनी थायलंड, चीन या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय आंबा परिषदांत सहभाग नोंदवून तेथे पाच संशोधनपर लेख सादर केले आहेत. त्यांनी संशोधनपर लेख आंबा कार्यशाळांमध्ये, बारा व राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये पंधरा सादर केले आहेत. त्यांनी पाच आधुनिक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. बुरोंडकर यांचे सारांश लेख आंतरराष्ट्रीय पुस्तिकांमध्ये चौतीस, त्यांचे लेख आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सव्वीस, राष्ट्रीय परिसंवादांमध्ये तेवीस, विस्तारविषयक तीस, पुस्तकांमध्ये दोन प्रकाशित झाले आहेत. तसेच, त्यांची तीन पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे रेडिओ/दूरदर्शनवर कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत.

त्यांनी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यातील चाळीस शेतकऱ्यांच्या युरोप अभ्यास दौऱ्यात जर्मनी, हॉलंड, ऑस्ट्रिया, बेल्जियम आणि स्वित्झर्लंड येथे काम केले आहे. त्यांना आंब्याच्या ‘सिंधू’ जातीच्या निर्मितीकरता ‘फाय फाऊंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार’ मनमोहन सिंह यांच्या हस्ते 1993 मध्ये प्रदान करण्यात आला. त्यांचा गौरव कोकणातील उद्यान निर्मितीसाठी 1997 मध्ये राज्य स्तरावरील ‘आबासाहेब कुबल पुरस्कार’, ‘झी-मीडिया ग्रूपचा 2015 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार’, विद्यापीठ स्तरावरील ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ देऊन करण्यात आलेला आहे. त्यांनी त्यांचा आगळावेगळा ठसा आदर्श शिक्षक, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार कार्यातील प्रसारक असा उमटवला आहे.

मुराद यांचा अंत कोविडच्या दुसऱ्या लाटेत, कोल्हापूरच्या रुग्णालयात झाला. त्यावेळी ते साठ वर्षांचे होते. ते तरुण पिढीचे मित्र, सल्लागार आणि दूरदर्शी विचार करणारे होते. ते ज्यांना मदत, सल्ला किंवा मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध असत. त्यांचा मुलगा नाबिद हा पुन्हा व्यापारी जहाजावर खलाशी आहे.

– संजय भावे 9422556565 sg_bhave@rediffmail.com

(‘माय कोकण’वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

—————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here