मुणगे गावचा आध्यात्मिक वारसा!

मुणगे हे मालवण आणि देवगड तालुक्याच्या सीमेवरील गाव. ते मोडते देवगड तालुक्यात. गावाच्या एका बाजूस अथांग अरबी समुद्र असून सागरी महामार्गावरून आचरे ते कुणकेश्वर असा प्रवास करताना भाविक, पर्यटक मुणगे गावात क्षणभर थांबतात आणि ग्रामदैवत भगवतीदेवीचे दर्शन घेतात. भगवती मंदिर अगदी मार्गालगत आहे.

मुणगे गाव आडबंदरवाडी, देऊळवाडी, बांबरवाडी, सावंतवाडी, बौद्धवाडी, सडेवाडी, भंडारवाडी, लब्देवाडी, आडवळवाडी, आपईवाडी, कारिवणेवाडी, वाघोळीवाडी अशा वाड्यांनी बनलेले आहे. ते आंबा बागांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व खासदार भालचंद्र मुणगेकर यांची ती जन्मभूमी.

गावात मुणगे व आडबंदर ही दोन महसुली गावे आहेत. ग्रामपंचायतीची स्थापना १२ एप्रिल १९४१ रोजी झाली आहे. गावाची लोकसंख्या २६०७ असून त्यामध्ये पुरुष १२५२ व स्त्रिया १३५५ आहेत. मतदान करणारे एकूण मतदार १६२६. त्यामध्ये पुरुष ७५० तर स्त्रिया ८७६ . गावाचे क्षेत्रफळ दोन हजार हेक्टर आहे. पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक पाच तर खासगी पंचाहत्तर विहिरी आहेत. तसेच, दोन नळपाणी योजना आहेत. सौर पथदीप सदुसष्ट आहेत. अडतीस ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबवण्यात आले आहेत. तर दहा ठिकाणी गांडूळखत प्रकल्प आहेत. गावाला समुद्रकिनारा लाभल्याने त्या ठिकाणी मच्छीमारीसुद्धा हंगामानुसार चालते. तेथे रापण संघाद्वारे मच्छिमारी केली जाते. सहा अंगणवाड्या, आठ प्राथमिक शाळा, पाचवी ते दहावीसाठी श्रीदेवी भगवती हायस्कूल; तसेच, तांत्रिक शिक्षण देणारे ज्युनियर कॉलेज आहे. एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, रेशन दुकान, तलाठी कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी सोसायटी, पोस्ट ऑफिस, सार्वजनिक वाचनालय आहे.

डोंगराची भक्कम साथ आणि काही अंतरावर अरबी समुद्र साथीला घेऊन भक्तांसाठी उभी आहे ती शक्तिदायिनी देवी भगवती. त्यामुळे मुणगे गावात वातावरण धार्मिक आहे. ग्रामस्थांची श्रद्धा असलेली देवी भगवती म्हणजे एक शक्तिस्थान बनले आहे! भाविक, पर्यटक यांचा राबता नेहमी या मंदिरामध्ये दृष्टीस पडतो. मंदिर आवारात अनभवाणी, पावणी, ब्राह्यणदेव, देव गांगो, देव भावय, जैन गाय गरब ही आद्यस्थाने आहेत. मुख्य देवालय देवी भगवतीसह बायची देवी, श्री देवी कांबर, श्री देव ब्राह्मण (आडवळवाडी), विठ्ठलमंदिर (आपयवाडी), भगवती चव्हाटा मंदिर (आडबंदर) श्रीदेव काळकाई, श्रीदेव पटेल (बांबरवाडी), श्रीदेव ब्राह्मण (कारीवणे वाडी), श्रीदेव बेळेपान आदी देवालये आहेत.

मुणगे गावाच्या कारीवणे वाडीतील पाडावे यांच्या घरी देवी भगवतीचे माहेर आहे. दर तीन वर्षानी देवी भगवती माहेरस्वारीसाठी पाडावे यांच्या घरी जाते. त्या सोहळ्यासह डाळपस्वारीचा सोहळासुद्धा अविस्मरणीय असतो. सर्वात मोठा उत्सव म्हणजे वार्षिक यात्रोत्सव होय. तो पौष पौर्णिमेस चालू होतो व पाच दिवस चालतो. गावाला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटकांची पावले आपसूकच त्या ठिकाणी वळतात. विशेषत: सुट्टीच्या हंगामात अनेक पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर भटकंतीसाठी येतात. त्यांना भगवतीदर्शन हे उत्तम निमित्त ठरते. तेथील सूर्यास्त विशेष रमणीय असतो.

गावच्या जडणघडणीत श्रीभगवती हायस्कूलचा मोलाचा वाटा आहे. दातृत्वाचा महामेरू अशी बिरुदावली देण्यात आलेल्या कै. बापूसाहेब पंतवालावलकर यांच्या दूरदृष्टीमुळेच गावात माध्यमिक शिक्षणाची सोय भगवती हायस्कूलच्या रूपाने झाली व पंचक्रोशीमध्ये ते गाव नावारूपास आले. गावाचे अर्थकारण मुख्यत: आंबा बागायतीवर अवलंबून आहे.

पाणलोट विकास योजने अंतर्गत भगवती मंदिरालगत झरा बळकटीकरण बंधारा, कारीवणेवाडी झरा बळकटीकरण, आडबंदर कारीवणेवाडी बंधारा बळकटीकरण आदी विकासकामे करण्यात आली आहेत. विविध क्षेत्रांत त्या गावातील व्यक्ती कार्यरत आहेत. एक शांत गाव म्हणून मुणगे गावची ओळख आहे.

– झुंजार पेडणेकर

(मूळ लेख, दैनिक प्रहार, ०५ फेब्रुवारी २०१४)

About Post Author