मुंबईची तटबंदी

-fort

पोर्तुगीजांनी इसवी सन 1686-1743 च्या दरम्यान बांधलेली फोर्टमधील वसाहत उंच तटबंदीने घेरलेली होती. फोर्ट परिसरात खासगी वापरासाठी व व्यावसायिक कार्यालयांसाठी जागा कमी पडू लागली; मात्र त्याचा विस्तार करणे शक्य नव्हते. ब्रिटिश राजवट भारतात 1858 मध्ये सुरू झाली. ब्रिटिश सरकारने सर बार्टल फ्रियर या महत्त्वाकांक्षी व दूरदर्शी प्रशासकाची मुंबईचा गव्हर्नर म्हणून 1862 मध्ये नियुक्ती केली. गव्हर्नर फ्रियरने परिस्थितीचा अंदाज घेऊन तटबंदी पाडून परिसर विस्तार योजना आखली व ती कार्यान्वित केली. तो 1867 पर्यंत पाच वर्षें त्या पदावर राहिला. त्याने त्या कारकिर्दीत भविष्याचा अचूक वेध घेऊन सार्वजनिक व प्रशासकीय इमारतींसोबत टाउन हॉल, सिनेमा, नाट्यगृहे, वाहतूक बेट, उद्याने, खुली मैदाने, फाउंटन, पाणपोई अशा इमारती बांधल्या. आधुनिक मुंबईच्या विस्ताराचा पाया त्या करारी गव्हर्नरने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळेच घातला गेला. त्याचे निधन 28 मे 1884 रोजी झाले.

फोर्ट तटबंदीस तीन प्रवेशद्वारे होती – पहिले बझार गेट व दुसरे लॉयन गेट, तिसरे प्रवेशद्वार फोर्टमधील सेंट थॉमस चर्चसमोर असल्यामुळे त्यास चर्चगेट असे नाव पडले. तेच नाव पुढे उपनगरी रेल्वे स्थानकास देण्यात आले. नव्या विस्तार योजनेनुसार तटबंदीसहित प्रवेशद्वारेही पाडण्यात आली. प्रत्येक प्रवेशद्वारासमोर मोठ्या आकारातील वाहतूक बेट तयार झाले. त्या विकासामुळे पाच वर्षांत मुंबईला नवा चेहरा मिळाला. महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख खात्यात सर बार्टल फ्रियर यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण कागदपत्रांचे जतन केले गेले आहे. चर्चसमोरील प्रवेशद्वाराच्या मूळ जागेवर त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक पाहता ते शिल्प राणीच्या बागेत (व्हिक्टोरिया गार्डन) ठेवण्यासाठी बनवले होते. परंतु फ्लोरा फाउंटन या नावानेच त्याचे उद्घाटन करण्यात आले!

 

हा ही लेख वाचा –
फ्लोरा फाउंटन मुंबई फोर्टचे वास्तुवैभव 

नवीन आराखड्यानुसार व्हिक्टोरिया टर्मिनस (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), चर्चगेट व अपोलो गेटसमोरील रस्त्यांवर मोठ्या आकारातील जंक्शन्स तयार झाली. त्या प्रत्येक जंक्शन्सवर चारपेक्षा अधिक रस्ते आहेत, इंग्लंडमध्ये तशा जागेस ‘सर्कल’ म्हणण्याचा प्रघात आहे. त्यानुसार ती स्थाने व्हीटी, फ्लोरा फाउंटन, काळा घोडा वेलिंग्टन फाउंटन, हॉर्निमन सर्कल इत्यादी नावांनी ओळखली जातात. त्या जंक्शन्संना स्थानिक प्रशासनाने 1960 नंतर एतद्देशीय मान्यवरांची नावे देऊन त्यापुढे ‘चौक’ असे नामकरण केले आहे. मात्र त्या जागा जुन्या नावांनीच ओळखल्या जातात. त्यावरून जनसामान्यांच्या मनातील पुरातन मुंबई स्थापत्यविषयक स्थानांची ओळख किती घट्ट आहे ते दिसून येते. ती जंक्शन्स ब्रिटिश काळापासून ते आजतागायत दक्षिण मुंबईतील मुंबईची ‘शक्तिस्थाने’ बनून राहिली आहेत. त्यापैकी फ्लोरा फाउंटनचे अनन्यसाधारण महत्त्व आजही टिकून आहे!

flora-fountainसध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व श्यामाप्रसाद मुखर्जी चौक यांच्या मध्यावरील फ्लोरा फाउंटन जंक्शन सर्वांत मोठे आहे. त्या जंक्शनला इतर जंक्शन्सपेक्षा अधिक लोक भेट देतात व त्याची सामावून घेण्याची क्षमतादेखील अधिक आहे. त्या दूरदृष्टीचे श्रेय गव्हर्नर फ्रियर व तत्कालीन वास्तुविशारद यांना द्यावे लागेल! त्या परिसरात 1960 पर्यंत अप्रतिम संगमरवरी पुतळ्यांची रेलचेल होती. त्यांपैकी नगर चौकातील राणी व्हिक्टोरिया आणि एस्प्लेनेड जंक्शनवरील काळा घोडा व आसपासचे पुतळे वेगवेगळ्या कारणांनी हटवले गेले. ज्या गव्हर्नरने पाच वर्षांत प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर मुंबईला दर्जेदार शहर बनवले, त्याचे नावही फाउंटनला दिले गेले नाही. ज्या एतद्देशीयांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अवघे जीवन खर्ची घातले, ते समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व प्रो. गोपाळ कृष्ण गोखले यांचे पुतळे ओव्हल व क्रॉस मैदानाला लागून उभे केले गेले आहेत. त्या पुतळ्यांची दखल ना वर्तमान स्थानिक प्रशासनाकडून घेतली जाते, ना नागरिकांकडून!

गव्हर्नर फ्रियरने सन 1862 मध्ये घेतलेल्या निर्णयामुळे तटबंदी व तीन प्रवेशद्वारांचे अस्तित्वच नाहीसे झाले. त्या संदर्भातील बातमी ऐकून निराश झालेले ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे तत्कालीन संपादक स्टेनली रोड म्हणतात, ”त्या प्रसंगाच्या आठवणीने मन व्यथित होते. ज्या पुरातन स्थापत्याशी आम्ही जोडले गेलो होतो, ती शृंखलाच आम्ही तोडून टाकली आहे. अरे! निदान एक दरवाजा तरी आठवण म्हणून जतन करायला हवा होता!” एका ब्रिटिश संपादकाने भारतातील पुरातन ठेव्यासंबंधी व्यक्त केलेली संवेदनशीलता खूपच बोलकी आहे. न तटबंदीचे काही अवशेष सेंट जॉर्ज हॉस्पिटलशेजारील पी. डीमेलो रोडवर शिल्लक आहेत; पण प्रवेशद्वार आठवणीच्या रूपाने फ्लोरा फाउंटनसारखी वैभवशाली वास्तू आठवण म्हणून एका वेगळ्या स्वरूपात उभी आहे.

मुंबईतील विकास व गतिमान जीवनशैलीमुळे दिवसेंदिवस शहरसौंदर्य व पुरातन ठेव्यात घट होत चालली आहे. त्याच सुंदर परिसराची साक्ष असलेले एस्प्लेनेड कोर्ट अति दुर्लक्ष केल्यामुळे पाडले जाणार आहे. तेव्हा मुंबईतील पुरातन वास्तूंचे जतन, संवर्धन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी केंद्र, राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांनी विशेष राखीव निधीची व्यवस्था करण्याची गरज आहे. जेणेकरून पुरातन सौंदर्याचे दाखले अधिक काळ टिकून राहतील. खऱ्या अर्थाने वैभवशाली पुरातन इमारतीच मुंबईची शान आहेत आणि हीच या शहराची खरी ओळख टिकून राहायला हवी.

– चंद्रशेखर बुरांडे 9819225101
fifthwall123@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. बार्टल फ्रिअरचा पूर्णाकृती…
    बार्टल फ्रिअरचा पूर्णाकृती पुतळा एशियाटीक लायब्ररीत मौदूद आहे.

Comments are closed.