मुंबईचा खडा पारसी

2
77

मुंबईत जे.जे. हॉस्पिटलकडून भायखळा रेल्वे स्टेशनकडे येताना रेल्वेवरील पूल संपला, की उजव्या हाताला लव्हलेन लागते. त्या रस्त्याच्या तोंडावर मध्यभागी उत्तुंग उंचीचा कलात्मक पुतळा उभारण्यात आला होता ‘त्याचं नाव खडा पारसी’. तो पुतळा मुंबईतील धनाढ्य पारशी व्यापारी करसेटजी माणेकजी श्रॉफ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वंशजांनी मुंबई महापालिकेला पैसा देऊन भायखळ्याच्या भरवस्तीत उभारला होता. माणेकजी यांच्‍या लहान मुलाने एके ठिकाणी प्रदर्शनीय कारंजा पाहिला. त्यानंतर त्‍याने 1875 मध्‍ये माणेकजी यांचे त्‍याच पद्धतीचे स्‍मारक बांधले.

पारशी पेहरावातील उंच स्तंभावर उभारलेला पुतळा ‘उभा पारशी’ नावाने नाही, तर हिंदीतील ‘खडा’ या शब्दाने ओळखला जाऊ लागला. जनसामान्यांनी त्याला खडा पारशी म्हणायला सुरुवात केली.

करसेटजी माणेकजी यांचा तो कांरजासहचा पुतळा बेलासीस मार्ग, क्लेअर मार्ग, डंकन मार्ग आणि रिपॅन मार्ग या जंक्शनवर आहे. पोलादात घडवलेला तो पुतळा नितांत कलात्मक आणि सौंदर्यपूर्ण आहे. स्तंभांच्या पायथ्याला चार दिशांना कमरेखालील भाग तारुण्याने मुसमुसलेल्या चार युवतींचा तर मागील भाग मत्स्याचा ठेवून त्या युवती हातात आखूड तुतारीसारखे वाद्य वाजवताना दाखवल्या आहेत. मात्र पुतळ्याच्‍या पायथ्‍याशी असलेले कांरजे रस्‍त्‍याखाली गाडले गेले आहे. पुतळ्याच्या खालील स्तंभही त्यांच्यावरील दोन चौथ-यांवर कोरीव नक्षीकाम करून सजवले आहे. स्तंभावरही नक्षीकाम करण्यात आले आहे. पुतळ्याच्या पायथ्याला असलेला चौथराही नक्षीकामाने आकर्षक करण्यात आलेला आहे.

पावसाळ्यात वर्षानुवर्षे पाण्याने भिजून पुतळ्यातील धातू गंजू लागला आहे. स्‍मारकाचे काही लहान भाग निखळले असून काही सांधे तुटले आहेत. मुंबई महापालिकेने 2012 साली तो पुतळा हलवून राणीची बाग अथवा दादर येथील फाईव्‍ह गार्डन येथे स्‍थलांतरीत करण्‍याच्‍या हालचाली सुरू केल्‍या होत्‍या. मात्र हेरिटेज कमिटीने त्‍यास हरकत घेतल्‍यानंतर तो निर्णय रद्द करण्‍यात आला.

करसेटजी माणेकजी हे गिरगाव चौपाटीसमोर बंगला बांधून राहत असत. मुंबईत गॅसचे दिवे प्रथम कॉफर्ड मार्केटमध्ये बसवण्यात आले होते. माणेकजी करसेटजी श्रॉफ यांनी स्वखर्चाने गॅसचे दिवे त्यांच्या घरात प्रथम लावले होते. त्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या पुतळ्याच्या खाली चारही बाजूंना गॅसच्या हंड्या लटकावलेल्या होत्या. पण आता, त्या तेथे नाहीत. त्याचे कारण म्हणजे एक तर प्रशासनाचे अज्ञान अथवा पुतळा हलवण्याच्या वेळी त्या फुटल्या असाव्यात. प्रशासनाचे अज्ञान अशासाठी, की त्या गॅसच्या हंड्या पुतळ्याचा अविभाज्य भाग होत्या. त्याची जाणीव नसल्याने त्या लावण्यात आल्या नसाव्यात.

करसेटजी माणेकजी हे गृहस्थ त्या काळातील एक बडे प्रस्थ मानले जात. माणेकजी दोराबजी श्रॉफ यांचे ते तिसरे अपत्य. त्यांचा मुंबईत जन्म इ.स.1764 मध्ये झाला. तेरा वर्षांच्या वयात वडिलांनी करसेटजींना ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा मुख्य अधिकारी असलेल्या अॅलेक्झाण्डर रेम्सेच्या हवाली केले. त्यांची काम करण्याची पद्धत हॅम्सेला आवडली आणि त्याने एका व्यापा-याबरोबर त्याला व्यापार करण्यास पाठवले.

 

पठ्ठे बापूराव यांच्‍या 'मुंबईच्‍या लावणी'पासून नामदेव ढसाळ यांच्‍या कवितांपर्यंत अनेक कथा, कादंब-या आणि मुंबईची माहिती देणा-या पुस्‍तकांमध्‍ये 'खडा पारसी'चा उल्‍लेख आहे.

– सुहास सोनावणे
 

About Post Author

Previous articleनईमभाई पठाण – पुरातन वस्तूंचे संग्राहक
Next articleतांबवे गावची वज्रेश्वरी देवी
सुहास सोनावणे हे मुंबईचे रहिवाशी. ते गेल्या तीस वर्षांपासून वृत्तपत्रे, मासिके यांमधून लेखन करतात. ते जुन्या मुंबईचे अभ्यासक आहे. त्‍या विषयावर त्‍यांनी विविध नियतकालिकांमधून लेखन केले आहे. सुहास सोनावणे यांचे 'मुंबई-कालची' हे पुस्तक प्रसिद्ध आहे, तर 'पुसलेली मुंबई' हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्‍यांच्या चळवळी' या विषयाचा अभ्यास केला आहे. त्‍यांनी आंबेडकरांसंदर्भात 'सत्याग्रही आंबेडकर', 'शब्द फुलांची संजीवनी', 'ग्रंथकार भीमराव', 'बहु आयामी आंबेडकर', आणि 'डॉ. आंबेडकर आणि समकालीन' ही पाच पुस्तके लिहिली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9920801602

2 COMMENTS

  1. स्तंभांच्या पायथ्याला चार
    स्तंभांच्या पायथ्याला चार दिशांना कमरेखालील भाग तारुण्याने मुसमुसलेल्या चार युवतींचा तर मागील भाग मत्स्याचा ठेवून त्या युवती हातात आखूड तुतारीसारखे वाद्य वाजवताना दाखवल्या आहेत.

    कमरेखालील भाग तारुण्याने मुसमुसलेल्या….? फारच बारकाईने केलेलं आहे वर्णन ! 😀 😀

    माहितीपूर्ण लेख आहे. त्याबद्दल आभारी आहे.

    – सुबोध केंभावी
    subkem@gmail.com

Comments are closed.