मी महाराष्ट्राचा – महाराष्ट्र माझा !

0
37

राज श्रीकांत ठाकरे. जन्म 14 जून 1968. एक युवा नेतृत्त्व, एक कलाकार, मित्रांचा मित्र, रसिक, जे.जे.स्कूल ऑफ आर्टस चा विद्यार्थी, व्यंगचित्रकार म्हणून लौकिक पावलेले हे नाव. व्यंगचित्राकलेबरोबरच राजकारणाचे धडे घरीच आपल्या काकांकडून (बाळासाहेब ठाकरे) घेतलेला हा तरूण.

शिवसेनेत असताना आणि नसतानाही जी मोजकी माणसे कायम चर्चेत असतात त्यांपैकी राज ठाकरे हे एक. राज हे उत्तम व्यंगचित्रकार असल्याने बहुधा बेधडक भाष्यकार, बोचरे टीकाकार, विरोधकांच्या  फिरक्या घेणारे असे आहेत. राज राजकारणातही आत्मविश्र्वासाने उतरले आणि  त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ ही तंत्र पक्षसंघटना काढून राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांचे राजकीय जीवन अनेक वादग्रस्त घटनांनी भरलेले आहे.

राज यांना चित्रपटांची आवड आहे. भविष्यात; कॉलेजमध्ये असल्यापासून करायची आवड आहे. त्यांनी बेकार तरुणांचा नागपुरात मोर्चा काढला. 2000 साली तरूणांना प्रेरक, मार्गदर्शक असा भव्य कार्यक्रम पुण्यात घेतला- ‘झीरो टू हीरो’. राज ठाकरे ह्यांचे नेतृत्त्व कौशल्य लक्षात घेऊन बाळासाहेबांनी ‘विद्यार्थी सेने’ची संपूर्ण जबाबदारी ह्यांच्यावर सोपवली व ती त्यांनी समर्थपणे पेलली. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यी संघटन करून त्यांना प्रोत्साहन दिले, प्रेरित केले, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. विद्यार्थी हा इतर राजकारण्यांच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेला घटक. पण प्रचंड ऊर्जा असलेली ही शक्ती आपल्या कुशल नेतृत्वाने केली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबरोबर महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांचा प्रश्न हाताळताना शैक्षणिक, चर्चासत्रे, प्रशिक्षण वर्ग आयोजित करून बेरोजगारांचा बौध्दिक विकास करण्याबरोबरीने त्यांस रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या ‘शिव उद्योग सेने’ च्या  माध्यमातून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांचा प्रश्न यशस्वीपणे हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद, मी मुंबईकर मोहीम, परप्रांतीयांचे अतिक्रमण, मराठी माणसांच्या नोक-यांचे प्रश्न (मराठी अस्मिता), भुमिपुत्रांचे हक्क इत्यादी उपक्रमांत राज ठाकरेंचा सहभाग असतो.

‘आम्ही कसे घडलो!’ हा मान्यवरांच्या अनुभवांचे बोल युवकांना अनुभवण्याची संधी देणारा कार्यक्रम असेल अथवा ‘जिगर 2000’ सारखा महाराष्ट्रव्यापी कार्यक्रम असेल, अशा दिशादर्शक कार्यक्रमांच्या आयोजनामधून तमाम मराठी तरूणांमध्ये नवी उमेद, धडाडी, जिगर निर्माण करून त्यांना दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य राज ठाकरे यांनी केले आहे. मराठी मनामध्ये असणारा ‘न्युनगंड’ कमी करून व्यावसायिक दृष्टी आणणारा मराठी तरूण निर्माण करण्यामध्ये राज ठाकरे यांचा कटाक्ष आहे. पक्षांतर्गत राजकारणामध्ये होणारी घुसमट मराठी माणसाला घडवण्यासाठी उराशी बाळगलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणताना होणारी पक्षांतर्गत कुचंबणा, स्वत:सोबत असंख्य कार्यकर्त्यांच्या विचारांची कोंडी होत आहे हे वारंवार बोचणारे शल्य इत्यादी बाबींचा विचार करता यातून नवनिर्माणाचा मार्ग शोधता शोधता, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या राजकीय पक्षाचा जन्म 9 मार्च 2006 रोजी झाला.

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ एका युवा नेत्याच्या कल्पनाविष्कारातून जन्माला आलेला अन् महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची स्वप्ने महाराष्ट्रीय जनतेस दाखवणारा राजकीय पक्ष आहे पक्ष नवीन आहे. भोवताली सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांचे जंजाळ आहे. अशा स्थितीतही नवे मार्ग शोधण्याची धडपड उल्लेखनीय रीत्या सुरू आहे. प्रस्थापित नेतृत्त्वाच्या मागे न लागता महाराष्ट्राला विकासाची ओळख करुन देण्यासाठी आवश्यक असणा-या वाटा शोधण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वत: आपल्या परीने करत आहे.

ग्रामीण महाराष्ट्रातील पाणी, वीज, रस्ते, शेती, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासोबतच सुंदर, स्वच्छ, विकसित आणि आधुनिक शहरे निर्माण करणे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्राथमिकता आहे. विकासाची फळे तळागाळातल्या माणसांपर्यंत पोचवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटिबध्द असून, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी स्वत:सोबत आपल्या मराठी बांधवांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना विविध क्षेत्रांत रोजगार व निर्मितीसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रांत जनजागृती करून एक संवेदनशील मराठी माणूस घडवणे यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्राधान्य देणार आहे. महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकीत मोठया संख्येने निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांची संख्या पाहता महाराष्ट्राने राज ठाकरेंवर दाखवलेल्या विश्वासाची प्रचीती येते.
विविध क्षेत्रांतील तसेच विविध वयोगटातील मित्रांचा गोतावळा असणारे  राज ठाकरे व्यक्तिगत जीवनात ‘मित्रांचा मित्र’ म्हणून ओळखले जातात. शिवाजी महाराजांच्या अडीचशे गडकोटांच्या चाळीस हजार छायाचित्रांच्या भव्य प्रदर्शनाची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मध्ये नोंद होण्यासाठी तरुणांच्या धडपडींमध्ये काही कमतरता राहणार नाही. यासाठी दक्ष असणारा राज, मराठी युवकांमध्ये मराठी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असणारा राज, आपल्या आदरणीय नेत्याचा जीवनपट जगाला उलगडून दाखवण्यासाठी ‘बाळ केशव ठाकरे-अ फोटोबायोग्रफी’ हे पुस्तक जिद्दीने व चिकाटीने पूर्ण करणारा राज, पैशांअभावी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता असूनही परदेशी स्पर्धेला मुकणा-या खेळाडूला सर्वतोपरी साहाय्य करणारा राज…. राज ठाकरे यांच्या स्वभावाच्या विविध छटा आपणास पहावयास मिळतात.

एकूणच ‘राजकारण’ असो वा ‘मैत्री’, जे करू ते संपूर्ण निष्ठेने, एकग्रतेने व कौशल्याने करण्याची हातोटी राज ठाकरेंना लाभली आहे. मराठी युवकांना प्रोत्साहन, पाठिंबा देणारा हा ख-या अर्थाने मराठी युवकांचा युवक प्रतिनिधी असल्याची प्रचीती क्षणोक्षणी दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे असे मानणा-या काही मोजक्या राजकारण्यांमध्ये राज ठाकरे यांचा क्रमांक निश्चितच अव्वल आहे. मला रिमोट कंट्रोल किंवा सॅटेलाईट व्हायला आवडेल हे त्यांचे एका मुलाखतीतील उद्गार त्यांच्या कर्तृत्वाचे सूचक आहेत.

– प्रसाद क्षीरसागर

About Post Author

Previous articleसंयुक्त महाराष्ट्रात जातींचे प्रश्न !
Next articleतुरुंगातले काव्य
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्‍या राहणा-या. त्‍यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर त्‍या ‘वनवासी कल्‍याणाश्रम‘ या संस्‍थेत काम करू लागल्या. ईशान्‍य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्‍यांच्‍यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्‍यांच्‍या आयुष्‍याचा भाग होऊन गेला आहे. त्‍यांनी ईशान्‍य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्‍येची‘ हे पुस्‍तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.