एक बाब सुरुवातीलाच स्पष्ट करून सांगतो. वर्तमानपत्रांचा नाद असा मला नाही. खूळ तर नाहीच नाही. माझ्या घरी जी दैनिके येतात, ती मी चाळतो; थोडीशी मतलबापुरती वाचतो. त्यांच्यात फार गुंतत नाही. मी राजकीय बाबींवरील अग्रलेख सफाईने टाळतो. मात्र प्रकरण उत्कट असेल किंवा मूलभूत मानवी हक्कांबद्दल असेल, तर त्या अग्रलेखाचे वाचन शांतचित्ताने करून विषय समजावून घेतो. गोविंद तळवलकर यांच्या घणाघाती शैलीने मला असा आनंद अनेक वेळा दिलेला आहे. फार फार पूर्वी प्रभाकर पाध्ये यांच्या तीव्र स्वरातील अग्रलेखांनी त्याच जातकुळीतील आनंद दिला होता.
तथापि, दैनिकांची वाट पाहणाऱ्यांपैकी मी नव्हेच नव्हे. दैनिके चार दिवस दिसली नाहीत तर माझे मन बिलकुल अस्वस्थ होणार नाही. अनेकदा, वर्तमानपत्र घरात येऊनही मी इतर व्यापांमुळे त्यांच्याकडे पाहतसुद्धा नाही. एक तर, रोज सकाळी घड्याळ लावण्याच्या निमित्ताने मी पुण्याहून प्रसारित होणाऱ्या सात पाचच्या प्रादेशिक बातम्या ऐकतो. तेवढे मला पुरेसे असते. मी माझी मते दुसऱ्यांनी केलेल्या पढिक भाष्यावरून किंवा वर्तवलेल्या भाकितांवरून बनवत नाही. ते दूधखुळेपण माझ्यापाशी नाही. तरीसुद्धा वाङ्मयीन बातम्यांसाठी आणि निसर्गक्रमाबद्दल व पर्यावरणाबद्दल कोठे काही महत्त्वाचे आले तर ते मी झडप घालून वाचतो; इतकेच नव्हे तर ते कात्रणही मी काढून ठेवतो. जवळपास एक हजार महत्त्वाच्या कात्रणांचा विस्कळीत संग्रह माझ्यापाशी आहे. त्यात घटनांची माहिती आहे. वाङ्मयीन तसेच निसर्गाबद्दल कौतुक आहे. ह्या संग्रहाचे काय करायचे हा प्रश्नच माझ्यापुढे आहे.
गेल्या अर्धशतकात मी जी काही वर्तमानपत्रे वाचली, त्यात तीन संपादकांची शैली मला अप्रतिम वाटली: फ्रँक मोराईस, रावसाहेब पटवर्धन आणि ग. प्र. प्रधान. त्यांच्यात अभिजात असा खानदानीपणा आहे. भाषाप्रभुत्व असामान्य आहे. विचारांना नैतिक अधिष्ठान आहे. आविष्कार सौम्य आहे. आवाहन आहे. आव्हान नाहीच आणि आग्रहाचे नावच नाही. तसे घरंदाज लेखन मला भुरळ घालते. प्रधान यांचा ‘साधना’मधील अग्रलेख मी कधीच चुकवत नाही. त्यांच्यात सौजन्य, समतोल आणि वैचारिक परिपक्वता यांचा सुमेळ आहे. आग्रही लेखनाला मी स्पर्शच करत नाही. माझा अढळ विश्वास वैचारिक प्रबोधनावर आहे. मर्म सांगण्याची हातोटी म्हणून लंडनच्या ‘टाइम्स’कडे आणि ‘इंडिपेंडंट’कडे बोट दाखवता येईल. मी ती दोन्ही दैनिके ब्रिटिश कौन्सिलमध्ये उन्हातानातून जाऊन लक्षपूर्वक चाळतो. त्यातील ‘ऑबिच्युअरी’ज कटाक्षाने वाचतो. प्रसंगी, त्यांची टिपणे काढतो किंवा त्या कात्रणांच्या झेरॉक्स प्रती संग्रही ठेवतो. ती कात्रणे हा माझ्या बऱ्याचशा ललित लेखांचा पाया आहे. ती बीजे आहेत. प्रकाश, पाणी, माती अर्थात माझी !
मी गिरगावात, गरीब ब्राह्मणी वस्तीत लहानाचा मोठा झालो. राहाळातील सगळीच कुटुंबे कफल्लक होती. त्यामुळे चाळीत कोणाकडे वर्तमानपत्र आल्याचे आठवत नाही. एवढ्या वस्तीत भाटकर आडनावाच्या, कस्टममध्ये काम करणाऱ्याच्या हातात इंग्रजी ‘टाइम्स’ दिसे. पण मी कधी खुद्द भाटकरांनाही तो वाचताना पाहिलेले नाही, की इतर कोणी त्यांच्याकडून ते वर्तमानपत्र वाचण्यासाठी मागितल्याचेही आठवत नाही. इंग्रजी ‘टाइम्स’ची घडी हातात असणे, तो घरी येणे हा त्या काळी, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळी पगारदार माणसाच्या इज्जतीचा भाग होता. इंग्रजी भाषा सुधारायची असेल तर आम्ही विद्यार्थ्यांनी रोज ‘टाइम्स’ वाचलाच पाहिजे, निदान त्यातील ‘करंट टॉपि क्स’ हे सदर तरी अभ्यासले पाहिजे असे वडीलधारे आप्त आम्हाला सदैव ऐकवत. पण आम्ही ते ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देत असू. तसेच महात्मा गांधी यांचे इंग्रजी सोपे असे त्या काळी म्हणत. म्हणून एकदोनदा हरिजन वाचण्याचा नेट लावला. पण शब्दार्थ कळले नाहीत नि विषय डोक्यावरून गेला ! माझे आईवडील प्राथमिक शिक्षक होते. ते ‘केसरी’ वाचत, ‘नवाकाळ’ वाचत. माझे हात तिथपर्यंत पोचले नाहीत. मॅजेस्टिक चित्रपटगृहासमोर पेंडसेवाडी आहे. तेथे एक मोफत वाचनालय होते. सर्व मंडळी त्या वाचनालयात जाऊन उभ्या उभ्या वर्तमानपत्रे वाचत. ती विकत घेण्याची ऐपत कोणाचीच नसे.
योगायोगाने मी गिरगावात, ठाकूरद्वारात वावरलो. त्यामुळे वर्तमानपत्रांशी संबंधित अशी, धावपळीतील माणसे मला नेहमी दिसत. सेंट्रल सिनेमा शेजारच्या गोरेगावकरांच्या चाळीत आतबाहेर करताना अनंत हरी गद्रे कायम दिसत. पंचावजा आखूड धोतर, अघळपघळ डगला, डोळ्याला चांदीच्या काड्यांचा- गोल भिंगांचा चष्मा आणि टक्कलावर सैल टोपी, हे त्यांचे विशेष. उजव्या हातात कायम विडी असे. डाव्या बगलेत वर्तमानपत्रांचा जुडगा. पायात जुन्या वहाणा. टोपी कधी काळी, कधी तपकिरी, तर कधी भगवी. पुढे पुढे, त्यांनी मनाने संन्यास घेतला. स्वतःला ‘समतानंद’ ही पदवी चिकटवून घेतली आणि त्या काळी अस्पृश्य लेखलेल्या समाजाला सवर्णांशी भिडवायचा घनघोर प्रयत्न केला. त्यांनी सत्यनारायणाच्या पूजा घातल्या आणि त्यासाठी ‘मेहूण’ म्हणून हरिजनांच्या जोडप्यांची योजना केलेली असे. ‘समतानंद’पदी पोचल्यावर ते भगवी कफनी आणि भगवे उपरणे घेऊन वावरायचे. त्यावेळी त्यांचे वय खूप झालेले होते. ते थोर अच्युतराव कोल्हटकर यांचे पट्टशिष्य आणि लोकमान्य टिळक यांचे अभिमानी. पक्के हिंदू महासभावाले, मात्र मुसलमानांचे वैरी नव्हेत. प्रेमीही नव्हेत. ते फक्त माणुसकीवादी होते. दुर्दैवाने जेव्हा त्यांची लेखणी मूक झाली, त्या वेळी मी त्यांना ओळखू लागलो. तसेच ते दैनिकाचे संपादक नव्हते. ‘निर्भीड’ ह्या साप्ताहिकाचे ते मालक-संपादक होते. त्यांचा तो अवतार मला पाहण्यास मिळाला नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती फार ओढगस्तीची होती. चित्रपट व्यावसायिक वाडिया मंडळी अनंतरावांचा दोस्ताना स्मरून त्यांचा घरखर्च करतात असे त्यावेळी बोलले जाई. कारण अनंतरावांची निम्मी आवक रेसकोर्सवर खतम होई.
फार फार पूर्वी, ‘नवशक्ती’च्या संपादकपदी का.म.ताम्हनकर नावाचे अत्यंत बाळबोध, म्हातारेसे गृहस्थ होते. ते मांगलवाडी समोरच्या छत्र्यांच्या कोल्हापुरी चिवड्याच्या उपहारगृहाच्या वर चाळीत राहत. गृहस्थ गरीब आणि हसतमुख. पण त्यांच्या काळात ‘नवशक्ती’ला वाचक होते असे म्हणण्यास पुरावा नाही. ते उतरले आणि त्यांच्या जागी प्रभाकर पाध्ये विराजमान झाले. ताम्हनकर यांचा तो पडतीचा काळ होता. ते काही दिवस कापसाच्या वाती घरात सहाणेवर तयार करून विकत असत, जान्हवी जोड विकून संसाराचा गाडा ओढून नेत असत. पुढे त्यांचे काय झाले, त्याची कल्पना नाही. त्यांची एक हसतमुख, सालस मुलगी आमच्या शाळेत होती. चाळीस वर्षांत तिची दृष्टिभेट नाही.
कोल्हापुरी पायतणे, सोगा सोडलेले धोतर, शर्ट – त्याच्यावर तोकडे रंगीत जाकिट आणि हातात भलीथोरली चामड्याची ऑफिसबॅग असा, त्या वेळच्या संपादक प्रभाकर पाध्ये यांचा एकूण अवतार होता. त्यांचे सर्वच काही उत्कट आणि कोमल होते. ते कोकणातील लांज्याचे, त्यांचे वडील गिरणी कामगार होते. साचा चालवायचे. त्यामुळे ते मी कामगारपुत्र आहे नि अस्सल कोकण्या आहे असे आग्रहाने ऐकवत. मार्क्सचा विरोध-विकास सिद्धांत ते कोळून प्यायलेले होते. त्यांचा पिंड ज्ञानी पंडिताचा होता. ते कट्टर कम्युनिस्ट विरोधक आणि समाजवादी पक्षाचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे आम्ही ‘राष्ट्र सेवा दल’वाल्या पाध्ये यांचे भक्त होतो. पण मला ते त्या काळात केवळ कथाकार म्हणून आदर्श वाटत. ‘व्याधाची चांदणी’ हा त्यांचा कथासंग्रह उत्तम होता. ‘कृष्णकमळीची वेल’ हा त्यांचा दुसरा कथासंग्रह, तो बाजारात आल्यावर त्याची पहिली भोनीची प्रत मी रोख दाम मोजून विकत घेतली होती. ‘मैत्रीण’ ही त्यांची कादंबरीही अगदी वेगळ्या प्रकारची आहे. पाध्ये यांनी पुढे अनेकवार जगप्रवास केला. हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी सौंदर्यशास्त्राचे अध्ययन केले आणि ‘फुटीर मेंदू’चा सिद्धांत जगासमोर मांडला. त्यांनी प्रवासवर्णनांचे चार-पाच संग्रह तयार केले. ते प्रसिद्ध झाले, पण त्यांचा बोलबाला झाला नाही. आपण प्रवासविषयक इतके लिहूनसुद्धा समीक्षकांनी तिकडे दुर्लक्ष केले अशी त्यांची खंत त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केली होती. मात्र पाध्ये यांचे ‘तोकोनाम’ हे जपानविषयक पुस्तक हा ललित लेखनाचा सौष्ठवपूर्ण नमुना आहे.
पाध्ये यांना वादविवाद करण्याची खुमखुमी होती. त्यांचा आवाज बसका नि चिरका होता, तरीही बेंबीच्या देठापासून जोर लावून ते त्यांचे मुद्दे पणाला लावून सभासंमेलने गाजवत. माझ्या पिढीला प्रभाकर पाध्ये यांनीच व्रत मानून कम्युनिस्टविरोध शिकवला, आजन्म ते एकाधिकारशाहीच्या, दंडुकेशाहीच्या, हुकूमशाहीच्या विरोधात कटिबद्ध होते. त्यांनी जयप्रकाश नारायण, अनुरिन बेव्हीन, ऑर्थर कोस्लर, मिनू मसानी, जिलास वगैरेंचा विश्वास संपादन केला. सदानंद रेगे, हमीद दलवाई, आनंद यादव, शंकर सारडा वगैरेंच्या जडणघडणीत प्रभाकर पाध्ये यांचा वाटा मोठा आहे. तथापि, ही सगळी नंतरची प्रगल्भ अवस्था आहे. ‘नवशक्ती’चे संपादक असताना त्यांचे अंगण लहानसर होते. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर तात्त्विक कारणासाठी त्यांनी त्यांच्या संपादकपदाचा राजीनामा दिला.
पाध्ये ‘नवशक्ती’ सोडून गेले आणि त्यांच्या रिकाम्या खुर्चीत श्रीकांत पालेकर बसले. ते वयस्क होते. अनुभवी होते. स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी तुरूंगाची हवा खाल्लेली होती. ते हाडाचेच लोकसेवक होते. परंतु त्यांच्याकडे भक्कम विचारधारा नव्हती. ते पंडित नव्हते. ते फक्त्त सात्त्विक आणि समोरच्यांची इज्जत राखणारे, मऊ शब्दांचे, वडिलधारे सहाय्यक होते. पाध्ये यांच्या मागे त्यांनी ‘नवशक्ती’ ठीक सांभाळला. अर्थात दि.वि. गोखले यांच्यासारखा फर्डा पत्रकार त्यांच्या हाताशी होता, हेही खरेच. ‘भटक्याची भ्रमंती’ अथक लिहिणारे प्रमोद नवलकर, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे भालचंद्र वैद्य आणि रवींद्र पाटकर ह्यांनी पत्रकारितेचे पहिले धडे श्रीकांत पालेकर यांच्यापाशीच गिरवले.
पां.वा. गाडगीळ यांना मी त्यांच्या उत्तरायुष्यात जवळून पाहिले. दुरून बरीच वर्षे पाहत होतो. ते अभ्यासू होते. कार्यकर्त्यांसाठी शिबिरे घेण्यात, तेथे मार्क्सवादाची मीमांसा करण्यात गाडगीळ यांना विलक्षण रस होता. ते दिवसही ‘अभ्यासवर्गां’चे होते. होतकरू कार्यकर्ते गाडगीळ यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहत. गाडगीळ सज्जन होते. एकमार्गी होते. विद्यालीन होते. एकदा मला म्हणाले, “मला मुख्यमंत्र्यांनी एकदा बंगल्यावर भेटायला बोलावले, वेळ कळवली. मी त्याप्रमाणे वेळेवर गेलो. पण मुख्यमंत्री कामात होते. ते कळण्यासारखे आहे. मी थांबलो, पण एक तास झाला तरी मला बोलावणेच येईना. मी संतापलो नि मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, की आम्ही आमच्या लेखनवाचनात दंग असलेली माणसे आहोत. आम्हांला तुमच्या राजकारणाशी काडीमात्र देणेघेणे नाही. आमच्या घरी पुस्तके वाचत आम्ही सुखात असतो. पण तुम्ही आमची तंद्री भंग करता- बोलावून घेता. आम्ही येतो. तुमच्या शब्दाला मान देतो. पण तुम्हीच दिलेली वेळ पाळत नाही. हा काय न्याय झाला? तेव्हा मुख्यमंत्री चपापले नि त्यांनी तोंडातला पाईप बाजूला सारून माझी माफी मागितली.” वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, तेव्हा.
इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी पुकारल्यावर आकाशवाणीवर ते जवळजवळ धावतच आले नि मला म्हणाले, “पाहा, मी स्टॅलीनचा पुरस्कर्ता आहे. रशिया कोणे एके काळी मागासलेले शेतीप्रधान राष्ट्र होते. ती परिस्थिती कठोर उपायांनीच बदलली पाहिजे हे स्टॅलीनने ओळखले. त्याने त्या जुनाट शेतीप्रधान राष्ट्राचे रूपांतर विज्ञानप्रणीत औद्योगिक राष्ट्रात केले आणि पाहा, रशिया केवढी प्रचंड महासत्ता झाला आहे ! तेव्हा राज्यकर्त्यांनी बळ वापरलेच पाहिजे. ह्या उलाढालीत काही जणांवर अन्याय होणार. काहीजण हात धुऊन घेणार. त्याला नाईलाज आहे. पाटील पाटाचे पाणी थोडेफार लुटणारच. आपण तिकडे कानाडोळा करायचा नि राष्ट्रहित तेवढे पाहायचे. इंदिरेने अगदी योग्य तेच पाऊल उचललेले आहे. माझा तिला शंभर टक्के पाठिंबा आहे. तेव्हा, केव्हाही रेडिओला लेखनाची, भाषणाची वगैरे मदत लागली तर पहिली हाक मला मारा. मी धावत येईन.”
आणीबाणीच्या काळात आकाशवाणीला पां.वा. गाडगीळ यांचा उपयोग खूपच झाला. पण पुढे पुढे त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांना कंप सुटला, लेखणी धरता येईना. मग ते रेडिओवर यायचे आणि भाषण तोंडी सांगायचे, आकाशवाणीवरला एखादा सेवक ते लिहून घ्यायचा नि मग ते कागद पां.वा. वाचून दाखवायचे, पण असे किती दिवस चालणार? एकदा ते असेच आले. बोटे थरथरत होती. खूप अशक्त झाले होते. ते म्हणाले, “सर्व भाषण माझ्या डोक्यात आहे. कुणाला तरी कागदावर ते टिपून घ्यायला सांगा.” मी चार-पाच जणांजवळ बाबापुता केले, पण पां.वा. गाडगीळ यांची ही फुकट सेवा करायला कोणीच तयार झाले नाही. मी ते त्यांना स्पष्ट सांगितले नि म्हटले, “अपवाद म्हणून तुमचे भाषण संहितेविना मी आज ध्वनिमुद्रित करतो. हे नियमाविरुद्ध आहे. मात्र, पुन्हा असे करता येणार नाही. वक्त्याने ध्वनिमुद्रणाला येताना भाषण लिहून आणलेच पाहिजे.”
मी त्यांचे उत्स्फूर्त भाषण ध्वनिमुद्रित केले. पण ते हताश झालेले दिसले. नंतर ते आकाशवाणीकडे कधीच फिरकले नाहीत. त्यांच्या हातांचा कंप वाढतच गेला नि एके दिवशी वाचले, की उंच इमारतीतून तोल जाऊन ते खाली पडले नि त्यांचे प्राण गेले !
मी श्री.शं. नवरे यांनी लिहिलेला एखाद दुसराच मृत्युलेख वाचला असेल. सर्वजण त्यांना ‘काका’ म्हणत. मी त्यांना ‘प्रभात’चे अग्रलेख लिहिताना पाहिलेले आहे. काळा रंग, चमकदार नेत्र, ठेंगणी मध्यम बांध्याची कुडी, धोतर-कोट-टोपी असा साधा वेश नि ठोस वाणी हे त्यांचे विशेष. ते कट्टर हिंदू महासभावाले होते. निरलस, निस्वार्थ समाजसेवक होते. त्यांच्या हातात एक कापडी पि शवी कायम असे. त्यात त्यांचा लेखनसंसार असायचा. ते श्रद्धानंद महिलाश्रमाचे आजन्म व्रती सेवक होते. त्यांचा खाक्या अगोदर ‘श्रद्धानंद’चे हृदयाने करायचे काम, नंतर डोक्याने करायचे पोटापाण्याचे म्हणजेच संपादकीय काम, असा होता. आम्ही बोलावले, की ते आकाशवाणीवर तत्परतेने हजर होत नि न अडखळता तारस्वरात भाषणाचे कागद वाचत. देशाचा सर्व इतिहास-भूगोल काकांच्या जिभेवर होता. संदर्भासाठी त्यांना कधीही ग्रंथ चाळावे लागले नाहीत किंवा आठवताना कधी प्रयास पडले नाहीत.
जवळपास त्याच पिंडाचा पण धर्मनिरपेक्ष नि सदासिद्ध असा मी पाहिलेला खंदा संपादक म्हणजे द्वा.भ. कर्णिक. त्यांच्या इतका, वरच्या वर्तुळात संपर्क असणारा माणूस विरळा. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तालमीत तयार झाल्यामुळे त्यांच्या विचारांचा पाया भक्कम होता आणि राजकीय अनुभव तर उदंड होता. लेखनगुण उत्तमात जमा होतील असे नामी होते. स्वातंत्र्याचा लाभ झाला त्यावेळी ते ‘मौज’ साप्ताहिकात संपादकीय विभागात होते. मी त्यांना ‘मौज’ छापखान्यात मजकुराच्या कॉप्या तयार करताना पाहिलेले आहे. त्या अगोदर ‘युगांतर’मध्येही पाहिलेले आहे. ‘उपेक्षितांचे उपेक्षित पुढारी’ ही त्यांची पंचवीस-तीस व्यक्तिरेखांची मालिका त्रेपन्न सालाच्या आसपास साप्ताहिक ‘मौज’मध्ये प्रसिद्ध झाली होती. तो उत्तम व्यक्तिचित्रलेखनाचा आदर्श पाठ होता. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, आर.के. खाडिलकर, वसंतराव कर्णिक वगैरेंची ती अत्यंत चटकदार व्यक्तिचित्रे आहेत. दुर्दैवाने, ती ग्रंथरूपाने प्रकाशित झालेली नाहीत. ‘मौज’च्या संचयिकांच्या जुन्या पानांत ते धन निपचित पडलेले आहे. कोणी पुढाकार घेऊन तो छोटासा संग्रह प्रसिद्ध केला, तर मराठी साहित्यातील तो छानदार ऐवज ठरेल.
कर्णिक यांनीच ‘महाराष्ट्र टाइम्स’चा पाया डोळसपणे घातला. त्यावेळी त्यांच्यापाशी उत्साहही भरपूर होता. ‘केसरी’चे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून त्यांची कारकीर्द गाजलेली होती. त्यांचे स्नेहसंबंध दिल्लीतील फार वरच्या वर्तुळातील सत्ताधिशांशी होते. ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास विश्वासातील पत्रकार-मित्र होते. ते यशवंतराव चव्हाण यांचे निकटवर्ती होते. त्यांचा स्नेहसंबंध पंडित नेहरू यांच्याशी होता. ते चंचल सरकार, दुर्गादास वगैरे पत्रकारांच्या बैठकीतील मित्र होते. त्यांना ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये छोटी कारकीर्द लाभली, पण तेवढ्या अवधीत त्यांनी अनेक पत्रकारांना स्वतःचा शब्द खर्च करून परदेशयात्रा घडवून आणली.
आणीबाणी जाहीर झाल्यानंतर पां.वा. गाडगीळ यांच्या मागोमाग द्वा.भ. कर्णिक आकाशवाणीवर आले आणि म्हणाले, की “आणीबाणी जाहीर झाली ही इष्ट अशीच घटना आहे. आपण आणीबाणीचे पुरस्कार करणारे असून शासन सांगेल तेव्हा मी भाषणाला येईन.” तसा प्रस्ताव त्यांनी मांडला. प्रारंभी ते आणीबाणीच्या समर्थनार्थ भाषणे करण्यासाठी आकाशवाणीवर आलेही; पण नंतर इंदिरा गांधी यांनी प्रेस कमिशन बरखास्त केल्यावर ते चपापले. हळहळत म्हणाले, “हे अति होतंय, ह्या बरखास्तीची काहीच गरज नव्हती !”
आकाशवाणीला लाभलेल्या उत्तम वक्त्यांमध्ये द्वा.भ. कर्णिक यांचा दुसरा क्रमांक लागेल, इतके ते मुद्देसूद आणि सोपे, ओघवते बोलत. त्यांच्या लेखनात किंवा भाषणात एकही चूक नसे. वागायला मोठा सरळ माणूस. सगळा इतिहास जिभेवर. कोठल्याही घटनेबद्दल विचारा, ती नेहमीच त्यांच्या नजरेसमोर घडलेली असे !
द्वा.भं. ना दुसरा क्रमांक द्यायचा, तर आकाशवाणीच्या वक्त्यांमध्ये पहिला क्रमांक कोणाचा लागेल? निर्विवादपणे तो मान माधव गडकरी यांच्याकडे फक्त जातो. कोठलाही विषय सांगा, माधवराव उत्तम लिहित आणि फर्डे बोलत. वाणी अस्खलित शुद्ध, त्यांचे ‘चौफेर’चे काही लेखन माझ्या समक्ष झालेले आहे, समोर पाठकोरे चतकोर, अर्धकोर घेऊन ते तंद्रीत गेलेले असत. वायुवेगाने त्यांचे लेखन चाले आणि लिहिलेला प्रत्येक परिच्छेद जिव्हाळ्याने थबथबलेला, माहितीपूर्ण. तशात ते लेखन साहित्याबद्दल किंवा साहित्यिकाबद्दल असेल तर गडकरी बहार उडवत. दि.बा. मोकाशी, कविवर्य बोरकर, अनंत काणेकर, खांडेकर, कुसुमाग्रज ह्यांच्याबद्दलची माधवरावांची स्फुटे पारदर्शक आणि उत्कट होती. एकटाकी इतकी विपुल नि माहितीपूर्ण स्फुटे लिहिणारा मराठी पत्रकार माझ्या नजरेसमोर नाही, त्यांच्या पद्धतीने त्यांचाही व्यासंग चालू असतो. गोपनीय माहितीचा ओघ त्यांच्याकडे सतत असतो. पिंडाने ते समाजसेवी संपादक आहेत. अनेक होतकरूंना त्यांनी वर्तमानपत्रांचे स्तंभ कर्तव्यभावनेने मोकळे करून दिले. दुःख ह्याचे वाटते, की एवढे दुर्मीळ गुण त्यांच्या अंगी असूनही त्यांच्याविषयी उमाळ्याने कड घेऊन बोलणारा, लिहिणारा एकही ठळक लेखक मला भेटलेला नाही. सुदैवाची गोष्ट ही, की उपेक्षेचे वारे सभोवती असूनही माधवरावांनी लेखणीला क्षणाचीही विश्रांती दिलेली नाही. जातिवंत लेखकाचेच हे लक्षण आहे.
ह.रा. महाजनी यांचे मी काहीच वाचलेले नाही. त्यांचा फक्त बोलबाला ऐकलेला होता. त्यांच्यापाशी एक जन्मजात उग्र गुर्मी होती. संपादकपद गेल्यानंतर ती ऐट अर्थातच जिरली. एकदा दुपारी ते आकाशवाणीवर स्वयंप्रेरणेनेच आले नि उंबरठ्यावरूनच उद्गारले, “काळाच्या प्रवाहात सर्वांचीच पि छेहाट होते. कर्तृत्ववान माणसांचा समाजाला विसर पडतो. मी आता मागेमागे पडत चाललो. रेडिओवरून तुम्ही माझी नाटके प्रसारित केलीत तर बरे होईल !” बाळ कुडतरकर यांनी त्यांचे एक नाटक त्यानंतर प्रसारित केलेही. भाषणासाठी त्यांना आमंत्रण पाठवायचे नजरचुकीने राहून गेले. मला त्याची हळहळ वाटते.
आचार्य अत्रे हे सर्व दृष्टींनी जबरदस्त प्रकरण होते. ते शासनाचे कट्टे विरोधक होते. साहजिकच, त्यांचे अग्रलेख धगधगते असत. पण भाषावार प्रांतरचनेमुळे भारतीय एकतेच्या चिरफळ्या उडतील असा धोका मला वाटे. म्हणून अत्रे यांचे राजकीय लेखन मी वाचले नाही. परंतु ते जे वाङ्मयाबद्दल पोटतिडकीने लिहीत ते डौलदार आणि उत्कट असे. माझ्या पि ढीला वाङ्मयावर प्रेम करायला शिकवले आचार्य अत्रे यांनीच. ते अधुनमधून ग्रंथांचा परामर्श घेत. त्यांचे ते लेखन मी मिटक्या मारत वाचत असे. मृत्युलेख लिहावेत तर अत्रे यांनीच, इतके ते माहितीपूर्ण आणि जिव्हाळ्याने लिहिलेले असत.
अरुण टिकेकर आणि कुमार केतकर हे दोघेही माझे स्नेही आहेत, ते दोघेही जबरे वाचक आहेत. दोघांनीही पुस्तकांसाठी जीव गहाण टाकायचे तेवढे उरलेले आहे. त्यांचे लेखन मी अर्थातच वाचतो. दोघेही समोरासमोर वार करणारे आहेत. कुमार केतकर माझे ‘ग्रंथाली’च्या पहिल्या ग्रंथयात्रेपासूनचे स्नेही. त्यांच्या लेखनात विश्लेषण आणि सोपेपणा, दोन्ही आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या स्तभंलेखनामुळे आठवड्याच्या आठवड्याला अरुण टिकेकर यांचा संबंध यायचा, लेखनविद्या हा टिकेकर घराण्याचा अलंकारच आहे. त्यांचे आजोबा, काका, सारे पट्टीचे ग्रंथकार. अरुणच्या लेखणीत लालित्य कमी आहे. पण वृत्तीत ज्ञानजिज्ञासा आहे. त्याच्या पत्रकारितेपेक्षा त्याची ग्रंथरचना अधिक मोलाची आहे.
राहता राहिले गोविंदराव तळवलकर. सुजाण नागरिकांना अग्रलेख वाचनाची सवय आणि ओढ गोविंदरावांनी लावली. त्यांनी पंचवीस-तीस वर्षे घणाघाती आणि निःस्पृह लिहून संपादकांच्या पेशाला इज्जत प्राप्त करून दिली. चौफेर अफाट वाचन, त्याचा लेखनात होणारा संक्षिप्त आविष्कार, संपादकीय खुर्चीचा आब राखण्याची त्यांनी वश करून घेतलेली अबोल विद्या आणि एकूण रुबाब हे मराठीत तरी प्रथमच इतके दीर्घकाळ दिसले. ते जन्मजात अबोल, तुटक. माझे त्यांचे बोलणे ग्रंथविश्वाबद्दलच प्रामुख्याने असे, त्यांचे रागलोभ तीव्र होते. उपरोध धारदार होता. त्यांचे काही सहकारी त्यांच्याकडून जबर दुखावले गेले होते. एखाद- दुसऱ्यावर अन्यायही घडलेला वरकरणी दिसतो. पण माझ्याशी त्यांचा प्रत्यक्ष संबंधही नाही नि दोन्ही पक्षांची संपूर्ण बाजू मी अभ्यासलेलीही नाही. शिवाय, आपण कोणाचाही न्याय करायचा नाही हे माझे तत्त्व आहे. तेव्हा तो विषय मी सोडतो. रुचिसंपन्न साहित्यात जीव अडकलेल्या गोविंदरावांना ‘पिंपळपान’ हे माझे, पाश्चिमात्य साहित्याचा परिचय करून देणारे पुस्तक मी आदराने अर्पण केले आहे. एकाच पंगतीवर हक्क सांगणारा एक छोटा लेखक दुसऱ्या एका मोठ्या लेखकासाठी आणखी काय बरे करू शकणार?
– कै. रवींद्र पिंगे
77 जय हनुमान सहनिवास, विलेपार्ले, मुंबई 400057
(‘रुची’ दिवाळी अंक, 1996 वरून उद्धृत)
खास पिनगे शैलीतला लेख आहे . पुन्हा वाचनाचा आनंद प्राप्त झाला !
अतिशय उत्तम आणि संग्राह्य लेख वाचायला मिळाला. नव्वद नंतर सर्वच क्षेत्रे बदलत गेली. यात पत्रकारिताही आहे. आजच्या पत्रकारितेचे स्वरूप आणि विषय वेगळे आहेत. यात बऱ्याच वेळा संपादक दिसत नाहीत. रवींद्र पिंगे यांच्या जुन्या लेखाने कर्तबगार संपादकांचा काळ समोर येतो.
रा.के.लेले यांनी मराठी पत्रकारितेचा इतिहास लिहिला आहे. या ग्रंथातून चांदा ते बांदा विविध वर्तमानपत्रे आणि संपादक समजून जातात. मराठी पत्रकारितेला विशेष वैभवशाली परंपरा आहे. पिंगे यांच्या लेखातून यातील काही संपादक समोर आले आहेत.
जुन्या आठवणींना उजाळा मीळाला,
Excellent!