मिलिंदचे ध्येयासक्त ल. बा. रायमाने (Tribute to Principal L.B. Raimane of Milind College)

3
71

प्राचार्य ल.बा.रायमाने

दलित साहित्याचे एक शिल्पकार आणि औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ल.बा. रायमाने यांचे अल्पशा आजाराने 6 डिसेंबर 2020 ला निधन झाले. त्यांचे वय पंच्याऐंशी वर्षे मृत्युसमयी होते. त्यांच्या निधनामुळे अनेकांचा अज्ञात आधारस्तंभ कोसळला. त्यांनी प्रखर बुद्धिवाद, चारित्र्यसंपन्नता, परिवर्तनवादी निष्ठा, साधी राहणी आणि सात्त्विक स्वभाव हे सर्व गुण शेवटपर्यंत अबाधित ठेवले. रायमानेसरांना बुद्ध धम्माची दीक्षा गेल्या काही वर्षांपासून घ्यायची होती. सर आयष्यभर बुद्ध धम्माचे पालन अघोषितपणे करत होतेच. सरांनी अखेर मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी म्हणजे 4 डिसेंबरला, रुग्णालयात असताना भंते सत्यपाल यांच्या मदतीने बुद्ध धम्माचा स्वीकार केला आणि 6 डिसेंबर या बाबासाहेबांच्यामहापरिनिर्वाणदिनी त्यांनी घेतलेला जगाचा निरोप हा अचंबित करणारा आहे. त्यांचा आग्रह मृत्यूनंतर कोठलेही विधी न करता केवळ सामूहिक बुद्धवंदना व्हावी असा होता. त्यानुसार त्यांच्या मृत्यूनंतर सामूहिक बुद्धवंदना घेऊन मृतदेह महात्मा गांधीमिशनच्या रुग्णालयास दान करण्यात आला.

अशा या ध्येयासक्ताचा जन्म कर्नाटकातील अंकलीचा. त्यांचा ते तिसरीत असतानाच स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला. सेवा दलाची शिबिरे, मेळावे यांमुळे त्यांच्यातील देशभक्तीची भावना प्रखर होत गेली. त्यातूनच त्यांना साने गुरुजी, वि.स. खांडेकर यांच्या साहित्याची ओढ वाटू लागली. ते हडपसर येथे 1954 ला झालेल्या राष्ट्र सेवा दलाच्या मेळाव्यात उपस्थित राहिले. ते त्याच प्रेरणेने गावातील भूदान चळवळ, शिवजयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती यांमध्ये सहभागी झाले. त्यांनी एम ए करण्यासाठी साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले काशीनाथ पोतदार यांनी लिहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठीतील चरित्र कानडीत भाषांतरित केले. ते शिष्यवृत्तीच्या पैशांतून छापून घेऊन वाटले. प्रा.रा.ग. जाधव म्हणतात, त्यांच्या जीवनाचा एक काठ सानेगुरुजींचा होता तर दुसरा आंबेडकर यांचा होता.त्याची ती सुरुवात होती.

रायमानेसर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मिलिंद कला महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून 1963 मध्ये रुजू झाले आणि त्यांच्या आयुष्यातील वेगळ्या पर्वाला सुरुवात झाली. मिलिंदमध्ये अध्यापनासाठी येण्याआधीच चांभार समाजातील असूनही, त्यांनाही त्या काळात, बाबासाहेबांच्या विचारांनी झपाटले होते. त्यांनी कोल्हापूरलामहाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थ्यांना एकत्र करून बाबासाहेबांची जयंती साजरी केली. जगणे, खाणे, कपडे अशी सगळ्यांचीच वानवा असलेले दलित विद्यार्थी मिलिंद– मध्ये राज्यभराच्या गावकुसांबाहेरून नवी स्वप्ने घेऊन येत होते. सरांच्या संवेदनशील मनाला त्या खदखदणाऱ्या ज्वालामुखींना व्यासपीठ देण्याची गरज वाटली.

साने गुरुजी छात्रालय दैनिकहे हस्तलिखित अंमळनेरला असताना चालवायचे, सरांना त्याची कल्पना होती. त्यांनी त्याच धर्तीवर मिलिंद हस्तलिखित पाक्षिक सुरू केले. दलित पँथरची स्थापना नंतरची असली, तरी दलित तरुणांमधील आक्रमकता त्या काळात मिलिंदमध्ये दिसू लागली होती. त्या उपक्रमाची उपयुक्तता आणि दाहकता मिलिंदमध्ये प्राचार्य म्हणून नव्याने आलेले म.ना. वानखडे यांनी ओळखली. त्यांना ते अमेरिकेतून शिकून आलेले असल्याने तेथील ब्लॅक लिटरेचरशी ओळख झालेली होती. प्राचार्य म.भि.चिटणीस, रा.ग.जाधव यांनीही त्या उपक्रमाला पाठबळ दिले. तोच उपक्रम दलित साहित्याच्या निर्मितीचा प्रेरणास्रोत ठरला. मीही मिलिंदमधील सर्जनशील वातावरणाने व्यक्त होऊ लागल्यांपैकी एक आहे. मी कॉलेजमधील कथाकथनाच्या कार्यक्रमात चांभार नायक केंद्रस्थानी ठेवून एक कथा पहिल्याच वर्षात वाचली होती. तेव्हापासून सरांनी माझ्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. मी चांभार असल्यामुळे दोघांमध्ये ओलावा होताच. वानखडे यांनी स्वत:देखील बाबासाहेबांच्या विचारांचा आणि चळवळीचा वेध घेऊन समाजात सुरू असलेल्या मूल्यसंघर्षाला अभिव्यक्ती मिळवून देण्यासाठी वैचारिक व वाङ्मयीन उपक्रमांना योग्य दिशा दाखवली. त्यासाठी हस्तलिखिताशिवाय मिलिंद जर्नल, मिलिंद मॅगझिन, मिलिंद साहित्य परिषद, अस्मिता त्रैमासिक (त्याचेच पुढे अस्मितादर्श झाले) यांसारखे उपक्रम सुरू केले. रायमानेसरांनी सुरू केलेल्या भीत्तिपत्रकाच्या उपक्रमाने असे चळवळीचे रूप धारण केले. डॉ. वानखडे व प्रा. जाधव यांनी काही वर्षात विविध कारणांनी मिलिंद सोडले. त्यानंतर रायमानेसरांनी या एकूण चळवळीला नेतृत्व दिले, तिचे संवर्धन केले. रायमानेसरांची भूमिका त्या सर्व उपक्रमांत अत्यंत महत्त्वाची होती.

रा.ग. जाधव म्हणतात, ‘साठ-सत्तरच्या दरम्यान नागसेन वनात दलित साहित्य संस्कृतीचे एक सृजनशील पर्व उदयास येत होते. मुख्य म्हणजे या युवा वर्गाची विविधतापूर्ण अशी सर्जनशीलता ओळखणारे व तिचे संगोपन-संवर्धन करणारे रायमानेसरांसारखे प्राध्यापक होते. या सामुहिक सर्जनशील उत्थानपर्वाचे फलित म्हणजे दलित साहित्यसंस्कृतीची निळी पहाट! रायमानेसर त्या पर्वाचे एक शिल्पकार होते. साधना साप्ताहिकाने त्या सर्व उपक्रमांना राज्यभर नेण्यात आणि अधिक गती देण्यात ऐतिहासिक भूमिका बजावलेली आहे. अनिल अवचट साधनाचे कार्यकारी संपादक असताना त्यांनी मिलिंद मॅगझिनमधील गावकुसाबाहेरील जातीयतेचे दाहक अनुभव असलेल्या निवडक अनुभवांवर आधारित साधनाचा 15 ऑगस्ट 1972 चा विशेषांक काढला होता. त्या अंकाचा फायदा असा झाला, की त्यातील सर्जकता, दाहकता, अस्सलता यांचा परिचय राज्यभर झाला. महाराष्ट्र टाइम्सने त्याची दखल घेऊन अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखात आज ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले जात आहे, ते उद्या गावाचे कूस मोडून टाकतील – नव्हे, गावकूससुद्धा उद्‌ध्वस्त करतीलअसा इशारा दिला होता!

रायमानेसरांनी स्वत: पुढाकार घेऊन ती परंपरा वानखडे आणि रा.ग.जाधव यांच्यानंतर संवर्धित केली. ते केवळ सांस्कृतिक आघाडीवर कार्यरत नव्हते, तर ते मिलिंदमध्ये येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे आई झाले होते. ते त्यांना कोठल्याही प्रकारची वाच्यता न करता मदत करत. स्पृश्यास्पृश्यांची दास्ये (स्वातंत्र्यदिन विशेषांक), अस्पृश्यांनी समाजपरिवर्तनात सहभागी व्हावे (21 नोव्हेंबर 1970), रूढींच्या निर्मूलनाचे नवे जग (15 ऑगस्ट 1972) असे साधनाच्या अंकात 70 च्या दशकात त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. रायमानेसरांनी जेवढे लेखन केले, ते केवळ मिलिंद मॅगझिन आणि साधनासाठी केलेले आहे.

रायमानेसरांना इतिहासाचे भान होते, म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांसोबतच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त आठवणी जेथून मिळतील तेथून लिहून घेण्याचे ऐतिहासिक कार्य केलेले आहे. त्या अनुषंगाने बाबासाहेबांचे सांगाती बा.ह.वऱ्हाळे, राधाबाई वऱ्हाळे, डी.जी.जाधव, दत्तोबा पवार, आर.आर.भोळे, सीताराम शिवतरकर इत्यादींना आठवणी सांगण्यास लावून स्वतःचे नाव कोठेही येऊ न देता त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. सरांनी त्यांचे वडील बाळू धोंडिबा रायमाने यांनाही लिहिते केले. उणे अधिक हे सरांच्या वडिलांचे चरित्र प्रसिद्ध आहे.

रायमानेसरांना ते चांभार असल्यामुळे मिलिंदमध्ये वाईट अनुभवांना अनेकदा सामोरे जावे लागायचे. सरांनी ते गृहीत धरलेले होते. असे अभिनिवेश असणारच, ते नैसर्गिक आहे अशी त्यांची समजूतदार आणि सर्वसमावेशक भूमिका होती. मी आणि रायमानेसर, आमची एकूण दलित चळवळीतील चांभार समाजाच्या सहभागाची नेहमी सविस्तर चर्चा व्हायची. चांभारांचे उत्थान, संघटन, इतर अनुषंगिक प्रश्न असे मुद्दे त्यांत असत. त्यांचा चांभार समाजाने एकूण दलित चळवळीत सहभागी व्हावे, आंबेडकरी विचार चांभार समाजात रुजवावा असा आग्रह असायचा. गांधी, मार्क्स, किंवा तत्सम विचारांचेही त्या चळवळीला वावडे असू नये असे त्यांचे ठाम मत होते. ते चांभारांच्या विविध संघटनांशी संबंधित होते. ते सुरुवातीला उप जिल्हाधिकारी एन.के.बोंडेकर, धर्मराज व्हटकर, गोवर्धनलाल बन्सवाल इत्यादींसोबत सक्रिय असायचे. रायमानेसरांनी हिरालाल डोंगरे, सखाराम पानझडे यांच्यासोबत औरंगाबादेत रचना संस्थेची स्थापना 1985 मध्ये केली. त्यांनी त्या संस्थेमार्फत पोटजातींचे संघटन, सहाशे गटई कामगारांची सामूहिक विमा योजना, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य वाटप व इतर मदत असे विविध उपक्रम हाती घेतले. ते समाजाच्या पूर्वेतिहासाबद्दलही सजग होते. ते सातत्याने बसवेश्वर आणि ज्या महात्म्यांच्या नावाने आपण ओळखले जातो त्या बसवेश्वर यांच्या दरबारातील हरळय्या, ककय्या यांच्याबद्दलही सातत्याने बोलत. लिहीत.

रायमानेसरांनी त्यांच्या समाजवादी निष्ठा बाबासाहेबांशी नाते सांगत असताना कधी लपवल्या नाहीत. त्यांच्या बंगल्याचे नाव शोध’. त्या शोधचा मुहूर्त यदुनाथ थत्ते यांच्या हस्ते दारात अशोक बेलखोडे यांनी भारत जोडो यात्रेतील विविध ठिकाणांहून आणलेली माती शिंपडून झाला. त्यांचा मुलगा डॉ. क्रांती याच्या आंतरजातीय विवाहातही यदुनाथ थत्ते यांची भूमिका मोलाची होती. यदुनाथ थत्ते यांनी ते साधनाचे संपादक असताना गावोगावी समाजात अज्ञात आधारस्तंभठरावेत असे युवक घडवले. रायमानेसर हे त्यांपैकीच एक. त्या अज्ञात आधारस्तंभाने मिलिंदमध्ये इतिहास घडवला. ते केवळ दलित साहित्याच्या शिल्पकारांपैकी एक नाहीत, तर त्यांनी 1963 ते 1995 पर्यंत मिलिंदमध्ये विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. त्यांच्या जाण्याने मीच नाही, तर मिलिंदायनपोरके झालेले आहे.

सर स्वभावाने हळवे परंतु तेवढेच कठोर होते. त्यांनी आयुष्यभर तत्त्वनिष्ठ, साधी राहणी, चारित्र्यसंपन्न्ता, परिवर्तनवादी निष्ठा, प्रसिद्धीच्या झोताबाहेरचे अध्ययन-अध्यापन आणि उद्बोधनाचे व्रत अशी मूल्ये जपली. ते केवळ बोलत नसत तर त्यांची कृतीही तशीच असायची. समाज सुधारला पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. म्हणूनच त्यांनी स्वतःच्या मुलांसोबत पुतणे-भाचे यांना शिकण्यासाठी आणून मार्गी लावले. क्रांती हा त्यांचा मुलगा आणि प्रेरणा ही त्यांची मुलगी, या त्यांच्या दोन अपत्यांत लहानगा भाचा सतीश माने तेवढ्याच मायेने त्या घरात वाढला. त्या मुलांच्या जन्माआधी पुतण्या विजय त्यांच्याकडे शिक्षणासाठी होता. त्याशिवाय, त्यांनी विकास रायमाने, कृष्णा निर्मळे हे पुतणे-भाचे यांना शिक्षणासाठी आणून त्यांना उभे केले. त्याचे भांडवल चकार शब्दाने कधी केले नाही.

(साधना, जानेवारी 2021 अंकावरून उद्धृत, संस्कारित-विस्तारीत)

– राम दोतोंडे 9833383887 ramdotonde@gmail.com

राम दोतोंडे हे महावितरण कंपनीतून मुख्य महाव्यवस्थापक म्हणून 2015 साली सेवानिवृत्त झाले. ते मुंबई महापालिका आयुक्त यांचे माध्यम सल्लागार म्हणून जून 2015 पासून कार्यरत आहेत. त्यांचे ‘रापी जेव्हा लेखणी बनते’ (1978) आणि ‘गल्ली बदललेला मोर्चा’ (2000) हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या ‘गल्ली बदललेला मोर्चा’ या कवितासंग्रहाला ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’सह संजीवनी खोजे, लोकायत साहित्य असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी प्रा.ल.बा.रायमाने यांचा ‘आधारस्तंभ’ हा गौरवग्रंथ प्रा.अविनाश डोळस यांच्या सहकार्याने संपादित केला. प्रा.अविनाश डोळस यांच्या ‘डोळस’ या गौरवग्रंथाचेही सह संपादन केले.

——————————————–———————————————————————————————————–

About Post Author

Previous articleअठराव्या शतकातील सुंता विधी! (Sunta Ritual Eighteenth Century)
Next articleपरीटाचा दिवा – कोकणातील मानसन्मानाची रीत (Washerman Community – Ritual in Konkan)
राम दोतोंडे हे महावितरण कंपनीतून मुख्य महाव्यवस्थापक म्हणून 2015 साली सेवानिवृत्त झाले. ते मुंबई महापालिका आयुक्त यांचे माध्यम सल्लागार म्हणून जून 2015 पासून कार्यरत आहेत. त्यांचे ‘रापी जेव्हा लेखणी बनते’ (1978) आणि ‘गल्ली बदललेला मोर्चा’ (2000) हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या ‘गल्ली बदललेला मोर्चा’ या कवितासंग्रहाला ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’सह संजीवनी खोजे, लोकायत साहित्य असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी प्रा.ल.बा.रायमाने यांचा ‘आधारस्तंभ’ हा गौरवग्रंथ प्रा.अविनाश डोळस यांच्या सहकार्याने संपादित केला. प्रा.अविनाश डोळस यांच्या ‘डोळस’ या गौरवग्रंथाचेही सह संपादन केले.9833383887

3 COMMENTS

  1. रायमानेसरांविषयीची छान माहिती वाचावयास मिळाली . शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम फार मोठे आहे .रायमानेसरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here