माहुरगडची रेणुकादेवी (Renukadevi)

2
118
_mahurgad_renukadevi

नांदेडपासून एकशेतीस किलोमीटरवरील मातापूर (माहुरगड) हे रेणुकामातेचे स्थान आहे. नांदेड मराठवाड्यात येते. त्याचा महिमा रेणुका महात्म्यातून गायिला गेला आहे. रेणुका हीच एकवीरा अदिती आहे. तिचे स्वयंवर झाले नि ती जमदग्नी ऋषींची धर्मपत्नी झाली. कान्यकुब्ज येथील रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी भागीरथीच्या तीरावर केलेल्या यज्ञातून ती प्रकटली, तीच कन्या रेणुका. इंद्राने स्वयंवरात दिलेल्या कामधेनू, कल्पतरू, दिव्य चिंतामणी, परीस व सिद्धपादुका या गोष्टी सोबत घेऊन, रेणुका पतीच्या सोबत त्यांच्या घरी आली. तिला वसू, विश्वावसू, बृहद्भान, बृहकरत्न आणि परशुराम हे पाच पुत्र झाले. 

रेणुका स्नानासाठी नदीवर एकदा गेली असताना, तेथे गंधर्वाची स्त्रियांसह कामक्रीडा पाहून ती क्षणभर रमली. तिला पतीची आठवण राहिली नाही. त्यामुळे तिला घरी परतण्यास निमिषभर विलंब झाला. तपस्वी पतीने ते सर्व अंतर्ज्ञानाने जाणले नि क्रोधाच्या भरात त्यांनी त्यांच्या एकेका पुत्राला त्यांच्या पत्नीचा शिरच्छेद करण्यासाठी पुकारले! पहिल्या चारही पुत्रांनी मातेच्या वधास नकार दिला. जमदग्नी ऋषींनी त्यांनाही शापसामर्थ्यांने भस्मसात केले. परशुरामाने मात्र आईला पितृआदेशानुसार ठार केले. पित्याने त्यावर प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने प्रथम त्याच्या चारही भावांना जिवंत करण्याची विनंती केली. पित्याने ती मान्य करून मृत पुत्रांना जिवंत केले. परशुरामांनी माता रेणुकेलाही जीवदान मागून घेऊन, तिला तिने केलेल्या अपराधातून सन्मानाने मुक्त केले! जमदग्नींनी घडलेल्या घोर प्रसंगाला कारणीभूत ठरलेल्या क्रोधाला दूर केले.

महिमावती नगरीच्या राजाने- सहस्रार्जुनाने अतिथी होऊन, जमदग्नीकडे जाऊन त्यांची ‘कामधेनू’ बळकावण्यासाठी कपट कारस्थान रचले नि जमदग्नीला ठार केले; रेणुकेलाही एकवीस जखमांनी घायाळ केले. परशुराम त्यावेळी तप करण्यास गेलेले होते. त्यांना ते तपाचरणानंतर परतले तेव्हा ती घटना कळली. त्यांनी सहस्रार्जुनाला ठार करण्याची प्रतिज्ञा मातेपुढे केली. त्याने महापराक्रम करून सहस्त्रार्जुनाचा वध केला नि पुढे पृथ्वी निःक्षत्रिय एकवीस वेळा केली.

रेणुकेने परशुरामाला त्याच्या पित्यावर अग्निक्रिया करण्यासाठी जेथे कोरी भूमी आहे तेथे घेऊन चल असे सांगितले. परशुराम एका कावडीत माता-पित्यांना ठेवून कान्यकुब्ज नगरीतून निघाला. तो प्रथम विष्णुपुरीतील निरजतीर्थास गेला. नंतर काशी, कुरुक्षेत्र, द्वारका, तपोवन, द्वीप, समुद्र आदी क्षेत्रे पार करत अंती कृष्णामलकी गावी आला. तेच पुढे मातापूर-माहुर म्हणून प्रसिद्ध झाले! तेथून जवळ दत्तात्रेय यांचा आश्रम आहे. दत्तात्रेय यांनी रेणुकेला नमस्कार केला आणि तिचा गौरव ‘हे माते! देवी सुरेश्वरी! तू एकटी या जगात वंदनीय आहेस’ असा केला. रेणुकामातेने दत्तात्रेय यांना पतीवर विधियुक्त अग्निसंस्कार करण्यासाठी विनंती केली आणि स्वतःची त्यांच्याबरोबर सहगमनाची इच्छाही बोलून दाखवली. त्यावर परशुराम म्हणाले, “आई! मी तुझ्यावाचून ह्या सह्याद्रीवर एक क्षणही राहू शकत नाही.” तेव्हा रेणुकामातेने परशुरामांना सांगितले, की “मी जरी अग्निप्रवेश केला तरी मी नंतर सर्व तीर्थांसहित, देव, मुनी, किन्नर आदींसहित, तेथेच वास्तव्य करीन.” तेव्हापासून सर्वजण त्या जगन्मातेचे गुणगान गाऊ लागले- 

_mahurgad_renukaमेळे आले योगिनीचे । चरण वन्दिती रेणुकेचे ।। 
येऊनी गणपती । की शयना पती | चकचकित सरस्वती । 
वाणी खुंटली द्वेषाची । वार्ता काय मानवाची । 
ऐसा जिचा गुण महिमा । न कळे योगी जना सीमा ।।

अंबेचा गुणमहिमा असा गाता गाता मातापूरमहिमाही वेगळया रूपाने गायला जातो.

मातापूर उंच पर्वत । आंबेपर्यंत । अंबे अवघड घाट । अरण्य महाडोंगर | वृक्ष लागले दाट कठीण, मार्ग हा दिसतो। पुढे न कळे वाट । दुष्टी देखे मळपीठ।।

मातापूरची पूर्वीची अवघड वाट आता सुकर झाली आहे. अर्थात, डोंगर चढून शिखरावर पोचताच रेणुकामातेची प्रसन्न मूर्ती अवघा शीणभार घालवते. मुळात जमदग्नी हे भगवान शंकर आहेत नि ही एकवीरा रेणुका म्हणजे गंगा आदितीच आहे! उभयतांचे ते अवतार लोककल्याणासाठी आहेत. परशुराम यांच्या रूपाने साक्षात् विष्णुभगवंत रेणुकामातेच्या पोटी त्याच कार्यासाठी अवतरले असे मानले जाते. 

रेणुकामातेचे स्वरूप तांदळारूपातील अतिशय सुंदर आहे. भव्य नाक, तेजस्वी नयन नि लोभस ओठ शोभिवंत! पाच फूट उंचीचा तिचा मुखवटा गाभाऱ्यात सिंहमुखासनावर विराजित आहे. तो अत्यंत रेखीव व देखणा आहे. मुखवट्यास दोन नऊवारी लुगडी नेसवतात. तिच्या भाळी आलटून पालटून ‘ॐ ऐं हीं क्लीं चामुंडायै विच्चे’ या मंत्रातील एकेक अक्षर कलात्मकतेने आलटून पालटून रेखाटतात. त्यामुळे मुखवटा खुलून दिसतो. 

रेणुकामातेचा वास समुद्रसपाटीपासून अठराशे फूट उंचीवर, निसर्गरम्य वातावरणातील माहुरगडावर आहे. तिचे वास्तुशास्त्रानुसार उभारलेले मंदिर मनमोहक आहे. रेणुकामहात्म्य व कालिकाखंड यांमधील आमलीग्राम (माहूर) महात्म्य यात माहुरक्षेत्राचे वर्णन सविस्तर आले आहे. त्या क्षेत्रास कृतयुगात आमलीग्राम, त्रेतायुगात सिद्धपूर, द्वापारयुगात देवनगर म्हणून ओळखत आणि कलियुगात त्यास मातापूर म्हणून ओळखतात. माहुरची ख्याती महाराष्ट्रातील उत्तर काशी म्हणूनही आहे. 

माहुर-मातापूर या रेणुकामातेच्या निवासस्थानी तीन कोटी तीर्थस्थाने आहेत. त्या स्थानांचे दर्शन घेतले तरी मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. म्हणून तर ते तीर्थक्षेत्र पवित्र होय. मातापूरचा अपभ्रंश म्हणजे माहुर. ते अनसूयेचे माहेरही आहे. रेणुकादेवीचे अनादि अनंत रूप स्वयंभू आहे. रेणुकेचे मुखकमल कमलाकार, सिंदुरचर्चित, रक्तवर्ण आहे. भाविक लोक माथा रेणुकामातेच्या चरणी सुमारे दोनशेपंचावन्न पायऱ्या चढून येऊनही न शिणता प्रसन्न मुद्रेने टेकवतात. त्यांना तिचा चांदीचा मुकुट, तिची भेदक नजर व तिचे तेजोमयी रूप चकित करते.

हे ही लेख वाचा – 
मुणगेची श्री भगवतीदेवी – आदिमायेचा अवतार
तांबवे गावची वज्रेश्वरी देवी

माहुरगडावरील सभामंडपात परशुराम गणेशरूपात रेणुकामातेच्या समोर बसले आहेत. तिच्या डाव्या बाजूला परशुरामाचा पाळणाही आहे. परशुरामाची मूर्ती _mahurgadपाळण्यात आहे. सभामंडपाच्या बाहेर दक्षिण दिशेला जे शिवलिंग आहे ते जमदग्नीचे स्थान मानले जाते. त्या शिवलिंगाचे दर्शन रेणुकेच्या दर्शनापूर्वी घेण्याची प्रथा आहे. नंतर परशुराम आणि त्यानंतर परशुरामाची माता रेणुकादेवी असे दर्शन घेत जाण्याचा प्रघात आहे. रेणुकामाता मंदिराच्या दक्षिणेला तुळजाभवानी आणि अलिकडे महालक्ष्मी यांची मंदिरे आहेत. त्या गडाच्या पुढे प्रभू दत्तात्रेयांचे मंदिर नि अत्री ऋषींचा आश्रम आहे, तर डावीकडील रामगड किल्ल्यात कालिकामातेचेही मंदिर आहे. त्याच परिसरात सती अनसूयेचेही मंदिर आहे. परशुरामाचे आणखी एक मंदिर गडाच्या पायथ्याशी आहे. तेथे महानुभाव पंथीयांचेही दत्तमंदिर आहे. शिवाय, त्या परिसरातील पाच तलाव मातृतीर्थ, मोवाळे, इंजाळे, गरुडगंगा आणि सर्वतीर्थ या नावांनी परिचित आहेत. 

भगवान परशुरामांनी त्यांच्या मातेला अग्नी त्या माहुरगडावरच दिला. तिने त्याला त्यानंतर मागे वळून पाहायचे नाही असे बजावलेले होते. पण त्यांनी तिच्यावरील प्रेमापोटी मागे वळून पाहिले. तिच्या संदर्भातील कितीतरी आख्यायिका आहेत. त्यांतील काही कथा गणेशपुराण, स्कंदपुराण आदी ठिकाणी आलेल्या आहेत. रेणुकामातेच्या प्रेरणेमुळेच भगवान परशुराम यांनी त्यांचा पितृवधाचा बदला घेतला. सहस्त्रार्जुन त्याच्या विशाल सेनेसह आला होता. परशुरामांनी त्याच्याशी सामना करून विजय मिळवला. रेणुकामातेचे माहुरगडावरील मंदिर किती प्राचीन आहे हे ज्ञात नसले तरी त्याचा जीर्णोद्धार 1624 साली केल्याची माहिती आहे. सातवाहन, पोर्तुगीज, शिवाजीराजे, औरंगजेब, आदींचा माहूरशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आला होता. 

रेणुकादेवीचे नवरात्र माहुरगडावर अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेने सुरू होते. त्यासाठी लाखो भक्त गडावर येतात. देवीसाठी तेलातुपाचा नंदादीप प्रतिपदा ते नवमीपर्यंत नऊ दिवस अखंड लावला जातो. नवरात्रात दररोज दहीभाताचा व पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. त्या काळात देवीमहात्म्य विविध प्रकारांनी आळवले, आठवले जाते. तेरा वस्तूंनी बनवलेला तांबूल तिच्या विशाल मुखात अर्पण करणे हा तिच्या पूजेतील वैशिष्ट्याचा भाग आहे. 

रेणुकामातेची अलंकार पूजा नवरात्रीतील पाचव्या माळेला – ललितापंचमीला- केली जाते. देवीचे अलंकार सूर्यास्तापूर्वी उतरवल्यावर तिची महाआरती होते. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले कलावंत त्यांची संगीतसेवा पंचमीला सादर करतात. विख्यात गायकनट बालगंधर्व ते भजनसम्राट अनुप जलोटा अशा दिग्गजांनी तेथे संगीतसेवा केली आहे. सप्तमीला महाकाली गडावरील महाकालिकेच्या मंदिरात जाऊन, तिची विधिवत पूजा करून, तिला महावस्त्र अर्पण करण्याची प्रथा आहे. अष्टमीला तर रेणुकामातेची यथाविधी पूजा पहाटेच्या प्रसन्न वेळी दिमाखात केली जाते. नवरात्रोत्सवात सप्तशतीचा नित्यपाठ होतो. यज्ञाला पूजेनंतर लगेच सुरुवात होते. तो यज्ञ चालू असताना सप्तशतीचे पठण सुरूच असते. मात्र सप्तशती पठणातील आठव्या अध्यायाला यज्ञविधी थांबवला जातो आणि रेणुकामातेला पंचामृतादी पूजाद्रव्याने स्नान घालून तिची महापूजा होते. _mandiracharasta_mahurgad_renukadeviनवीन वस्त्र परिधान केलेली देवी शोभून दिसते. सप्तशतीचे पठण देवीला महानैवेद्य दाखवल्यावर नवव्या अध्यायापासून पुन्हा सुरू होते. यज्ञाचाही पुन्हा आरंभ केला जातो. नववा अध्याय पूर्ण झाल्यावर अष्टमीच्या यज्ञाचीही सांगता होत असते. रेणुकादेवीचे मुख्य निशाण विजयादशमीला उतरवण्यात येते. त्या पवित्र खांबाला पवित्र स्नानही घातले जाते आणि निशाणावर नववस्त्र व नवीन अलंकार चढवले जातात. निशाणाचे ते नववस्त्र एकावन्न मीटर लांबीच्या कापडाचे असते. विजयादशमीला निशाण उतरल्यानंतरची रेणुकामातेची शृंगारपूजा मंगलस्नानासह केली जाते. तिला महावस्त्र अर्पण करून पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवला जातो. तो सोहळा नयनरम्य असतो. त्यानंतर परशुरामाची पालखी मिरवणूक निघते. ती वरदायीच्या डोंगरावर जाऊन, म्हणजे सीमोल्लंघन करून स्वस्थानी परतते. मिरवणूक परतताना रेणुकामातेच्या मंदिराद्वारी येताच मातेला आपट्याच्या पानांचे सोने वाहून, महानैवैद्य दाखवून, महाआरतीनंतर तांबूल भरवून नवरात्रोत्सवाची सांगता होते..

– संकलित

About Post Author

2 COMMENTS

  1. शालिवाहन राजाने त्याचा…
    शालिवाहन राजाने त्याचा जीर्णोद्धार केल्याची माहिती आहे. सातवाहनांचा काळ इसपू २३० ते इस २३० आहे. छत्रपती शिवरायांचा काळ १६२४ आहे.

  2. सुंदर लेख, छान माहिती मिळाली.
    सुंदर लेख, छान माहिती मिळाली.

Comments are closed.