महादेवशास्त्री जोशी – संस्कारशील कथा

0
191

अमीर खानचा ‘तारे जमींपर’ हा सुंदर व प्रेरणादायी चित्रपट प्रसिद्ध आहे. त्यात छोटा मुलगा व त्याला समजून घेणारे शिक्षक यांची नितांतसुंदर कथा गुंफलेली आहे. चित्रपटातील संवादामध्ये एक वाक्य आहे – Every child is special ! प्रत्येक मुलामध्ये कोणती तरी चांगली कला किंवा वैशिष्ट्य गुंफलेले असते, मात्र आईवडिलांनी ते ओळखले नाही तर मुलगा शाळा व शिक्षण यांमध्ये मागे पडतो आणि आईवडिलांची काळजी सुरू होते. त्या चित्रपटामध्ये अमीर खान (एक शिक्षक) ती गोष्ट ओळखतो. त्या मुलाच्या कलेला वाव देतो. त्यामुळे तो मुलगा उत्तम चित्र काढून शेकडो मुलांमध्ये स्पर्धा जिंकतो. इतकेच नव्हे तर शाळेच्या अभ्यासातही अव्वल ठरतो. चित्रपटातील गाणी फार भावस्पर्शी असून आईवरचे शंकर महादेवन यांनी गायलेले एक गाणे डोळ्यांत पाणी उभे करते !

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तशाच एका लेखकाचा जन्म गोव्याच्या सत्तरी परगण्यामधील आंबेडे या गावी झाला. त्या लेखकाचा शोध मला एका पुस्तकामधून लागला. ते चरित्रनायक म्हणजे महादेवशास्त्री जोशी. त्यांचा नावलौकिक मला परिचयाचा होता, पण त्यांचे बालपण कसे घडले हे माहीत नव्हते. त्यांचे वडील पुराणिक होते. पुराणिक देवळात चातुर्मासात व इतर वेळी हरीविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत अशा ग्रंथांतील कथा सांगून लोकांना जीवन कशा प्रकारे जगावे याचा वस्तुपाठ देत. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अशा कथा/गोष्टींमधून सांगितलेली धर्मतत्त्वे व जीवन जगण्याची सांस्कृतिक परंपरा लोकांना समजत असे, महत्त्वाची वाटे. महादेवाचा जन्म अशा पुराणिकांच्या पोटी झाला. त्यांच्या वडिलांचे निधन लवकर झाले. महादेवशास्त्री यांच्या गावात शाळा नव्हती. गावामध्ये दोन मुख्य जाती होत्या- एक ब्राह्मण व दुसरी कुळवाडी. ते सर्व लोक मेहनत करून पोट भरत. दोन्ही जातींमध्ये फरक विशेष नसे.

घरच्या लोकांनी महादेवाला पौरोहित्य व वेद यांच्या शिक्षणासाठी सांगलीच्या वेद पाठशाळेत पाठवले. त्यांना तेथे मराठी वाचनाची गोडी लागली. त्यांना वेळ मिळेल तेव्हा वाचनालयात जाऊन बसण्याचा छंद लागला. पाठशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी क्वचितच कोणी तसे करत असे. महादेव यांचे मन विशेषत: लघुकथांवर झेपावत असे. महादेव यांच्या हृदयाला खांडेकर यांच्या कथा त्यांतील भावनास्पर्शी व समृद्ध भाषेमुळे भिडत. त्यांना लघुकथालेखक विठ्ठल सीताराम गुर्जर यांच्या कथाही आवडत. साहजिकच, त्यांच्या मनात येई, की अशा कथा स्वत: का लिहू नये ! त्यांनी मनोमन लघुकथालेखक होण्याचे ठरवले. त्यांनी प्रसिद्ध कादंबरीकार हरिभाऊ आपटे यांच्या कथा व कादंबऱ्या सपाटून वाचल्या. त्या वाचनामुळे त्यांना जग हे त्यांचे गाव धाब्या आंबेड्याहून किती मोठे आहे याची जाणीव झाली.

त्यांनी सांगलीच्या वेद पाठशाळेतील सात वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. तेथे त्यांना लेखन-वाचनाबरोबर ज्ञानेश्वरी-तुकाराम गाथा व रामायण-महाभारत असे धार्मिक ग्रंथ यांचे आकलन झाले. ते दशग्रंथी ब्राह्मण म्हणून शिक्षण पूर्ण करून गोव्याला त्यांच्या गावी परतले. परंतु तेथे पुढील चरितार्थासाठी काही साधन नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांचा मोर्चा पुण्याकडे वळवला. तेथे ते दोन/तीन देवळांमध्ये धार्मिक कामे करू लागले. पुणे हे त्यावेळी विद्येचे व ज्ञानाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध होते. तेथेच त्यांनी ‘सद्विचार’ नावाचे मासिक सुरू केले. ते चारपाच वर्षे चालवले. त्यांनी वेद पाठशाळेमध्ये कालिदास अभ्यासला होता. त्यांना ज्ञानेश्वर व तुकाराम या संतांच्या मराठी रचनांनी समृद्ध केले होते. त्यावेळी गुरु परंपरा होती, पण त्या तिघांशिवाय दुसरे कोणी गुरू त्यांना मिळाले नाहीत.

पुण्याहून ‘ध्रुव’ नावाचे मासिक संपादक रा.प्र. कानिटकर चालवत असत. त्यांनी मासिकासाठी कथास्पर्धा जाहीर केली. त्यामध्ये कानिटकर यांनी परीक्षक न नेमता वाचकांनी त्यांना आवडलेली कथा सांगावी असे जाहीर केले. त्यात महादेवशास्त्रींची ‘धन आणि मन’ ही कथा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. ती कथा एका सावकारावर होती. पण तो सावकार जनमनातील सावकाराच्या कल्पनेपेक्षा वेगळा होता. त्याचा एक ऋणको (कर्जदार) – जनुभाऊ मुद्दल नव्हे तर व्याजपण देऊ शकत नव्हता. सावकार एका वर्षी कसेही करून निदान व्याज तरी वसूल करायचे असे ठरवून कर्जदाराच्या घरी व्याज मिळेपर्यंत मुक्काम ठोकतो, पण सावकाराला कर्जदाराच्या दारात गेल्यावर त्याचे जे दर्शन झाले त्यामुळे त्याचा कर्जवसुलीचा निर्णय कोलमडून पडला ! ऋणकोचे घर जाण्यायेण्याच्या वाटेवर होते. त्यामुळे तेथे गरीब, दीनदुबळ्या प्रवाशांना आश्रय मिळे. अंगणात येऊन बसलेल्या कुळवाड्यांना तेथे हमखास द्रोणभर पेज मिळे. कोणीही वाटसरू त्या घराच्या ओसरीत तहान शमवण्यासाठी येई, किमान पाणी तरी पिऊन जाई. सावकाराने ते सारे एका रात्रीच्या तेथे केलेल्या मुक्कामात पाहिले. दुसऱ्या दिवशी कर्जफेडीच्या गोष्टी निघाल्या तेव्हा ऋणकोने सावकाराला स्पष्ट सांगितले –माझ्याकडून तुमचे कर्ज फिटेल असे आता मला वाटत नाही. तेव्हा कर्जफेडीचा एक उपाय म्हणजे तुम्ही माझे घर आणि कुळागार घेऊन टाका. एकाद्या ‘जातिवंत’ सावकाराला तो उपाय ऐकून आनंद झाला असता, पण या सावकाराला तसा आनंद झाला नाही. त्याने जे उत्तर दिले ते अनपेक्षित व ऋणकोला धक्का देणारे होते. सावकार म्हणाला – जनुभाऊ, ठिकाण (घर) देण्याचा वेडेपणा तुम्ही करू नका. ते घेण्याचा लोभ मीही करणार नाही. हातचे घर गेले, जमीन गेली की तुम्हाला लाचारीने दिवस काढावे लागतील, ज्याला स्थान (घर) नाही त्याला मान नाही. या तुमच्या हजार रुपयांसाठी माझी चूल अडलेली नाही. तुमच्याकडून कर्जवसुली करताना मी माझी माणुसकी विसरता कामा नये. तुम्ही सवड होईल तेव्हा आणि तसे पैसे मला द्या. मी ते मुदलातून फिटले असे समजेन. व्याज घेणार नाही. व्याजाची मला हाव नाही आणि आणखी एक गोष्ट सांगतो – आल्यागेल्याचे विश्रांतिस्थान अन् गोरगरिबांना घासभर अन्न देणारे हे तुमचे वाटेवरचे घर मी मोडले असे व्हायला नको.

जनुभाऊ सावकाराच्या त्या ‘दर्शना’ने भारावून गेले. सुदैवाने त्यांना पुढे पैसे मिळाले तेव्हा ते सावकाराचे सर्व पैसे परत करावे म्हणून सावकाराकडे गेले. त्यांनी सावकाराचे पैसे परत केले. त्यावेळी सावकाराला त्या पैशांचा त्याग करता येईना व स्वीकारही करता येईना (त्यावेळी ऋणकोने सावकाराची परीक्षा पाहण्यासाठी नाटक केले असावे). शेवटी, सावकार त्यातील पाचशे रुपये वेगळे काढतो व जनुभाऊंच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीकडे ती रक्कम देऊन ‘ही धाकट्या भावाची ‘प्रेमाची भाऊबीज’ असे म्हणून निघून जातात.

या कथेमुळे महादेवशास्त्री यांचा कथालेखनाचा बाज ठरला, त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांना महाराष्ट्रातील सर्वसामान्य वाचकवर्गाची मनोवृत्तीही कळून आली. त्यांना असे दिसून आले, की वाचकांची मानवी सद्भावनेवर श्रद्धा आहे, वाचकांच्या अंतरात माणुसकीचा गहिवर आहे. तेथे वाचक व महादेवशास्त्री यांच्यातील लेखक यांचा सांधा जुळला ! त्या यशाने महादेवशास्त्री यांचा कथालेखनाचा पुढील मार्ग निश्चित झाला.

महादेवशास्त्रींना त्यांच्या कथासाहित्याच्या माध्यमातून मनुष्याच्या मनावर सद्भावनांचे संस्कार करणे हे उद्दिष्ट वाटे. त्यांचे जीवनविषयासंबंधीचे विचार, त्यांचे साहित्यिक कर्तृत्व व त्यांची आचरणशीलता यांमध्ये एकवाक्यता आढळते. त्यांची जीवनपद्धत ते ज्या भूप्रदेशात राहिले तेथील समाजाची होती. त्यांच्या गोव्याच्या भूमीची होती. त्यांच्या कथांमधील पात्रे त्यांच्या आजुबाजूची किंवा लहानपणापासून अनुभवलेली असत.

त्यांची दुसरी कथा ‘कन्यादान’. त्या कथानायकाच्या जीवनात घडलेल्या गोष्टीचा विचार केला तर त्यांनी आचरणात आणलेली जीवनमूल्ये किती उच्च दर्ज्याची होती याचा प्रत्यय येतो. कथेमध्ये दोन मित्र असतात. त्यांतील एकाचे म्हणजे नानांचे दुसऱ्या मित्राला पत्र येते. त्या पत्रातून नानांच्या मुलीला स्थळ सुचवलेले असते. तसेच, नानांच्या संमतीने त्यांच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी कथानिवेदक मित्राने म्हणजे दुसऱ्याने घेतलेली असते. ते मित्राच्या मुलीला म्हणजे कुमारी प्रतिभेला त्यांच्या घरी आणतात व लग्नाची सर्व तयारी करतात, पण लग्नाची वेळ जवळ येऊन ठेपली तरी मुलीचा बाप म्हणजे नाना लग्नासाठी येतच नाही. ऐन वेळी, नानांच्या पत्नीचे नानांना गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात पकडले असल्याचे पत्र येते. लग्नाचा सारा खर्च मित्र करतो. लग्नाला आईबाप येऊ शकत नाहीत, म्हणून वरपित्याला चिंता वाटू लागते, पण कन्यादान करण्यासाठी तयार झालेला प्रतिभेचा ‘बाप’ ठरल्यावेळी व ठरलेल्या पद्धतीने लग्न होईल असे आश्वासन देतो. त्यातही परिसीमा म्हणजे हुंड्याचा खर्च म्हणून तो स्वत:च्या बायकोचे दागिने गहाण ठेवतो ! नानांची मुलगी प्रतिभा त्याला विरोध करते. शेवटी कळस म्हणजे ती दोघे पतिपत्नी (नवरा-बायको) हुंडा देण्यासाठी लग्नाच्या वेळी वरपक्षाकडे जातात, तेव्हा तो नवरा हुंड्याचे पैसे स्वीकारण्यास तयार होत नाही. जावई म्हणतो, ‘आधी काकूंच्या बिल्वर-पाटल्या हातात येऊ देत. मग कन्यादान. मला हुंडा नको.’ हे सर्व अकल्पित वाटणारे आहे. पण ही कथा सत्य असल्याचे समजते.

महादेवशास्त्री जोशी यांचे कथासंग्रह

महादेवशास्त्री यांच्या प्रत्येक कथेत व्यक्ती आणि व्यक्तीचे मन हे मध्यवर्ती केंद्र आहे. लेखक कथेतील भावनांशी एकरूप होऊन त्यातील समस्या हलक्या व नाजूक हाताने सोडवतात. त्यांच्या अशा कथांचे दहा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत- 1. वेलविस्तार, 2. खडकातले पाझर, 3. मोहनवेल, 4. कल्पित आणि सत्य, 5. कथाकांता, 6. भावबळ, 7. प्रतिमा, 8. घररिघी, 9. पुत्रवती, 10. कन्यादान. त्यांनी ‘आत्मपुराण’ हे स्वत:चे आत्मचरित्र लिहिले आहे.

जोशी यांच्या बहुतेक कथा गोमंतकीय असल्या तरी गोव्याच्या प्रादेशिक जीवनापुरत्या मर्यादित नाहीत. त्यांना त्यांच्या ‘गोपी’, ‘चतुर्भुज’, ‘येरे माझ्या मागल्या’, ‘आज मी असेच बोलणार’ या कथांची बीजे त्यांच्या गोव्याच्या जीवनातून सापडली. मराठी साहित्यात त्यांच्या भावनाशील व संस्कारशील कथांचे स्थान असाधारण आहे. खरे म्हणजे त्यावेळी चार मराठी नवकथाकार (गाडगीळ, भावे, गोखले, माडगूळकर) त्यांच्या नवकथा सादर करून त्यांचे मराठी साहित्यविश्वातील स्थान निर्माण करत होते. तरी महादेवशास्त्री जोशी यांची पारंपरिक कथाही टिकून राहिली. महादेवशास्त्रींच्या कथा हृदयस्पर्शी व कौटुंबिक जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळणाऱ्या आहेत. त्यांच्या बऱ्याच कथांची पार्श्वभूमी गोव्याची असली तरी कथासाहित्यात प्रकट होतात त्या मानवी भावना सर्व प्रदेशांत घडणाऱ्या आहेत. त्यांच्या कथेतील कौटुंबिक विषय, कौटुंबिक समस्या अगर सुखदु:खे ही सर्वसामान्य माणसांच्या जीवनात पदोपदी येणारे अनुभव आहेत. त्यामुळे वाचकांना ते त्यांचे अनुभव वाटतात व त्यांची नाळ त्या कथांशी जोडली जाते. त्यांच्या कथांवर आधारित दहाच्या वर चित्रपट निर्माण झाले. ते असे – ‘मानिनी’, ‘जिव्हाळा’, ‘अरे संसार संसार’, ‘जावई माझा भला’, ‘बहिष्कार’, तर हिंदीतील – ‘मानापमान’, ‘बहुबेटी’, ‘धर्मकन्या’ वगैरे. चित्रपटांना लागणारे नाट्य त्यांच्या कथांत भरपूर होते.

त्यांच्या कथालेखनाचा बहराचा काळ हा 1940 ते 1960 असा होय. पुढे, त्यांनी कथालेखन थांबवले व त्यापेक्षा मोठे म्हणजे मराठी ‘भारतीय संस्कृतिकोशा’चे कार्य हाती घेतले. रूढ आधुनिक शिक्षण फारसे नसताना, त्यांनी त्यांचे मराठी साहित्यातील स्थान स्वत:च्या प्रतिभेने, अनुभवाने व मेहनतीने निर्माण केले. त्यांच्या कथासंग्रहांना पुरस्कार मिळाले. त्यांच्या संस्कृत भाषेतील ‘पर्जन्यकुंडम्’ या कथेला बक्षीस मिळाले. तसेच, नाटककार बाळ कोल्हटकर यांनी ‘दुरितांचे तिमिर जावो’ हे नाटक लिहिले. भालचंद्र पेंढारकर यांच्या ‘ललित कलादर्श’ संस्थेने त्या नाटकाचे प्रयोग केले. त्यास अमाप लोकप्रियता मिळाली.

महादेवशास्त्री जोशी यांचे असे हे कथाविश्व. वाचक ते वाचू लागला, की त्यांतील हळुवार संवेदनेने त्या कथांच्या प्रेमात पडतो.

प्रभाकर भिडे 9892563154 bhideprabhakar@gmail.com
(मुख्य संदर्भ: ‘ओळख’ – लेखिका – अर्चना पंडित, मधुश्री प्रकाशन)
—————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here