महाजनपूर सैनिकांचे गाव (Mahajanpur – Soldiers Village)

_sainikanche_gav_mahajanpur

नासिकच्या महाजनपूरची ओळख ‘सैनिकांचे गाव’ अशी आहे. गावातील त्रेपन्न युवक लष्कराच्या विविध विभागांत कार्यरत आहेत. त्यांच्या सहकार्यातून मोफत लष्करी प्रशिक्षणाचा प्रकल्पही राबवला जात आहे. शेती कसणे आणि काही प्रमाणात शासकीय नोकऱ्यां असा मार्ग खुला असतानाही तेथील युवकांचा कल खडतर लष्करी सेवेकडे आहे.

नासिकहून औरंगाबादला जाताना हिरवाईने नटलेला निफाडचा समतल परिसर समृद्ध शेतीची प्रचीती देतो. सुजलाम-सुफलाम दिसणाऱ्या त्या परिसराचे रुदन मात्र वेगळेच आहे. निफाड – सिन्नर सीमारेषेवर वसलेल्या गावांमध्ये दुष्काळ पाचवीला पुजलेला. पावसाच्या पाण्यावर थोडेफार पिकते. परंतु, त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालवणे अवघड. त्यावर मात करण्यासाठी स्थानिक युवकांनी मार्ग शोधला लष्करी सेवेचा. त्यामुळे बहुतेकांची त्यासाठी तयारी दहावीत प्रवेश करतानाच सुरू होते. देशसेवेची भावना लष्करात दाखल होण्यामागे आहे, पण तितकाच पर्याय पोटाची खळगी भरण्याचाही आहे. अनेक जण सैन्यात कठोर परिश्रमातून दाखल झाले. त्यांनी नवोदितांना मार्गदर्शनाची जबाबदारी स्वीकारली. ग्रामस्थांची मदत, युवकांचे श्रमदान यांतून सरावासाठी गावात खास मैदान तयार झाले, अद्ययावत व्यायामशाळा उभारली गेली. ज्यांना भरतीत यश मिळाले नाही, त्यांनी उमेद हरली नाही; अन्य छोटेमोठे कामधंदे स्वीकारत भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांच्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिले. त्यांना मैदानात, व्यायामशाळेत अव्याहतपणे धडे दिले जातात. त्या सामूहिक प्रयत्नांची परिणती महाजनपूरला ‘सैनिकांचे गाव’ ही ओळख निर्माण होण्यात झाली आहे.

भरतीपूर्व लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय, खासगी संस्थांची कमतरता शहरी-ग्रामीण भागात नाही. परंतु ग्रामस्थांच्या सहकार्यातून युवकांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी मोफत सुविधा देणारा, मार्गदर्शन करणारा प्रकल्प राबवणारे महाजनपूर हे गाव बहुधा एकमेव असावे. ते सायखेड्यापासून सात किलोमीटरवर आहे. ते दुष्काळी सिन्नर तालुक्यास लागून आहे. त्या गावची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास आहे. गावातील दराडेमामा 1976 साली सैन्यात भरती झाले. ते त्यांच्या क्षमतांच्या बळावर कर्नलपदापर्यंत पोचले. त्यांचा गावाशी संपर्क पुढील काळात तुटला, परंतु त्यांचा सैन्यदलातील प्रवेश ग्रामस्थांना प्रेरणा देणारा ठरला. गावातील एक व्यक्ती लष्करी अधिकारी होऊ शकते तर आपण का नाही, या विचाराने गावातील पिढी झपाटली. शेतीची खस्ता स्थिती पाहून कुटुंबीयांनी त्यांना पाठबळ दिले. त्यामुळे गावातील त्रेपन्न युवक भारतीय लष्कराच्या वेगवेगळ्या विभागांत कार्यरत आहेत. ज्यांना काही कारणास्तव लष्करात जाता आले नाही, त्यांनी पोलिस खात्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे एकतीस मुले-मुली पोलिस दलात गेली. युवक भरती होऊ लागले, तशी इतरांना प्रेरणा मिळाली. काही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांचाही कल लष्करी सेवेकडेच आहे.

हा ही लेख वाचा – फड मंडळींचे महाजनपूर

सामाजिक कार्यकर्ते बच्चू फड त्या गावातील युवकांचा कल लष्करी सेवेकडेच का आहे, त्याची कारणे उलगडतात. शेती दुष्काळी भागात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. उन्हाळ्यात कोरडा माळ पाहत आकाशाकडे डोळे लागलेले असतात. पोटापाण्याचा प्रश्न सुटावा, याकरता नोकरीशिवाय पर्याय नाही. एकीकडे शेतमालास भाव नाही, तर दुसरीकडे शासकीय नोकऱ्यांची कमतरता, शिक्षणानुसार नोकऱ्यांचे प्रमाण नाही. त्यामुळे मुलांना हाता-तोंडाची गाठ पडण्यास हवी म्हणून मोलमजुरी करण्यापेक्षा सैन्यदलात भरती व्हावेसे वाटते. देशाची सेवा होतेच, पण आयुष्याला स्थैर्यही मिळते. तरुण सैन्यात जाता यावे म्हणून कसून सराव करतात. गावातील कित्येक मुले प्रत्येक भरतीसाठी मुंबई गाठतात. त्यातून एक-दोन जणांची निवड होते. महाजनपूरमध्ये भरतीसाठी होत असलेली तयारी पाहून, मुले आसपासच्या गावांतूनही मार्गदर्शनासाठी तेथे येतात.
सागर फड याची भरतीत निवड होऊ शकली नाही. मग त्याने व्यायामशाळेच्या प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. ते म्हणाले, ‘‘मी मला आलेल्या अडचणी इतर मुलांना येऊ नयेत यासाठी प्रयत्न करतो. आम्ही सरपंचाच्या मागे लागून मैदान तयार केले. त्यासाठी आम्ही गावातील पंचवीस ते तीस मुले दोन महिने काम करत होतो. उंच उडी, गोळाफेक, सोळाशे मीटरचा ट्रॅक आदी व्यवस्था मैदानावर केल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने अत्याधुनिक अशी व्यायामशाळाही सुरू केली आहे. सागर फड कोठलेही मानधन न घेता मुलांना व्यायामाचे धडे देत आहेत. आता केवळ महाजनपूर नव्हे, तर भेंडाळी, औरंगपूर, सायखेडा येथून दररोज पन्नासहून अधिक युवक सरावासाठी येतात.’’

_smarakगावातील बहुतेक तरुणांचा सैन्यदलात जाण्याचा विचार पक्का आहे. त्यांपैकी एक म्हणजे अविनाश फड. तो युवकांचा दिनक्रम कथन करतो. रोज पहाटे पाच किलोमीटर पळण्याचा सराव केला जातो. गोळाफेक, उंच उडी, नियमावलीनुसार निर्धारित वेळेत अंतर पार करणे असे सर्व काही होते. सकाळ-सायंकाळी मैदानावर आणि व्यायामशाळेत सराव केला जातो. अविनाशने दुसरीकडे गावात चहाची टपरी सुरू केली आहे. ‘‘पालकांवर त्याचा बोजा नको या विचाराने माझे काम सुरू असून, दिवसाकाठी दोनशे-तीनशे रुपये मिळतात. तीन वर्षांपासून हा माझा नित्यक्रम झाला आहे. पण या वर्षी माझा नंबर लागणारच,’’ असे तो विश्वासाने सांगतो. श्रीकृष्ण फड याने लष्करी भरतीतील निकषांमुळे होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष वेधले: ‘‘सैन्यदलात दाखल होण्यासाठी ‘जनरल ड्युटी (जेडी)’साठी अठरा ते एकवीस आणि ‘ट्रेड्समन’ पदासाठी एकोणीस ते तेवीस वयोमर्यादा आहे. वर्षांतून दोनदा, म्हणजे सहा-सहा महिन्यांनी भरती १९९४ पर्यंत होत असे. त्यामुळे एका भरतीत नाकारले गेलो तरी वर्षांत दुसऱ्यांदा संधी मिळत होती. मात्र, आता सर्व कारभार ऑनलाइन आहे. भरती वर्षांतून एकदाच होते. त्याची तारीख कधी येईल हे माहीत नसते. त्यात वर्ष निघून जाते. कसून सराव करूनही कधी अनुत्तीर्ण झाल्याने, तर कधी वयोमर्यादा उलटल्याने, गावातील वीस मुले त्या प्रक्रियेतून बाद झाली आहेत.’’ त्याने त्यामुळे सैन्यात दाखल न झाल्यास अत्याधुनिक पद्धतीने शेती करायची, भाजीपाला पिकवायचा हे ठरवले आहे.

कृष्णा फड याची धडपड खेळाडूंच्या कोट्यातून लष्करात जाण्यासाठी सात वर्षांपासून सुरू आहे. तो कयाकिंग स्पर्धेत राज्यपातळीवर पोचला. त्याची राष्ट्रीय स्पर्धेची तयारी सुरू आहे. त्याला यश प्रत्येक वेळी दोन-तीन गुणांनी हुलकावणी देते. त्याने यंदा खेळाडूंचा कोटाही कमी केला गेला असल्याने प्रयत्न तरी कसा करायचा, अशी अगतिकता व्यक्त केली. बापू फड यालाही लष्करात जायचे आहे. त्याचा भरतीत सहभागी होण्यासाठी दिवस-रात्र सराव सुरू आहे. त्याचे वडील नसल्याने त्याची जबाबदारी आईवर आहे. तो सांगतो, “आई मला म्हणते, भरपूर शिक्षण घे, पण शेती करू नको. प्रयत्न करूनही अपयश पदरी येते, तेव्हा आई धीर देते, खचू नकोस असे सांगते. पण प्रत्येक निकालाने तीच आतल्या आत खचते,’’ हे सांगताना त्याच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

_sainikanche_gavप्रत्येकाची कथा वेगवेगळी आहे पण तरीही युवावर्ग सैन्यात भरती होण्यासाठी झोकून देत सराव करत आहे. सैन्यात असलेले गावाचे तरुण त्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. ते सुटीवर घरी आल्यानंतर मुलांसोबत मैदानावर सराव करतात, शेतीत हातभार लावतात. मुलांना तयारी कशी करायची, याविषयी माहिती देतात. काम करतानाचे अनुभव मांडतात. गावात काही घरे अशी आहेत, की ज्यांची दोन्ही मुले सैन्यात आहेत. लष्करातील सेवेमुळे त्या कुटुंबांच्या आर्थिक गरजा पूर्ण होऊन आयुष्याला स्थिरता मिळाली आहे.

शेती करणाऱ्याला कोणी मुलगी देण्यास तयार नाही. सैन्यदलात भरती झालेल्या मुलांकरता मात्र स्थळे पायघड्या टाकत येतात. भरतीत निवडला गेला, की साखरपुडा आणि प्रशिक्षण झाल्यावर लग्न ही तेथील पद्धत पडून गेली आहे. अनेक युवक नोकरी नसल्यास कोणी विचारत नसल्याची खंत व्यक्त करतात. 

– चारुशीला कुलकर्णी 9922946626
charu.kulkarni85@gmail.com
(‘लोकसत्ता’ वरून उद्धृत, संपादित – संस्कारीत)

About Post Author