मला स्‍वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्थेचं नाटक रंगभूमीवर यावं असंच वाटत राहिलं – अरूण काकडे

अरुण काकडे
अरुण काकडे

अरुण काकडे‘‘मला, मी स्‍वतः कलाकार असलो तरी स्‍वतःपेक्षा माझं आणि माझ्या संस्‍थेचं नाटक रंगमंचावर यावं असंच वाटत राहिलं. आजही वाटतं. इथून पुढंही तेच करण्‍याची इच्‍छा आहे.’’ ज्‍येष्‍ठ नाट्यकर्मी अरुण काकडे यांनी दादर-माटुंगा कल्‍चरल सेंटरमध्‍ये रंगलेल्‍या ‘कृतार्थ मुलाखतमाले’त अशी भावना व्‍यक्‍त केली. नाटकाचा प्रवास चालू राहिला पाहिजे अशा आशयाच्‍या त्‍यांच्‍या बोलण्‍यातून ते आणि त्‍यांची नाटके यांच्‍यातील एकात्मता प्रत्‍ययास येत राहिली. कार्यक्रमात विश्‍वास काकडे लिखित ‘ग्रंथाली’ प्रकाशनाच्‍या ‘मनाचे कवडसे’ या पुस्‍तकाचे अरुण काकडे यांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.

काकडेकाकांशी संवाद साधताना रवींद्र पाथरेनाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे यांनी अरुण काकडे यांना बोलते करत त्‍यांच्‍या आयुष्‍याचा पट उलगडला. नाट्यक्षेत्रात काकडेकाका या नावाने ओळखले जाणारे ‘काका’ही आठवणींमध्‍ये रमले. त्‍यांनी त्‍यांच्‍या लहानपणीचा काळ कष्‍टप्रद अन् हलाखीचा होता असे सांगत नाटकाचे सादरीकरण आणि वाचिक अभिनयाचे बीज लहानपणच्‍या घटनांमध्‍ये रूजले गेले असावे असा अंदाज व्‍यक्‍त केला. त्‍यांनी नाट्यक्षेत्रातील स्‍वतःच्‍या पहिल्‍या प्रयत्‍नांचा मागोवा घेत शिक्षणासाठी पुण्‍याला येणे, तिथे भालबा केळकर यांच्‍याशी झालेली ओळख, मग एकत्रितपणे बसवलेली महाविद्यालयीन नाटके अशा घटना सांगितल्‍या. पुढे अरुण काकडे पीडीएतला अनुभव पाठीशी घेऊन मुंबईला आले. त्‍यांची तिथे ओळख अरविंद देशपांडे आणि विजया मेहता यांच्‍याशी झाली. त्‍या भेटीच्‍या आठवणीने काकडे यांचा स्‍वर कातर झाला होता.

तुघलक नाटकात प्रसिद्ध अभिनेते अरुण सरनाईक (२ ऑगस्ट १९७१)काकडे त्‍यांच्‍या शांत, हळुवार आवाजात बोलत राहिले. त्‍यांच्‍या सांगण्‍यात ‘रंगायन’च्‍या उभारणीआधीचा काळ, विजया मेहता-अरविंद देशपांडे-भालबा-विजय तेंडुलकर -श्री. पु. भागवत अशा मोठ्या व्‍यक्‍तींचा त्‍यांना लाभलेला सहवास, रंगायनची झालेली स्‍थापना, त्‍यांनी केलेली नाटके, त्‍यांना आवडलेल्‍या इतरांच्‍या भूमिका, ‘शितु’, ‘मी जिंकलो… मी हरलो…’ किंवा ‘शांतता…’, ‘तुघलक’सारख्‍या मैलाचा दगड ठरलेल्‍या नाटकांची निर्मिती अशा ब-याच घटना येत राहिल्‍या. त्‍या सा-यांतून ते आपसूकच मराठी नाट्यक्षेत्राचा एक महत्‍त्‍वाचा काळ प्रेक्षकांसमोर उभा करत गेले. शेवटी नाटक उभे करण्‍याची हातोटीच त्‍यांची! त्‍यांच्‍या कथनामधूनच नाटक उभे राहिले. काकडे यांनी त्‍यांच्‍या प्रांजळ बोलण्‍यातून कडू-गोड आठवणी सांगितल्‍या. त्‍यांनी ‘शांतता… कोर्ट चालू आहे’ या नाटकातील सुलभा देशपांडे यांनी साकारलेली बेणारे बाई आणि ‘चांगुणा’ या नाटकातील रोहिणी अरुण काकडेंच्या मुलाखतीत रंगलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेहट्टंगडी यांनी उभी केलेली सगुणा या मराठी रंगभूमीवरील दोन अजरामर भूमिका असल्‍याचे सांगितले. मुलाखतीस उपस्थित असलेल्‍या ज्‍येष्‍ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे , रामदास भटकळ , सुधीर नांदगावकर , सतिश जकातदार, श्रीकांत लागू, अनंत भावे अशा नामांकित व्‍यक्‍तीदेखील प्रेक्षकांप्रमाणे त्‍या आठवणींमध्‍ये रंगून गेल्‍या होत्या.

‘पाहिजे जातीचे’ नाटक सादर करताना विहंग नायक आणि नाना पाटेकर (९ नोव्हेंबर १९७६)पाथरे यांनी काकडे यांना विजया मेहता आणि तशाच इतर व्‍यक्‍तींच्‍या त्‍यांच्‍या संस्‍थेशी असलेल्‍या मतांतरांबद्दल विचारले. अरुण काकडे यांनी त्‍या सर्व प्रश्‍नांना मोकळेपणाने उत्‍तरे दिली. छबिलदासमध्‍ये प्रयोगशीलता नव्‍हती असे विजयाबाईंचे म्‍हणणे आहे, या पाथरे यांच्‍या प्रश्‍नाला उत्‍तर देताना काकडे म्‍हणाले, ‘‘प्रयोगशीलता ही व्‍यक्तिसापेक्ष असते. छबिलदासने एवढी चांगली नाटके रंगभूमीवर आणली, ती प्रयोगशीलता असल्‍याशिवाय का? आणि शेवटी प्रयोगशीलता म्‍हणजे तरी काय, तर संहिता वाचून डोक्‍याला झिणझिण्‍या येतात आणि मनास अस्‍वस्‍थता येते आणि तो प्रयोग करणे ही निकड वाटून तो उभा केला जातो. त्‍यालाच तर प्रयोगशीलता म्‍हणायचे ना!’’ काकडे यांनी पुढे असे नमूद केले की, विजया मेहता छबिलदासमध्‍ये कधीही आल्‍या नाहीत. मात्र त्‍या सांगण्‍यास कटुतेचा स्‍पर्श नव्‍हता.

काकडे केवळ आणि केवळ त्‍यांच्‍या नाटकांबद्दल, त्‍यातील माणसांबद्दल आणि नाट्यसंस्‍थांबद्दल बोलत राहिले. त्‍यांच्‍या बोलण्‍यातून प्रत्‍येक टप्‍प्‍यानुसार नाट्यसंस्‍थेमधील त्‍यांची जबाबदारी आणि बदलतली भूमिका स्‍पष्‍ट होत गेली. त्‍यांचे आधी असलेले कलाकाराचे रूप, मग त्‍यास चढलेला सूत्रधाराचा रंग आणि त्‍यानंतर संस्‍थेचा आधारस्‍तंभ अशा कलाकार ते पडद्यामागचा सूत्रधार या त्‍यांच्‍या बदलत्‍या भूमिकांचा प्रवास आणि वेळोवेळची विचारधारा प्रत्‍ययास येत गेली.

‘शांतता... कोर्ट सुरू आहे’ या नाटकाचा १९७१ सालचा चमू. डावीकडे अरुण काकडे दिसत आहे.‘शांतता...’चा प्रयोग करताना अरुण काकडे आणि रोहिणी हट्टंगडी (१९७९)दुर्गा झाली गौरी नाटकातील एक दृश्‍यकाकडे यांनी सांगितलेल्‍या आठवणींमधून नाटक हे माध्‍यम, त्‍यांनी निर्मिती केलेली नाटके, उभारलेल्‍या संस्‍था यांबद्दलची त्‍यांची बांधिलकी व निष्‍ठा संयतपणे व्‍यक्‍त झाली. त्‍यांनी रंगमंचावर न राहता रंगमंचामागे सूत्रे सांभाळल्‍यानंतरही त्‍यांची सावली रंगमंचावर दिसत राहिली. त्‍यांनी चालवलेल्‍या छबिलदास चळवळीच्‍या धडपडीच्‍या काळात त्‍यांनी जुन्‍या विचारांना फाटा देत सर्वांना सोबत घेऊन जाण्‍याचा जो प्रयत्‍न केला तोच पुढे त्‍यांच्‍या कार्याचा महत्‍त्‍वाचा भाग ठरला. त्‍यांचा एकूण नाटक आणि नाट्यकलावंत यांकडे पाहण्‍याचा समग्र दृष्टिकोन जाणवत राहिला. तेच त्‍यांचे कर्तृत्‍व होय. त्‍यांनी त्‍या संदर्भात ‘दुर्गा झाली गौरी’ या पिढ्यानुपिढ्या चालू असलेल्‍या नाटकाचा उल्‍लेख केला. ते म्‍हणाले, असे नाटक मराठी काय भारतीय रंगभूमीवरही झालेले नाही. तिच गोष्‍ट महेश एलकुंचवार यांच्‍या ‘नाट्यत्रयी’बद्दलही त्‍यांनी सांगितली. ते म्‍हणाले, की सलग आठ तास चाललेले आणखी नाटक कुठे आहे? ‘आविष्‍कार’ ने तो प्रयोग साधला.

पाथरे यांनी ‘आविष्‍कार’च्‍या पुढील वाटचालीकडे कटाक्ष टाकताना ‘तुम्‍ही आतापर्यंत दुसरे काकडेकाका का तयार केले नाहीत?’ असा प्रश्‍न केला असता काकडे म्‍हणाले, की दुसरा काकडे तयार करता येत नाही. तो उपजत असावा लागतो.

‘व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन’कडून आयोजित करण्‍यात आलेल्‍या या कार्यक्रमाचे व्हिडीओ चित्रिकरण करण्‍यात आले असून संयोजकांकडून इच्‍छुकांना त्‍या टेप्‍स उपलब्‍ध करून देण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे.

आशुतोष गोडबोले
thinkm2010@gmail.com
०२२-२४१८३७१०

About Post Author