मराठी विज्ञानकथेची शतसंवत्सरी

0
24
_Marathi_Vidnyankatherchi_Shatsauvantari_1.jpg

मराठीमध्ये विज्ञान साहित्यनिर्मितीस – म्हणजे सायन्स फिक्शनच्या लेखनास अनुवादित स्वरूपात 1900 मध्ये सुरुवात झाली. तो ज्यूल्स व्हर्नच्या ‘टू द मून अँड बॅक’चा अनुवाद होता. तो ‘केरळ कोकीळ’च्या जून अंकात प्रसिद्ध होऊ लागला. अनुवादकाला जमेल तसा तो अनुवाद 1906 पर्यंत अधूनमधून प्रसिद्ध होत होता, पण त्यावर अनुवाद करणाऱ्याचे नाव नसे. त्या काळच्या प्रथेप्रमाणे, संपादक त्यांचे नाव त्यांच्या नियतकालिकांमधील लेखनावर छापत नसत. त्यामुळे तो अनुवाद ‘केरळ कोकीळ’चे संपादक चित्रमयुर कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी केला असावा असे गृहीत धरता येते.

‘विज्ञानकथा’ हा साहित्यप्रकार मराठीत सर्वप्रथम मार्च 1916 मध्ये अवतरला. श्री. बा. रानडे यांची ‘तारेचे हास्य’ ही कथा त्या वर्षी ‘मासिक मनोरंजन’च्या अंकात प्रसिद्ध झाली. त्याच वर्षी वामन मल्हार जोशी यांच्या दोन कथा त्यांच्या ‘नवपुष्प करंडक’ या संग्रहात प्रकाशित झाल्या. ‘वामलोचना’ आणि ‘अदृश्य किरणांचा दिव्य प्रताप’ अशी त्या दोन गोष्टींची नावे होती. त्यांना विज्ञानकथा म्हणता येते कारण त्या सुमारास क्ष-किरणांचा गाजावाजा होत होता आणि स्त्रियांना डाव्या डोळ्याने कमी दिसते अशा प्रकारचे संशोधन प्रसिद्ध झालेले होते. ते संशोधन कालांतराने चुकीचे असल्याचे सिद्ध झाले; पण प्रचलित विज्ञानाला बाधा येऊ न देता भविष्यात त्या विज्ञानाचे परिणाम कोणते घडू शकतील याचा विचार त्या कथेत केला होता.

एखादी गोष्ट एखाद्या काळात वैज्ञानिक सत्य मानली जाते. पुढे, ती सत्य मानली गेलेली विज्ञानकल्पना इतर वैज्ञानिक अधिक संशोधन करून ती ‘कल्पना’च होती, किंवा ती चुकीची होती हे सिद्ध करतात. पण, ती कल्पना जेवढा काळ सत्य मानली जात होती तोपर्यंत त्या कल्पनेवर आधारित साहित्य हे विज्ञान साहित्यच असते! त्याचे जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे मेरी शेलीची ‘फ्रॅंकेन्स्टाईन ऑर द मॉडर्न प्रॉमेथीअस’ ही कादंबरी. इंग्रजी विज्ञान साहित्याला, किंबहुना पाश्चात्य विज्ञानकथेला दोनशे वर्षें पूर्ण होतील, या टप्प्यावर मेरी शेलीची विज्ञानकथा कशी लिहिली गेली ही हकिगत मोठी मजेदार आहे. पर्सीबीसी शेळी, त्याची पत्नी मेरी, लॉर्ड बायरन आणि त्यांचा एक मित्र स्वीत्झर्लंडमधील लॉर्ड बायरन यांच्या घरात गप्पा मारत बसले होते. बाहेर हिमवादळ सुरू होते. त्यावेळी चाललेल्या गप्पांमध्ये लेखनाचा विषय निघाला. तेथे असलेल्या पुरुषांपैकी एकजण ‘स्त्रिया साहित्यिनिर्मिती करू शकत नाहीत. जरी त्यांनी ती केली तरी ती काळाच्या कसोटीवर टिकू शकत नाही’ असे म्हणाला. ते ऐकताच ‘आपण सर्वजण कादंबरी लिहू या. बघू कोणाची कादंबरी चांगली ठरते!’ असे मेरी शेली म्हणाली. तिने झपाटून कादंबरी लिहिली. अलेस्सांड्रो व्होल्टा यांचे स्थिर विद्युतनिर्मिती; तसेच, त्या काळात विद्युतघट निर्मितीचे प्रयोग गाजत होते. विजेच्या तारेचा स्पर्श होताच मेलेला बेडूक पाय हलवतो- ही बातमी तेव्हा गाजत होती. त्यामुळे विजेच्या साहाय्याने मृत जीवाला संजीवनी मिळाल्याप्रमाणे पुनरुज्जीवित करता येते या कल्पनेची चर्चा युरोपभर चालू होती. मेरीने तीच कल्पना तिच्या कथेत वापरली. मेरीची कादंबरी लिहून झाली. बाकी कोणीही ती गोष्ट मनावर घेतली नाही. कारण ती चर्चा त्या घरातील आगोटीसमोर वेळ घालवण्यास म्हणून मद्यपान करत असताना झालेली होती हेही असू शकते. पण एकट्या मेरीने ती गोष्ट मनावर घेऊन तिची कादंबरी पूर्ण केली. ती 1818 साली म्हणजे भारतात शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला त्या वर्षी लंडनमध्ये प्रसिद्ध झाली. तिच्यावर लेखिकेचे नाव नव्हते. कारण एखादी कादंबरी स्त्रीने लिहिली आहे, हे कळल्यावर एकतर त्या घटनेचा निषेध होईल ही भीती तर होतीच; शिवाय, त्यामुळे ती विकली जाणार नाही अशीही भीती प्रकाशकाला वाटत होती. पण ती कादंबरी खपली. त्यानंतर त्या कादंबरीची दुसरी आवृत्ती 1831 मध्ये निघाली. त्या कादंबरीच्या सटिक आणि विशेष भाष्यासह, मानसिक पृथक्करणासह अशा विविध प्रकारच्या आवृत्ती गेली जवळजवळ दोनशे वर्षें बाजारात आल्या… आणि येत आहेत. मेरी शेलीने जे गृहीत सत्य मानले होते ते, विजेचे झटके देऊन मृत सजीव करता येतो हे गृहीतक खोटे ठरले. तरीही तिच्या त्या कादंबरीला विज्ञान साहित्याचाच दर्जा देण्यात येतो.

त्या कादंबरीच्या प्रथम प्रकाशनानंतर अठ्ठ्याणव वर्षांनी मराठीतील पहिल्या चार विज्ञानकथा छापल्या गेल्या. त्यांना 2016 साली शंभर वर्षें पूर्ण झाली. पहिल्याच वर्षी जरी चक्क चार विज्ञानकथा छापल्या गेल्या तरी त्यानंतरच्या काळात विज्ञानकथालेखन बरेच मंदावलेले दिसते. श्री.बा. रानडे यांनी ‘उद्यान’ या मासिकात ‘रेडियम’ ही कथा 1916 सालीच लिहिली. ती चौथी विज्ञानकथा. त्र्यं.र. देवगिरीकरांनी  ‘2018’ ही विज्ञानकथा ‘चित्रमयजगत’मध्ये 1923 साली, त्यानंतर दोन वर्षांनी लिहिली. त्यांनीच ‘शरद लोकांची सफर’ ही कथा ‘चित्रमयजगत’मध्ये 1936 साली लिहिली. ना.वा.कोगेकरांची ‘मृत्युकिरण’ ही कथा ‘सह्याद्री’ मासिकात 1936 मध्ये प्रसिद्ध झाली. त्या कथा प्रसिद्ध होत असताना, वि. वा. शिरवाडकर यांची ‘कल्पनेच्या तीरावर’ आणि ना. के. बेहेरे यांची ‘ध्येयाकडे’ या दोन ‘युटोपीयन’ म्हणजे आदर्श समाजाचे स्वप्न रंगवणाऱ्या, भविष्यकाळात विहार करणाऱ्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. दुसऱ्या महायुद्धापूर्वी मराठीतील विज्ञानसाहित्य हे तितकेच मर्यादित होते. त्याच काळात इंग्लड-अमेरिकेत विज्ञानसाहित्य भरपूर निर्माण होत होते. आयझॅक असिमोव्ह, आर्थर सी. क्लार्क, रॉबर्ट हाईनलाईन, ब्रायन आल्डिस आणि इतरही अनेक लेखक ‘अस्टाउंडिंग सायन्स फिक्शन’, ‘वंडर स्टोरीज’ यांसारख्या मासिकांमधून लिहीत होते.

भा.रा.भागवत यांची ‘मंगळावर स्वारी’ ही विज्ञानकथा ‘विविधवृत्त’मध्ये 1934 मध्ये प्रसिद्ध झाली. मात्र, त्यांचा पहिला विज्ञानकथासंग्रह ‘उडती छबकडी’ हा 1966 साली आला. मराठी विज्ञानकथांनी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये जोर धरलेला दिसतो. भा.रा. भागवतांनी त्या काळात बऱ्याच विज्ञानकथा आणि विज्ञान कादंबऱ्या लिहिल्या. त्याच सुमारास नारायण धारप, द. चिं. सोमण, द. पां. खांबेटे, ग. रा. टिकेकर आदि मान्यवरही विज्ञानकथा लिहू लागले होते. भालबा केळकरही ‘वाङ्मयशोभा’ मध्ये विज्ञानकथा लिहीत होतेच. मी त्या मंडळींच्या कथा वाचतच वाढलो आणि ‘आपणही तशाच कथा लिहून विज्ञानकथालेखन करतोय’ अशी स्वप्ने पाहू लागलो. ते स्वप्न 1970 मध्ये पूर्ण झाले.

भा. रा. भागवत ‘उडती छबकडी’ या विज्ञानकथा संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात, “मंगळावर स्वारी’ ही कथा ‘विविधवृत्ता’च्या दिवाळी अंकासाठी स्वीकारली गेली. मात्र, कै. तटणिस यांनी त्यांच्या पत्रामध्ये ‘कथा ओरिजिनल आहे की ट्रान्सलेशन?’ अशी पृच्छा केली. मी त्या पत्राला जे उत्तर पाठवले ते या संग्रहातील सर्व कथांना लागू पडण्यासारखे आहे. ‘मध्यवर्ती कल्पना बहुधा उचललेली असते, कथानक माझे असते. इंग्रजी विज्ञानकथा वाचताना एखादी कल्पना किंवा वैज्ञानिक भाषेत बोलायचे तर ‘जर्म’ सापडतो आणि मग त्याला प्रेमावर पोसून मी वाढवतो.’

मराठीत बऱ्याच विज्ञानकथाकारांनी तसेच केले. पण विज्ञान साहित्य म्हणजे काय, हे समजावून सांगण्याचे काम फार थोड्या जणांनी केले. ज्या थोड्या लेखकांनी विज्ञान साहित्य म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केला त्यात दोन प्रयत्न महत्त्वाचे आणि सर्व विज्ञान साहित्यिकांना मार्गदर्शक ठरतील असे आहेत. यशवंत रांजणकर यांच्या ‘शेवटच्या दिस’ या कथासंग्रहाची प्रस्तावना त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. रांजणकर म्हणतात, ‘विज्ञान काल्पनिकांविषयी (त्यात विज्ञानकथा आणि कादंबरी या दोन्ही आल्याच) मराठी वाचकांत  कुतूहल, आकर्षण निर्माण झाले आहे, ही गोष्ट कितीही समाधानाची असली तरी त्या साहित्यप्रकाराविषयी मराठी वाचक, लेखक आणि समीक्षक यांच्या मनात बराच गोंधळ वा गैरसमज असावेत असे एतद्विषयक अधूनमधून जे काही लिहिले, बोलले व चर्चिले जाते किंवा विज्ञान काल्पनिकेच्या लेबलाखाली ज्या तऱ्हेचे कथासाहित्य सादर केले जाते, त्यावरून वाटते.’ यातील कंसात मजकूर माझा आहे. रांजणकर यांनी ते उद्गार 1982 साली काढले. 2016 सालीही ते लागू पडत आहेत, हे विशेष. भालबा केळकर यांनी त्यांच्या ‘विज्ञानाला पंख कल्पनेचे’ या छोटेखानी कथासंग्रहात मराठीमधील आगळावेगळा प्रयोग केला आहे. तो म्हणजे एक विज्ञानकथा घ्यावी आणि ती विज्ञानकथा का व कशी हे समजावून घेण्याचे तसे प्रयत्न नव्याने करायला हवेत.

मराठीत विज्ञानकथेत दोन पंथ आहेत. एक म्हणजे विज्ञानकथा ही विज्ञान शिकवण्यासाठीची शर्करावगुंठित गोळी आहे असे म्हणणारा आणि दुसरा केवळ साहित्यनिर्मिती म्हणून विज्ञानकथा लिहिणारा. त्यातील पहिल्या प्रकारच्या लेखनामुळे काही वेळा विज्ञान प्रसारकांची पंचाईत होते. विशेषतः अलिकडच्या काळात रामायणातील विमाने आणि महाभारतातील अणुबॉम्ब या कथांचा डंका वाजत असताना विज्ञान शिकवण्याची शर्करावगुंठित गोळी म्हणून विज्ञानकथा लिहिणाऱ्यांकडून आणि विज्ञानकथेत जे प्रचलित विज्ञान वापरले जाते ते सिद्ध झालेले असणे आवश्यक आहे असे म्हणणारे विज्ञानकथा लेखक ‘वीस हजार वर्षांपूर्वी भारतात प्रगत संस्कृती नांदत होती…’ अशा तऱ्हेची विज्ञानकथा लिहितात तेव्हा रामायण-महाभारतातील तथाकथित विमाने आणि अणुबॉम्ब यांच्या विरुद्ध बोलणे अवघड होऊन बसते. त्यामुळे विज्ञानकथा लेखकांवर बरीच जबाबदारी येऊन पडते.

मराठीत बरेच लेखक विज्ञानकथा लिहू लागले आहेत. ‘सायफाय कट्टा’ म्हणून एक ई-विज्ञान साहित्यलेखन चळवळही जोमात आहे. मुंबई विद्यापीठाने ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या सहकार्याने 1983 साली भरवलेल्या चर्चासत्राचा ग्रंथ तयार झाला. ‘मराठी विज्ञान परिषद’ (मुंबई)नेही तशा तर्हेहने ग्रंथ छापले. तथापि गेल्या दहा-पंधरा वर्षांत मात्र अनेक चर्चासत्रे होऊनही त्यांतील निबंधांचे संकलन झालेले नाही. त्यामुळे मराठी विज्ञानकथेची शताब्धी होऊन गेल्यावर तरी नव्याने चर्चासत्रे भरवावीत आणि त्यांतील निबंधांचे संकलन व्हावे, हीच इच्छा!

– निरंजन घाटे

(लोकरंग पुरवणी, 31 जानेवारी 2016 अंकावरून उद्धृत)

About Post Author

Previous articleशेटेसरांची पाच हजार वर्षांची इतिहास कालरेषा!
Next articleबोलक्या रंगांचा चित्रकार : ग.ना. जाधव
निरंजन घाटे आणि विज्ञानविषयक भरपूर आणि सोपी माहिती असणारी पुस्तके हे समीकरण वाचकांच्या मनात पक्के झाले आहे. निरंजन घाटे यांनी पुणे विद्यापीठातून भूशास्त्र विभागात उच्च शिक्षण घेतले. 1968 ते 1977 या काळात त्यांनी पुणे विद्यापीठात प्रयोगदर्शक आणि व्याख्याता म्हणून काम केले आहे. नोव्हेंबर 1977 पासून जवळजवळ सहा वर्षे त्यांनी आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून कार्यक्रम अधिकारी या नात्याने सहाशे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाचे ते उपसंचालक व नंतर संचालक होते. आता ते पूर्ण वेळ लेखन करतात. सृष्टिज्ञान, बुवा, ज्ञानविकास, किर्लोस्कर यांसारख्या मासिकांचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे, पुण्यातील ’ मराठी विज्ञान परिषद’, ’मराठी साहित्य परिषद’ आणि ’महात्मा फुले वस्तू संग्रहालय’ यांचे ते आजीव सदस्य आहेत. मराठी विज्ञान परिषदेतर्फे 1985 साली त्यांना ’उत्कृष्ट विज्ञान प्रसारक’ म्हणून मानपत्र मिळाले. त्यांनी लिहिलेल्या ’वसुंधरा’, ’एकविसावं शतक’ आणि ’नवे शतक’ या पुस्तकांना ’राज्य पुरस्कार’ मिळाले आहेत. इंडियन फिजिक्स असोसिएशनतर्फे ’प्रा. डॉ. मो. वा. चिपळूणकर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी लिहिलेले सुमारे 3000 लेख आणि 300 कथा विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. मराठी व्यतिरिक्त इंग्रजी आणि हिंदी नियतकालिकांमधूनही त्यांनी लेखन केले आहे. मराठी विज्ञानसाहित्याचा इतिहास या विषयातील पथदर्शक तज्ज्ञ म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. लेखकाचा दूरध्वनी 02024483726