मध्यमवर्गाला धक्का

0
44
छाया दातार

स्वान्त सुखाय मध्यमवर्गाला उचकवणारी नाट्यमय स्वगते

पडदा उघडतो आणि काळ्या शाईचा पसरत जाणारा ढब्बा असणारं भलंमोठं होर्डिंग आपल्यासमोर उभं ठाकतं. त्या काळ्या ढब्ब्यामध्ये असा काही जिवंतपणा जाणवतो, की तो त्याच्या ऑक्टोपससारखा वळवळणार्‍या हातांनी आपल्याला कोंडीत पकडण्याचा, गच्च आवळून हातपाय बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतोय; आणि तितक्यात, नाना पाटेकरच्या भारदस्त आवाजात आकाशवाणी झाल्यासारखी नाटकाच्या सादरीकरणाला सुरूवात होते!

 अंधारातील स्वगते’

माणूस म्हणून जगण्याची अभिलाषा बाळगणार्‍या, सन्मानाने जगू इच्छिणार्‍या मनाला दंश करणारी, एक ‘जोल्ट’ देऊन ‘ऑफ बॅलन्स’ करणारी शब्दांची आतषबाजी प्रेक्षकांचे मन सुन्न करून थांबते. ही कामगत आहे षांताराम पवारांची – या नाट्याचे बीज त्यांच्या मनात अंकुरले.
 

 अंधारातील स्वगते आहेत ‘घातपात नगरा’तील, ‘जे आपला स्वसन्मान हरवून आहेत – तोंड दाबून बुक्के  खाणार्‍यांची.. हाताची घडी तोंडावर बोटे ठेवणार्‍यांची… खाटकाकडे निघालेल्या कळ्यांची… आंधळ्या डोळ्यांतून वाहणारी…रक्ताचा रंग नासवणारी!  भगवंताला पिंजर्‍यात उभे करणारी… भामट्यांची करणी काळी. तुमची, आमची नेहमीची रडगाणी’!
 

आकाशवाणीमुळे स्वत:चे वास्तव एका लख्ख आरशात पाहण्यासाठी तुमची मानसिकता तयार होते. चार स्वगते आपल्यासमोर मांडली जातात. चार लेखक आणि चार रंगकर्मी प्रत्येकी फक्त पंधरा मिनिटे सादरीकरण करतात. सगळ्या सादरीकरणांतून एकच सूत्र पुढे येत राहते. भ्रष्टाचार-सर्वदूर बोकाळलेला आणि स्वत्वाला तिलांजली देणारा. कार्यक्रमामधून व्यासपीठावरील होर्डिंगमधील काळा ढब्बा अधिकाधिक गडद होत जातो!

 चारी लेखकांनी आपापली नस पकडून स्वगते लिहिली आहेत. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांमध्ये विविधता आहे. पहिला येतो तो मुंबईमधला मध्यमवर्गीय मराठी माणूस. त्याला साधी रिक्षा मिळवणे जमत नाही. त्यासाठी परप्रांतीय असून गुर्मीत असणार्‍या रिक्षा ड्रायव्हरची भीक मागण्याच्या प्रसंगापासून सुरुवात होते आणि त्‍याचे आयुष्यात बिनकण्याने वावरण्याचे सततचे अनुभव एकामागून एक पुढे येतात.
 

 सतत हताशपणा, गांडुपणा, आखडलेले मन, आखडलेले शरीर… परिस्थितीवर मात करून विजयाच्या पताका रोवण्याची जिद्द कुठेही नाही.

 रघुवीर कुल यांनी रंगवलेले हे पात्र संजय मोनेने समर्पकपणे सादर केले आणि एका सत्त्वहीन, मरगळलेल्या समाजाचा प्रत्यय दिला. हा माणूस आश्चर्य करत राहतो, नगरसेवकांचा आमदार, आमदाराचा एम.पी, मग कॅबिनेट मंत्री… अशी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे उत्तरेकडे (दिल्लीची दिशा) कशी होऊ लागतात, त्‍याचे! त्याच वेळी त्याला जाणवते, की पैसे कमावण्याचे इंद्रियच नाही आपल्याला. मेथीची जुडी ‘बारा रुपयांऐवजी दहा रुपयाला दे’ एवढीच मजल आपली. संपली घासाघीस.
 

दुसरे स्वगत द्रोणाचार्यांचे. महाभारतातील द्रोणाचार्य – एकलव्याची कथा सर्वांनाच माहीत आहे, ती मुख्यत: एकलव्याच्या समाजातील वंचित स्थानाच्या संदर्भात आणि वंचित माणूस स्वत:च्या हिमतीने द्रोणाचार्यांची शरसंधान विद्या हस्तगत करतो आणि तरी द्रोणाचार्यांना गुरू मानल्यामुळे त्यांनी मागितलेली गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा त्यांना अर्पण करतो. गंगाराम गवाणकर यांनी ह्या आदर्शवत मानल्या गेलेल्या कथेला कलाटणी देऊन द्रोणाचार्यांसारख्या तथाकथित सत्त्वशील ब्राम्हणाने स्वत:च्या भूमिकेशी केलेली वंचना येथे सादर केली आहे. द्रोणाचार्य ‘भ्रष्टाचाराचे आद्य प्रतीक’ म्हणून येथे प्रतीत होतात. ते पांडवांच्याकडे नोकरी करत असताना अर्जुनाच्या दबावाखाली एकलव्याला धनुर्विद्येचे शिक्षण द्यायला तयार होत नाहीत. स्वत:च्या मुलाच्या – अश्वत्थामा – पोटापाण्यावर गदा येईल या भीतीपोटी ते स्वत:चा गुरुधर्म विसरतात. एवढेच नव्हे तर एकलव्य बारा वर्षांनी जेव्हा पुन्हा भेटतो तेव्हा त्याचे शरसंधान पाहून द्रोणाचार्यांच्या हृदयात त्याच्या कर्तृत्वाबद्दल कौतुकाचा उमाळा फुटतो. पण ते पुन्हा एकदा अर्जुनाचे सर्वश्रेष्ठपण टिकवून ठेवण्यासाठी एकलव्याच्या अंगठ्याची मागणी करून स्वत:चे मिंधेपण, स्वाभिमानहीन जिणे सिद्ध करतात. प्रमोद पवार या नटाने हे विश्लेषण, द्रोणाचार्यांचे भळभळणारे हृदय आणि मिंधेपणाचा सल प्रभावीपणे पोचवला आहे.
 

 समकालीन ते इतिहासकालीन अशा दोन पात्ररचना पूर्ण होता होता, पुन्हा एकदा सद्यकालीन वातावरणामध्ये भ्रष्टाचार हा मू्र्तिमंत माणसांच्या विविध रूपांत वावरताना समोर येतो. तो सगळ्यांच्या ओळखीचा, सिग्नल तोडला म्हणून दंड न भरता पोलिसांना लाच देऊन पटवताना तुमच्या-आमच्या रूपात भेटतो आणि तो निवडणुकीमध्ये सरकारदरबारी कोट्यवधी रुपयांचे देवघेवीचे व्यवहार करताना उघडपणे, लेजिटीमेटली विराजमान झालेला आढळतो. असले व्यवहार अंधारात, लपूनछपून करण्याची गरज आजच्या काळात राहिलेली नाही. त्यांना  राजमान्यता मिळालेली आहे. हा मानवीरूपी भ्रष्टाचार दीपक करंजीकरांच्या हालचालींमध्ये आणि वेशभूषेमध्ये इतका बेमालूमपणे मिसळलेला होता की पांढरीशुभ्र, कडक इस्त्रीची पॅण्ट आणि तसाच शर्ट व गळ्यात सोन्याच्या जाडजूड साखळ्या, हातातील पाची बोटांवरील लखलखत्या खड्यांच्या अंगठ्या हे रूप अतिपरिचित वाटत होते. ते चित्रपट आणि टीव्ही सिरिअल्समधून कदाचित लोकप्रिय झाले असणार; पण त्‍या रूपातील माणसे अवतीभवती सहजपणे पाहायला मिळत असतात हेही खरे. तो भ्रष्टाचार नावाचा माणूस पुन्हा पुन्हा सांगत राहतो, की ‘मी श्रीमंतांना इन्कम टॅक्स चुकवायला मदत करतोच, पण मी झोपडपट्टीत विनापरवाना नळजोडणी करून देत नाही गरिबांना परवडेल त्या दरात मदत करत असतो’. तो प्रसिद्धी माध्यमांचे आभार खास मानतो, कारण ती दररोज कोट्यवधींचा भ्रष्टाचार पडद्यावर आणत असतात. त्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळतो, की हेच वास्तव आहे. आणि एवढ्या कोटींची देवाणघेवाण करणारे राजकारणीच फक्त भ्रष्टाचारी असतात. आपण नाही. आनंद म्हसवेकरांचा भ्रष्टाचारी अतिशय लिलया बोलतो- आत्मविश्वासपूर्वक अभिमानाने तळपत.
 

 चौथे स्वगत स्त्रीचे होते. स्त्री-पुरूष समानतेच्या या दिवसांत स्त्रियाही मागे नाहीत हे अधोरेखित करणारे हे स्वगत पुरुषोत्तम बेर्डे यांनी लिहिले होते. ‘मी बाई…खाऊ बाई..,खाऊ की नको खाऊ?’ यातील बाई अंगारे – धुपारे करत खायला योग्य अशा खुर्चीवर प्रमोशनच्या माध्यमातून विराजमान होते. परंतु तिचे मन खात राहते थोडेसे. मग ती त्याचे समर्थन करायला गीतेचा आधार शोधते. ती ‘मॅडम’ असल्याने पार्ट्या-बिर्ट्यांना न जाता आपली प्रतिमा -सामान्य मध्यमवर्गीय बाई अशी ठेवूनच अधिक फायदा मिळवता येतो असे तिचे तत्त्व आहे. संसाराच्या महासंग्रामात सर्व शक्य असते आणि मागच्या जन्मात केलेली पापे पुडक्याच्या रूपाने देणेकरी फेडत असतात असे तिने स्वत:ला समजावले आहे.

 बेर्डे यांनी सामान्य कुवतीची, मध्यमवर्गीय बाईसुद्धा भ्रष्टाचारी वातावरणात पैशाला कशी चटावते याचे दर्शन घडवले आहे. विशाखा सुभेदारांचे सादरीकरण आहे. हे स्वगत आधीच्या तिन्ही स्वगतांपेक्षा जरा फिके आहे. अगदी रोजच्या पाहण्यातील हे पात्र, म्हणूनच अतिपरिचयात त्याचे चमकदारपण नाहीसे होते. एका बाईचे चित्र भ्रष्टाचारी पुरुषांपेक्षा वेगळे रंगवले आहे ही जमेची बाजू आहे. पण ‘नॉर राडिया’सारख्या स्त्रियाही राष्ट्रीय पातळीवर केवढे प्रचंड नाट्य खेळू शकतात आणि आपल्या क्लायंट्सना हवी असलेली कॉण्ट्रॅक्ट्स मिळवून देऊ शकतात याचा विचार केला की असे वाटते, की असे स्त्री पात्र व तिचे स्वगत रंगवण्याचे आव्हान लेखकाने स्वीकारायला हवे होते.
 

 षांताराम पवारांशी बोलताना लक्षात आले, की ‘भ्रष्टाचार’ विषयाचे नाट्यीकरण करण्याचा विचार दोन – तीन वर्षांपासून त्यांच्या मनात होता. त्याचे श्रेय ते अण्णा हजारे यांच्या चळवळीला देऊ इच्छित नाहीत. म्हणूनच चारी लेखकांच्या मनात त्यांना हव्या त्या विषयाचे बीज पेरल्यावरसुद्धा ते लेखकांच्या बरोबरीने त्या लेखनाची निगराणी करत होते. पहिला ड्राफ्ट, दुसरा ड्राफ्ट असे करत तो भ्रष्टाचाराचा आशय विकसित होत होता आणि त्या लेखनाचे टोक सतत प्रेक्षकांकडे वळलेले ठेवून स्वत:च्या षंढपणाच्या जाणिवेने त्यांना कुरतडत ठेवणे असे जर उद्दिष्ट असेल तर ते साध्य झालेले वाटले. रिफ्लेक्सिव्हीटी – आत्मवंचना – करत जगणार्‍या आपल्या सगळ्यांचे हे नाटक आहे.
 

– छाया दातार 9322597997

About Post Author