भोगी – आनंदाचा आणि उपभोगाचा सण

2
21
carasole

पौष महिन्‍यात येणा-या मकरसंक्रांतीच्‍या सणाच्‍या आदल्‍या दिवसाला ‘भोगी’ असे म्हणतात. तो आनंदाचा आणि उपभोगाचा सण अशी लोकधारणा आहे. त्‍या दिवशी घर आ‍णि आजूबाजूचा परिसर स्‍वच्‍छ केला जातो. पूर्वी स्‍त्रीया भल्‍या पहाटे उठून घराला शेणाने सारवून घेत असत. घरासमोर रांगोळ्या काढत. त्या दिवशी अभ्‍यंगस्‍नान करण्‍याची प्रथा आहे.

स्त्रिया भोगीच्‍या दिवशी नवे अलंकार परिधान करतात. त्या दिवशी सासरी गेलेल्‍या स्त्रिया सणाकरता माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन तो सण साजरा करतात. दुपारच्‍या जेवणात तिळ लावलेल्‍या बाजरीच्‍या भाक-या, लोणी, पापड, वांग्‍याचे भरीत, मूगाची डाळ, चटणी आणि तांदूळ घालून केलेली खिचडी असा खास भोगीचा बेत असतो. या दिवशी एक खास भाजी केली जाते. त्‍यात चाकवत, बोरे, गाजर, डहाळ्यावरील ओले हरभरे, ऊस, वांगे, घेवड्याच्‍या शेंगा आणि तीळ अशा विविध गोष्‍टी टाकल्‍या जातात. त्‍या भाजीस खिंदाट असे म्‍हटले जाते. बाजरीच्‍या भाकरीसोबत खिंदाट खाल्‍ले जाते. जोडीला राळ्याच्‍या तांदळाचा भात तयार केला जातो.

भोगीला सुगड पुजले जातात. त्‍याकरता सवाष्‍णी स्‍त्रीया बाजारातून पाच छोटी गाडगी व पाच मोठी गाडगी (मातीचे मडके) घेऊन येतात. त्‍यामध्‍ये खिंदाटात टाकलेल्‍या गोष्‍टी कापून भरल्‍या जातात. शहरांमध्‍ये जागेच्‍या अभावी कोणत्‍याही आकाराची केवळ पाच गाडगी आणण्‍याची पद्धत आहे. त्‍या कृतीला काही ठिकाणी ‘वाण पुजणे’ असे म्‍हटले जाते. भोगीला तयार केलेल्‍या सुगडांचा दुस-या दिवशी, मकरसंक्रांतीला ववसा असतो. त्‍यामध्‍ये सवाष्‍णींना घरी बोलावून सुगडामधील पदार्थांनी त्‍यांची ओटी भरली जाते. त्‍यांना हळदकुंकू लावून त्‍यांच्‍या डोक्‍यावरील भांगेत तीळ भरले जातात. महाराष्‍ट्रातील काही ठिकाणी ओटी भरणाचा कार्यक्रम भोगीच्‍या दिवशी पार पाडला जातो. ववसा किंवा ओटी भरणे ही पद्धत कोकणात आढळत नाही.

मकरसंक्रांतीच्‍या दुस-या दिवशी, किंक्रांतीला सुगडामधील उरलेले पदार्थ कााढून लहान मुलांना वाटतात. भोगीला तयार केलेली खिंदाटाची भाजी आणि बाजरीची भाकरी मकरसंक्रांतीला खाऊ नये अशी धारणा आहे. किंक्रांतीच्‍या दिवशी त्‍या दोन्‍ही पदार्थांचा किमान एकेक घास खाण्‍याची पद्धत आहे.

भोगीच्‍या दिवशी भारतात अनेक ठिकाणी इंद्रदेवाची पूजा केली जाते.

– आशुतोष गोडबोले

Last Updated On – 12th Jan 2017

About Post Author

2 COMMENTS

  1. मकरसंक्राती ची अतिशय रोचक
    मकरसंक्रातीची अतिशय रोचक माहिती. आभार. महाराष्ट्राबरोबरच अन्य प्रांतातील प्रथा परंपरांचा ही परिचय/ तुलनात्मक आढावा देणे उपकारक ठरेल. कमलाकर सोनटक्के.

  2. हीच तर आमची संस्कृती. जी…
    हीच तर आमची संस्कृती. जी आम्ही विसरत चाललो आहोत. भोगी संबंधी वाचल्यावर मला माझ्या दिवंगत आईची आठवण झाली. 1988 ला गेली. तोपर्यंत ती हे सर्व करत असे.

Comments are closed.