भैरव

2
51
carasole

भैरव हा शैव परिवारातील देव आहे. त्याला शिवाचे एक रूप मानतात. भैरव महाराष्ट्रात सामान्यत: ग्रामदेवता म्हणून पूजला जातो. त्याला भैरोबा किंवा बहिरोबा असेही म्हणतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात भैरोबा किंवा बहिरोबा देवाचे ठाणे असतेच असते. कधी त्याची मूर्ती असते, तर कधी तांदळा असतो. जी मूर्ती उभी असते, तिच्या उजव्या हातात डमरू आणि डाव्या हातात त्रिशूल असतो. भैरोबा देवाचे वाहन कुत्रा आहे.

महाराष्ट्रातील भैरवमूर्ती सामान्यत: नग्न असतात. त्यांच्या कंबरेला सापाचा कडदोरा असून, गळ्यात नरमुंडमाळा असते. चेहरा भयानक, नाकपुड्या रूंद आणि तोंडाच्या दोन्ही बाजूंना सोंडेसारखा पुढे आलेला भाग असतो.

भैरवांना चार, आठ, बारा किंवा त्याहून अधिकही हात असतात. त्या हातांतून विविध शस्त्रे असतात. डाव्या बाजूच्या खालच्या हातात नरमुंड असते व त्यातून रक्त ठिबकत असते. ते ठिबकणारे रक्त कुत्री चाटत असतात.

भैरवाचे ‘शैव आगम’ या ग्रंथात चौसष्ट प्रकार सांगितले आहेत. तो शिवभक्तांना प्रिय ग्रंथ आहे. आठ भैरवांचा एक असे आठ वर्ग होतात. त्यांचे प्रमुख अष्टभैरव या नावाने ओळखले जातात. त्याशिवाय कालभैरव, बटुकभैरव असेही भैरव प्रसिद्ध आहेत.

तंत्रग्रंथांत चौसष्ट भैरवांना चौसष्ट योगिनींचे स्वामी मानले गेलेले आहे. योगिनी म्हणजे शक्ती. म्हणून भैरव हा प्रत्येक शक्तिपीठाचे संरक्षण करत असतो असे म्हटले जाते.

गंमत अशी, की शाक्त पंथामध्ये शक्तिश्रेष्ठता असली तरी भैरवाला प्राधान्य दिले गेलेले आहे. भैरव शाक्त उपासनेचे महत्त्व देवीला समजावून देतात असे ‘कौलज्ञाननिर्णय’ या ग्रंथात दर्शवले आहे. शक्तीची पूजा भैरवाला वगळून केली तर ती निष्फळ ठरते असे ‘महापीठनिरूपण’ ग्रंथात म्हटले आहे.

भैरवाची मृत्यूला भिववणारा देव म्हणून पूजा पंजाबात होते.

कालभैरव आहे, तसाच बालभैरवही आहे. त्याच्या नावाने एखाद्या दगडाला शेंदूर फासलेला असतो. शेंदूर आणि तूप दिले, की बालभैरव संतुष्ट होतो! गावकरी पेरणी व कापणी करण्यापूर्वी भैरवाची पूजा करतात.

 

रामदासस्वामींनी भैरवाला क्षेत्रपाळ कल्पून त्याची आरती रचली आहे.
जय जय भैरवा रे | तुझे भजन लागे सदैवा रे || धृ ||
काळभैरव बाळाभैरव | टोळाभैरव बटुभैरव ||
नाना प्रकारींचे विरखार | तयाचा करितसे भैरी संहार ||
काळ काळाचाही काळ | माहाकाळाचाही काळ |
दास म्हणे तो हा क्षेत्रपाळ ||

भैरवाची आराधना भूतबाधा किंवा सर्पदंश झाल्यास करतात. भैरव अंगीकृत कार्याचे यशापयश सांगतो अशीही समजूत आहे. शिवाची कृपा असलेला वेताळ असेही त्याला मानले जाते. परंतु भैरवाचा दर्जा वेताळापेक्षा वरचा असतो.

भैरव जेव्हा रात्री घोड्यावर बसून फेरी घालण्यास निघतो, तेव्हा त्याच्यासोबत काळा कुत्रा असतो असे म्हणतात.

भैरवाची मूर्ती किंवा तांदळा राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली असतो. तेथे तो काळा भैरव व गोरा भैरव अशा दोन नावांनी आढळतो.

भैरव ही स्मशानदेवता आहे अशी राजस्थानी लोकांची धारणा आहे. तेथील भोपे भिक्षेला निघण्यापूर्वी स्मशानात जाऊन भैरवाची प्रार्थना करतात आणि स्मशानातील भस्म अंगाला लावतात.

दुर्गापूजेच्या वेळी भैरवाची पूजा प्रथम कुत्र्यासहित होते.

जैन आणि मुसलमान लोकही भैरवाला भजतात. जैन लोक भैरवाला मांसाचा नैवेद्य न दाखवता फळांचा व मिठाईचा दाखतात. मुसलमान लोक यतीभैरव म्हणून त्याची उपासना करतात.

भैरवाच्या दोन प्रकारच्या मूर्ती ओडिसामध्ये आढळतात. त्यांपैकी एका मूर्तीमध्ये भैरव विश्वपद्मावर उभा असतो व त्यात त्याला तीन नेत्र व ओठावर मिशा असतात, तर दुसऱ्या मूर्तीला तिसरा डोळा व मिशा नसतात, पण तिच्याभोवती उपायन घेतलेल्या स्त्रिया असतात.

(आधार – भारतीय संस्कृतिकोश – खंड सहा)

– राजेंद्र शिंदे

 

About Post Author

2 COMMENTS

  1. ….नमस्कार ….आपल्या या
    ….नमस्कार ….आपल्या या अमूल्य माहितीमुळे लोक प्रबोधनाला मदत होईल.सूक्ष्म अभ्यास करता येईल.कालभैरवाच्या मूर्तींबद्दलची भिती नष्ट होईल.
    कालभैरव आपला मित्र,सखा,रक्षणासाठी सत्वर व तत्पर आहे ,असतो ही जाणिव विकसित व संपन्न होईल.
    ||जय जय रघुवीर समर्थ ||

  2. Mazya devaryat bhairoba…
    Mazya devaryat bhairoba devache tak aahet aamhi te pujto pan kadich tya devala gelo nahi mala. Please margdershan karave

Comments are closed.