भीमसेन जोशी – शेरच तो ! (Remembering Bhimsen Joshi on his birth centenary)

              पंडित भीमेसन जोशी यांच्या जन्माला नव्याण्णव वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 ला कर्नाटकात झाला. पण समस्त महाराष्ट्रीयनांच्या व भारतीयांच्या मनात, हृदयांत भीमसेन आहेत ते पुण्याचे. माझी पिढी 1955 ते 1960 मध्ये जन्मास आलेली. अण्णा हे आमच्या वडिलांच्या पिढीचे; मी त्यांना भीमण्णाच म्हणतो ! ते त्यांचे लाडके नाव. पण औपचारिकरीत्या बघायचे तर ते पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न… बापरे, केवढे मोठे व्यक्तिमत्त्व पंडित भीमेसन जोशी यांच्या रूपाने या जगी अवतरले होते ! फक्त शास्त्रीय संगीताचा ध्यास घेतलेले असे ते एकमेव भारतरत्न’.

            पंडितजींच्या गाण्याचा काळ म्हणजे 1941 ते 2000 सालापर्यंत म्हणजे साधारण साठ वर्षांचा. भीमसेन यांचे गाणे असे नुसते म्हटले तरी कानात घुमू लागतो तो त्यांचा दमदार, करडा, स्निग्ध सूर … हृदयाचा ठाव घेणारा, साऱ्या अवकाशाला व्यापणारा. तो काळच वेगळा होता हे वाक्य प्रत्येक पिढीने वापरून गुळगुळीत झालेले आहे. पण तरीही भीमसेन यांच्या बाबतीत ते वाक्य काळाची तीच तीव्रता धारण करते. हल्ली काळ पाच-पाच वर्षांत बदलतो. पार इकडचा तिकडे होतो. लोकप्रिय माणूस होत्याचा नव्हता होतो. पण जुन्या काळात तीस ते पन्नास वर्षे रसिक-जिज्ञासूंना पकडून ठेवणारी ती माणसे कशी असतील? उगाच नाही त्या नंतरच्या पिढ्यांतील माणसे खुजी वाटत ! क्रिकेट म्हटले की सुनील गावस्कर, कुस्ती म्हटले की दारासिंग, अत्रे यांच्यानंतर पु.ल. आणि शास्त्रीय संगीताची मैफिल म्हटले, की त्याचा बादशहा पंडित भीमसेन जोशी… अशी धारणा आमच्या पुढील-मागील दोनपाच पिढ्यांची होती. भीमण्णांसाठी तर त्यामागील काळात जाण्यामध्ये आनंदाचा खूप साठा आहे.

         पेणसारख्यातालुक्याच्या ठिकाणी तर वेगळीच मौज असे. कलाप्रेमी लोकांचा छोटा गट असे. सगळे जगणे सोपे होते. सायकलला तेव्हा समोर बिल्ले होते, वर्षागणिक त्यांचा आकार बदलत राहायचा. मग सायकलला डायनॅमो आला. चांगली सायकल (हरक्युलिस) असणे, हातावर घड्याळ असणे, चांगल्या चपला (किंवा सँडल) घालणे व पुणे-मुंबईच्या चांगल्या कॉलेजात शिकण्यास मिळणे ही तेव्हा फार मोठी गोष्ट होती. गावागावात तेव्हा घराला कुसू (कुंपण) होते. शेणाने सारवलेले अंगण होते. आत ओटी-पडवी होती. अंगणात तुळस, दारापुढे रांगोळी काढलेली असायची. देवळात पहाटे काकड आरती होई. रूद्र वगैरेंच्या निमित्ताने वेद-मंत्रोच्चार कानावर पडत. वैदिक ब्राह्मण इकडेतिकडे फिरताना दिसत. उत्सवाला कीर्तने असत. कीर्तनकारांबद्दल आदर वाटे. बुवांनी एक दिवस तरी आपल्याकडे जेवण्यास यावे असे वाटे. एखादी तीफडके यांच्या माडीवर तंबोरा घेऊन जाताना दिसे. एखादा तोतबला फिट करून घेण्यासाठी गुरवाकडे जाताना दिसे. कोपरकरबुवा, आफळेबुवा कीर्तनासाठी गावात असत. बुवा काय मस्त गाता तुम्हीअसे कोणी म्हणाले तर ते म्हणत, आम्ही कीर्तनकार, थोडेफार गातो इतकेच. खरे गाणे भीमसेनांचे. गावागावांत कोणाच्या घरात, कोणाच्या वाड्यात नाही तर कोठल्या तरी देवळात आठवडाभरात गाण्याची मैफिल असायचीच. मग त्या सुरांबरोबर चहा पिताना गप्पा हमखास. गाण्याची मैफिल आणि मधल्या गप्पा ह्यामध्ये पंडित भीमसेन जोशी यांचा विषय निघाला नाही अशी मैफिल होतच नसे. त्यामुळे भीमसेनांसारख्या कलावंताबाबतच्या माहितीचे प्रत्येक वाक्यन् वाक्य मनावर ठसलेले असे.

          भीमण्णांच्या लहानपणाचा काळ आणि नंतर शास्त्रीय संगीत शिकण्याच्या वेडाचा काळ, हा आमच्या पूर्वीचा. कर्नाटकाच्या मोठ्या, संयुक्त कुटुंबातील अण्णा, ते लहानपणापासूनच सुरांचे वेडे होते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला चन्नप्पांकडे काही धडे गिरवल्यावर कर्नाटक सोडले. त्यांचे गुरु शामाचार्य जोशी होते. ते आजारी पडल्यामुळे तरुण भीमसेन एच.एम.व्ही.साठी गायले. पण त्यांना शिकण्याची आस स्वस्थ बसू देईना. ते उत्तर भारतात गुरूच्या शोधात फिरले. ते मुस्ताक हुसेन खान यांच्याकडे एक वर्ष राहिले. पण वडिलांनी त्यांना शोधून परत धारवाडला आणले. मग सवाई गंधर्वांनी त्यांना 1936 च्या सुमारास शिष्य म्हणून स्वीकारले. मग मात्र ते जुन्या गुरूशिष्य परंपरेप्रमाणे त्यांच्याकडेच राहिले. त्यांच्या काही मुलाखतींत अण्णांनी सांगितले आहे, की सच्चे गाणे शिकण्यासाठी ते काहीही करायला तयार असत, अगदी गुरूचे कपडे धुण्यापासून ते घरची इतर कामे करण्यापर्यंत. गाणे शिकण्यासाठी इतके आत्मसमर्पण क्वचितच असू शकते, ते अण्णांकडे होते.

           त्यांच्या स्वतंत्र मैफलींना 1941 नंतर सुरुवात झालीतेव्हा ते फक्त एकोणीस वर्षांचे होते. गुरूजी सवाई गंधर्व हे त्यांच्या ह्या शिष्यावर खूप खूश असत. त्यांच्या मैफिली 1950 ते 1970 ह्या काळात बहरत गेल्या. आयुष्य फक्त आणि फक्त शास्त्रीय संगीताला वाहिलेले, त्यामुळे त्यातून तयार झालेला एक प्रकारचा कडवा स्वभाव. त्यांच्या सुरांप्रती समर्पणाचे किस्से आणि चर्चा भारतभर होऊ लागल्या. त्यांनी किराणा घराण्याचे गाणे उच्च पदावर नेऊन ठेवले. काय सुंदर काळ होता तो! उच्च दर्ज्याच्या संगीताचा रसिकवर्गही तसाच होता. शास्त्रीय गाणे प्रतिष्ठा पावले होते. पैसा, श्रीमंती ह्यांना अवास्तव महत्त्व नव्हते. कलाकाराची तळमळ त्याचे काम उत्कृष्ट व्हावे अशीच होती. आहे मनोहर तरीया पुस्तकात लेखिका सुनीता देशपांडे लिहितात, भाई (म्हणजे पु.ल.), वसंता (वसंतराव देशपांडे) आणि भीमसेन, पुण्यात पंचविशीतील तरुण जवळचे मित्र होते. त्यांना एकमेकांच्या कलेचा खूप आदर होता. पण तरुणपणीचे रक्त… एका शनिवारी पु.लं.च्याच घरी वसंतराव गायले ते भीमसेनच्या वरचढ, म्हणजे आदल्या शनिवारी भीमसेन गायले होते, ते सर्व आणि शिवाय इतर थोडे जास्त. पहाटे सगळे घरी गेले पण भीमसेन यांच्यातील कलावंताचा अहंकार दुखावला गेला असावा. पु.लं.च्या घराची बेल काही तासांतच वाजली. सुनीताबाई लिहितात…मला दुधवाला असेल असे वाटले, म्हणून दार उघडले, तर भीमसेन हजर ! परत सर्व जमवाजमव केली आणि भीमसेनची एक उत्कृष्ट मैफिल झाली. ह्या दोघा मातब्बर गाणाऱ्यांच्या स्पर्धेमुळे उत्कृष्ट मैफिलीचा लाभ मात्र पु.ल. आणि सुनीता यांना झाला. तर असा तो संगीताला, सुराला वाहिलेला भीमण्णांचा काळ.

          आम्ही रायगड जिल्ह्यातील पेण गावचे. माझे वडील अप्पा मुंबई (ब) रेडियोवर बासरी वाजवण्यास जात असत. यशवंत देव हेही पेणचे. ते माझ्या वडिलांचे मित्र. त्या काळात म्हणजे 1960 ते 1980 च्या दोन दशकांत पंडित भीमसेन जोशी यांचा कार्यक्रम रात्री कोठेही असो- महाड, रोहा, अलिबाग, पेण, खोपोली किंवा पुणे, मुंबई- माझे वडील कितीही कष्ट पडले तरी आवर्जून तेथे जात असत. ते रेडियो स्टारहोते म्हणून व नेहमी पुढे बसणारा जाणकार श्रोता म्हणून भीमसेन त्यांना वैयक्तिक ओळखत असत. (पूर्वी जाणकार श्रोत्यांनी पुढे बसण्याची पद्धत होती… व्हॉट्सअॅपवर येथे मिश्किल इमोजी टाकला असता !) माझ्या लहानपणी, अप्पांनी एका वर्षी मला सवाई गंधर्व महोत्सवासाठी पुण्याला नेले. भीमण्णांच्या गाण्याला अर्थातच गर्दी होती. आम्ही सातव्या-आठव्या रांगेत बसलो होतो. गाणे सुरू झाले. भीमण्णांनी पहिला जोरदार सालावला व त्या सा मध्येच कडक नजरेने सर्व प्रेक्षकांना, रसिकांना पाहून घेतले. माझे वडील त्यांना सातव्या-आठव्या रांगेत दिसले, त्यांनी गाता गाताच माझ्या वडिलांना उजव्या हाताने तेथून उठा आणि पुढे येऊन बसा असा इशारा दोनतीनदा केला. अप्पांनी माझा हात धरला आणि आम्ही निमूटपणे पुढे येऊन बसलो. ती घटना असावी 1970 ची.

भीमण्णांच्या गाण्याचा उत्तरोत्तर रंगत गेलेला तो काळ, 1970 ते 2000. त्यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या गाण्याने महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून सगळ्या भारतभराच्या रसिकांच्या मनात आदराने कोरले गेले. आणि मग त्यांनी भारताच्या सीमाही ओलांडल्या. त्यांपैकीही 1960 ते 1980 हा दोन दशकांचा काळ तसा साधा होता. मैफिलींना घरगुतीपणा होता. मैफिली कोठल्या गावात, कोणाच्या तरी घरी, वाड्यात, कोठल्या तरी छोट्या हॉटेलमध्ये किंवा देवळाच्या सभामंडपात होत. भीमण्णांच्या अगदी पुढ्यात बसण्यास मिळत असे. पंडित भीमसेन जोशी यांची मैफिल आहे म्हणजे आठवडाभर आधीपासून संपूर्ण गाव उत्साहित होत असे. प्रत्येकाची मैफिलीसाठी अवतीभवती काहीतरी काम करण्याची इच्छा असे. संगीतातील, सुरातील जाणकार तर खूष असतच, पण आमच्यासारखे सुद्धा आपल्यालाही कळते किंवा आपण शिकायला पाहिजे ह्या भावनेने आजुबाजूला वावरत असत. ती जादू होती पंडितजींच्या आवाजाची, सुरांची, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची. संगीताच्या आणि सुरांच्या विस्तीर्ण जंगलातील तो शेर होता. अनभिषिक्त राजा.

संगीताच्या मैफिली मुंबईत सेंट झेवियर्स कॉलेजशेजारी रंगभवनमध्ये 1980  च्या दशकात रात्री व्हायच्या. आम्ही जे. जे. स्कूलवाले विद्यार्थी म्हणून मैफिलीचे पास आम्हाला मिळायचे. पहिल्या रांगेत रविशंकर, जसराज, अल्लारखाँ, शिवकुमार शर्मा, हरीप्रसाद चौरसिया बसलेले असायचे. भीमण्णा रात्री बारा वाजता यायचे, मग त्यांची मैफिल रंगायची; असा मान त्या दिग्गजांकडूनही त्यांना मिळत असे. भीमण्णा आमचे म्हणून आमचीही कॉलर आमच्या बहुढंगी मित्रमंडळीत उगाचच ताठ होत असे !

भीमसेन तेव्हा भरधाव गाडी हाणत, ठरावीक घरी किंवा वाड्यात येत. खरे तर, ‘मैफिल तेथूनच चालू व्हायची. अण्णा आलेत, भीमसेनजी ह्यांच्याकडे उतरलेत अशी माहिती गल्लीबोळात फिरायची आणि सर्व गावच मनाने मैफिलीत गेल्यासारखा काही वेळात धुंद व्हायचा. पंडितजींना व्यक्तिमत्त्वही त्यांच्या दमदार सुरांप्रमाणे तसेच लाभले होते. मोठ्ठे कपाळ, त्यावर उलटे फिरवलेले दाट काळे केस, भेदक करारी डोळे, धारदार नाक थोडे दुमडलेले (नाना पाटेकरचे तसे आहेत का?), सुपारीचे खांड अडकित्त्यात तोडताना, थोडे उजव्या बाजूला तोंड विचकून, नेमकेच पण मार्मिक बोलणे. त्यांच्या सुरांना बरोबर शोभेल अशी मजबूत गर्दन. एकमेव. ते म्हणजे तेच. एकमेवाद्वितीय!! साधा लेंगा, झब्बा, चैन म्हणजे शाल, मैफिलीच्या आधी बराच वेळ तंबोरा लावून सूर लावणे, तबला-पेटी पुन्हा पुन्हा ‘चेक’ करणे, त्या लोकांची चौकशी करणे हे सर्व खूप प्रेमाने चाले. मैफिलीच्या आधीची ती मैफिलसुद्धा भारावलेली असे. त्यांच्या अवतीभवती घोटाळण्यास सुद्धा सर्वांना फार आवडायचे.

मग एकदाची मैफिल चालू व्हायची. भीमसेन यांना दहा-वीस तरी जाणकार श्रोते-प्रेक्षक समोर बसलेले लागायचे आणि तसे ते असायचेही. भीमसेन स्वतः बहुतेकांना ओळखायचे आणि मग गाताना त्यांच्याशी संवाद साधला जाई तो सुरांनी. इशारे होत ते डोळ्यांनी, मानेने आणि हातांनी. सर्व जण, अगदी सर्व जण मागचेसुद्धा, त्या जबरदस्त ताकदीच्या सुरांनी अक्षरशः न्हाऊन निघायचे. पूर्ण हिपनोटाईज्ड्. भीमसेनही स्वतःला विसरून, सर्व पणाला लावून जीव ओतून गायचे. त्यांचे गाणे दृकश्राव्य असायचे. त्यांची मान फिरवणे, प्रचंड हातवारे करणे, कधीकधी जवळ जवळ वाकून लोळणे व्हायचे. म्हणजे नुसते श्रवण नाही तर त्यांना पाहणे हासुद्धा प्रचंड आनंदाचा अनुभव असे. पंडितजी गाणे संपवून भरधाव वेगाने निघून जायचे. अख्खा गाव मात्र त्या दमदार सुरांमधून नऊ-दहा दिवस तरी बाहेर पडत नसे.

          काही काळ त्यांचे दुसरे लग्न किंवा ते खूप दारू पितात अशाही चर्चा व्हायच्या, पण त्यात लडिवाळपणा असे. पुढे, उतारवयात त्यांनी दारू पिणे थांबवले. पण त्यांचे गाण्यावरचे प्रेम, त्यावर सतत खूप मेहनत घेण्याची तयारी अबाधित राहिली. त्यांनी त्यांच्या करारी व्यक्तिमत्त्वाने बाकी सर्व गोष्टींवर मात केली. घनदाट जंगलात सिंह फिरतो तेव्हा कोठेतरी अंग घासतो, कोठल्या तरी झाडावर खखडून त्याचा हक्क प्रस्थापित करतो, त्याला कोणी हा असा काय खखडतोयअसे म्हणतो का? सिंहाने त्याच्या रुबाबातच जगावे, असे सगळ्यांनाच वाटते. भीमसेन हे संगीतातील तसेच शेर होते.

सर्वच जागी खूप सुधारणा 1980 नंतर होत गेली. मोठमोठे हॉल झाले, स्टेज उंचावर गेले. माईक वगैरे या सर्व यंत्रणांमध्ये आमूलाग्र बदल झाले. मग घरगुती मैफिली फारशा राहिल्या नाहीत. फियाट, अम्बॅसिडर या पंडितजींच्या लाडक्या गाड्यांच्या ठिकाणी मर्सिडिज आली. पंडितजींचे गाडी भरधाव चालवण्यावर सुरांसारखेच प्रेम होते. बुवांचे गाडीह्या विषयावरच प्रेम होते. ते मिश्किलपणे म्हणत, की गाडी चालू केल्यावर त्याच्या इंजिनाचा सूर बघून काही बिघाड आहे का हे मला लगेच समजते. दमदारपणा आणि वेग हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता.

त्यांचे अनेक परदेश दौरेही झाले. त्यांच्या मैफिलीची पोस्टर्स न्यू यॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरला लागली होती. त्या काळात पंडित रविशंकर, अल्लारखाँ ही मंडळी अर्धे वर्ष अमेरिकेत राहत आणि सहा महिने भारतात. पण भीमसेन आयुष्यभर मनाने अस्सल भारतीय राहिले. ते हसत हसत पण खोचकपणे मिश्किल हावभावात म्हणत, मी इंटरनॅशनल नाही, नॅशनल आहे!!” त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आवाका इतर कोठल्याही गायकाला जमला नाही, असा इंटरनॅशनल होता.

          आमच्या दोनचार पिढ्यांच्या संपूर्ण जाणत्या आयुष्यात, हृदयाचा एक कप्पा भीमसेन यांच्या सुरांसाठी कोरला गेला आहे. पुण्याच्या अप्पा बळवंत चौकात एच.व्ही. मेहेंदळे अँड सन्सअसे वाद्यांचे मोठे दुकान होते (आता ते बाजीराव रोड आणि टिळक रोड यांच्या कोपऱ्यावर घरीच आहे). ते माझे नातेवाईक. मी दुकान दिलीप मेहेंदळेबरोबर एका सकाळी आठच्या सुमारास उघडले व आत गेलो. साल 2000 च्या आसपास असावे. एक रिक्षा थांबली आणि चुरगळलेला नाईटड्रेस घालून चक्क पंडित भीमसेन जोशी उजव्या हातात नातवाला पकडून एकदम दुकानात हजर. त्याला बुलबुल वाजवण्यासाठी बदाम हवा होता. आम्ही दोघे उडालोच ! आदरयुक्त भीती ! दिलीपने अनेक बदाम असलेला ट्रे त्यांच्या समोर ठेवला. ते त्यातील बरा बदामनिवडताहेत आणि आम्ही म्हणजे मी त्यांच्याकडे फक्त पाहत आहे. काही सुचेना. बरं, ते मला काही ओळखत नव्हते. पण काहीतरी बोलण्याची इच्छा फार होती. मी धीर केला आणि चाचरत विचारले, अण्णा, पेणच्या वामनराव देवधरांना तुम्ही ओळखता का? मी त्यांचा मुलगा. त्यांनी डोळ्यांच्या कोपऱ्यातून करारी नजरेने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, चांगला ओळखतो, त्यांना एकदा भेटायला बोलावलंय म्हणून सांग. पुढे दोन-चार वाक्ये झाली आणि ते रिक्षात बसून निघून गेले. तो माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण, कायमचा कोरला गेला आहे.

           

 

         भीमसेनांसारखी माणसे त्यांच्या विषयात पुढे जातात, मोठी होतात की त्यांना देवत्व प्राप्त होते. सचिन तेंडुलकरबद्दल सांगतात, की त्याची बॅट बोलते. त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व बॅटने व्यक्त होते. तसाच पंडितजींचा सूर आहे. पंडीतजी व्यक्त व्हायचे ते फक्त त्यांच्या गाण्यातून. त्यांच्यावर अनेक वेळा अनेक पुढाऱ्यांबरोबर, मान्यवरांबरोबर बोलण्याचा प्रसंग यायचा, सत्काराला उत्तर म्हणून. सगळे कान टवकारायचे, कारण भीमसेनजी बोलणार! म्हणजे नेमकेच मार्मिक, काहीतरी आपल्याला मिळून जाणार अशीच त्यांची भावना असायची. पण भीमसेन माईक पकडायचे आणि धीरगंभीर आवाजात बोलायचे, अगदी हळू, “मला काही बोलता येत नाही, आज बरीच भाषणे झाली, पण गाणं झालं नाही. तुम्ही म्हणता तेवढा मी काही मोठा नाही, गुरुकृपा मात्र आहे. अजून काय, बसतो आता आणि गातो. सगळयांचा आभारी आहे” आणि मग ते गायचे. गाण्यातच, गातच साथीदारांचे आभार मानायचे, गातच, गाण्यातच कृतज्ञता व्यक्त करायचे, आपुलकी दाखवायचे, प्रेम व्यक्त करायचे, इतकेच नाही तर मनातील उद्विग्नता, चिडचिड, राग, हावभावांसकट गाण्यातच व्यक्त व्हायची. पंडितजींचे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणजेच त्यांचे गाणे. त्यांचा तो दमदार स्निग्ध सूर. पुढे वयामुळे गाणे थांबले तरी ते घरी दमदार सुरांमध्येच बसलेले आहेत असे दिसायचे.

          भीमसेन यांनी त्यांच्या गुरूच्या प्रेमासाठी पुण्यामध्ये सवाई गंधर्व पुण्यतिथीची सुरुवात केली. तो भारतातील संगीत क्षेत्रातील महत्त्वाचा महोत्सव म्हणून लोकप्रिय झाला आहे. महोत्सवाच्या प्रत्येक रात्रीच्या उत्तरार्धात पंडितजींना सवाई गंधर्वच्या मंडपात फिरताना पाहणे हे भाग्याचे लक्षण होते. त्यांचे वृद्धापकाळी व्हीलचेअरवर बसून महत्त्वाचे काही पुरस्कार स्वीकारतानाचे फोटोसुद्धा तडफदार दिसतात. त्यांच्याबद्दलची माझ्या मनातील प्रतिमा तशीच तडफदार राहिली आहे. संगीतातील ह्या मोठ्या तपस्व्याला माझा नमस्कार.

श्रीकांत देवधर +91-9423093202 02143-252078 shrikant_deodhar@yahoo.com

श्रीकांत देवधर यांनी शिल्पकलेचे शिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून 1980 साली पूर्ण केले. त्यांनी त्यांच्या वडिलांचा पेणला असलेला कल्पना कला मंदिर नावाचा मूर्तीचा कारखाना 2010 पर्यंत यशस्वीरीत्या चालवला. त्यांनी त्यात गणपतीसोबत इतरही अनेक मूर्तींची निर्मिती केली. त्यांनी डेरवणसारख्या (चिपळूण) संस्थांसाठी शिल्पकाम केले आहे. त्यांनी परदेशात तसेच भारतात शैक्षणिक संस्था आणि म्युझियममध्ये गणपतीची मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा घेतल्या, मूर्तिकला व संस्कृती या विषयांवर भाषणेही केली आहेत. त्यांचे वास्तव्य पेणला असते. ते श्री गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्षही आहेत.

———————————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here