भारतीय चित्रपटांचा वारसा

 

 

भारतीय चित्रपटांचा वारसा जिथं जिवंत होतो…

‘राजा हरिश्चंद्र’… चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेलं मोठं वरदानच. भारतीय चित्रपटसृष्टीचं 1913 साली सुरू झालेलं पर्व चित्रपट रसिकांना सतत उत्तमोत्तम कलाकृती देत आलं आहे.

विविध भाषा, प्रांत आणि संस्कृतींमुळे समृध्द होत गेलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीला काळानुरूप मिळालेली आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तिची उंची वाढवणारी ठरली. महाकाव्यांपासून अभिजात साहित्यकृतींपर्यंत आणि भावनिक विषयांपासून नवीन तंत्रज्ञानाला गवसणी घालणारे चित्रपट हे या सृष्टीचं वैभव. भारतात आज तर, दरवर्षी सुमारे एक हजार चित्रपट तयार होतात!

देशात निर्माण होणारा चित्रपटांचा हा खजिना जतन करण्याचं महत्त्वाचं काम पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे केलं जातं. पुण्यातील लॉ कॉलेज रोड परिसरात असलेल्या फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआयआय) अर्थात तेव्हाच्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या परिसरात १९६४ साली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची (नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया – एनएफएआय) स्थापना करण्यात आली. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा माध्यम विभाग असलेलं हे संग्रहालय भारतीय चित्रपटसृष्टीच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहे. पुणे हे या कार्याचं मुख्यालय असून बंगळुरू, कोलकाता आणि तिरूवनंतपुरम् अशा तीन ठिकाणी एनएफएआयची विभागीय कार्यालयं आहेत. सुमारे सहा हजार चित्रपट, दोन लाख पोस्टर्स आणि फोटोग्राफ यांचं उत्तम कलेक्शन राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आहे.

Where The Heritage of Indian Cinema Comes Alive… हे ब्रीद असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. भारतीय चित्रपटांचा इतिहास, त्यांची परंपरा, त्यांतील विविध पैलू, वैशिष्ट्ये आणि त्यातील कलेचे कंगोरे नवीन पिढीपर्यंत पोचवणे हा या संग्रहालयाचा उद्देश आहे. भारतीय चित्रपटांबरोबरच विदेशांतील, विविध भाषांमधील चित्रपट भारतीय अभ्यासकांना येथे उपलब्ध करून दिले जातात. केवळ चित्रपट नाही तर त्याच्याशी संबंधित साहित्य, फोटो, गाण्यांची बुकलेट्स आणि पोस्टर्स हे साहित्यदेखील भारतीय चित्रपटांच्या अभ्यासासाठी मोलाचं ठरत आहे. देशभरात चित्रपटविषयक संस्कृतीचा प्रसार आणि परदेशामध्ये भारतीय चित्रपटांचा प्रचार करण्याचं कार्य या विभागातर्फे केलं जातं. पुण्यातल्या लॉ कॉलेज रस्त्यावरील बॅरिस्टर जयकर बंगल्याच्या परिसरात एनएफएआयच्या कार्याचा विस्तार अधिक जोमानं झाला.

चित्रपटाशी संबंधित विषयांमध्ये संशोधन करणा-या व्यक्तींना केवळ प्रोत्साहन देण्याचं नाही तर त्यासाठी लागणारं साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम एनएफएआयतर्फे केलं जातं. चित्रपटांच्या विविध पैलूंवर आधारित उपक्रम इथं राबवले जातात. भारतीय चित्रपटांचा इतिहास हा पैलू तर अधिक प्रभावीपणे हाताळला जातो.

अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील एक पॅनल : जब्बर पटेल, मोहन आगाशे सहभाग

चित्रपटांविषयीचा अभ्यास करणारे संशोधक आणि विद्यार्थी यांच्यासाठी संग्रहालयातील चित्रपट, व्हिडिओ कलेक्शन, डॉक्युमेंटेशन विभाग आणि ग्रंथालयांची कवाडं कायमच खुली असतात. एनएफएआयच्या सुसज्ज अशा ग्रंथालयात चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलांवर आधारित पुस्तकं आणि नियतकालिकं अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत. अशा प्रकारची पुस्तकं आणि नियतकालिकं वाचकांना उपलब्ध करून देणारं देशातलं हे एकमेव ग्रंथालय आहे. इथं असलेली चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर जगभरातून प्रसिध्द झालेली सुमारे 25 हजार पुस्तकं म्हणजे अभ्यासक-वाचकांसाठीचा खजिनाच आहे. मुख्य म्हणजे अभ्यासकांच्या संदर्भासाठी बांधणी स्वरूपात करून ठेवण्यात आलेले 1920 पासूनचं सेन्सॉर रेकॉर्ड आणि 1930 पासूनचे भारतीय चित्रपटविषयक मासिकांचे बांधणी केलेले व्हॉल्युम्स, तसंच संदर्भ आणि अभ्यासासाठी महत्त्वाचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे.

संग्रहालयात असलेल्या उत्तमोत्तम फिल्म्स म्हणजे तर भारतीय चित्रपटसृष्टीचा अनमोल ठेवाच. हा ठेवा अबाधित राखण्यासाठी एनएफएआयने विशेष प्रयत्न केले आहेत. मानवी हातांचे स्पर्श, धूळ, बॅक्टेरिया आणि मुख्य म्हणजे बदलतं हवामान या सगळ्यांपासून फिल्मचं संरक्षण करणं आवश्यक होतं. 1991 पासून या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. यासाठी स्पेशल व्हॉल्ट्स तयार करण्यात आले असून त्यामध्ये या फिल्म्स जतन करून ठेवल्या जातात. योग्य आयुर्मानापर्यंत फिल्म्स टिकून राहण्यासाठी या व्हॉल्ट्सचा उपयोग होतो.

मात्र अनेक जुन्या फिल्म्स या व्हॉल्ट्समध्ये ठेवण्यापूर्वीच खराब झालेल्या होत्या. अनेक वर्षे सातत्याने वापरल्यामुळे त्यांची परिस्थिती नाजूक झाली होती. ज्या फिल्म्स अशा खराब झाल्या होत्या, खूप वेळा वापरण्यात आल्या होत्या, हाताळण्यात आल्या होत्या अशा फिल्म्सचं आयुर्मान फारच कमी झालं होतं. अशा फिल्म्स व्हॉल्ट्सच्या साहाय्यानं योग्य तापमानामध्ये ठेवून त्यांची जपणूक करणं हे आव्हानात्मक काम होतं. ब्लॅक ऍण्ड व्हाईट फिल्म्ससाठी पंधरा डिग्री सेल्सिअस तापमान आणि पन्नास टक्के आर्द्रता हे आदर्श वातावरण व्हॉल्ट्सच्या साहाय्यानं उपलब्ध करून देण्यात आलं. तर रंगीत फिल्म्ससाठी विशेष व्हॉल्ट्सद्वारे दोन डिग्री सेल्सिअस तापमान आणि चोवीस टक्के आर्द्रता असलेलं आदर्श वातावरण उपलब्ध केल्यामुळे फिल्म्सचं आयुर्मान टिकवून ठेवायला याची चांगलीच मदत होत आहे. संग्रहालयात दाखल झालेल्या नवीन फिल्म्स अशा योग्य वातावरणात ठेवल्या तर त्यांचं आयुर्मान वाढतं आणि त्या सुमारे शंभर वर्षे व्यवस्थितपणे टिकून राहू शकतात.

या फिल्म्स व्हॉल्ट्समध्ये ठेवणं इथपर्यंतच हे कार्य मर्यादित नसून वेळोवेळी त्यांची तपासणी करणंही त्यांचं आयुर्मान टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यासाठी पंधरवड्यातून एकदा या फिल्म्सची तपासणी केली जाते.

मानवी शरीराप्रमाणे या फिल्म्सची योग्य वेळी देखभाल घेणं गरजेचं असतं. अन्यथा त्याकडे केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम त्यांच्या आयुर्मानावर होतो. त्यातून स्वाभाविकपणे चित्रपटांचा हा ऐतिहासिक ठेवा लोप पावला जातो. यावर उपाय म्हणून या फिल्म्स योग्य पध्दतीनं सांभाळणं, त्यांची देखभाल करणं आणि मुख्य म्हणजे काळानुरूप त्याचं डिजिटायजेशन करणं आवश्यक झाल्यानं या कार्यास गती लाभली आहे.

फिल्म्सचं डिजिटायजेशन करण्याच्या कार्यात एनएफएआयचे संचालक विजय जाधव यांची भूमिका महत्त्वाची आहे. विजय जाधव यांनी 1 एप्रिल 2008 रोजी एनएफएआयचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला. जाधव यांच्याकडे या पदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. मात्र आपल्याला देण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचा जाधव यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी चित्रपट संग्रहालयाच्या कार्यात महत्त्वपूर्ण पावलं उचलून मोठा हातभार लावला आहे.

व्हॉल्ट्समध्ये फिल्म्स ठेवणं आणि त्यांची वेळोवेळी तपासणी करणं हे सुध्दा पुरेसं नसल्यामुळे या फिल्म्सचं डिजिटायजेशन करण्याचा उपक्रम जाधव यांनी हाती घेतला आहे. ते शिक्षणानं केमिकल इंजिनीयर आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय चित्रपटसृष्टीचा हा खजिना नवीन पिढीकडे हस्तांतरित करण्याचं कार्य याद्वारे केलं जात आहे. जाधव यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या विभागाचा अभ्यास करून भविष्यातील योजनांची आखणी केली. याकामी त्यांनी आपल्या परदेशातील मित्रांची मदत घेऊन परदेशातील चित्रपट संग्रहालयांची माहिती मिळवली. चित्रपटांचा संग्रह करण्यासाठी परदेशात वापरण्यात येणा-या पध्दती, रसायनं आणि तंत्रज्ञान यांविषयी उपलब्ध झालेले रिसर्च पेपर्स अभ्यासून सखोल माहिती करून घेतली. भारतीय व्यवस्था, आपल्याकडील वातावरण आणि उपलब्ध साधनसामग्री यांचा योग्य ताळमेळ घालून जाधव यांनी फिल्म्सचा संग्रह आणि त्याच्या डिजिटायजेशनच्या कामाला सुरुवात केली. वर्षभरात सुमारे दीडशे फिल्म्सचं डिजिटायजेशनचं, तर पन्नास फिल्म्सचं रिस्टोअरिंगचं काम पूर्ण झालं आहे. जाधव यांनी सुरू केलेलं फिल्म्सचं रिस्टोअरिंग आणि डिजिटायजेशनचं काम वेळोवेळी उपलब्ध झालेल्या निधीमुळे विनाअडथळा सुरू आहे. अधिका-यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या योग्य कामासाठी शासन निधी देण्यास उत्सुक असतं असा जाधव ह्यांचा अनुभव आहे. नोकरशाहीतला असा हा वेगळा माणूस आहे.

जाधव यांनी हाती घेतलेला आणि संग्रहालयाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेला आणखी एक उपक्रम म्हणजे फिल्म्स आणि इतर साहित्यासाठी बारकोड सिस्टिम. संग्रहालयात असलेल्या फिल्म्स आणि त्यांच्याशी संबंधित साहित्य वेळोवेळी विविध ठिकाणची फिल्म फेस्टिव्हल किंवा अन्य कार्यक्रमांसाठी पाठवलं जातं. या फिल्म्स व साहित्य यांची संग्रहालयाकडे नोंद केली जाते. मात्र ती नोंद कागदावर असल्यामुळे सर्व साहित्य वेळीच परत मिळवणं हा एक मोठा कार्यभाग असतो. शिवाय, या फिल्म्स प्रोसेस करण्यासाठी संग्रहालयाच्या विविध विभागांत पाठवल्या जातात. कोणती फिल्म कोणत्या वेळी कुठल्या विभागात आहे, हे लगेच सांगणं कठीण जातं. या दोन्हीवर उपाय म्हणून फिल्म्स आणि इतर साहित्य यांसाठी बारकोड सिस्टमचा अवलंब करण्यात येत आहे. त्यासाठीचं प्राथमिक काम सुरू करण्यात आलं असून येत्या वर्षभरात ते काम पूर्ण होईल अशी शक्यता आहे. बारकोड सिस्टिममुळे फिल्म्स व सर्व साहित्य यांची नोंद संगणकावर होऊन वेळोवेळी त्याविषयीची माहिती घेणं सहज शक्य होणार आहे. नॉर्वेमध्ये नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काइव्हिजच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विजय जाधव यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं. अनेकांनी या परिषदेत भारतीय चित्रपटांच्या जोपासनेसाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय करत असलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले, ही बाब स्वाभाविकच म्हणायला हवी.

दरवर्षी राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार मिळवणा-या फिल्म्स संग्रहालयाकडे येतच असतात. मात्र त्याशिवायच्या अनेक उत्तम फिल्म्स संग्रहालयापर्यंत पोचत नाहीत. वास्तविक या संग्रहालयात येणा-या फिल्म्सचं रिस्टोअरिंग आणि डिजिटायजेशन करण्यासाठीचा खर्च एनएफएआयतर्फे केला जातो. असं असूनही अनेक चित्रपटांचे निर्माते आणि संबंधित व्यक्ती आपल्या फिल्म्स एनएफएआयकडे पाठवण्यास उत्सुक नसतात. खरंतर एनएफएआयकडे येणा-या फिल्म्सचं रिस्टोअरिंग आणि डिजिटायजेशन तर होतंच; शिवाय, देश-परदेशात होणा-या चित्रपट महोत्सवांमधून या फिल्म्स दाखवल्याही जातात. आपल्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वाढवण्याच्या या संधीचा लाभ चित्रपटांचे निर्माते आणि संबंधित कलाकार यांनी नक्कीच घेतला पाहिजे.

भारतीय चित्रपटांचा प्रसार आणि प्रचार अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत व्हावा यासाठी एनएफएआयतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. चित्रपटक्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या स्मरणार्थ, गौरवार्थ त्यांच्यावर आधारित चित्रपट या महोत्सवांमध्ये दाखवले जातात. वेगवेगळ्या वयोगटांतील प्रेक्षकांसाठी छोट्या कालावधीचे चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात. चित्रपटांवर आधारित चर्चासत्रे, मान्यवरांशी गप्पा, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचे कार्यक्रमही होतात. चित्रपटाशी संबंधित छोट्या कालावधीचे अभ्यासक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिष्यवृत्तीही दिल्या जातात. एनएफएआयच्या परिसरात असलेलं पस्तीस खुर्च्यांच्या क्षमतेचं प्रीव्ह्यू थिएटर, तीनशेतीस आसनक्षमता असलेलं मुख्य थिएटर आणि कोथरूड परिसरातील दोनशे आसनक्षमता असलेलं सुसज्ज थिएटर ही दालनं प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादाची साक्ष देणारी आहेत. पुण्यासह अन्य ठिकाणी होणा-या एनएफएआयच्या उपक्रमांना वेळोवेळी उत्तम प्रतिसाद मिळतो, हे वेगळं सांगायलाच नको!

– ममता क्षेमकल्याणी
vidisha_mn@yahoo.co.in 
भ्रमणध्वनी : 9881736078

 

About Post Author

Previous article‘ग्रामोक्ती’
Next articleइंग्रजी भाषा – वाघिणीचे दूध? नव्हे,
ममता क्षेमकल्याणी मूळ नाशिकच्या. त्या पुण्यातील ‘विदिशा मीडिया नेटवर्क’ या माध्यम संस्थेच्या संपादक आहेत. त्यांनी बी ए आणि राज्यशास्त्र विषयात एम ए केले आहे. त्यांनी पत्रकारितेचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी विविध माध्यम संस्थांमध्ये काम केल्यानंतर पुणे येथे 2007 साली पत्रकार नितीन जळुकर यांच्या सहकार्याने ‘विदिशा मीडिया नेटवर्क’ या माध्यम संस्थेची स्थापना केली. त्या लेखक, निवेदक आणि मुलाखतकार आहेत. त्या इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी ‘मराठी भाषा वर्ग’ घेतात. लेखकाचा दूरध्वनी 9881736078