भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke)

1
33
_Dadasaheb_Phhalke_1.jpg

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणजे धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके. भारतात पहिला चित्रपट निर्माण केला तो दादासाहेब फाळके या मराठी माणसाने, म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात त्यांचे योगदान अमूल्य आहे. सिनेमाचे तंत्रज्ञान, कॅमेरा, वितरण, व्यक्तिरेखा हे शब्द माहीत नव्हते, त्या काळात दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली.

दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 ला नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गोविंदशास्त्री आणि द्वारकाबाई फाळके यांच्या घरात झाला. दादासाहेबांना दोन (मोठे) भाऊ व चार बहिणी होत्या. दादासाहेबांचे शिक्षण मुंबईला ‘मराठा हायस्कूल’मध्ये झाले. त्यांनी मॅट्रिकची परीक्षा 1885 मध्ये उत्तीर्ण झाल्यावर मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सला प्रवेश घेतला. त्यांचा पहिला विवाह 1886 मध्ये झाला. ते जे.जे.तून 1890 साली उत्तीर्ण झाल्यावर बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षणक्रम पूर्ण केला. त्याबरोबरच त्यांनी वास्तुकला व साचेकाम यांचाही अभ्यास केला. त्याच सुमारास त्यांना प्रोसेस फोटोग्राफी, त्यांवरील प्रक्रिया व हाफ्‌टोन ब्लॉ’क करणे याचा छंद जडला. कलाभवनाचे प्राचार्य गज्जसर यांच्या उत्तेजनाने त्यांना रतलाम येथे तीनरंगी ठसे बनवण्याची प्रक्रिया (थ्री कलर प्रोसेस), प्रकाश शिलामुद्रण (फोटोलिथो) व छायाचित्रण इत्यादी क्षेत्रांत प्रयोग करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर काही दिवस त्यांनी बडोदा येथे धंदेवाईक छायाचित्रकार; तसेच, रंगभूमीचे नेपथ्यकार म्हणून काम केले. त्यांना हौशी कलावंतांना अभिनय शिकवणे, त्यांची रंगभूषा व वेशभूषा करणे यांचीही आवड होती. त्यांनी अहमदाबादला 1892 मध्ये भरलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात पाठवलेल्या आदर्शगृहाच्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळाले होते. त्यांनी छायाचित्रकार म्हणून व्यवसाय गोध्रा (गुजरात) येथे 1895 साली सुरू केला होता; परंतु त्यांच्या पत्नीहचे देहावसान 1900 मध्ये प्लेकगने झाले, म्हणून ते परत बडोद्याला गेले. तेथेच, त्यांनी 1901 साली एका जर्मन जादूगाराचे शिष्यत्व पत्करले. दादासाहेबांनी जादूगार म्हणूनही किमया दाखवली आहे.

बडोद्याला त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या चाळीस जादूगारांपैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्‌झ याच्याशी ओळख झाली व त्यांच्याशी दादासाहेबांचा स्नेह निर्माण झाला. त्या जादूगाराकडून दादासाहेबांनी रासायनिक तांत्रिक, भ्रांतिकृत चमत्कार, पत्त्यांची जादू वगैरे गोष्टी शिकून घेतल्या. त्यामुळे त्यांना चित्रपटांची चमत्कृतीसाठी (ट्रिक फोटोग्राफीसाठी) उपयोग झाला; एवढेच नव्हे तर, दादासाहेब प्रोफेसर केल्फा (Phalke (फाळके) या नावाचा उलटा क्रम) नावाने जाहीर रीत्या जादूचे प्रयोग करत असत. प्रो.‘केल्फा’ यांचे जादूचे खेळ त्यांनी एका लघुपटात चित्रितही केले. ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. त्यांनी चित्रपटनिर्मिती सुरू केल्यानंतरची त्या संबंधातील एक मजेदार आठवण आहे. मुंबईला पुण्याहून जाताना खंडाळ्याच्या घाटाजवळ काही तांत्रिक दोषामुळे गाडी बराच वेळ थांबली. लोक कंटाळले होते. दादासाहेबांनी एका प्रवाशाकडून पत्त्याचा एक जोड मिळवला व त्याच्या निरनिराळ्या जादू करून त्यांची भरपूर करमणूक केली. त्यावेळी त्यांना हा जादूगार म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आहे हे कळले नसेल. त्यांनी त्यांची ओळखही करून दिली नाही. तसे ते प्रसिद्धीविन्मुख होते.

त्यांचा दुसरा विवाह 1902 मध्ये झाला. त्यांना भारत सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्यात प्रारूपकार व छायाचित्रकार म्हणून 1903 साली नोकरी लागली. त्यांना त्या फिरतीच्या नोकरीमुळे भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली. त्यांनी ‘वंगभंग चळवळी’च्या निमित्ताने त्यांच्या सरकारी नोकरीचा राजीनामा 1906 साली दिला.

त्यांनी ‘फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस (वर्क्स)’ ही संस्था 1908 साली लोणावळ्याला सुरू केली. ती पुढे दादर (मुंबई) येथे हलवली. तिचेच रूपांतर नंतर ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’ मध्ये झाले.

फाळके जर्मनीहून तीनरंगी मुद्रणप्रक्रियेचे अद्यायावत तांत्रिक शिक्षण आणि ‘रोल्टर इसाके अँड कंपनी’ची यंत्रसामुग्री घेऊन 1909 साली आले. व ‘लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’ ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. दादासाहेबांनी 1910 मध्ये ‘सुवर्णमाला’ नावाचे कलापूर्ण असे मराठी-गुजराती मासिकही सुरू केले; परंतु त्यांनी भागीदारांशी मतभेद झाल्यावर त्या व्यवसायाशी त्यांचा संबंध 1911 च्या प्रारंभी तोडून टाकला. उद्विग्न मनः स्थितीत असतानाच, मुंबईत गिरगावमधील ‘अमेरिका इंडिया सिनेमॅटोग्राफ’ या तंबूवजा चित्रपटगृहात (हल्ली तेथे हरकिसनदास हॉस्पिटल आहे) 15 एप्रिल 1911 रोजी ‘ख्रिस्ताचे जीवन’ हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यांनी स्वदेशी चित्रपटव्यवसाय त्यातून प्रेरणा घेऊन उभारण्याचे ठरवले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपटनिर्मितिविषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. त्यांना डोळ्यांवरील अतिताणाने तात्पुरते अंधत्व आले; परंतु सुदैवाने, त्यांना मुंबईचे डॉ. प्रभाकर या नेत्रविशारदाने पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली.

दादासाहेब शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे, त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच ते छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला मुद्रणकला शिकण्यासाठी जर्मनीला गेले. त्यांनी तेथे ‘लाइफ ऑफ ख्राइस्ट’ हा चित्रपट पाहिला. ते चित्रपट पाहून फार प्रभावित झाले आणि त्यांनी तसा चित्रपट रामकृष्णांवर तयार करण्याचे ठरवले. त्यांनी भारतात परतल्यानंतर चित्रपटासाठी आवश्यक अशा सर्व साहित्याचा व तंत्राचा अभ्यास केला; त्यासाठी परदेशातून येणारे सिनेमेही पाहिले. त्यांनी त्यानंतर चित्रपटतंत्रज्ञान शिकण्यासाठी मित्राकडून कर्ज काढून आणि पॉलिसी गहाण टाकून पैसे उभे केले आणि ते इंग्लंडला 1912 मध्ये गेले. त्यांनी भारतात परतल्यावर चित्रपटनिर्मितीसाठीची आवश्यक ती यंत्रसामुग्री आणली व राहत्या घरातच स्टुडिओ उभारला. दादासाहेब फाळके यांनी ‘रोपट्याची वाढ’ हा लघुपट 1912 मध्येच तयार केला. त्यानंतर ते मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले.

त्यांना ‘रोपट्याची वाढ’च्या प्रयोगानंतर पैशांची खूप चणचण चित्रपट निर्माण करण्यासाठी भासत होती. त्यांनी पत्नीचे अलंकार गहाण ठेवून पैसे उभे केले. दादासाहेबांच्या पत्नीने त्यांना भक्कम साथ दिली. त्यांनी स्वतःच चित्रपटासाठी लेखक, रंगभूषाकार, संकलक, कलादिग्दर्शक या भूमिका पार पाडल्या. त्यांच्या चित्रपटासाठी त्यांना स्त्रीकलावंतही मिळू शकली नाही. अशा अडचणी असूनही फाळके यांनी मुंबई येथील दादरच्या प्रमुख मार्गावर त्यांचे चित्रपटनिर्मितिगृह सुरू केले आणि भारताचा पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ सहा महिन्यांत पूर्ण करून, तो मुंबईच्या कोरोनेशन थिएटरमध्ये 3 मे 1913 रोजी प्रदर्शित केला. तो चित्रपट एकूण तेवीस दिवस चालला. दादासाहेब स्वतः एक पडदा व प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात आणि त्यांच्या चित्रपटांचे खेळ प्रेक्षकांना दाखवत. फाळके यांना ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर परदेशी संस्थानी दिग्दर्शक म्हणून काम करण्यासाठी निमंत्रण दिले, पण दादासाहेबांनी ते नाकारले व भारतातच राहणे पसंत केले.

पौराणिक चित्रपटासाठी योग्य अशी देवळे, घाट, लेणी व वाडे; तसेच, नैसर्गिक परिसर नाशिकला असल्याने, दादासाहेबांनी 3 ऑक्टोबर 1913 रोजी मुंबईहून नाशिकला स्थलांतर केले. ‘राजा हरिश्चंद्रा’नंतर दादासाहेबांनी ‘मोहिनी भस्मासूर’ या चित्रपटाची निर्मिती केली व तो 1914 च्या जानेवारीत कोरोनेशन सिनेमामध्ये प्रदर्शित केला. त्या चित्रपटासोबत ते ‘पिठाचे पंजे’ हा एक विनोदी लघुपटही दाखवत.

त्यांनी दोन चित्रपटांच्या निर्मितीनंतर , ‘सत्यवान-सावित्री’, ‘कालियामर्दन’, ‘गंगावतरण’ अशा काही चित्रपटांची निर्मिती केली. त्यांचे ‘श्रीकृष्णजन्म’ आणि ‘लंकादहन’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘लंकादहन’ या चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले. त्यांनी लहान मुलांसाठी माहितीपट व लघुपट सर्वप्रथम तयार केले. दादासाहेबांनी सुमारे शंभर मूकपटांची निर्मिती केली. फाळके 1914 मध्ये लघुपट-व्यंगपटांकडे वळले. त्यांनी दोन वर्षांत, ‘आगकाड्यांची मौज’, ‘नाशिक-त्र्यंबक येथील देखावे’, ‘तळेगाव काचकारखाना’, ‘केल्फाच्या जादू’, ‘लक्ष्मीचा गालिचा’, ‘धूम्रपान लीला’, ‘सिंहस्थ पर्वणी’, ‘चित्रपट कसा तयार करतात’, ‘कार्तिक-पौर्णिमा उत्सव’, ‘धांदल भटजीचे गंगास्नािन’, ‘संलग्न रस’, ‘स्वप्नविहार’ हे माहितीपर आणि शैक्षणिक लघुपट तयार केले. त्यामुळे अनुबोधपटांच्या जनकत्वाचाही मान त्यांच्याकडेच जातो.
त्यांनी भांडवल उभारण्याच्या दृष्टीने लहानमोठ्या संस्थानिकांच्या भेटी घेतल्या. औंध व इंदूर संस्थानांकडून देणगीच्या रूपाने आणि इतर स्नेंह्यांकडून कर्जाऊ स्वरूपात आर्थिक साहाय्य घेतले व त्यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट 3 एप्रिल 1917 रोजी नव्याने पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रदर्शित केला. तसेच, ‘लंकादहन’ हा चित्रपटही त्याच वेळी तयार करून, तोही त्यांनी 19 सप्टेंबर 1917रोजी प्रदर्शित केला. तो चित्रपट भारतभर लोकप्रिय ठरला.

दादासाहेबांचे ते यश पाहून त्यांची आर्थिक विवंचना कायमची मिटावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला व शेठ मोहनदास रामजी आणि शेठ रतन टाटा इत्यादींच्या आर्थिक साहाय्याने पाच लाख रुपये भांडवल उभे करून ‘फाळकेज फिल्मल लिमिटेड’ ही संस्था उभारण्याची योजना निश्चित केली; परंतु ती कार्यान्वित होऊ शकली नाही. तथापी ‘कोहिनूर मिल्स’चे वामन श्रीधर आपटे, माया शंकर भट्ट, माधवजी जयसिंग व गोकुळदास दामोदरदास या भांडवलदारांच्या भागीदारीत 1 जानेवारी 1918 रोजी ‘फाळकेज फिल्मस’चे रूपांतर त्यांनी ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ मध्ये केले व त्याच वेळी त्यांच्या कल्पनेत 1914 पासून असलेले कायमचे चित्रपटनिर्मितिगृहही नाशिक येथे उभारले. त्या संस्थेचे श्रीकृष्णजन्म (ऑगस्ट 1918) व कालिया मर्दन (मे 1919) हे फाळके दिग्दर्शित दोन्ही चित्रपट यशस्वी ठरले; परंतु त्या चित्रपटानंतर दादासाहेबांचे इतर भागीदारांशी मतभेद सुरू झाले. म्हणून ते सहकुटुंब मनःशांतीसाठी काशीला 1919 अखेर निघून गेले. तेथील वास्तव्यात त्यांनी ‘रंगभूमी’ हे नाटक लिहून काढले.

त्यांनी लोकमान्य टिळक व दादासाहेब खापर्डे यांनाही त्यातील काही प्रवेश ऐकवले. तथापी, दोन भागांत सादर केल्या जाणाऱ्या त्या सात अंकी नाटकाला व्यावसायिक यश मात्र मिळू शकले नाही. दादासाहेब ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’च्या भागीदारांशी तडजोड होऊन त्यांनी निर्मितिप्रमुख व दिग्दर्शक म्हणून 1922 साली कामाला पुनश्च सुरूवात केली. त्यांनी त्या संस्थेसाठी ‘महानंदा’ (1923) सारख्या दर्जेदार अशा एकूण अडतीस चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 1918 ते 1934 या सोळा वर्षांच्या काळात ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी’ने एकूण सत्त्याण्णव चित्रपट काढले. त्यांत फाळकेदिग्दर्शित चाळीस चित्रपट होते. तसेच, दादासाहेबांनी त्या संस्थेसाठी ‘गंधर्वाचा स्वप्निविहार’, ‘खंडाळा घाट’, ‘विंचवाचा दंश’, ‘विचित्र शिल्प’, ‘खोड मोडली’, ‘वचनभंग’ इत्यादी लघुपटही दिग्दर्शित केले.

दादासाहेब फाळकेदिग्दर्शित ‘सेतुबंधन’ हा ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’चा अखेरचा चित्रपट. दादासाहेबांचा स्वत:चा ‘गंगावतरण’ हा शेवटचा चित्रपट १९३७ साली प्रदर्शित झाला. ते काळाच्या पडद्याआड 16 फेब्रुवारी 1944 रोजी गेले.

दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिनेक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंताला ‘दादासाहेब फाळके’ या नावाच्या भारत सरकारच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात येते. चित्रपटसृष्टीची पंढरी आणि रूपेरी-चंदेरी दुनिया म्हणून मुंबईची चित्रनगरी अर्थात फिल्मसिटीला ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’ असे नाव सार्थपणे देण्यात आले आहे.

– नितेश शिंदे
niteshshinde4u@gmail.com

आधार: दादासाहेब फाळके – जया दडकर आणि महाजालावरून

(हा दादासाहेब फाळके यांच्यावरील लेख नसून त्यांच्या कार्याची  ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने घेतलेली नोंद आहे. ‘थिंक महाराष्ट्र’ लवकरच विस्तृत लेख प्रसिद्ध करेल. वाचकांना दादासाहेब फाळके यांच्यावर लेख लिहायचा असल्यास  ‘थिंक महाराष्ट्र‘ला संपर्क साधावा.)

About Post Author

1 COMMENT

  1. Sincere thanks for your…
    Sincere thanks for your article . We look forward to your well researched fact-based full length article in coming weeks.
    …Dr Sudhir Tare,
    Dadasaheb Phalke International Awareness Mission

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here