भाऊबीज (Bhaubij)

0
88

कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण भावाला तिच्या घरी जेवायला बोलावते आणि त्याला ओवाळते. त्या प्रसंगी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून द्रव्य (पैसे), वस्त्र किंवा एखादी वस्तू प्रेमाने देतो. भाऊबीज हा सण दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; वस्तुत: तो एक वेगळा सण आहे.

          द्वितियेचा चंद्र (ज्योतिष) आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या (चंद्राच्‍या) कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो‘, ही त्यामागची भावना आहे.

          पुराणातल्‍या कथेप्रमाणे त्या दिवशी यमराज त्याची बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला. म्हणून त्‍या दिवसाला यमद्वितिया म्हणूनही संबोधले जाते. त्या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे; सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे असे सांगितले आहे.

          भाऊबिजेसंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत, त्यांतील दोन कथा पुढीलप्रमाणे

          1. एक दिवस यमाने त्याच्या दूतांना आज्ञा केली, की ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या. यमदूत तशा व्यक्तीचा शोध घेत पृथ्वीवर फिरू लागले. एका बहिणीला ती बातमी कळली. तिच्या भावाला अद्यापपर्यंत कोणीही शिवी दिली नाही हे तिला माहीत होते. मग ती तिच्या भावाच्या संरक्षणासाठी त्याला शिव्या देत रस्तोरस्ती फिरली व त्याच्या घरी गेली. तिच्या माहेरच्या माणसांना वाटले, की तिला वेड लागले असावे. पण तिने वस्तुस्थिती सांगताच, सर्वांनी तिचे कौतुक केले. मग भावाने बहिणीला ओवाळणी घातली. तो दिवस कार्तिक द्वितियेचा होता. त्या दिवसापासून भाऊबीजेचा सण सुरू झाला.

          2. या दिवशी यमराज त्याची बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो व त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.

          यमद्वितीया हे एक व्रतही आहे. यात यमधर्म, यमदूत, चित्रगुप्त, मार्कंडेय आणि पितर यांचे पूजन करायचे असते. श्रावण, भाद्रपद, आश्विन व कार्तिक महिन्यांतील शुद्ध द्वितीयांना अनुक्रमे चुलतबहीण, मामेबहीण, आते-मावसबहीण आणि सख्खी बहीण यांच्या हातचे अन्न घ्यायचे असते.

          उत्तरप्रदेशातील स्त्रिया त्या दिवशी दारावर कावेने भाऊ-भावजय यांच्या प्रतिमा काढून त्यांची पूजा करतात. मग बाहेर अंगणात शेणाने चौकोन सारवून त्याच्या चारही कोनांवर चार व मध्ये एक अशा पाच शेणाच्या बाहुल्या मांडतात. त्यांच्यापुढे जाते, मडके, चूल इत्यादी वस्तू शेणाच्याच करून ठेवतात. मग त्यांची पूजा करतात. त्यानंतर पूजा करणारी स्त्री मुसळ जमिनीवर आपटून म्हणते, की जो कोणी माझ्या भावाचा द्वेष करील, त्याचे तोंड मी मुसळाने फोडीन.

          ब्रजमंडलात भाऊबीजेचा (यमद्वितीया) दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानतात. त्यासाठी तेथे लाखोंच्या संख्येने यात्रा भरते. तेथील स्नानोत्सव सर्वांत मोठा उत्सव होय. त्या दिवशी यमुनेबरोबर यमाचीही पूजा होते.

आशुतोष गोडबोले

————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here