बैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना

0
242

शंभर वर्षांपूर्वी घोडागाडी, बैलगाडी चालवण्यासाठी परवान्याची सक्ती होती. तो परवाना जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सहीने दिला जाई. तसेच, घरात रेडिओ लावण्यासदेखील परवाना आवश्यक होता. त्याचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागे…

घरात रेडिओ लावण्यासही परवाना तीस-पस्तीस वर्षांपर्यंत लागे. ‘एरियल’,घरात रेडिओवर सिग्नल प्राप्त करण्यासाठी लावावी लागे. ती दोन-अडीच इंच रुंदीची, पाच-साडेपाच फूटांची जाळीदार तारेची पट्टी असे. रेडिओसाठी परवाना शुल्काचे पुस्तक असे. ते रेकॉर्ड पोस्टात राही. पोस्टाच्या बचत पुस्तकासारखे. दरवर्षीचे ठरावीक परवाना शुल्क असे. ते पोस्टात भरावे लागे. त्या पुस्तकावर तसा शिक्का असे. असे आठ रुपयांचे वार्षिक परवाना शुल्क भरून, पोस्टातून शिक्का मारून आणलेल्या ‘परवाना पुस्तका’चे छायाचित्र सोबत.

बैलगाडी आणि घोडागाडी (टांगा) रस्त्यात चालवण्यासही परवान्याची सक्ती शंभर वर्षांपूर्वी होती ! रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का वाहन चालवण्याच्या परवान्यावर असतो. परवान्याचे दर पाच वर्षांनी नुतनीकरण करावे लागते. शंभर वर्षांपूर्वी परवाना जिल्हा पोलिस प्रमुखांच्या सहीने (सहीच्या शिक्क्याने नव्हे) दिला जाई. त्याचे दरवर्षी नुतनीकरण करावे लागे.

तुकाराम हरी चव्हाण, राहणार सांगली यांना 9 ऑगस्ट 1920 रोजी मिळालेला बैलगाडी चालवण्याचा परवाना लेखासोबत दर्शवला आहे. ते गृहस्थ सांगलीतील ‘हनुमान ड्रेसेस’चे मालक होते. परवाना क्रमांक 299 आहे. तो दोन बैलांच्या गाडीसाठीचा आहे. त्यावर दोन्ही बैलांच्या रंगांची आणि वयाचीही नोंद आहे ! बैलगाडीत चालवणाऱ्याखेरीज चार उतारूंना बसण्याची आणि जास्तीत जास्त ऐंशी पौंड वजनाचा माल वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परवाना फी एक रुपया आहे. त्याची मुदत 31 डिसेंबर, 1920 पर्यंत आहे; तशी नोंदही आहे.

जर ही बैलगाडी प्रवासी वाहतुकीसाठी वापरली तर प्रवाशांकडून भाड्याच्या स्वरूपात रक्कम किती घ्यावी त्याचे दरपत्रकही जिल्हा पोलिस प्रमुखांनी ठरवून दिलेले आहे. एका बैलाच्या अगर एका घोड्याच्या गाडीचा दर वेगळा आहे आणि दोन बैलांच्या अगर दोन घोड्यांच्या गाडीचा दर वेगळा आहे. अंतरानुसार तो निरनिराळा आहे. बैलगाडी अगर टांगा भाड्याने चालवण्यास दिला तर तासानुसार किती भाडे आकारावे तेही नमूद केले आहे.

सांगली बस स्थानकापासून बुधगाव, हरिपूर, मिरजशिरोळ, नरसोबावाडी, सांगली स्टेशन, माळ बंगला (स्वानंद भुवन पॅलेस), सांगली हायस्कूल, खण बंगला (मोतिबाग हे जिल्हाधिकारी निवासस्थान) येथपर्यंत प्रवासी वाहतूक चालत असावी.

परवान्याच्या मागील बाजूस परवाना शुल्क तक्ता, माल वाहून नेण्याची क्षमता आणि वाहतुकीची नियमावली दिलेली आहे. एकंदरीत बारा नियम आहेत. वाहन चालवताना तो परवाना जवळ ठेवावा आणि तो स्वच्छ असावा याची जाणीव करून दिलेली आहे. प्रवासी संख्या मोजताना कडेवरील मुलांस मोजणीत धरू नये आणि बारा वर्षांखालील दोन मुले मिळून एक इसम समजावा असेही सांगितले आहे. चालक हा नीटनेटक्या पोषाखात असावा, त्याने नशापाणी केलेले असू नये अशी ताकीदही दिलेली आहे. रात्रीच्या वेळी बैलगाडीस आणि टांग्यास ठळक ज्योतीचे दिवे लावले पाहिजेत. परवाना दिलेल्या दोन घोड्यांच्या गाडीस जुंपलेली घोडी अठ्ठेचाळीस इंचापेक्षा कमी उंचीची असू नयेत आणि ती गाडी एका घोड्याची असेल तर घोड्याची उंची पन्नास इंचांपेक्षा कमी असू नये असाही नियम नोंदला आहे.

हा परवाना गहाळ झाला तर दुसरा परवाना पूर्ण शुल्क भरून दिला जाई. त्याचीही नोंद आढळते. असे बारा नियम होते.

– सदानंद कदम 9420791680 kadamsadanand@gmail.com

(‘सदर – प्रतिबिंब’, सकाळ, सांगली आवृत्तीवरून उद्धृत-संपादित-संस्कारित 26 सप्टेंबर 2022)

—————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here