बेळगावचे पुस्तकवेडे शंकर चाफाडकर

2
63

शंकर चाफाडकरबेळगाव या गावाबद्दल प्रेम वाटायची कारणे लिहायची म्हटले, तर ती यादी मोठी होईल. एक जीएंनी त्यांचे पुस्तकच त्या गावाला मोठ्या डौलदार शब्दांत अर्पण केले आहे. शिवाय बेळगावची हवा, बेळगावचा कुंदा, बेळगावी अगत्य पर्सोनिफाइड असे मी म्हणतो ते परममित्र श्रीवल्लभ उपाध्ये, बेळगावचा तरुण भारत आणि किरण ठाकुर यांचा लोकमान्य परिवार, अशोक याळगी या पुस्तकवेड्याचे लोकमान्य वाचनालय… यादी वाढत जाईल. त्या यादीत एक नाव नुकतेच अॅड झाले. बेळगावचे अचाट ग्रंथप्रेमी शंकर चाफाडकर!

आयुष्यभर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये सैनिकगिरी करणा-या शंकररावांनी निवृत्तीनंतर त्यांच्‍या छंदासाठी काय काय केले आहे ते पाहिले तर थक्क व्हायला होते. त्यांचे वय आहे केवळ शहात्तर. त्यांचे घर केवळ पुस्तकांनी भरले आहे आणि त्यांच्या चार खोल्यांच्या फ्लॅटमध्ये फक्त एक पलंग त्यांना राहायला पुरतो; बाकी सर्वत्र पुस्तके आणि पुस्तकांविषयी खूप काही आहे. मी ‘ललित’मध्ये प्रश्नामंजुषा सुरू केली आणि दुस-याच महिन्यात बेळगाववरून दोघा-तिघांच्या उत्तरपत्रिका आल्या. त्यांत एक नाव शंकर चाफाडकर हे होते. पुढे दरमहा ती तीन-चार नावे हमखास असत. बेळगाव बक्षिसांच्या यादीत कायमच आघाडीवर असे. लोकमान्य ग्रंथालयाच्या अशोक याळगींचा एकदा फोन आला. सांगत होते, “तुमच्या प्रश्नमंजूषेसाठी आम्ही ‘ललित’ची वाट बघत असतो. अंक आला की आम्ही ग्रंथालयात जमतो आणि मग आमची धमाल शोधयात्रा सुरू होते. त्यात आमचे शंकर चाफाडकर आघाडीवर असतात.” मग चाफाडकरांचाही फोन आला. उत्साहाने भरभरून बोलत होते. पुढे तर एक दिवस अचानक एक भलेमोठे कूरिअर आले. त्यात शंकररावांनी मागच्या शतकाच्या पूर्वार्धात छापलेली काही अतिशय दुर्मीळ पुस्तके मला भेट म्हणून पाठवली होती.

मग मी त्यांच्या घरी गेलो. शंकरराव मात्र विनय, नम्रता आणि अगत्य यांचे टोक आहेत. घरात इकडून तिकडे अचाट उत्साहाने नाचत एकेक पुस्तक कुठून कुठून शोधून आणत, भल्यामोठ्या पुस्तकातील नेमके पान काढून मला एखादा परिच्छेद, एखादी ओळ वाचून दाखवत. सध्या शंकररावांना वेड लागले आहे ते ‘बुक्स ऑन बुक्स’ या प्रकारच्या ग्रंथांचे. त्यांनी त्या विषयावरील अनेक मोठमोठाले इंग्रजी ग्रंथ वेगळ्या विभागात ठेवले आहेत. नुसते ‘पुस्तकचोर’ या विषयावरील कितीतरी ग्रंथ… आणि वर उत्साहाने पुस्तके आणून त्याबद्दल भरभरून बोलत होते. सांगत होते, ‘या चोराने बरं का, अमेरिकेतील जवळजवळ सगळ्या प्रांतातील शेकडो लायब्र-यांमधून पुस्तके चोरून जो मोठा संग्रह केला त्यात 23,900 पुस्तके होती…’ एकदा बोलू लागले, की चाफाडकरांना किती सांगू अन् किती नको असे होते.

शंकररावांनी लग्न वगैरे फंदात न पडणे तसे साहजिकच होते. इतक्या छांदिष्ट वादळाला कोण आवरणार? सबंध घरभर त्यांच्या छंदाची चिन्हे दिसतात. सगळ्या भिंती पुस्तकाची कपाटे, साहित्यिक-संगीतकार-शास्त्रज्ञांची चित्रे, शेकडो बुकमार्क्सचा संग्रह, कात्रणे, आवडलेल्या वचनांची त्यांच्या स्वत:च्या हस्ताक्षरात केलेली पोस्टर्स, … सगळ्याचे वर्णन करणे अशक्य आहे.

त्यांनी तो अचाट संग्रह सौंदर्यपूर्ण रीतीने, निगुतीने सांभाळला आहे. ते प्रत्येक पुस्तकाला, कात्रणाला स्वत: प्लॅस्टिक कव्हर घालतात. त्यासाठी भल्यामोठ्या पॉलिस्टर शीटचे गठ्ठे, पुस्तकांना नीट ठेवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या वस्तू एका कोप-यात ठेवलेल्या. जिकडे तिकडे कसल्या तरी (आल्यासारख्या दिसणा-या) मुळ्या पसरलेल्या दिसत होत्या. म्हणालो, हा आणखी कसला छंद? त्यावर लगेच एका कपाटातून टिकेकरांचे ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ हे पुस्तक काढून त्यातील विशिष्ट पान काढून दाखवत मला म्हणाले, टिकेकरांमुळे मला हे कळले. वेखंडाच्या मुळ्या ठेवल्या, की वाळवी, झुरळे इतकेच काय मुंग्यादेखील अजिबात फिरकत नाहीत. तोवर दुसरेच एक मोठे इंग्रजी पुस्तक काढून त्यातील वाळवीचा फोटो आणि वाळवी नेमकी कशी पुस्तके खराब करते याचे शास्त्रीय विवेचन सुरू… त्या माणसाला कशाकशात रस आहे त्याची यादी करणे अशक्य आहे.

माझा बेळगाव भेटीत मुक्काम असल्यामुळे दोन दिवस चाफाडकरांच्या घराला निवांत भेट देता आली. मन तृप्त झाले… बेळगावविषयी प्रेम वाटावे याच्या कारणांची यादी मोठी आहे, आणि ती वाढतच आहे!

शंकर चाफाडकर – 09901101920

– संजय भास्कर जोशी (फेसबुकवरून लेख संक्षिप्त)

About Post Author

Previous articleआनंद शिंदे – सागर-संपत्तीचा अनमोल खजिना
Next articleअरुण साधू – स्थित्‍यंतराच्‍या युगाचा लेखक
संजय भास्‍कर जोशी हे संजय भास्कर जोशी हे मराठीतले आघाडीचे कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. जोशी हे मूळचे एक उच्चपदस्थ कॉर्पोरेट अधिकारी. त्‍यांनी अनेक वर्षे मोठ्या पदावर कामे केली. ते आयडिया कंपनीत असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट असताना वयाच्या 43 व्या वर्षी त्‍यांनी पूर्णवेळ वाचन आणि लेखन करण्‍याकरता नोकरी सोडली. जोशी यांची 'नचिकेताचे उपाख्यान', 'रेणुका मृणालची उपाख्याने',' श्रावणसोहळा' या कादंबर्‍या, 'स्वप्नस्थ' आणि 'काळजातीला खोल घाव' हे कथासंग्रह, तसेच, 'आहे कॉर्पोरेट तरी' हे आत्मचरित्रपर पुस्तक अशी साहित्‍यसंपदा आहे. त्यांच्‍या लेखनाला दोन वेळा राज्य सरकारचा पुरस्‍कार प्राप्‍तझाला आहे. त्‍यांनी जे.डी सॅलिंजर यांच्या 'कॅचर इन द राय' या कादंबरीचा अनुवाद केला असून अंतर्नाद, अनुभव, ललित, म टा , लोकसत्ता वगैरे नियतकालिकात विपुल समीक्षा लेखन केले आहे. वाचन आणि वाचनसंस्कृती यांच्या वृद्धीसाठी ते अनेक प्रकल्प चालवत असतात. साधना साप्ताहिकात त्यांची 'संजय उवाच' व 'पडद्यावरचे विश्वभान' ही सदरे लोकप्रिय झाली. लेखकाचा दूरध्वनी 9822003411

2 COMMENTS

  1. फारच छान लेख! एकदम वेगळे
    फारच छान लेख! एकदम वेगळे व्यक्तिमत्व..

  2. फारच सुंदर लेख. बेळगावच्या
    फारच सुंदर लेख. बेळगावच्या भेटीत मलाही चाफाडकरांचं ग्रंथालय पाहण्याचं भाग्य लाभलं. दोन तास पुस्तकांच्या सहवासात कसे गेले कळले नाही. बेळगावमधील आवर्जून पाहावी अशी जी काही ठिकाणं आहेत त्या पैकी एक म्हणजे चाफाडकरांचं ग्रंथालय.

Comments are closed.