प्रीतिसंगम (Pritisangam)

1
124
_Pritisangam_1.jpg

कराड (सातारा जिल्हा) येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. त्या ठिकाणास प्रीतिसंगम असे म्हटले जाते. कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या व सातारा जिल्ह्याच्याही शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत यशवंतराव चव्हाण यांचा वाटा मोठा आहे. यशवंतराव हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र. त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द गाजली, यशस्वी ठरली. त्यांच्याकडे सांस्कृतिक जाण होती, विकासात्मक दूरदृष्टी होती. यशवंतराव चव्हाण यांची समाधी प्रीतिसंगमावर आहे. समाधी उघड्यावर असून मुक्त आहे. तिच्यावर छत्र नाही. चावडी चौक परिसरातील मनोरे, सोमवार पेठेतील भुईकोट किल्ला आणि त्याच परिसरातील नकट्या रावळाची विहीर यामुळे आजही कराडचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे. बहामनी राजवटीत कराडला भुईकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले. बुरुज त्या किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष देत उभे आहेत.

प्रीतिसंगम हे उद्यान साडेपाच एकर जागेत आहे. उद्यानाच्या सर्व बाजूंनी भक्कम असे कंपाऊंड करण्यात आलेले आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराकडून समाधीकडे जाण्यासाठी पंधरा फूट रुंदीचा रस्ता आहे. त्याच्या दुतर्फा पाच फूट रुंदीचे ‘फ्लॉवर बेड’ तयार करण्यात आले आहेत. त्याच्या दोन्ही बाजूंस सिल्व्हर ओकची झाडे लावलेली आहे. रस्त्याच्या दक्षिणेस विस्तीर्ण पटांगणामध्ये अद्ययावत उद्यान तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये विशिष्ट आकार असणारे गोलाकार, नागमोडी वळणे असलेले रस्ते आहेत. बाकीच्या भागामध्ये विस्तीर्ण अशी हिरवळ तयार करण्यात आली आहे. तेथे झाडे लावताना ती विशिष्ट आकार व विशिष्ट ॠतूत फुलांचा बहार असणारी अशी निवडण्यात आली आहेत. त्यामध्ये शिरीष, कांचन, बहावा, कौशिया, बॉटल, ब्रश, गुलमोहर, पांगारा, सिंगापूर चेरी, चिचकारी अशी वैशिष्ट्यपूर्ण झाडे आहेत.

उद्यानामध्ये विद्युत प्रकाशाची योजना विशिष्ट प्रकारची करण्यात आली आहे. उद्यानाच्या दक्षिण बाजूला पंतकोटाच्या तिरक्या भागावर निलगिरीची झाडे लावलेली आहेत. त्यामुळे तो भाग हिरवी भिंत असल्यासारखा भासतो. उतार संपल्यानंतर रिटेनिंग वॉल व उतारामध्ये विविध फुलांची लहान लहान रोपे लावण्यात आली आहेत. बागेच्या विस्तीर्ण जागेमध्ये काही ठिकाणी विशिष्ट आकाराच्या झगमगत्या कांरज्यांची योजना केलेली आहे.

_Pritisangam_3.jpgकराडचा प्रीतीसंगम म्हणजे निसर्गाची कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा आणि दक्षिणेहून येणारी कोयना, दोघी अगदी आमने-सामने येऊन एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावातील नाही. पण कराडचा प्रीतीसंगम मात्र त्याला अपवाद आहे असे म्हंटले तर कृष्णा आणि कोयना सख्या बहिणीच. महाबळेश्वर दोघींचेही उगमस्थान आहे.

कृष्णा-कोयनेचा संगम हा पवित्र मानला जातो. प्रीतिसंगमाच्या जवळ कृष्णामाई या कराडच्या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. तेथील वातावरण शांत असल्यामुळे तेथे संध्याकाळच्या वेळी लोक गर्दी करतात. ते कराडचे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.

तेथेच ‘नकट्या रावळाची विहीर’ आहे. कराडचा ऐतिहासिक वारसा याच नकट्या रावळाची विहिरीमुळे सोमवार पेठेतील पंताच्या कोट परिसरात टिकून असल्याचे पाहण्यास मिळते. तेथील भुईकोट किल्ल्यात अप्रतिम अशी ती पायविहीर आहे. तिला नकट्या रावळ्याची विहीर असे म्हणतात. बाराव्या शतकातील शिलाहार राजवटीत बांधलेली ती विहीर कोटाच्या पश्चिम टोकाला कोयनेच्या पात्रात असून सुमारे पंचाहत्तर फूट उंचीवर आहे. विहिरीची लांबी एकशेवीस बाय नव्वद फूट आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍यांच्या चोहोबाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो. मुख्य विहीर अकराशेअकरा चौरस मीटरची आहे. तिच्या ईशान्य बाजूचा भाग थोडा गोलाकार दिसतो. एकूण ब्याऐंशी पायऱ्या असून प्रत्येक वीस पायर्‍या संपल्यावर मोठी पायरी म्हणजे थांबण्याची जागा आढळते. पायर्‍यांच्या अखेरीस दोन दगडी खांब असून त्यावर सुरेख कमान दिसते. विहिरीचे बांधकाम रेखीव अशा चिऱ्यांचे आहे. ते चुन्यात घट्ट केले आहे. बांधकामामध्ये ठरावीक अंतरावर पाणी सोडले जात असावे, त्यामुळे तिची खोली कोयनेच्या पात्राइतकी असावी. अनेक मजल्यांच्या विहिरीचा उपयोग पाणी पुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी करत असावेत, अशी नोंद गॅझेटियरमध्ये पाहण्यास मिळते.

_Pritisangam_2.jpgविहिरीतील घडीव दगडांच्या प्रशस्त पायर्‍या संपल्यानंतर दोन मोठे दगडी स्तंभ असून त्यावर कमान आहे. कमानीत दोन उपमार्ग आहेत. विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद आहे. राष्ट्रीय स्मारकात आठ प्रकारच्या वर्गवारी असून त्यातील सातव्या वर्गवारीत या विहिरीचा समावेश असल्याचे सांगितले जाते. विहिरीची देखभाल; तसेच, तिची डागडुजी करण्याचा प्रयत्न स्थानिक लोकांनी केला होता. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने उपाययोजना 2005 नंतर करत त्या परिसरात काही निर्बंध घातले आहेत. मात्र, तत्पूर्वीच काही बांधकामे त्या परिसरात झाली आहेत. विहीर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे वर्ग झाल्यानंतर तिच्या डागडुजीचे काम करण्यात आले आहे. त्याचबरोबर विहिरीसभोवताली भिंती घालण्यात आल्या असून प्रवेशव्दाराला ग्रील व लोखंडी दरवाजा बसवण्यात आला आहे. नकट्या रावळाची विहीर हे नाव तेथील राजाच्या नावावरून पडले असावे असे म्हटले जाते.

चौऱ्याऐंशी चौरस मीटर क्षेत्रावर कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगम परिसरातील भुईकोट किल्ला थोरल्या शाहू महाराज यांच्या राजवटीत प्रतिनिधींच्या ताब्यात गेला. किल्ल्याच्या तटबंदीचे काही अवशेष भग्नावस्थेत आहेत. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. किल्ल्यातील प्रतिनिधींचा वाडा म्हणजे मराठाकालीन वास्तुशैलीचे अप्रतिम उदाहरण होते. वाड्याच्या दक्षिणेस दोनशे एकोणसाठ मीटर लांब-रुंद व चार मीटर उंच असा दरबार हॉल होता. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन स्वतंत्र दालने होती व पूर्वेस भवानीदेवीची छत्री. मंदिरातील मूर्तीचे मूळ अधिष्ठान हे तेराव्या शतकातील असावे. दरबाराच्या तक्तपोशीवर जाळीदार नक्षीकाम होते. परशुराम निवास प्रतिनिधींच्या मातोश्री काशीबाई यांनी या वास्तूच्या बांधकामास 1800 च्या सुमारास सुरुवात केली व वडिलांनी ते काम पूर्ण केले. किल्ल्याच्या परिसरात स्लॅबची घरे, इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळेच किल्ला तेथे होता का? हा प्रश्न उभा राहतो. कोयना पात्रालगतची तटबंदी 1875 च्या महापुरात नष्ट झाली असावी असे सांगितले जाते. विहिरीचे अस्तित्व कायम आहे. मात्र भुईकोट किल्ला जवळपास नामशेष झाला आहे.

(नकट्या रावळाची विहीर ही माहिती महाराष्ट्रातील मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे, फेसबुक आणि ‘पुढारी’ वर्तमानपत्र सातारा आवृत्ती यांमधून)

– माहिती संकलक : नितेश शिंदे

About Post Author

1 COMMENT

  1. लेख छान आहे, विहिरीला…
    लेख छान आहे, विहिरीला नाकाट्या रावळाची विहीर का म्हणतात ते सांगता येईल का ?

Comments are closed.